बिबट्या आला शेजारी |Human-leopard conflict | Leopard Premium Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Human-leopard conflict }
बिबट्या आला शेजारी

बिबट्या आला शेजारी

‘बिबट्याचा गावात वावर’, ‘बिबट्याने पाळीव जनावराची केली शिकार’ अशा बातम्या दररोज कानावर पडत आहेत. काही दशकांपूर्वी केवळ जंगलात दिसणारा (अर्थात, अगदी जवळ असला, तरी बिबट्या प्रत्यक्षात दिसणे तसे अवघड) बिबट्या आता कुठे नाही, असा प्रश्न पडावा इतके जवळ आले आहेत. आपण गावात राहत असो वा शहरात बिबट्या सर्वत्र आढळून येत आहे. मागील आठवड्यात पुण्याजवळील दिवे घाट, वडकीनाला, कानिफनाथ डोंगर, जुन्नर, शिरूर तालुक्यात तसेच बुलडाणा, पंढरपूर, करमाळा, कऱ्हाड, नाशिक अशा विविध भागात बिबट्याचा वावर, पाळीव जनावरांवर त्यांचा हल्ला घडण्याच्या घटना घडत आहेत.
मुंबईतही जवळपास रोजच अशा बातम्या येतात. मुंबईत बोरिवली नॅशनल पार्कजवळील परिसर, गोरेगाव, आरे कॉलनी अशा परिसरात बिबट्यांचा सर्वाधिक वावर आहे. मुंबईने बिबट्यांसोबत एक प्रकारची अस्वस्थ शांतता प्रस्थापित केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेशातील शेत जमीन, तसेच आसाम, तमिळनाडूमधील चहाचे मळे, तर राजस्थान, आंध्रप्रदेशातील खडकाळ प्रदेशात बिबट्यांचा वावर दिसून येतो.गेल्या जवळपास १० ते १५ वर्षांत बिबट्या माणसाच्या अधिक जवळ येऊ लागल्याचे निरीक्षण विविध तज्ञांनी नोंदविले आहेत. नेमकं काय होत असावे, बिबट्या माणसाच्या वस्ती शेजारी का येतोय, बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी काय करायला हवे, हे जाणून घेणार आहोत.(Article on Human-leopard conflict)

हेही वाचा: गॅस : एलपीजी की पीएनजी?

सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे जगभरात माणसांचे जगणे अवघड झाले आहे. आपली ही अवस्था असेल, तर वन्यप्राण्यांची काय स्थिती असेल, याचा केवळ अंदाज येऊ शकतो. बिबट्या हा मांजर कुळातील एक अत्यंत चतुर प्राणी आहे. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचे कसब बिबट्याकडे आहे. घनदाट जंगलापासून ते ओसाड जागा, उसाचे शेत, शहराजवळील टेकड्या अशा कोणत्याही भागात तो मुक्तसंचार करू शकतो. शहर, गावे यांच्या जवळील जंगलात अधिवास असणारा बिबट्या गेल्या काही वर्षात माणसाच्या अधिक जवळ येत आहे. खरंतर, फक्त बिबट्याशी निगडित एखादी घटना घडली तर त्याच्या अस्तित्वाची जाणीव माणसाला होते. अनेक वेळा बिबट्याला पकडण्यासाठी ‘स्टॅटेजिक प्लॅन’ केला जातो. परंतु अनेकवेळा तो हे नियोजन अक्षरश: उधळवून टाकतो. जंगलात अन्नाचा तुटवडा जाणवू लागला, की बिबट्या जंगलाच्या बाहेरील परिसरातही सहज वावरू शकतो. माणसाच्या वस्तीजवळ सहज भक्ष्य मिळत असल्यामुळे तो गावाच्या, वस्तीच्या आजूबाजूला राहण्याचा पर्याय निवडतो.

काही वर्षांपूर्वी वन्यजीव अभ्यासक विद्या अत्रेय यांनी राज्यातील बिबट्यांचा वन विभागाच्या सहकार्याने अभ्यास केला होता. या अभ्यासादरम्यान काही बिबट्यांना रेडिओ कॉलर लावली होती. रेडिओ कॉलर लावलेल्या बिबटे कुठे जातात, त्याचा वावर कुठे-कुठे असतो, शिकार कधी करतात, विश्रांती कधी करतात, याच्या वेळोवेळी नोंदी संशोधनात्मक अभ्यासात ठेवल्या जात होत्या. रेडिओ कॉलर लावलेल्या बिबट्यापैकी एक बिबट्या एका उसाच्या शेतात विश्रांती घेत होता. अर्थात, हे कॉलर लावल्याने मिळणाऱ्या सिग्नल्समुळे अभ्यासकांना समजले होते. त्याच शेताच्या एका कोपऱ्यात तिथला शेतकरी आणि काही बायका काम करत होत्या. अभ्यासकांनी त्यांना,‘तुम्हाला शेतात बिबट्या दिसला का?, असा प्रश्न केला. त्यावेळी त्यांनी तो काही दिवसांपूर्वी दिसल्याचे सांगितले. म्हणजेच बिबट्या शेतात काम करणाऱ्या माणसांपासून अवघ्या २५ ते ३० मीटर अंतरावर आराम करत होता. तरी त्याचा थांगपत्ता त्यांना नव्हता, हा अनुभव खुद्द अत्रेय यांनी अनेकदा कार्यक्रमादरम्यान, मुलाखतीदरम्यान सांगितला आहे. हे सांगायचे तात्पर्य एवढेच की, बिबट्या आपल्या अगदी जवळ असला तरीही त्याच्या अस्तित्वाची जाणीव एखादी घटना घडल्याशिवाय होत नाही, हे तितकेच खरे. वारंवार हे सिद्ध देखील झाले आहे. शहराच्या गजबजलेल्या, भर गर्दीच्या ठिकाणी बिबट्या दिवसभर असतो, परंतु कोणाच्या लक्षात येत नाही. नजर चुकीने एखाद्याला त्याचे दर्शन घडते आणि गोंधळ उडतो, अशा घटना प्रत्यक्षात घडल्या आहेत. त्याशिवाय जंगल सफरीतही बिबट्याला शोधणे, तो दिसणे दुर्मिळ मानले जातो. अतिशय चाणाक्ष असा हा प्राणी. कोणत्याही अधिवास आत्मसात करणे हे त्याचे अनोखे वैशिष्ट्य. माणसाच्या वस्ती जवळ सुरक्षित अधिवासात राहणाऱ्या (जंगलाव्यतीरिक्त अधिवास) बिबट्याचे कुत्री हे आवडते भक्ष्य बनले आहेत. दिवसा शांत असणारे बिबटे रात्री मात्र त्या प्रदेशातील राजे बनलेले असतात. शहरी आणि ग्रामीण भागात माणसाच्या वस्ती जवळ दबा धरून बसलेले म्हणजेच थोडक्यात बिबट्यांना आपला सुरक्षित अधिवास वाटणाऱ्या भागात रात्रीच्या वेळी सगळे वस्ती शांत झोपलेला असताना, रस्त्यावर चिटपाखरू देखील नसताना, त्या परिसरात राहणाऱ्या वन्य प्राण्यांसाठी ते जंगलच असते. तसे ते बिबट्यांसाठी देखील असते.

हेही वाचा: दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’

ऊस तोडणीचा हंगाम बिबट्यांसाठी बनतोय संवेदनशील
उसाचे शेत हे बिबट्यांसाठी सुरक्षित अधिवास ठरत आहे. बिबटे उसाच्या शेतात रूळले आहेत, स्थिरावले आहेत. या नवीन अधिवासात माणसांना टाळायचे कसे, याचे कौशल्यही या हुशार, चतुर प्राण्यांने आत्मसात केले आहे. परंतु ऊस तोडणीच्या हंगामात त्याचा हा सुरक्षित अधिवास उघडा पडत आहे. या काळात बिबट्यांना सातत्याने स्थलांतर करावे लागते. पिल्ले असणाऱ्या मादी बिबट्यासाठी हा काळ म्हणजे एक कसोटी असते. म्हणूनच ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला की माणूस आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष अधिक वाढण्याची शक्‍यता असते. वन्यप्राणी जंगलातून बाहेर पडतात, त्याचे प्रमुख कारण म्हणजे जंगलात अन्न न मिळणे. अन्न, संरक्षित अधिवास याच्या शोधात वन्यप्राणी जंगलाच्या बाहेर पडतात. अनेकवेळा ते माणसाच्या वस्ती जवळ येतात. अशाच प्रकारे उसाचे शेत हे बिबट्याला (मादी) संरक्षित अधिवास वाटत असते. त्यामुळे विणीच्या हंगामात बिबट्या (मादी) उसाच्याच शेताचा आसरा घेतात. पण ऊस तोडणीच्या हंगाम सुरू होतो, त्यावेळी कामगार शेतात जाऊन तोडणीचे काम करत असतात. अशावेळी पिल्लांच्या संरक्षणासाठी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्या (मादी) स्वत:च्या आणि पिल्लांच्या संरक्षणासाठी प्रतिहल्ला करण्याची दाट शक्‍यता असते. याच काळात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडतात. त्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगलात अन्नाचा तुटवडा जाणवू लागतो. या काळातही बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी गावाच्या जवळ येतात. म्हणूनच ऊस तोडणीचा हंगाम असो वा उन्हाळा या कालावधीकडे संवेदनशीलपणे पाहण्याची आवश्यकता आहे.

बिबट्या वावर आढळल्यास, तो दिसल्यास हे करावे
बिबट्याचा वावर असल्याची माहिती रहिवाशांनी वन अधिकाऱ्यांना द्यावी. जेणेकरून वन अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शहानिशा करतील. एखाद्या परिसरात बिबट्याच्या वावराची माहिती मिळाल्यास वन अधिकारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावत नाहीत, हे समजून घ्यायला हवे. सगळ्यात पहिल्यांदा बिबट्याच्या पावलांचे ठसे, त्याने केलेली शिकार, त्याचे प्रमाण, पशुधनावर हल्ला झालाय की नाही, याची माहिती घेतली जाते. बिबट्याच्या वावराची खात्री आणि सर्व गोष्टीची शाहनिशा केली जाते. सर्व स्थितीची पाहणी करून गरज वाटल्यास वन विभागामार्फत बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात पिंजरा लावण्यासाठी पावले उचलली जातात. पिंजरा लावण्यापूर्वी परिसरातील घटनांच्या नोंदी घेण्यात येतात. बिबट्याने कोठे कुत्र्यांवर हल्ला केला, रहिवाशांना तो कोठे दिसला, शेळ्या किंवा बकरी अशा पशुधनावर कोठे हल्ला केला, त्या जागांची पाहणी करून त्याचे मॅपिंग केले जाते. त्या आधारे बिबट्याचा जाण्या-येण्याच्या मार्गाचा, वावर असणाऱ्या परिसराचा अंदाज घेतला जातो. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी पिंजरा कोठे लावायचा हे ठरविले जाते. वन्यप्राण्यांच्या सहज लक्षात येणार नाही, अशी जागा पिंजऱ्यासाठी निवडली जाते. परंतु दरम्यानच्या काळात रहिवाशांनी संयम दाखविणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: Corona Virus : मास्कपासून मुक्ती कधी?

बिबट्यासमवेत सहजीवन व्हावा स्वीकार
या संघर्षाची तीव्रता केवळ प्रबोधन, जनजागृती यातूनच कमी होणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ‘सर्व काही सरकारनेच करावे’, या मानसिकतेतून नागरिकांनी बाहेर यायला हवे. मुळात बिबट्या माणसाच्या वस्ती शेजारी का आलेत, नेमकी समस्या काय हे, समजून घ्यायला हवे आणि ती सोडवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. लोकांच्या मनातील बिबट्याची भीती दूर करण्यासाठी प्रबोधन हवे. तसेच बिबट्यासोबत सहजीवन, याबाबत जागृती करणे, लोकांना पटवून देणे आवश्यक आहे. बिबट्या माणसांना टाळतो, परंतु त्याला कोणत्याही प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न केल्यास तो हल्ला करतो. त्यामुळे बिबट्या परिसरात आल्यास त्याच्यामागे धावू नये किंवा त्याला गराडा घालू नये. असे केल्यास माणसाचा वावर, गर्दी पाहून तो घाबरून किंवा बिथरून जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तो स्वत:चा बचाव करण्यासाठी धावाधाव करेल आणि त्यातून तो हल्ला चढवू शकतो. परिणामी बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने विशेषत: शहरी किंवा ग्रामीण भागात माणसाच्या वस्तीजवळ आढळणाऱ्या बिबट्यांवर संशोधन करावे. त्यातून बिबट्यांची बदलत जाणारी जीवनशैली समोर येईल, त्यानुसार उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

लंडन येथील नॅचरल हिस्टरी म्युझियम आणि बीबीसी वाइल्डलाइफ तर्फे आयोजित जागतिक स्पर्धेत २०१६मध्ये नागरी वन्यजीवन विभागात सर्वोत्कृष्ट वन्यजीव छायाचित्रकार म्हणून पुरस्कार मिळविलेले प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर यांनी शहरी भागाजवळील बिबट्याचे यथेच्छ अगदी बोलके निरीक्षण नोंदविले आहे. ‘‘माणसांच्या वस्तीजवळ राहूनही केवळ झोपलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करणे, रहदारीचा रस्ता सहज ओलांडणे, भूक लागल्यावर मिळेल, त्यावर ताव मारणे, अशा पद्धतीने बदल अंगीकारून बिबट्या शहरीकरणाशी जुळवून घेत आहेत. त्यासाठी बिबट्यांनी आपल्या जीवनशैलीत बदल करत असल्याचे निरीक्षण खानोलकर यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एका जाहीर कार्यक्रमादरम्यान नोंदविले. हे निरीक्षण इतके बोलके आहे, की आता माणसाच्या वस्तीजवळ (मग ते गाव असो वा शहर) राहणाऱ्या बिबट्यांनी स्वत:ला अशा परिस्थितीत सामावून आणि आत्मसात करून घेतले आहे. एका अर्थाने बिबट्यांनी माणसासमवेत त्यांच्या शेजारी राहणे आत्मसात करत आपल्या जीवनशैलीत बदल केले आहेत. आता बिबट्याच्या वावराने, हल्ल्याने प्रकर्षाने समोर येणारा ‘बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष’ कमी करण्यासाठी आपणच पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top