पुण्यात 1796 मध्ये देवीची लस इंग्लंडवरुन मागवण्यात आली होती... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Medical hub}
पुण्यात 1796 मध्ये देवीची लस इग्लंडवरुन मागवण्यात आली होती...

पुण्यात 1796 मध्ये देवीची लस इंग्लंडवरुन मागवण्यात आली होती...

पुण्याच्या गेल्या अडीचशे वर्षांच्या आरोग्य इतिहासात वेगवेगळ्या नऊ साथीच्या रोगांचा भयंकर उद्रेक झाल्याची नोंद आहे. त्यापैकी प्लेगनंतर प्रत्येक साथरोग उद्रेकात शहराने आरोग्य व्यवस्थेत अमुलाग्र बदल केला. त्यामुळे कोरोना उद्रेकानंतर ससून रुग्णालय ते अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय असा 159 वर्षांचा आरोग्य प्रवास पुण्याने आतापर्यंत केला आहे. आता ‘मेडिकल हब’ म्हणून पुण्याने वाटचाल सुरू केली आहे.

पुणे आणि साथीचे रोग यांचं नातं दोन शतकांहून अधिक काळाचं आहे. पुण्याला साथीच्या रोगाचा पहिला उद्रेक 1769 मध्ये झाला. पहिली साथ होती देवीची. बरोबर 27 वर्षांनी म्हणजे 1796 च्या दरम्यान देवीच्या साथीचा शहरात परत उद्रेक झाला. सध्या आपण जसे कोरोना प्रतिबंधक लस घेत आहोत. तशीच त्या वेळी देवी प्रतिबंधक लस होती. त्या लशीचा शोध युरोपातील एडवर्ड जेनर यांनी लावला होता. डॉ. कोट्स यांनी ती लस इंग्लंडमधून मागविली. त्यासाठी पेशव्यांनी मदत केली होती. शनीवार वाड्यावर हे लसीकरण झाले होते. त्यामुळे पुणेकरांना साथरोग उद्रेक, त्यावरचे उपचार, प्रतिबंधात्मक लसीकरण याची तोंडओळख आधीपासूनच आहे!

पुण्यामध्ये देवीनंतर मलेरिया, कॉलरा याच्या साथी येऊन गेल्या. पण, सर्वात विनाशकारी ठरली ती प्लेगची साथ. रास्ता पेठेत 19 डिसेंबर 1896 प्लेगचा पहिला रुग्ण आढळला. पुढे जवळपास 12 ते 13 वर्षे या साथीचे रुग्ण शहराच्या वेगवेगळ्या भागात आढळत होते. पुण्यात 1896 ते 1950 या 54 वर्षांमध्ये शहरात तीस लाख नऊ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 56 हजार 91 (18 टक्के) मृत्यू एकट्या प्लेगमुळे झाल्याची नोंद महापालिकेच्या दफ्तरात झाली आहे. 1897-98 साली पाच हजार 302 रुग्णांना प्लेगचा संसर्ग झाला होता. त्यातील चार हजार 125 (80 टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, 1950 नंतर शहरात प्लेगच्या एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. शहरात प्लेगचा प्रचंड उद्रेक सुरू असतानाच 1897 साली तत्कालीन पुणे नगरपालिकेच्या पुढाकाराने 1897 मध्ये संसर्गजन्य रुग्णालय सुरू झाले. त्याचे पुढे डॉ. नायडू असे नामकरण करण्यात आले. त्यापूर्वी 8 ऑक्टोबर 1863 रोजी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या बांधकामाला सुरवात झाली होती. या रुग्णालयाचे बांधकाम 1867 मध्ये पूर्ण झाले आणि 1883 मध्ये रुग्णालयाच्या विस्तारिकरणाचे काम सुरू झाले.

साथीबरोबरच वाढली आरोग्य व्यवस्था-

पुण्याच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात आलेल्या प्रत्येक साथीमधून त्या वेळच्या कारभाऱ्यांनी आरोग्य व्यवस्था भक्कम करण्याचा धडा घेतला. त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली. त्यातून शहरातील आरोग्य व्यवस्थेला आकार मिळत होता. शहरात 9 डिसेंबर 1885 मध्ये शनिवार पेठेत कॉलराचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर काही वर्षांमध्येच हा उद्रेक रोखण्यासाठी शहरातील उघड्यावरची गटारे बंद झाली. त्या एवजी भुयारी गटारांची नव्या व्यवस्थेचा शहरात उदय झाला. त्यामुळे अशुद्ध पाण्यातील बेसमुमार वेगाने फैलावणारी कॉलराची साथ आटोक्यात आली. अशीच एक-एक आरोग्य व्यवस्था प्रत्येक साथीनंतर पुण्यात विकसीत झाली आहे.

खासगी रुग्णालयांचे योगदान-

देशाच्या स्वातंत्र्यापासून 1990 पर्यंत मिश्र अर्थव्यवस्थेचा हा काळ होता. नव्वदच्या दशकाच्या सुरवातीपासूनच जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, उदारिकरण याचे वारे जोमाने वाहू लागले. अर्थात, त्याला भारतही अपवाद राहीला नाही. देशाने आर्थिक बदलाचा स्विकार केला. देशभर त्याचे पडसाद उमटू लागले. तसेच पुण्यातही उमटले. अवघ्या दोन दशकांमध्ये पुण्याला ‘आयटी हब’, ‘सिलीकॉन व्हॅली’ अशी नवी ओळख मिळाली. देशात परकीय गुंतवणूक वाढली. देशातील प्रमुख शहरांमध्ये वेगाने बदल होत होते. देशात लोकसंख्येमध्ये आठव्या क्रमांकावर असलेल्या पुण्यातही 1990 ते 2000 या दरम्यान बदलांना सुरवात झाली. हे पुण्याच्या दृष्टीने संक्रमणाचे दशक ठरले. यात दरम्यान आरोग्य व्यवस्थेत खासगी रुग्णालयांचे योगदान सुरू झाली. धर्मादाय रुग्णालयांची खऱ्या अर्थाने पायाभरणी झाली. यापूर्वी वैद्यकीय उपचारांची व्यवस्था शहराच्या पूर्व भागात केंद्रीत झाली होती. ती रचना बदल कोथरुडसारख्या शहराच्या पश्चिम भागात रुग्णसेवा सुरू झाली. पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेची सुरवात ससून रुग्णालयापासून झाली. तो प्रवास आता पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत आला आहे. हा प्रवास निश्चितच येथे थांबणार नाही, हे कोरोना उद्रेकानंतर कात टाकत असलेल्या आरोग्य व्यवस्थेवरून स्पष्ट दिसते.

‘मेडिकल हब’कडे वाटचाल -

जगभरात आधुनिक वैद्यकशास्त्रात झपाट्याने बदल सुरू होते. रोगनिदानाचे अद्ययावत तंत्र उपलब्ध होऊ लागले होते. काळ्या कुट्ट ‘एक्स-रे’ची जागा डिजिटल एक्स-रेने केव्हाच घेतली. ‘सीटी-स्कॅन’, ‘एमआरआय’ हे क्रांतिकारक बदल रेडिओलॉजिमध्ये झाले. तसेच, रक्ताच्या नमुन्यावरून अचूक रोगनिदानाचे तंत्र पॅथॉलॉजिला गवसले. त्यातून अचूक आणि नेमके उपचार करणारे तंत्र विकसित झाले. जगभरात होणाऱ्या या प्रत्येक वैद्यकीय बदलाची मोहोर पुण्यात उमटत गेली. त्यामुळे पुण्याची वाटचाल आता ‘मेडिकल हब’ या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

पुण्यात सहाशेपेक्षा जास्त खासगी रुग्णालये आहेत. महापालिकेची 70 हून अधिक रुग्णालये रुग्णसेवेसाठी सज्ज आहेत. पंधरा हजारांहून अधिक खाटा रुग्णसेवेसाठी उपलब्ध आहेत. विशेषज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित मनुष्यबळ, कुशल परिचारिका, सहजतेने मिळणारी जीवरक्षक औषधे आणि अद्ययावत वैद्यकीय उपकरणे ही आधुनिक काळातील आरोग्यसेवेची पंचसूत्री आहे. यात पुणे देशात अग्रगण्य आहे.

वैद्यकीय पर्यटनात पुण्याला संधी निर्माण होत आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुर आणि चेन्नई या चार महानगरांमधील रुग्णालयांमध्ये परदेशी नगरिक मोठ्या संख्येने उपचारांसाठी दाखल होतात. जवळपास 70 टक्के परदेशी रुग्ण या चार ठिकाणी उपचार घेतात. मात्र, महाराष्ट्रातील विशेषतः पुणे, नाशिक आणि नागपूरमधील डॉक्टरांना आणि रुग्णालयांसाठी वैद्यकीय पर्यटनाची संधी निर्माण होत आहे. त्यासाठी शहरातील काही रुग्णालयांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा निर्माण केली आहे. तसेच, आता विमानांची ‘कनेक्टिव्हिटी’ या पुण्यात वाढत आहे. त्याचा थेट परिणाम वैद्यकीय पर्यटनाला गती मिळण्यावर होईल. तमिळनाडू आणि दिल्लीच्या तुलनेत पुण्यात वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी येतो. देशातील ‘एनएबीएच’ प्रमाणित रुग्णालयांची संख्या 729 आहे. त्यापैकी 78 (11 टक्के) रुग्णालये एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्या पाठोपाठ कर्नाटकचा (64) आणि पंजाबचा (60) क्रमांक लागतो. राज्यात ‘एनएबीएच’ प्रमाणपत्र मिळालेली 64 टक्के (50) रुग्णालये एकट्या पुण्या-मुंबईत आहेत.

पुण्यातील साथीच्या रोगांचे उद्रेक-

1769 : देवीची साथ

1880 : मलेरिया या सांसर्गिक रोगाचा उद्रेक

9 डिसेंबर 1885 : कॉलरा साथ

19 डिसेंबर 1896 : प्लेगची पहिली साथ

5 सप्टेंबर 1918 : इन्फ्ल्युएन्झा (स्पॉनिश फ्लू) साथ.

ऑगस्ट 1949 : पोलिओचा उद्रेक

1940 : क्षयरोगचे रुग्ण

2009 : ‘स्वाईन फ्लू’ चा देशातील पहिला मृत्यू पुण्यात झाला. त्यानंतर या साथीचा उद्रेकाने पुणे हादरले.

9 मार्च 2020 : कोरोना

असे उभारले सरकारी दवाखाने-

- 1878 : नारायण व शनिवार पेठेच्या सीमारेषेवर पहिला आंग्ल पद्धतीचा दवाखाना नगरपालिकेकडून सुरू

-1880 : सदाशिव पेठ आणि नाना पेठेत आयुर्वेदिक व आंग्ल पद्धतीचे दोन दवाखाने सुरू

- 1893 : महात्मा फुले मंडई येथे आयुर्वेदिक दवाखाना सुरू

- 1924 : कसबा व गंज पेठेत दोन दवाखाने सुरू

- 1926 : नारायण पेठेत दवाखाना

- 1932 : शिवाजीनगर येथे दवाखाना

- 1935 : रविवार पेठेत दवाखाना

- 1938 : शुक्रवार पेठेत दवाखाना

- 1949 : गाडीखाना दवाखाना सुरू

- 10 ऑक्‍टोंबर 1950 : रोजी गाडीखाना येथे महापालिकेकडून पहिली रोगचिकित्सा प्रयोगशाळा (लॅब) सुरू

- 1947 ते 1957 : पर्यंत शहराच्या विविध भागात एकूण 20 दवाखाने नगरपालिकेने उभारले.

- 9 नोव्हेंबर 1953 ः महापालिकेकडून 13 खेड्यांमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी पहिलांदा फिरता दवाखाना सुरू करण्यात आला.

- 1943 ः बालमुत्यदर रोखण्यासाठी पुण्यात पहिल्यांदा मॅटर्निटी होम सुरू.

- 1957 पर्यंत चार प्रसूती गृह सुरू

हेही वाचा: ...संसद भवन आणि ताजमहाल विकणारा मि. नटवरलाल!

शहरातील आरोग्य व्यवस्थेला ‘बूस्टर’

बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) यापेक्षा पुढे महापालिकेची रुग्णालये गेल्या 72 वर्षांमध्ये कधीच सरकली नव्हती. कोरोनाचा उद्रेक इतका भयंकर होता की, रुग्णांना दाखल करण्यासाठी शहरांमध्ये खाटा मिळत नव्हत्या. अशा वेळी महापालिकेची रुग्णालये अद्ययावत वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज करण्यात आली. त्यामुळे कोरोना उद्रेकात महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला बूस्टर डोस मिळाला. त्यातून रुग्णालयांना चेहरा-मोहरा गेल्या दोन वर्षांमध्ये बदलल्याचे प्रकर्षाने दिसत आहे.

शहरात गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्या वेळी महापालिकेकडे 19 प्रसूतीगृहे एक सामान्य रुग्णालय आणि शंभर खाटांचे संसर्गजन्य रुग्णालय इतकीच सुविधा उपलब्ध होती. पुण्यात 120 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात पहिल्या काही रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांमध्येच कोरोनाच्या रुग्णांची संख्या बेसुमार वेगाने वाढू लागली. डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालय भरले. त्यामुळे पुढे रुग्णांना दाखल करून ठेवयाचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला. त्या वेळी ससून रुग्णालय हा पर्याय पुढे आला. पण, त्याच बरोबर महापालिकेची इतर रुग्णालये साथरोगाच्या उद्रेकासाठी सज्ज करण्याचे पहिले पाऊल पडले.

खाटांची क्षमता आठ पटींनी वाढली

कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी महापालिकेच्या रुग्णालयांमधील खाटांची क्षमता 140 होती. ही संख्या गेल्या दोन वर्षांमध्ये एक हजार 94 पर्यंत वाढविण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. त्यामुळे गेल्या 730 दिवसांमध्ये आठ पटींनी खाटांची संख्या वाढल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

अशा वाढल्या रुग्णालयातील खाटा (संख्या खाटांमध्ये)

रुग्णालय - कोरोना - कोरोनानंतर

डॉ. नायडू 100 200

दळवी 40 200

लायगुडे 0 50

बोपोडी 0 50

बाणेर (जूने) 0 334

बाणेर (नवीन) 0 260

हेही वाचा: ''यश मिळवायचं असेल, तर रागावर नियंत्रण आवश्यक''

ऑक्सिजनची यंत्रणा सज्ज

कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी महापालिकेच्या एकाच रुग्णालयात एक किलोलिटर वैद्यकीय ऑक्सिजन होता. कोरोनाच्या पहिल्या उद्रेकात रुग्णांना उपचारांसाठी ऑक्सिजन नितांत गरज असल्याचे प्रकर्षाने लक्षात आले. त्यानंतर प्रमुख रुग्णालयांमधून ऑक्सिजन सुविधा सक्षम करण्याचा ध्यास महापालिकेने घेतला. दोन वर्षांमध्ये नऊ रुग्णालयांमधून 118 किलो लिटर ऑक्सिजन साठ्याची यंत्रणा सज्ज करण्यात आली. महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात प्रथमच ऑक्सिजन प्लँट बसविण्यात आला. त्यामुळे उपचारांसाठी दाखल असंख्य रुग्णांचे प्राण वाचविणे वैद्यकीय तज्ज्ञांना शक्य झाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top