आळंदीतील अपरिचित धार्मिक स्थळे आणि पर्यटन केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीतील अपरिचित धार्मिक स्थळे आणि पर्यटन केंद्र}

आळंदीतील अपरिचित धार्मिक स्थळे आणि पर्यटन केंद्र

Unfamiliar religious and tourist Places in Alandi :आळंदी म्हटलं की आठवते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अर्थात माउलींचे संजीवन समाधी मंदिर. अनेक वारकरी भाविक भक्तांच श्रद्धास्थान. वारकरी संप्रदायाचा पाया रोवलेलं तीर्थक्षेत्र. त्यामुळे आळंदीत नेहमीच वर्दळ असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह लगतच्या गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण, गुजरात, राजस्थान, तमीळनाडू, केरळ आदी राज्यातील भाविक आळंदीत येत असतात. पर्यटक व शालेय सहलीही दरवर्षी येतात. मात्र, संजीवन समाधी मंदिर, माऊलींनी भिंत चालवल्याचे ठिकाण. संत मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे भाजल्याचा प्रसंग आणि महान तपस्वी संत चांगदेव महाराज ज्या झाडाखली थांबले होते, ते विश्रांतवड स्थळ. या व्यतिरिक्त आळंदीत येणाऱ्यांना फारसी माहिती नाहीच. ते सरळ देहूकडे किंवा भीमाशंकरकडे किंवा परतीच्या मार्गावर निघतात. वास्तविकतः आळंदीच्या दहा किलामीटर परिसरात अनेक धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळे आहेत. जी अनेकांना परिचित नाहीत. त्यांना भेट दिल्यास ज्ञानात भर तर पडणार आहेच, पण विरंगुळाही मिळणार आहे.

गजानन महाराज मंदिर
शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानने आळंदीत महाराजांचे मंदिर बांधले आहे. हे मंदिर दोन वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झाले आहे. हे मंदिरसुद्धा टोकडीवर असून वर ध्यान मंदिर आहे. टेकडीच्या टप्प्याटप्प्यवर शोभेची झुडपे व झाडे असून उद्यान साकारले आहे. संगमरवर लावून सुशोभिकरण केले आहे. संस्थानने निवास व भोजनाची व्यवस्थाही केली आहे. एक पर्यटनस्थळ म्हणून मंदिराचा परिसर विकसित केला आहे.

जलाशय व सिद्धबेट
आळंदी येथे इंद्रायणी नदीवर बांध बांधला आहे. छोटेसे धरण म्हणूया हवे तर. सिद्घबेटाला लागून हे जलाशय आहे. आता तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सिद्धबेटाचे सुशोभिकरण करून चांगले उद्यान साकारले आहे. नदीच्या कडेने साधारणतः एक किलोमीटर लांबपर्यंत उद्यानाचा परिसर आहे. त्याला लागूनत जलाशय असल्याने त्याला घाट बांधला आहे. त्यात पोहोण्याचा आनंद अनेक लुटत असतात. बांधावरून नदीपात्रात पडणारे पाणी म्हणजे एक प्रकारचा धबधबाच आहे. एक दिवसाच्या विसरंगुळ्यासाठी हा परिसर छान आहे. अनेक जण एकत्र येऊन या परिसरात वनभोजनाचा आनंदही लुटत असतात.

घाट, मंदिर अन् सुवर्ण पिंपळ
इंद्रायणी नदीला दोन्ही तिरावर प्रशस्त घाट बांधला आहे. घाटाच्या पायऱ्या उतरून भाविक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी मंदिराकडे दर्शनासाठी जातात. मंदिराचे महाद्वार उत्तराभिमुख आहे. समोरच सभामंडप आहे. तिथे कीर्तन, भजन, जागर सुरू असतो. दर्शन बारीतून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाता येते. गाभाऱ्यात विठ्ठल-रुख्मिणीची मूर्तीही आहे. शेजारी पूर्वाभिमूख गणपतीचे मंदिर आहे. मागे मुक्ताई मंडप असून संत मुक्ताईची मंदिर आहे. सिद्धेश्वराच्या मंदिरालगतच नांदुरकीचा वृक्ष आहे. तिथे अनेक साधक ज्ञानेश्वरी पारायण करत असतात. मंदिराच्या आवारातच सुवर्ण पिंपळ आहे. याच सुवर्ण पिंपळाला माऊलींच्या मातोश्रींनीसुद्धा प्रदक्षिणा घातल्या होत्या, असे म्हणतात.

पद्मावती मंदिर
आळंदीतील प्रदक्षिणा मार्गावर वडगाव चौक आहे. तेथून उत्तरेकडी एक कच्चा रस्ता जातो. त्याला पद्मावती रस्ता असे म्हणतात. याच रस्त्यावर साधारण एक किलोमीटरवर पद्मावती मंदिर आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. आत प्रशस्त वातावरण आहे. एका बाजूला फुलांची झाडे आहेत. दुसऱ्या बाजूला छोटे उद्यान व लहानमुलांसाठी खेळणी आहेत. आजबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे. बहुतांश शेती आहे. मंदिराच्या परिसरात कवठाची झाडे आहेत. मंदिराचा गाभारा छोटासाच आहे. समोर सभामंडप आहे. छोट्याशा गाभाऱ्यात पद्मावती मातेची प्रसन्न मूर्ती आहे. नवरात्रीमध्ये येथे येणाऱ्या भाविकांना दुधाचा प्रसाद काही स्थानिक शेतकरी भक्तांकडून दिला जातो. पद्मावती मातेचे मंदिर व परिसर खूप सुंदर व निसर्गसंपन्न आहे. पण, मंदिरावर कळस नाही. सर्व मंदिर दगडात बांधलेले आहे. त्याबाबत एक अख्यायिका सांगितली जाते की, खूप वर्षांपूर्वी रानवडे नावाच्या भक्ताला देवीने दृष्टांत दिला की, मी अमूक अमूक ठिकाणी आहे. त्या ठिकाणी माझं मंदिर बांध. पण, एका रात्रीत सूर्योदयापूर्वी मंदिर बांधून झाले पाहिजे. अन्यथा संकट कोसळले. त्यानुसार, त्या शेतकऱ्याने सूर्यास्तानंतर मंदिर बांधायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी ते बांधून पूर्ण करायचे होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी मंदिर बांधून तयार झाले. पण, कळसाचे काम राहिले होते. तेव्हापासून मंदिर तसेच आहे कळसाशिवाय. अर्थात पद्मावती मातेच्या मंदिराला कळस नाही. काही वर्षांपूर्वी मंदिरासमोर सभामंडप बांधला आहे.

अडबंगनाथ मंदिर
आळंदीला लागूनच पिंपरी-चिंचवड शहरातील एक उपनगर म्हणजे डुडुळगाव. पौराणिक काळातील नाथ संप्रदायातील अडगंबनाथांचे मंदिर येथे आहे. बाजूलाच इंद्रायणी नदीचे प्रशस्त मंदिर आहे. भटकंतीसाठी इंद्रायणी नदीचा परिसर उत्तम आहे.

ऐतिहासिक चऱ्होली
आळंदी पासून दोन किलोमीटर अंतरावर चऱ्होली गाव आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९७ मध्ये गावाचा समावेश झाला. इसवी सनाच्या बाराव्या शतकाच्या आधीपासून गाव अस्तित्वात होते, याच्या खुणा आजही सापडतात. येथीपल ग्रामदैवत वाघेश्‍वर मंदिर. गावाजवळीलच एका टेकडीवर वसलेले. तेथील शिलालेखावरून हे देऊळ देवगिरीच्या यादव राजांच्या काळात बांधल्याचे समजते. सध्या स्वकाम सेवा मंडळ संस्थेने लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. पूर्वी गावाला संपूर्ण तटबंदी होती, आता फक्त एक दगडी कमान शिल्लक आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांचा सहवास कधीकाळी या गावाला लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यनिष्ठ, शुर, पराक्रमी सरदार (दुळबाजी तापकीर सरकार) व तापकीर सरदार घराणे, दाभाडे सरकार आणि देशमुख सरकार हे या गावचे रहिवासी आहेत.जुने वाडे व घरांचे दर्शन चऱ्होलीसह लगतच्या चोविसावाडी, वडमुखवाडी, निरगुडी, धोनोरे आदी गावांमध्ये आजही जुनी कौलारू घरे शिल्लक आहेत. गावठाणात जुने वाडे आहेत. त्यांचे नक्षी काम, कलाकुसर बघण्या व अभ्‍यासण्यासारखे आहे. आळंदीतून चिंबळी रस्त्याने गेल्यास उजव्या बाजूला एक टेकडी आहे. त्यावर आसाराम बापू यांचा आश्रम आहे. सर्व परिसर बघण्यासारखा आहे.

शिवसृष्टी पर्यटन स्थळ
वाघेश्‍वर मंदिर एका टेकडीवर आहे. तेथून गावाचा संपूर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात आहे. इंद्रायणी नदीचे विहंगमदृष्य व निसर्गरम्य परिसर डोळ्यांना सुखावतो. मंदिराच्या परिसरात शिवसृष्टी साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूचा १६ फुट उंच अश्‍वारूढ पुतळा उभारला आहे. येथील उद्यान प्रशस्त आहे. वाघेश्‍वर मंदिर परिसर एक पर्यटन स्थळ झाले आहे. चऱ्होलीच्या उत्तरेकडून इंद्रायणी नदी चंद्राकार वाहते.

तुळापूरचे नौकाविहार
आळंदीपासून तुळापूर साधारण दहा किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचे पूर्वीचे नाव ‘नांगरवास’ होते, असे म्हणतात. या ठिकाणी भीमा, भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांचा संगण आहे. अर्थात त्रिवेणी संगम असल्याने अनेक भाविक स्नानासाठी येतात. तीन नद्यांच्या संगमामुळे बाराही महिने पाणी अथांग असते. त्यामुळे येथे नेहमी बोटिंग सुरू असते. या माध्यमातून नौकाविहाराचा आनंदही लुटता येतो.

संभाजी महारात समाधीस्थळ

तुळापूर येथे त्रिवेणी संगमावर प्राचीन शिवालय आहे. त्याला संगमेश्वर असे म्हणतात. मंदिराला तटबंदी आहे. मंदिरापासूनच नदी घाटावर जाता येते. येथे मंदिराच्या समोरच छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे. त्यात महाराजांचे जीवन चरित्र रेखाटले आहे. एका बाजूला अश्वारूढ पुतळा आहे.

लोहगावचा खंडोबा माळ ट्रेक
चऱ्होली गावाची हद्द संपते त्या ठिकाणी पुणे शहर सुरू होते. अजिंक्य डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची इमारत पिंपरी-चिंचवड शहरात असून प्रवेशद्वार व मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे. या ठिकाणीच उंच टेकडी आहे. टेकडी लंब गोलाकार असून तिला दोन शिखरे आहे. दोन शिखरांच्या मध्ये पठार आहे. पठाराचा भाग खडकाळ असून त्यात पाणी साचलेले आहे. एका शिखरावर खंडोबाचे मंदिर आहे. त्यालाच खंडोबचा माळ म्हणतात. त्यावर डी. वाय. पाटील संकुलाच्या प्रवेशद्वारापासून ट्रेकिंग करत जाता येते. साधारणतः अर्धा तास चालत टेकडी चढून गेल्यावर दुसऱ्या टोकाला खंडोबाचे मंदिर आहे. तेथून लोहगावच्या बाजूने खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.

विमानतळ दर्शन टेकऑफ व लॅंडिंग
खंडोबा माळावरून आकाश निरीक्षण करता येते. वेगवेगळ्या प्रकारची झाडे येथे असल्याने वनस्पती निरीक्षणीही करता येते. माळावरून उत्तर वायव्यवेला बघितल्यास चऱ्होलीगाव व आळंदीचे विहंगम दृश्य दिसते. दक्षणेला पूणे शहराचे दर्शन घडते. लोहगाव विमानतळही येथून दिसते. त्यामुळे विमानांचे लॅंडिंग व टेकऑफ कसे होते याचे निरीक्षण करता.येथे. टेकडी भटकंती करताना निसर्ब दर्शनाचा आनंदही घेता येतो.

ऐतिहासिक ‘तुला’पूर
शहाजी राजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा नद्यांच्या काठावर नांगरवासगावी अर्थात तुळापूर येथे पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली. पण, ‘एवढा थोर बच्चा कसा जोखावा’ याची त्याला काही केल्या उकल होईना. मग शहाजीराजांनी पुढे होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा भीमा आणि इंद्रायणी नद्यांच्या संगमातील डोहातल्या एका नावेत चढविण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खूण करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगडधोंडे नावेत चढविले आणि त्या दगडांच्या भाराइतके सोने-नाणे दान करण्यात आले. तेव्हापासून त्या ‘नांगरवास’ गावाला ‘तुळापूर’ असे म्हटले जावू लागले असे सांगितले जाते.

चाकणचा भुईकोट
आळंदीपासून दहा किलोमीटर अंतरावर पुणे-नाशिक महामार्गावर चाकण गाव आहे. तिथे भुईकोट किल्ला आहे. तो आजही इतिहासाची साक्ष देतो. सध्या किल्ला भग्नावस्थेत असून त्याची तटबंदी काही प्रमाणात शिल्लक आहे. त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या किल्ल्यालाच संग्रामदुर्ग असेही म्हणतात. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी हा किल्ला शिवरायांना भेट दिला होता. त्यामुळे महाराजांनीसुद्धा फिरंगोजी यांनाच किल्लेदार म्हणून घोषित केले होते. हा किल्ला जिंकण्यासाठी शाहीस्तेखानाच्या बलाढ्य फौजेला तब्बल ५६ दिवस लागले होते.

चक्रेश्वर मंदिर
चाकण येथील चक्रेश्वर मंदिर हा देखील एक ऐतिहासिक व पौराणिक ठेवा आहे. रामायण काळात राजा दशरथाचे अन्य राजांशी युद्ध सुरू होते. त्या वेळी त्यांच्या रथाचा आस मोडून चाक निखळले होते. ते ज्या ठिकाणी पडले त्याला चक्रेश्वर म्हणून ओळखले जाते. तसेच, महाभारत काळात श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्क जिथे पडते होते. ते ठिकाण म्हणजे चक्रेश्वर होय, अशा आख्यायिका सांगितल्या जातात. त्या चक्रावरूनच चाकण असे नाव या गावाला मिळाल्याचेही सांगितले जाते.

वडमुखवाडीतील संतशिल्‍प
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आळंदी-पुणे पालखी मार्गावर सकल संत भेटीवर आधारित समह शिल्प उभारले जात आहे. यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्यासह सकल संतांचे बावीस शिल्प आहेत. परिसरात ओपन थिएटर आणि उद्यान उभारणीचे काम सुरू आहे. उद्यानाच्या संरक्षक भिंतीवर म्युरल्स उभारण्यात येणार आहेत. याच ठिकाणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे थोरल्या पादुका मंदिर आहे. शेजारीच प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”