मराठवाड्यात होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन का महत्वाचं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Literary festival}
मराठवाड्यात होणारं आखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलन का महत्वाचं?

मराठवाड्यात होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन का महत्वाचं?

सूर्याच्या वाढत्या प्रखरतेने सध्या महाराष्ट्र होरपळून निघतोय. एप्रिल-मे हे उन्हाळ्याच्या काहिलीचे दिवस असतात. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील लातूरजवळील उदगीर येथे येत्या २२, २३, २४ एप्रिल दरम्यान साहित्य संमेलन होत आहे. मराठी साहित्य संमेलन हा समस्त मराठीजनांचा एक सोहळा असतो. एखाद्या सण-समारंभातून साहित्य संमेलनाकडे बघितलं जातं. तापत्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा शीतल जरी झाल्या नाहीत, तरी त्या सुसह्य होतील याची खात्री संमेलनाला येणाऱ्‍या प्रत्येक मराठी रसिकाला असते.

मराठवाड्यात अनेक वर्षांनी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे असून, त्यांच्या काळात काही ठोस घडण्याची सुरुवात संमेलनापासूनच व्हावी, अशी साऱ्‍यांची अपेक्षा आहे आणि ती चुकीचीही म्हणता येणार नाही. साहित्य संमेलन आणि वाद यांचं इतकं जवळचं नातं आहे की, वाद झाल्याशिवाय साहित्य संमेलन भरविणाऱ्‍या संस्थांनाही साहित्य संमेलन भरवल्यासारखं वाटत नाही आणि संमेलनाला येऊ इच्छिणाऱ्‍या रसिकांना वाटत नाही. गेली अनेक वर्षं साहित्य संमेलन त्याच्या अध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावरून गाजत होतं. मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून अध्यक्ष निवडीचा वाद आणि त्यावरून निर्माण होणारं वादळ संपुष्टात आलं आहे. महामंडळाने अध्यक्षपदाचा भार संपुष्टात आणला असला तरी, यजमानपद आयोजक संस्थेला दिलं असलं तरी संमेलनाचे मुख्य आम्हीच हा आविर्भाव सोडलेला नाही.

मराठवाड्यात हे संमेलन होत असताना मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रमुख कौतिकराव ठाले पाटील आणि मुंबई मराठी साहित्य परिषद यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जे मानापमान नाट्य रंगलं, त्यावरून साहित्य संमेलनासाठी वादाची सुरुवातही झाली, असं म्हणायला हरकत नाही. मुळात कोरोनामुळे गेली तीन वर्षं साहित्य संमेलन विस्कळीत झालं होतं. नाशिकचं संमेलन पार पडलं, असं म्हणावं लागेल. मात्र, आयोजकांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागलं. आत्तादेखील उदगीरच्या संस्थेला विविध समस्यांना सामोरं जावं लागलं. या पार्श्वभूमीवर साहित्य संस्थांचा आणि त्यातील पदाधिकाऱ्‍यांचा वाद झाला नसता तर बरं झालं असतं. असो.

मराठवाड्याला पाण्याचा दुष्काळ असला तरी साहित्यसेवेचा आणि साहित्यिकांचा मुळीच दुष्काळ नाही. मराठवाड्यातील साहित्य संमेलन कोरोना उत्तरकाळात होणारं पहिलंच संमेलन आहे. राज्याच्या नव्हे तर देशाच्या समाज जीवनात कोरोनापूर्व आणि कोरोनानंतर अशी काळाची विभागणी झालेली आहे. कोरोना या साथीच्या रोगाने मनुष्यजातीला खूप गोष्टी शिकवल्या आहेत, त्यामुळे उदगीरच्या साहित्य संमेलनाकडे केवळ एक संमेलन म्हणून पाहून चालणार नाही. साहित्य संमेलनाने मराठी साहित्याला तसंच मराठी माणसाला काय दिलं यावर आतापर्यंत अनेकवेळा चर्चा झडली आहे. साहित्य संमेलन भरवायची जशी सुरुवात झाली, तेव्हापासून साहित्य संमेलनाचं उपयोगित्व काय, अशी सातत्याने विचारणा झाली

आहे. सुदैवाने सामान्य मराठी वाचकाला आणि साहित्यप्रेमींना असा प्रश्न पडला नाही आणि संमेलनाची गर्दी कधी ओसरली नाही. गावच्या जत्रा, यात्रा किंवा एखादं वार्षिक धर्मकार्य करावं या पद्धतीने साहित्यप्रेमी जनता संमेलनाला येत राहिली. उदगीरच्या साहित्य संमेलनात वेगळं काही घडेल असं नाही. साहित्य रसिकांची गर्दी या संमेलनाला निश्चित होईल. मात्र, आता कसोटी आहे, ती साहित्य संमेलनाचं आयोजन करणाऱ्या संस्था तसंच साहित्य संस्थांचे पदाधिकारी यांची. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही याबद्दल खंत करत बसण्यापेक्षा हा दर्जा मिळण्यासाठी नेमके कसोशीचे प्रयत्न काय व्हायला हवेत आणि ते प्रयत्न कृतिशील मार्गाने कसे होतील, याचा आराखडा निर्धाराने संमेलनात ठरवला जावा. किमान यादृष्टीने काही पावलं तरी पडावीत, अशी अपेक्षा ठेवली तर ती गैर होणार नाही. संमेलनाच्या कोटी कोटीच्या उड्डाणातून इतकी माफक अपेक्षा पुरी व्हायलाच हवी आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्षं साहित्य संमेलन उत्सवी पद्धतीने होत आहे. साहित्य संमेलन हा उत्सवच आहे यात कसलीही शंका नाही, फक्त हा उत्सव साजरा करताना मराठी भाषेच्यादृष्टीने आणि पुढच्या पिढ्यांचं संचित व्हावं, असं एखादं पाऊल उचललं जाणे अत्यंत आवश्यक आहे. साहित्य संमेलन कसं भरवायचं याबद्दल यापूर्वी अनेक वेळा चर्चा घडल्या आहेत. त्यातल्या मुद्द्यांची इथं पुन्हा एकदा उजळणी करण्याची गरज नाही. मात्र कोरोनाउत्तर काळातील या

पहिल्याच संमेलनात ठोस मुद्दे आणि प्रकल्प निश्चित केले जावेत, ही अपेक्षा चुकीची ठरणार नाही. संमेलनातल्या जेवणावळी आणि संमेलनातील पुस्तकांच्या विक्रीचे आकडे याची चर्चा जरूर व्हावी; पण संमेलनात या तीन गोष्टींवर निर्णय झाला आणि त्यापैकी एका बाबतीत काम सुरू झालं, असं घडायला हवं. मराठी साहित्य गुणवत्तेच्या बाबतीत अगदी धनाढ्य असलं तरी अन्य भाषांच्या तुलनेमध्ये जागतिक नकाशावर पोचण्यात ते नेहमीच कमी पडत आलं आहे. मराठी साहित्यातील दर्जेदार निर्मिती अन्य भाषांमध्ये जाण्यासाठी जाणीवपूर्वक जेवढे प्रयत्न व्हायला हवेत, तेवढे प्रयत्न झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मराठी लेखकांना ज्ञानपीठ किंवा साहित्य अकादमीचे पुरस्कार गुणवत्ता असूनही मिळत नाहीत ही तक्रार आता जुनी आहे, तर अगदी एखाद्या गुळगुळीत नाण्यासारखी घासून घासून रया गेल्यासारखी आहे. आता कृतीची वेळ आली आहे. राज्य शासन किंवा अन्य कुठल्या सरकारी संस्था मराठी भाषेच्या उद्धारासाठी पुढे येतील ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. साहित्य संमेलन भरविणाऱ्या आयोजक संस्थेच्या सहकार्याने अखिल भारतीय साहित्य महामंडळाने यासंदर्भात एक कृतिशील साहित्यिकांची, अभ्यासकांची, तसंच अनुवादकांची भलीमोठी टीम उभी केली पाहिजे. मराठीतील चांगलं साहित्य जास्तीत जास्त भाषांमध्ये कसं जाईल याचा आराखडा तयार करून, पुढच्या साहित्य संमेलनाकडे किमान दहा पुस्तकं तरी चार भाषांमध्ये जातील, असं केलं पाहिजे.

साहित्य संमेलनाला निधीची कमतरता आहे, हे जुनं दुखणं केव्हाच संपलं आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर होतं, तेव्हापासून संमेलनासाठी २५ लाख रुपयांसारखं घसघशीत अर्थसाहाय्य मिळण्यास सुरुवात झाली. असा निधी मिळण्याची सोय होऊन देखील २५ वर्षं होऊन गेली. आता महामंडळाने प्रगल्भपणे संमेलनाच्या माध्यमातून निधी उभा करून तो पुढच्या पिढीसाठी रचनात्मक कार्य करणारा कसा ठरेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर वसुंधरा पेंडसे-नाईक यांनी संमेलन भरवण्यासाठी महाकोशासारखी संकल्पना मांडली होती. या संकल्पनेची आजपर्यंत केवळ चर्चा झाली. आता हा महाकोश खऱ्‍या अर्थाने १०० कोटींचा कोश कसा होईल, याचं नियोजन व्हायला हवं. १२ कोटी मराठी भाषकांच्या बळावर १०० कोटींचा कोश उभा करणं फारसं अवघड नाही. माणशी १० रुपये धरले तरी हा आकडा गाठणं शक्य आहे. मात्र, त्यासाठी मराठीतील सर्व साहित्यिकांनी व प्रकाशकांनी कंबर कसून यामागे उभं राहिलं पाहिजे. एकदा कोश उभा राहिला की, धनाढ्यांच्या दारातील किंवा राजकारण्यांच्या प्रतिमानिर्मितीसाठीचं संमेलन हा डाग पुसला जाईल. उदगीरचं साहित्य संमेलन कृतिशील गोष्टींना चालना देणारं ठरो, ही अपेक्षा. साहित्य रसिकांचा हा उत्सव मराठी भाषेच्या उत्थानाचा, मराठी भाषकांच्या आनंदाचं मोठं कारण ठरो, हीच या संमेलनासाठी शुभेच्छा आणि संमेलनाकडूनची अपेक्षा !

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top