चोरीला गेलेला मोबाईल परत मिळेल, पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरीला गेलेला मोबाईल परत मिळेल, पण...}

फोन करणे असो की इंटनेटवर सर्चिंग सर्व कामे मोबाईलवर सहजरित्या व्हायची, महत्त्वाची डॉक्युमेंट त्याच्यामध्ये सेव्ह आहेत, ऑफिसचीही सर्व काम त्यावरच अवलंबून. मात्र, मोबाईलच चोरीला गेला. आता काय करावे. काहीच सुचत नाही. चोरीला गेलेला मोबाईल परत कसा मिळेल, याविषयी अधिक जाणून घ्या.

चोरीला गेलेला मोबाईल परत मिळेल, पण...

sakal_logo
By
मंगेश पांडे

अन्न, वस्त्र व निवारा यासह आता मोबाईलही प्रत्येकाची मुख्य गरज बनली आहे. सध्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईलशिवाय जगणेच अशक्य अशी स्थिती आहे. संपर्क साधण्यासह इंटरनेटचे कामही त्यावर होत असल्याने तो जणू कॉम्पुटरच बनला आहे. मात्र, तो हाताळताना हवी तितकी काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मोबाईल चोरीचे व गहाळ होण्याचे प्रमाण वाढत आहे. काही क्षण मोबाईल जवळ नसल्यास काय स्थिती होते. हे त्यावेळी कळते. केवळ किमती वस्तू चोरीला जाते एवढेच नाही तर त्यातील महत्त्वाचे संपर्क क्रमांकही आपल्याकडून जातात. असे झाल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मोठ्या मेहनतीने मिळविलेले संपर्क क्रमांक अनेक वर्षांपासून जतन केलेले असतात. मात्र, मोबाईलची चोरी झाल्यास त्यासह क्रमांक जाणे नुकसानीचे ठरते.

हेही वाचा: तुफान, बादल, वादळ! इंजिने धावणार कधी?

मोबाईल चोरीला गेल्यास ज्या परिसरात ही घटना घडली त्यापासून जवळ असलेल्या पोलिस ठाण्यात तात्काळ तक्रार देणे आवश्यक असते. तेथे तक्रार घेताना पहिल्यांदा पोलिस मोबाईल खरेदीची मूळ पावती विचारतात. मात्र, अनेकजण कमी किमतीत मोबाईल खरेदी करण्याच्या नादात संबंधित दुकानाची मूळ पावती घेण्याकडे दुर्लक्ष करतात. साध्या कागदावर मिळालेली पावतीही स्वीकारतात. मात्र, ऐनवेळी अडचण निर्माण होते. मूळ पावती देण्यासह मोबाईलचा मॉडेल नंबर, आयएमईआय नंबर, मोबाईल नंबर, पत्ता व सिमकार्डसंबंधी इतर माहिती देणे आवश्यक आहे. दरम्यान, मोबाईल खरेदीच्या बिलावर मिळणारा ईएमईआय क्रमांक जतन करणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्याआधारे पोलिसांना मोबाईलचा शोध घेणे सोयीचे ठरते. तसेच तात्काळ कस्टमर केअर नंबरवर संपर्क साधून आपण वापरत असलेल्या सिम कार्डचा नंबर त्वरित बंद करावा. त्यामुळे आपल्या सिमचा गैरवापर थांबवू शकतो. जीमेल, फेसबुक, ट्विटरचे पासवर्ड रिसेट करुन घेणे आवश्यक आहे.

लूटमार व गहाळ म्हणून होते नोंद

मोबाईल चोरीला गेल्यास कलम ३९२ अंतर्गत लूटमारीचे गुन्हा दाखल होतो. तर हरविल्यास गहाळ म्हणून नोंद होते. तक्रारीत सर्व सविस्तर माहिती दिल्यानंतर ट्रैकरद्वारे पोलिस मोबाईलचा शोध घेतात. मात्र, मोबाईल चोरीलाच जाऊ नये यासाठी आपण स्वतःच काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा: गुंतवणुकीतील नवे प्रवाह! ‘सूर तेच छेडिता, गीत उमटले नवे’

प्रदर्शन टाळावे

मोबाईल कोणता वापरतो ही स्टेट्स आयडेंटी झाली आहे. त्यामुळे आपल्याकडे किती भारीतला मोबाईल आहे, हे दाखविण्याची चढाओढ लागलेली दिसून येते. यातून अनेकजण मोबाईलचे प्रदर्शन करीत असतात. त्यासाठी हातात मोबाईल पकडून वावरणे, शर्टच्या खिशात ठेवणे, असे प्रकार घडतात.

हे मोठे नुकसान

काही क्षणात दूर अंतरावरील व्यक्तीशी संपर्क साधण्याचे माध्यम म्हणजे मोबाईल. मात्र, त्यासाठी आवश्यक असतो तो समोरील व्यक्तीचा संपर्क क्रमांक. यामुळे प्रत्येकजण संपर्क क्रमांक जतन करण्यासाठी धडपडत असतो. वर्षानुवर्षे ते क्रमांक जतन केलेले असतात. तातडीच्या वेळेला, महत्त्वाचा कामाला ते क्रमांक उपयोगी पडतात. एखादा क्रमांक जरी चुकून डिलीट झाल्यास ऐनवेळेला फजिती होते. अशावेळी जर सर्वच क्रमांक गहाळ झाल्यास काय होईल, याचा विचार करून मनात धस्स होत. मात्र, हे संकट मोबाईल चोरीला गेल्यावर ओढवते.

हेही वाचा: चाहूल ‘डिजिटल करन्सी’ची!

अशा होतात चोऱ्या

बाजारपेठ, रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळे आदी गर्दीच्या ठिकाणी धक्का मारून अथवा खिशात हात घालून सहजरित्या मोबाईल चोरला जातो. अथवा आपणासाठी दुचाकीवर जाताना तसेच दुचाकी रस्त्यालगत उभी करून फोनवर बोलणेही धोकादायक ठरते. आपण बोलण्यात व्यस्त असताना चोरटे मोबाईल हिसकवितात. मोबाईल चोरीत अशाप्रकारच्या चोरीचे प्रमाण अधिक आहे. तसेच पादचाऱ्यांबाबतीतही असे घडते. यामध्ये अनेकदा मोबाईलधारक जखमी देखील होतो. मोबाईल तर चोरीला जातोच शिवाय जिवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे रस्त्यावरून जाताना मोबाईलवर बोलणे टाळणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील नुकसानीला सामोरे जावे लागते.

go to top