साक्षर की सार्थक | Premium Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साक्षर की सार्थक }

साक्षर की सार्थक

शिक्षण हा विनोबा भावे यांचा जिव्हाळ्याचा विषय. शिक्षणाकडे आपला बघण्याचा सर्वसामान्य दृष्टिकोन व विनोबांचा दृष्टिकोन यात खूप तफावत आहे. शिक्षण म्हणजे माणूस घडविणे, आयुष्य सार्थक होणे ह्या शिक्षणाबाबतच्या रूढ कल्पना त्यांना साफ अमान्य आहेत. विनोबांच्या मते आपल्या आसपासच्या वस्तू पारखण्याची शक्ती म्हणजे विज्ञान आणि आत्मज्ञान, अध्यात्म.

शिक्षण दिले जात नाही, कारण ते देता येत नाही. शिक्षणाचे रूप हे अनिर्वचनीय आहे राज्यघटनेत जा १४ भाषांचा उल्लेख आहे त्या सर्व भाषांमध्ये 'शिकविणे' या क्रियेसाठी शब्दच नाही. शिकण्यासाठीच शब्द आहे. इंग्रजीमध्ये लर्न ( शिकणे ) हा शब्द आहे, टीच ( शिकविणे ) हाही शब्द आहे. म्हणजे शिकणे ही स्वतंत्र क्रिया मनाली आहेच, पण शिकविणेही स्वतंत्र क्रिया मानली आहे. मात्र आम्ही शिकण्याला मदत करू शकतो, शिकवू शकत नाही. ' तेजस्वि नावधीतमस्तु ' म्हणजे ' आम्हा दोघांचे अध्ययन तेजस्वी बनो ' , याचा अर्थ शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांबरोबर अध्ययन करीत आहेत, शिकत आहे.

अनेक शतकांपासून ज्यांच्या ज्ञानाचा, विचारांचा आदर्श समाजात आहे त्या लोकांचे लक्ष जीवन साक्षर कारण्यापेक्षा सार्थक करण्याकडेच जास्त होते. साक्षर जीवन निरर्थक असू शकते ह्याची उदाहरणे आजच्या सुशिक्षित समाजात सहज सापडणारी आहेत. याउलट निरक्षर जीवनही अत्यंत सार्थक असू शकते अशाविषयीचे अनेक दाखले इतिहासाने पहिले आहेत.

हेही वाचा: गॅस : एलपीजी की पीएनजी?

अभ्यासाबद्दलही विनोबांचे अनुभवसिद्ध मार्गदर्शन आहे. अनेक विषयांवर आणि भाराभर वाचीत बसून काही लब्धी नाही. लांबचलक अभ्यास म्हणजे पुष्कळसा भासच; शिवाय शक्तीचा ऱ्हास. थोडा पण समाधियुक्त खोल अभ्यास ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक आहे. अशा अभ्यासाने माणसाचे जीवन प्रज्ञावंत, प्रतिभावंत होते. प्रतिभा म्हणजे बुद्धीला नवीन नवीन कोंब फुटत राहणे. भाराभर वाचनाने अशा प्रतिभेचा अपमृत्यू ओढवण्याची भीती असते. म्हणून अल्प मात्रा, सातत्य, समाधी आणि निश्चित दिशा हे खोल अभ्यासासाठी विनोबांचे मार्गदर्शक सूत्र आहे. महाभारतात श्रीकृष्णाने 'मातृहस्तेन भोजनम्' असा वर मागितला होता. शिक्षणाच्या बाबतीत विनोबांनी त्या वराचे 'मातृमुखेन शिक्षणम्' असे रूपांतर केले. शिक्षणाचा आरंभ हा मातृमुखातून होत असतो. लहान मुलांचे शिक्षण स्त्रियांच्या हातात असले पाहिजे असे विनोबांचे मत आहे.

आजचे विद्यार्थी विद्यार्थी नसून परीक्षार्थी झाले आहेत. त्यांना ३३ टक्के गुण मिळाले की पास करण्यात येते. स्वयंपाक करणारा म्हणेल की मी शंभरातल्या तेहतीस पोळ्या चांगल्या बनवू शकतो, तर त्याला नोकरीवर ठेवाल का? ज्ञान तर शंभर टक्के असले पाहिजे. या लोकांना माहीत आहे की आपण जे शिकवले आहे ते सगळे लक्षात ठेवण्याच्या लायकीचे नाही. मुलांना ज्याची आज गरज नाही ते ज्ञान आपण मुलांच्या डोक्यावर लादत आहोत. अशा स्थितीत १०० टक्क्यांची अपेक्षा कशी करता येईल? म्हणून ३३ टक्के गुण मिळवणाऱ्यांना पास करतात. पण कोणी मनुष्य ८० टक्के जिवंत आणि २० टक्के मेलेला राहू शकतो का? जिवंत असेल तर पूर्ण जिवंत असेल आणि मेलेला असेल तर पुरा मेलेला असेल. टक्केवारीची गोष्ट ज्ञानात चालत नाही. खरे म्हणजे, खरे ज्ञान कधी विसरले जात नाही. जी विसरण्यासारखी विद्या आहे ती विद्याच नाही. क्रियायुक्त ज्ञान विसरले जाऊ शकत नाही.

हेही वाचा: अंटार्क्टिकाचे भवितव्य

आजचे शिक्षण म्हणजे लिहणे, वाचणे आणि खुर्चीवर बसून हुकूम सोडणे. शिकण्याचा अर्थच आहे, काम सोडणे. शिकलेल्या लोकांना काम करण्याची लाज वाटते. समाजात देह आणि बुद्धीची फारकत होणे ही अगदी भयानक स्थिती आहे. देवाने हात आणि बुद्धी, दोन्ही गोष्टी दिल्या आहेत. ज्ञान आणि कर्म, विद्या आणि परिश्रम एकत्र जोडले गेले तरच देशाची उन्नती होईल.

सर्व मुलांना काम आणि ज्ञान सामान रूपाने मिळायला हवे. भगवान श्रीकृष्ण सारथी व्हायला तयार, लढायलाही तयार, गुरु बनवायलाही तयार आणि शिष्य बनवायलाही तयार. भारताचे हे दुर्दैव आहे की ज्ञान आणि कर्म यांच्यात मेळ उरलेला नाही. जे काम करतात त्यांना ज्ञान मिळत नाही आणि ज्यांचा बौद्धिक विकास झालेला आहे असे ज्यांना वाटते ते काम करत नाही. समाजात काही लोक केवळ ज्ञानावाले आणि काही केवळ कामवले अशी संकल्पना असलेला समाज राहू-केतूंचा समाज होईल. राहू म्हणजे फक्त डोके आणि केतू म्हणजे फक्त धड ; डोके नाहीच. ज्ञान आणि कर्म एकत्र असलेच पाहिजे.

परंतु आमचेकडे तर शिक्षित मनुष्य श्रेष्ठ आणि श्रम करणारा खालच्या दर्जाचा मानला जातो. मामुली मॅट्रिक झालेला मुलगा उत्तम सुतारालाही मूर्ख समजतो, अशी आजची स्थिती आहे. तो त्याला म्हणतो, माझ्या घरी अमुक काम आहे, तुझी मजुरी काय आहे ? म्हणजे तो त्याला 'तुझी' मजुरी असे विचारतो, 'तुमची' मजुरी काय असे विचारीत नाही. एवढा मोठा कुशल कारागीर, जो देशाची सेवा करतो व प्राज्ञ आणि अनुभवी पुरुष आहे, त्याला तो 'तू' म्हणतो! एवढ्याच बळावर की त्याला लिहिणे-वाचणे येत नाही.

आजच्या शिक्षणात ना व्यावहारिक ज्ञान मिळते ना पारमार्थिक ज्ञान. या शिक्षणाचा वस्तुस्थितीशी काही संबंधच नाही. त्यामुळे आजच्या शिक्षितांची दशा धोब्याच्या कुत्र्यासारखी - ना घरचा ना घाटाचा अशी होते. ज्ञान प्रत्येक मनुष्याला आवश्यक असते, त्यामुळे जीवनात ज्ञानप्राप्ती अनिवार्य आहे. मनुष्यालाच काय, पण प्राणिमात्राला ज्ञानाची आवश्यकता असते. काय खावे, काय खाऊ नये असे जीवनोपयोगी सर्व प्रकारचे ज्ञान प्राण्यांनाही असते. मनुष्यात आणि इतर प्राण्यांत फरक इतकाच की मनुष्याला थोडे अधिक ज्ञान असेल आणि त्या ज्ञानाचा तो सुव्यवस्थित संग्रह करीत असेल. मनुष्य मोठमोठ्या हवेल्या बांधतो. परंतु मधमाशीचे पोळे किती कलापूर्ण असते! वारूळ किती सुंदर दिसते! त्यामुळे ज्ञान आणि कर्म ओतप्रोत झाले म्हणजे शिक्षण पूर्ण झाले, हा सिद्धांत देखील मला अपूर्ण वाटतो.

माझ्या मते मानव-गुणांचा विकास हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. मानवाचे काही विशिष्ट गुण आहेत. उद्योगशीलता इतर प्राण्यांतही आढळते. हल्ला करून जीवन जगणारे अनेक प्राणी आहेत. मग मानवाचा विशेष गुण कोणता? ज्ञान हाही त्याचा विशेष गुण नाही, कारण इतरही प्राण्यांत ज्ञान असते. मानवाचा विशेष गुण कोणता याचे एकदम उत्तर देणे कठीण आहे. अनेक गुणांची कदाचित यादी करावी लागेल.

हेही वाचा: सणासुदीला मिठाई घेताय; तर सावधान!

आजकाल आपण विद्यार्थ्यांना एक प्रकारचे व्यावहारिक शिक्षण देतो आणि त्यांच्यापासून थोडी शिस्त बाळगण्याची आशा ठेवतो. याहून जास्त अपेक्षा आपण करीतच नाही. शिस्त हा एक चांगला गुण आहे, पण तो काही सर्वांत श्रेष्ठ गुण नाही . सर्वांत श्रेष्ठ गुण कोणता? हे सांगणे कठीण आहे. परंतु भगवंतांनी गीतेत अभय गुणाला ती जागा दिली आहे. म्हणून निर्भयतेच्या आधारावर सगळे शिक्षण उभारण्यात आले पाहिजे. विद्यार्थ्यांना निर्भय बनवण्याचा शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे. त्याशिवाय सत्यनिष्ठा वाढणार नाही. सत्यावर दृढ राहण्याची शक्ती येणार नाही.

निर्भयता म्हणजे कोणाला न घाबरणे आणि कोणाला न घाबरवणे. दोन्ही मिळून निर्भयता बनते. स्वतःला देहाहून वेगळे ओळखण्यातच निर्भयता आहे. जो स्वतःला देहाहून वेगळे ओळखतो, तो दुसऱ्यांनाही देहाहून वेगळे ओळखतो. म्हणून तो कोणाला घाबरत नाही कोणा घाबरवत नाही. आपण शरीरापासून वेगळे आहोत हे ओळखणे ही शिक्षणातली मुख्य गोष्ट आहे. प्रत्येक मुलाला याचे शिक्षण मिळाले पाहिजे.

ज्ञान आणि कर्म यांच्यात भेद मानल्याने घोटाळा होतो, खरे म्हणजे ज्ञानाने कर्माची प्रेरणा मिळते, तसेच कर्मामुळे ज्ञान प्राप्त होते, व या दोहोंमुळे जीवनाचे सार्थक होते, अशी वस्तुस्थिती आहे. शिक्षण हे खरे म्हणजे आनंदमय असायला पाहिजे. आपल्याला विद्यार्थ्यांत ज्ञान भरीत बसायचे नाही, तर ज्ञानाची तृष्णा व ते प्राप्त करून घेण्याची शक्ती निर्माण करायची आहे. शिक्षणाने विद्यार्थी आत्मनिर्भर, स्वयंसिद्ध व स्वावलंबी झाला पाहिजे. जीवनाच्या अनुभवातून, जबाबदाऱ्यांच्या जाणिवेतून व ज्ञानवृद्धांच्या सेवेतून मिळणारे क्रियाशील ज्ञान विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवीत असते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top