
घराची राखण करणाऱ्या कुलुपाच्या निर्मितीची कथा...
मथळा वाचून आश्चर्य वाटेल, की अशी कोणती निर्जिव वस्तू आहे की, ती एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे घराची राखण करते. जास्त विचार करू नका, मी कुलपाबद्धल बोलतोय. कुलपाच्या भरवशावर आपण निर्धास्त राहतो. मग ते कुलूप घराचे असो किंवा दुकानाचे असो. कुलूप नसते तर काय झाले असते, याची कल्पनाच करता येत नाही. घराचे, वास्तूचे, मालमत्तेचे संरक्षण करणारे कुलूप हे गर्भश्रीमंतापासून ते गरीब व्यक्तींकडे हमखास आढळून येणारी वस्तू आहे. प्रत्येक व्यक्ती कुलूप हाताळतो, परंतु ते कुलूप तयार कसे होत असेल, त्याला किती वेळ लागतो, मुळातच कुलूप कशापासून तयार होते आणि कोठे तयार होते, याबाबत सर्वांनाच माहित असेल असे नाही. आपल्याकडे उत्तर प्रदेशातील अलीगड ही कुलूपनगरी म्हणून ओळखली जाते. तर दक्षिणेतील डिंडिगूळ ही कुलपाची आणखी एक नगरी आहे. अलीकडच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कुलपाची निर्मिती होऊ लागल्याने पारंपरिक कुलूप उद्योगाला घरघर लागली आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने अलीगडच्या कुलूप उद्योगाच्या विकासासाठी योजना आखली आहे, परंतु डिंडिगूळच्या उद्योगाकडे राज्यकर्ते फारसे सकारात्मक नसल्याचे दिसून येते.
अलीगडचे मुस्लिम विद्यापीठ जगात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथील कुलूप व्यवसायाला नावलौकिक आहे. मोगलांच्या काळापासून अलीगडमध्ये कुलूप तयार होऊ लागले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीपासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या अलीगडला ‘कुलूपनगरी’ म्हणतात. देशातील एकुण कुलूप उत्पादनापैकी ७५ टक्के कुलूप निर्मिती अलीगडनगरीत होते. अलीगडचे कुलूप उच्च प्रतीचे असतात, असे मानले जाते. या उद्योगात शहरातील सुमारे १ ते दीड लाख प्रशिक्षित आणि अप्रशिक्षित कारागीर कार्यरत होते. ही संख्या पाच वर्षापूर्वीची असून सध्या यात घट झाल्याचे सांगितले जात आहे.
अलीगडमधून कुलूप आणि तांब्यांचे अन्य उत्पादनाची निर्यात केली जाते आणि त्याची वार्षिक उलाढाल ही २०० ते २२५ कोटी रुपयांच्या आसपास आहे. काही वर्षांपूर्वी शहरात सुमारे ६ हजार घरगुती आणि मध्यम स्वरुपातील कंपन्या या कुलूप उद्योगातील आर्थिक कणा मानल्या जात होत्या. परंतु आता पूर्व आशियायी देशातील उदा. चीन, तैवान, कोरियात तुलनेने स्वस्तात कुलूप तयार होत असल्याने आणि धातूच्या किंमतीत वाढ झाल्याने अलीगडचा कुलूप उद्योग आर्थिक अडचणीत आला आहे. विशेष म्हणजे २०१६ च्या नोटाबंदीचा जबर फटका या उद्योगाला बसला. कुलूप निर्मितीचे ८० टक्के काम रोकड टंचाईमुळे थांबले. किरकोळ कारागिरांची आर्थिक अडचण वाढली आणि रोखीने व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची संख्या रोडावली. तसेच परदेशातून तुलनेने अधिक दर्जेदार आणिस्वस्त कुलूप भारतात येऊ लागल्याने स्थानिक उद्योगावर संक्रात आली आहे. परिणामी काही मोठ्या कुलूप उद्योगांनी या व्यवसायालाच कुलूप लावून नवीन मार्ग निवडला.
सुरवातीला हा असंघटित उद्योग होता. कालांतराने इंग्रजांनी या उद्योगाची बांधणी केली आणि आर्थिक स्रोत म्हणून या उद्योगाला पुढे आणले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अलीगडच्या कुलूप उद्योगाला वलय मिळाले आणि देशभरात याच कुलूपाचा अधिक वापर होऊ लागला. राज्य सरकारकडून भरीव योगदान दिले जात नसले तरी लोकप्रियतेमुळे उद्योग टिकून राहिला. कुलूप व्यवसायात असलेल्या उद्योजकांची संघटना स्थापन झाली आणि त्यांनी वेळोवेळी शासनदरबारी प्रश्न मांडले. अलीगड येथील अप्पर कोट येथे चाळीस वर्षांपासून कुलूपाची निर्मिती केली जात आहे. परंतु नवीन आव्हानामुळे तीन वर्षांपासून या भागात कुलूप निर्मिती थंडावली आहे. विशेषत: कोरोना काळानंतर कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने कुलूप उद्योगासमोर नवे संकट उभे राहिले आहे. उत्पादनाचा खर्च वाढला आहे. अलीगडचे काही किरकोळ व्यापारी जुन्याच भावाने ऑर्डर घेत आहेत आणि कच्च्या मालाच्या किंमती वाढवूनही तयार मालाची किंमत वाढवत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तोटा वाढत गेला. त्यामुळे मार्च महिन्यांत ३०० पेक्षा अधिक कुलूप उत्पादकांनी कारखाने आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कारखान्यांना तोट्यातून बाहेर काढण्यासाठी कुलूप आणि हार्डवेअर उत्पादनाच्या किंमतीत २० टक्के वाढवण्याचा निर्णय झाला. कारण या भाववाढीमुळे १५ ते २० हजार लोकांच्या रोजीरोटीवर संकट आले होते.
कुलूप उद्योगासमोरील अडचणी
नोटाबंदीबरोबरच अन्य कारणानेही कुलूप उद्योगासमोर अडचणी वाढत गेल्या. डिजिटल व्यवहार, जीएसटी आकारणी, चिनी कुलुपाचे आगमन यामुळे अडीगडच्या कुलूप उद्योगात अडचणीत भर पडत गेली. याशिवाय वीज आकारणीत वाढ, कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढ आदी कारणामुळे पारंपरिकरीत्या कुलुपाची निर्मिती करणाऱ्या ६५०० कुटीर उद्योगांवर ताण पडला. कुलूप तयार करण्याचे काम अतिशय किचकट असल्याने आणि पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने सहा दिवस कुलूप निर्मितीत जातात आणि सातव्या दिवशी त्याची विक्री होते. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने अलीगडचा बाजार ही महागाई पेलण्यास तयार नाही. काही उद्योगांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले असून स्थानिक उद्योग चांगल्या दर्जाचे कुलूप तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीगडच्या कुलूप उद्योगाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्टनुसार कुलूप-हार्डवेअर आणि तांब्याच्या मूर्तीची निर्मितीला योगी सरकार प्रोत्साहन देत असून या जोरावर अलीगडचा व्यवसाय टिकून राहील अशी अपेक्षा आहे.
दक्षिणेतील ‘अलीगड’
कुलुपाचे नाव घेतले तर आपल्यासमोर केवळ अलीगडचेच नाव येते. परंतु दक्षिणेत देखील कुलूपनगरी असून त्याचे नाव डिंडिगूळ असे आहे. त्याठिकाणी आता बोटावर मोजण्याइतपत कारागिर कुलूप तयार करतात. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे दिसून येते. तमिळनाडूत असलेल्या डिंडिगूळ येथे कधीकाळी ६० ते ७० कारागीर तासनतास काम करत कुलूप तयार होते. परंतु आता मात्र कारागिरांची संख्या घटली आहे. चार दशकांपासून या ठिकाणचे कारागिरी जीआय टॅगचे कुलूप तयार करत होते. चेन्नई येथील जिओग्रॅफिकल इंडिकेशन रजिस्ट्रीने ऑगस्ट २०१९ मध्ये डिंडिंगूळ येथील कुलूपाची गुणवत्ता आणि लोकप्रियता पाहून जीआय टॅग दिला होता. परंतु आता या व्यवसायात फारसे कोणी राहिले नाही. एकेकाळी एकाच शेडखाली ६० ते ७० कारागीर कुलूप तयार करत होते. त्यांच्या उत्पादनावर लोकांचा विश्वास असायचा. एकापेक्षा एक सरस कुलूपांची निर्मिती केली जायची. डिंडिगूळच्या ३०० घरांपैकी २०० घरांना डिंडिगुळचेच कुलूप वापरले जायचे.
परंतु आता शहरातील काही भागातच या कुलूपाचा वापर केला जात आहे. या उद्योगाला घरघर लागत असून त्यांचा वारसा पुढे कोणी नेऊ इच्छित नाही. कारण या कामात मिळणारी मजुरी इतकी कमी आहे, की तेथे कोणीही काम करण्यास तयार नाही. विशेष म्हणजे डिंडिगूळ येथे तीन चाव्या असलेल्या कुलपाची निर्मिती केली जायची. एक चावी कुलूप उघडण्यासाठी दुसरी चावी कुलूप लावण्यासाठी आणि तिसऱ्या चावीचा दोन्ही ठिकाणी वापर व्हायचा. एवढी कलाकुसर अन्य कोठेही पाहवयास मिळत नव्हती. काही कुलपात तर अलार्म सेट होता. जर अन्य व्यक्ती कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत असेल तर अलार्म वाजत चावी अडकायची. विशेष म्हणजे आंब्याच्या आकाराचे कुलूप सर्वांना आवडायचे, असे स्थानिक कारागीर सांगतात. मागणीनुसार कुलूप तयार केले जात होते. परंतु आता मागणीत घट झाली आहे.
एका कुलूप तयार करण्यासाठी तीन तासाचा वेळ
लिव्हर गाईड आणि चाव्या या अलीगड येथून मागवल्या जायच्या आणि धातू तमिळनाडूतीलच त्रिपूर आणि मदुराई येथून मागवले जायचे. कच्चा माल देशभरातून मागवला जायचा. पूर्वी एक कारागिरी दररोज पाच कुलूपांची निर्मिती करायचा आणि त्याला एका कुलपामागे ७५ रुपये मिळायचे. बहुतांश कुलूप हे लोखंड, तांबे आणि स्टीलपासून तयार केले जाते. आकारावर कुलूप तयार करण्याचा कालावधी निश्चित व्हायचा. लहान कुलूप तयार करण्यासाठी तीन तास लागतात. ८३ मिलिमीटर कुलपाचे वजन साधारणपणे दीड किलो असायचे. त्याला खूप वेळ लागतो, असे कारागीर सांगतात. परंतु ते आपल्या मुलांना या उद्योगात येऊ देण्यास इच्छुक नाहीत. कारण चावी आणि कुलूप तयार करणे हे खूपच कठीण आणि मेहनतीचे काम आहे. त्यामुळे कारागिरांच्या पुढील पिढीने अन्य क्षेत्रात उडी घेतली आहे. मेहनतीच्या तुलनेने पैसे कमी मिळत असल्याने आर्थिक स्थितीत फारसा फरक पडला नाही. म्हणून मुलांना अन्य क्षेत्रात जाण्यासाठी कारागिरांनी प्रोत्साहित केले. कुलूपाच्या पत्र्याला आकार देण्यासाठी डाय कास्टिंगची प्रक्रिया अंगीकारली जाते. त्यानुसार लोखंडाला गरम करून ते साच्यात टाकले जायचे. आता अशा प्रकारे तयार होणाऱ्या कुलूपांचे प्रमाण कमी झाले आहे. ब्रँडेड कंपन्यांनी आधुनिक आणि आकर्षक साच्यासह कुलूप बाजारात आणली आहेत. अशा स्थितीत पारंपरिक कुलूप व्यवसायाला आता काही दिवसांनी ‘कुलूप’ लागण्याची वेळ आली आहे.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”