Rural Education for Tribals- ग्राममंगल मुक्तशाळा' मुलांच्या कलांनी शिक्षण देण्याची आदर्श पद्धती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राममंगल मुक्तशाळा}
जाणून घ्या ही आदर्श शिक्षण पद्धती

'ग्राममंगल मुक्तशाळा' मुलांच्या कलांनी शिक्षण देण्याची आदर्श पद्धती

दाभोण, ऐना, रणकोळ ही आहेत गावांची नावे. ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील खोलवरच्या जंगल भागातील  ही  वारली, कातकरी, मल्हारकोळी अशा आदिवासींची वस्ती असलेली ही गावे ! काय आहे इथली मुक्तशाळांची परंपरा....

चाळीस वर्षांपूर्वी, थोर समाजसेविका अनुताई वाघ वयाच्या सत्तराव्या वर्षी या गावांत आल्या. तिथे त्यांनी बालवाड्या सुरू केल्या. येथील कामासाठी 'ग्राममंगल` नावाची संस्था सुरू केली. आता अनुताई नाहीत; पण बालवाड्या मात्र चांगल्या फुलल्या आहेत. आदिवासी मुले या बालवाडयांमधूनच त्यांच्या शिक्षणाची पहिली पाऊले टाकताहेत. (Rural Open schools for tribals in Maharashtra Thane District)

ऐना या गावात संस्थेची बालवाडी ते दहावी शाळा (School) आहे. शाळेचे नावच 'मुक्तशाळा' आहे. जवळपास चार ते पाच एकरावर असलेल्या जागेवर ही शाळा कार्यान्वित आहे. इमारतीवर वारलीची सुबक नक्षीदार रंगकाम केल्याने खऱ्या अर्थाने आदिवासी भागातील शाळा येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष वेधून घेते. स्वयं शिक्षणाच्या संधी, सौंदर्यपूर्ण आनंदमय वातावरण, व्यक्तिगत शिक्षणाची रचना, अभ्यासाचा (Study) भाग म्हणून छोटी बौद्धिक आव्हाने स्वीकारण्याची संधी, आवडी-निवडीचे स्वातंत्र्य, व्यक्तिमत्त्वाचा आदर आणि भावनांची कदर असणाऱ्या शाळेतले शिक्षण श्वासोच्छ्वासाइतके सहज होते, नवशिक्षणाविषयीच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी ‘ग्राममंगल’ संस्थेतर्फे महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू आहे. अनुताई वाघ, प्रा. रमेश पानसे आदींनी चार  दशकांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेने आनंददायी शिक्षण पद्धतीचा एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे.

मुलांमध्ये  शिक्षणाची (Education) उपजतच आवड असते. शाळा आकर्षक आणि भरपूर कल्पक उपक्रम देणारी असेल तर मुलांना नक्कीच शाळेत जावेसे वाटते. त्यांना शाळेत ‘येती’ करण्याचा प्रश्नच राहत नाही. अशा शाळेतून ‘गळती’ संभवत नाही. शाळांमध्ये कृतिशील अनुभवांची रेलचेल असेल तर सर्वच मुले-मुली आनंदाने येऊन चांगल्या पद्धतीने शिकतात.  हे या शाळेने खरे करन दाखवले आहे. येथून जवळच असलेल्या विक्रमगड या तालुक्याच्या ठिकाणी ‘ग्राममंगल’ संस्थेची 'अनुताई वाघ शिक्षण  केंद्र' ही बालवाडी ते दहावी पर्यंतची शाळा आहे.

‘ग्राममंगल’च्या सर्व शाळांमध्ये मुला-मुलींना कुणीही शिकवत नाहीत. त्यांची ती अनुभवाने प्रयत्नपूर्वक शिकतात. शिक्षक फक्त त्यांना त्या प्रक्रियेत मदत करतात. सकाळी साधारण दहा वाजता शाळा सुरू होते. आधी मुले-मुली परिसराची स्वच्छता करतात. मग शाळेत नियमित अभ्यास सुरू होतो.  प्रत्येकी ४० मिनिटांची तासिका असते मात्र येथे विषयानुरूप केवळ शिक्षक बदलत नाहीत, तर मुलांनाही दुसऱ्या वर्गात जावे लागते. कारण येथे विषयानुरूप वर्गखोल्या शास्त्रालय असून तिथे गटागटाने मुले विशिष्ट विषयाचा अभ्यास करतात. प्रत्येक गोष्ट आणि गृहीतक व्यवहाराच्या कसोटीवर पारखून पाहण्याची सवय त्यांना  लागते.  ‘ग्राममंगल’ संस्थेने ५०० हून अधिक शैक्षणिक साधने तयार केली आहेत. या शैक्षणिक साधनांच्या आधारे मुले संख्याबोध, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असे व्यावहारिक गणित शिकतात.

ऐने येथील साधन केंद्रात ही शैक्षणिक साधने विभागवार जतन करून ठेवण्यात आली आहेत. संस्थेच्या वतीने बालवाडी तसेच प्राथमिक शिक्षकांसाठी या रचनावादी शिक्षण पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते. निवासी प्रशिक्षण देण्याची सोय आहे. समृद्ध ग्रंथालय शाळेत आहे. ‘लावण्य’ हाही ग्राममंगलचा एक वैशिष्टय़पूर्ण प्रकल्प आहे. या नावीन्यपूर्ण कार्यशाळेत परिसरातील कारागीर,  आपल्या कलाकृती आणि कलावस्तू तयार करतो. संस्थेत येणारे पाहुणे, पर्यटक त्या वस्तू पाहतात, विकत घेतात. येथील शाळेच्या भिंतींवर ‘नेहमी खरे बोलावे’ छापाच्या सुविचारांऐवजी अभ्यासक्रमास पूरक माहितीचे तक्ते, आकृत्या, चित्रे, गणिताची सूत्रे, कविता, सामान्यज्ञानाची
माहिती असते.

विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाकृती, केलेल्या कविता, लिहिलेले लेखही भिंतीवर आकर्षकपणे मांडलेले असतात. भूगोलाचा तास निसर्गाच्या सान्निध्यात झाडाखाली भरलेला दिसतो. तिथे पृथ्वीचा गोल हातात घेऊन मुले त्यावरील खंड, देश आणि महासागरांचे निरीक्षण करतात. गणिताच्या तासाला मुले व्यावहारिक हिशेब करून भागाकार अथवा बेरीज-वजाबाकीचे तंत्र समजून घेतात. दुपारी भोजनगृहात एकत्र जेवतात. त्यानंतर दुपारचे सत्र सुरू होऊन पाच वाजता शाळा सुटते.        

पहिली-दुसरीच्या मुलांना उपयुक्त असा ‘लिहू या – वाचू या’ हा नऊ पुस्तकांचा संच ‘ग्राममंगल’ने उपलब्ध करून दिला आहे. एका भाषेवर प्रभुत्व असेल तरच दुसरी भाषा नीट आत्मसात करता येते, असा संस्थेचा विश्वास असून त्याआधारेच संस्थेच्या शाळांमधून द्विभाषा समृद्धी प्रकल्प काही काळ आनंददायी शिक्षणाचा ‘ग्राममंगल’चा प्रयोग आता केवळ एका जिल्ह्य़ापुरता मर्यादित राहिला नसून पुणे, सातारा, बीड अशा ठिकठिकाणच्या शाळांमधून ‘ग्राममंगल’च्या रचनात्मक
पद्धतीने शिक्षण दिले जाते. प्रत्येक मूल चांगले शिकू शकते.

ग्रामीण भागातील मुलांना दर्जात्मक शिक्षण मिळावे यासाठी 'विकासघर' ही संकल्पना अंमलात आणली आहे. गावात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारातच एका कक्षात विकासघर असते. तिथे गावातील ताई मुलांना शिकवण्यासाठी प्रशिक्षित केली जाते.  पहिली ते चौथीच्या मुला-मुलींना स्वयंअध्ययनासाठी दररोज दोन तास विकासघर उपलब्ध असते. वाई,महाबळेश्वर, पाचगणी भागात  विकासघरे कार्यान्वित आहेत. मुले, शिक्षक आणि पालक मिळून शिकण्याचा एक अनौपचारिक प्रयोग 'लर्निंग होम' या नावाने पुण्यात गेली १२ वर्षे चालवला आहे. स्वयंअध्ययनाने दहावीची परीक्षा देता येते, हे या प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

ग्राममंगल संस्था, डहाणू विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत संस्थेला मिळत नाही. उलट अशाप्रकारच्या शाळा अनधिकृत ठरवून त्या बंद करण्याचा घाट शासनाने मध्यंतरी घातला होता. त्याविरूद्ध झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व ‘ग्राममंगल’च्या प्रा.रमेश पानसे यांनी करून शासनाला या शाळांची निकड पटवून दिली. निरनिराळ्या व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या मदतीवरच ‘ग्राममंगल’चे कामकाज चालते. विद्यार्थी दत्तक योजना राबवली जाते.  छोटी मुले आपली आपणच शिकत असतात. त्यांच्याभोवती पसरून ठेवलेल्या अनेक शैक्षणिक खेळांतून, शैक्षणिक साधनांतून.

रोज आल्याबरोबर भिंतीवरच्या तक्त्यात स्वतःच आपली हजेरी लावतात, आपल्याला आवडेल त्या साधनांवर खेळू लागतात. कधी हे खेळ म्हणजे भाषेची साधने असतात, तर कधी गणितांची. कधी विज्ञानाची तर कधी परिसर अभ्यासाची. ही मुले कधी एकटीच खेळत-शिकत असतात. तर कधी गटा-गटांनी बसतात.अर्थात सारखाच असा अभ्यास करतात असे नाही. कंटाळा आला तर बाहेर फिरुन येतात. किंवा झाडावर चढतात. फारच कंटाळा आला तर चक्क झोपतातसुद्धा. त्यांच्या बाई, म्हणजे वर्गातील ताई त्यांना कधी रागवत नाहीत. कारण मुलांना अभ्यासाचा कंटाळा कधीही येऊ शकतो, हे त्यांना माहीत आहे.


आपल्याला जे काही करायचे आहे, खेळायचे आहे, शिकायचे आहे ते सर्व स्वत:च ठरवण्याची मुभा इथे विद्यार्थ्यांना आहे; कारण इथे स्वयंशिक्षणाची पद्धत आहे आणि अगदी लहानपणापासून मुलांना स्वयंशिक्षणासाठी लागणारे स्वातंत्र्य दिले आहे. स्वयंशिक्षणाची संधी आणि त्यासाठी लागणारे स्वातंत्र्य दिले की लहान लहान मुलेसुद्धा स्वयंशिस्तीने वागतात, असे या शाळांतून दिसले आहे. त्यामुळे इथे मुलांनी अमूक एक गोष्ट करावी म्हणून त्यांना बक्षिसाची लालूच दाखविली जात नाही की, अमूक एक गोष्ट केली नाही, नीट केली नाही म्हणून शिक्षाही केली जात नाही.

खरे सांगायचे तर, यामुळेच ही मुलांना आवडणारी, रोज रोज जावेसे वाटणारी अशी शाळा आहे. शाळा ही मुलांचे रमण्याचे केंद्र आहे. सर्वांच्या बुद्धिमत्तेस वाव या शाळेत तर खूपच छान छान गोष्टी आहेत. मुख्य म्हणजे या शाळेत कुणाला मठ्ठ किंवा 'ढ' समजले जात नाही; कुणाला हुषार समजले जात नाही. निसर्गाने प्रत्येकच बालकाला काही ना काही आवडी दिलेल्या असतात, कशाची ना कशाची बुद्धी दिलेली असते. या शाळेत असे मानले जाते की, प्रत्येक मुलाला कुठली ना कुठली बुद्धिमत्ता मिळालेलीच असते. त्याचबरोबर प्रत्येकालाच वेगवेगळ्या बुद्धिमत्ता मिळालेल्या असतात. त्यांचा शोध घेण्याचे काम या शाळेत चालते.

असा शोध घेतल्यावर लक्षात आले की काही मुले उत्तम गाऊ शकतात, अगदी अभिजात संगीत देखील तर काही मुले छान चित्रकार आहेत. काही छान खेळतात. कुणी भाषेत हुषार तर कुणी खेळाबरोबर इतिहासातही हुषार. कुणी भूगोलावर प्रेम करतात तर कुणी गणितावर मात करतात. कुणी शेतीचे काम छान करतात तर कुणी इस्त्री करण्याचे, दुकान चालविण्याचे कसब दाखवतात. म्हणजे, सगळीच मुले हुषार असतात, हे ओळखून या 'ग्राममंगल’च्या शाळेत वेगवेगळे उपक्रम योजले जातात.

प्रकल्प पद्धतीने स्वयंशिक्षण :  
इथे मुले प्रकल्प पद्धतींनी खूप काही शिकतात. 'ग्राममंगल' संस्थेत एकदा धनगर लोक लांबून आले होते, आपल्या शेकडो मेंढया घेऊन. त्यांनी एक रात्र मुक्काम केला. ग्राममंगलच्या शेतात. तर या शाळेच्या मुलांनी एकत्र जमून, परस्परांशी विचार-विनिमय केला. भराभर प्रश्न काढले. आपापसांत वाटले आणि चक्क तास-दीड तास त्या धनगर कुटुंबांचीच मुलाखत घेतली. मुलाखत घेताना, मिळालेल्या माहितीच्या नोंदी घेतल्या. आणि मग या मुलाखतीवर आधारित असे त्यांचे धनगरांच्या जीवनावरचे पुस्तकच तयार झाले. त्यांनी स्वतःचे स्वत: लिहिलेले !

इथल्या गावात सर्व आदिवासी कुटुंबेच राहतात; फक्त वाण्याची दुकाने चालविणारी काही मारवाडी कुटुंबे. मुलांनी त्यांच्या भूगोलाच्या अभ्यासात या दोन जमातींचा अभ्यास केला. घरोघर जाऊन, घरे नीट पाहून, घरच्यांच्या मुलाखती घेऊन वगैरे. आता त्यांचेही एक चांगले पुस्तक तयार झाले आहे. त्यांच्या राहण्या-जेवणाच्या पद्धती, कपडे, घरातील वस्तू, आर्थिक व्यवहार, असे काय काय त्या पुस्तकात आहे.


मुलांना नकाशा शिकायचा होता. तर त्यांनी आधी आपल्या वर्गाचाच नकाशा काढला. कोणत्या वस्तू कुठे आहेत, मुले कुठेकुठे बसतात; या सगळ्या गोष्टींचा. मग 'ग्राममंगल'च्या परिसराचा नकाशा तयार केला नि शेवटी निघाले सगळे विद्यार्थी आणि त्यांचे गुरुजी हातात मोठमोठाले कागद नि पेन्सिली घेऊन ऐने गावाच्या नकाशाची तयारी करायला. गावाच्या प्रत्येक भागात फेरफटका करून त्यांनी कुठे काय आहे याच्या नोंदी केल्या; दिशा लक्षात घेतल्या. वेगवेगळ्या विभागांचे तयार झालेले नकाशे चक्क सारवलेल्या जमिनीवर खडूने आखले आणि त्यांचे एकत्रीकरण करुन झाला आख्ख्या ऐने गावाचा नकाशा तयार ! मग तो बारकाव्याने कागदावर
उतरवला.

‛ग्राममंगल’ या मुक्त शाळेतील मुले, त्यांच्या 'अंथरलेल्या ग्रंथालयात' पुस्तके वाचतात. विश्वकोशातूनही माहिती जमा करतात. छान छान पत्रे लिहितात, निबंध लिहितात. इतिहासातला कालपट स्वत:च तयार करतात. वेगवेगळ्या विषयांवर माहिती जमा करून पुस्तके ही तयार करतात. खूप बोलतात, बडबड करतात,  हिंडतात-फिरतात. रानातून जांभळे, करवंदे गोळा करून आणतात तर, आपल्या शाळेच्या भिंती बांधण्यासाठी डोगरांतून कारवी तोडून आणतात. सगळेजण नदीत छान पोहतात. पाहुण्यांशी मस्त गप्पा मारतात. आणि असा रोजच्या जीवनाचा भरभरून आनंद घेत घेत शिकतात, खूप शिकतात. मुक्त मनाने शिकतात.

ग्राममंगल ही एक शैक्षणिक संस्था आहे. तिची कार्यात्मक आणि वैचारिक जोपासना शिक्षणासाठी, शिक्षणातून आणि शिक्षणविषयक प्रयोगातून झाली. आपण एखादा ‘प्रयोग’ असे म्हणतो तेव्हा काही ‘हेतूपूर्ण काम’ असा त्याचा अर्थ असतो. ह्या कामामागे एखादी विशिष्ट अशी कल्पना असते किंवा विशिष्ट असा विचार असतो. आपण तो जोखून पाहत असतो. त्याची व्यावहारिक यशस्विता तपासून पाहत असतो.

ग्राममंगलच्या अगदी सुरुवातीच्या कामांमध्ये असे काही नव्हते. पण पुढे जेव्हा शिक्षणातील प्रश्न जाणवू लागले तेव्हा उत्तरांच्या दिशेने शोध सुरू झाला आणि मग शिक्षणशास्त्राच्या आणि त्यामागे असलेल्या इतर शास्त्रांचा अभ्यास होऊ लागला. हळूहळू ग्राममंगलच्या शिक्षणाच्या प्रत्यक्ष व्यवहाराला सैध्दांतिक पाया पुरविण्याचा खटाटोप सुरू झाला. बहुविध बुध्दिमत्तांचा विचार, मेंदूवर  आधारित शिक्षणाचा विचार, मज्जा व मानसशास्त्राचा आधार आणि अलीकडे एकूणच आकलनविषयक शास्त्राचा, शिक्षणशास्त्राचा इथून पुढच्या काळात ठरू शकणारा पाया यांना ग्राममंगलच्या प्रयोगात आणण्याचा प्रयत्न होऊ लागला.

ग्राममंगलचा घडत गेलेला शैक्षणिक विचार हा आजच्या काळातील शिक्षणव्यवस्था, शिक्षण व्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या गरजा यांच्याशी सुसंगत करण्याचा प्रयत्न होत होता. त्यातून मूल्यांचा विचार पुढे उभा ठाकला. ‘मूल्याधिष्ठित समाजासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण,’ ही गरजेची बाब ठरते. त्यामुळे कोणती मूल्ये आणि ती आजच्या शिक्षणरचनेत कशी रुजू शकतील, याचाही विचार आणि प्रयोग होत गेला. ह्या सगळ्याच मुद्द्यांचा प्रचार आणि प्रसार होणे; इतर शाळा, संस्था आणि शासन यांना या पध्दतींचा उपयोग होणे या दिशेने ग्राममंगल अलीकडच्या काळात काम करीत राहिले आहे. ही नवी शिक्षणपध्दती आज ‘रचनावादी शिक्षणप्रणाली’ म्हणून ओळखली जाते.

भारतात हिचा राष्ट्रीय स्तरावरून स्वीकार २००५ सालच्या ‘राष्ट्रीय शिक्षणक्रम मसुद्या’त करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने याच्याच धर्तीवर २०१० साली आपला शिक्षणक्रम आराखडा बेतला. त्यानुसार राज्यभर शालेय शिक्षणात घुसळण होऊ लागली आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण, रचनावादी शिक्षणाच्या नमुनेदार शाळांची निर्मिती, इतर सरकारी व खाजगी शाळांचे रचनावादी शिक्षणात परिवर्तन, अशा अनेक मार्गांनी ग्राममंगल ह्या शैक्षणिक बदलाच्या कामात सहभागी होत असते. ग्राममंगलचा एक पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून मी या सर्व प्रक्रियेत सहभागी होऊन ग्राममंगल ही संस्था समाजाला विविध पध्दतींनी उपयोगी ठरत आहे याचा आनंद घेत आहे!

पहिले ते दहावी पर्यतच्या विद्यार्थ्यांना शेती, शेतीपूरक व्यवसाय, शेतीसंबधी औजाराची तोंडओळख व्हावी यासाठी शेतीहा विषय येथे विद्यार्थ्यांना शिकवला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांचे वर्गानुसार गट तयार करून त्यांना जमीन वितरीत करून त्या जमिनीवर पीके घेण्याचे प्रात्यक्षिक शिकवले जाते. त्यातून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे स्वअनुभव येतो. याशिवाय आदिवासी भागातील बियाणांचे विद्यार्थ्यीच संकलन करत असून त्याची नावे, वैशिष्ट्ये आणि उपयोग याबद्दलची माहिती शाळेत उपलब्ध करून दिली आहे. त्यातून या भागाची ओळख तयार होण्यास चांगलीच मदत होते. परिसरातील झाडाचा सर्व्हे करून शाळेत असलेल्या कुठल्या प्रकारची कोणती झाडे आहेत, याचा माहितीचे संचयन करून आलेख स्वरूपात सादरीकरण केले जाते. त्यामुळे या शाळेविषयीची आत्मियता अनेकांच्या मनात रूजत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना हवामानासंबंधीची माहिती, नोंदणी, हवामानातील बदल यांबाबत प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या उद्देशाने विज्ञान भारती, पुणे यांच्याद्वारे 'प्रत्येक शाळेत वेधशाळा' ही योजना हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत पालघरमधील ग्राममंगल मुक्तशाळेत नुकतेच राज्यातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले आहे. विज्ञान भारती, पुणेद्वारा 'प्रयोगातून विज्ञानप्रशिक्षण' या प्रकल्पाअंतर्गत, विलास रबडे यांच्या संकल्पनेतून व लोकसहभागातून साकार झालेल्या 'प्रत्येक शाळेत वेधशाळा' योजनेचा शुभारंभ गेल्या वर्षी १५ आँगस्ट २०२१ रोजी या आदिवासी भागातील शाळेपासून झाला. हे हवामान केंद्र स्वनियंत्रित, सौर ऊर्जेवर चालणारे व इंटरनेटने जोडलेले आहे. साधारण दर दहा सेकंदांनी त्याची माहिती अद्ययावत होते व त्याच्या सांकेतिक स्थळावरून मोबाइल फोनमध्ये पाहता येते.

काय आहे हा प्रकल्प ?:  
कोणतीही संकल्पना किंवा घटना कानांनी ऐकून समजते, त्यापेक्षा डोळ्यांनी पाहून जास्त समजते आणि प्रत्यक्ष कृतीतून किंवा सहभागातून सर्वात चांगली समजते, या मूलभूत तत्त्वावर आधारित शालेय विद्यार्थ्यांना हवामानासंबंधीचे प्राथमिक ज्ञान अवगत करून देण्याच्या उद्देशाने दैनंदिन हवामानासंबंधीची माहिती, त्यात होणारे  दैनंदिन व नैमित्तिक बदल यांचे निरीक्षण व नोंदी कृतींद्वारे शालेय विद्यार्थ्यांना व्हावी, अशी ही योजना आहे.

केंद्र सुरू केल्यानंतर अवघ्या दोन तासांत १० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद विद्यार्थ्यांनी घेतली. त्यांची माहिती शेतकऱ्यांना दिल्यानंतर त्यावर आधारित पिकांचे नियोजन करण्याचा संकल्प गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. कोकणातील आदिवासी भागात असलेल्या या शाळेपासून असे पहिलेच केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रामुख्याने स्वयंचलित आणि हाताने नोंदी घेणारे अशी दोन प्रकारची हवामान केंद्र बसवण्यात आली आहेत. या शाळेत मुख्यत्वे वारली, महादेव कोळी व कातकरी या आदिवासी समाजांचे विद्यार्थी आहेत.

हे विद्यार्थी येथे पडणाऱ्या पावसाच्या नोंदी घेत आहेत. या स्वयंचलित केंद्रामध्ये तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा, पावसाची तीव्रता, एकंदर पडलेला पाऊस, वाऱ्याची सतत दिशा बदलणे, जाणवणारे तापमान यांचे सेन्सर बसवलेले आहेत. साधारण दर दहा सेकंदांनी त्याची माहिती अद्ययावत होते. हाताने नोंदी घेणाऱ्या यंत्रामध्ये पर्जन्यमापक ठेवलेले आहे. सकाळी साडेआठ वाजता व संध्याकाळी साडेपाच वाजता विद्यार्थी त्याच्या नोंदी घेत आहेत. पूरपरिस्थिती व आपत्ती व्यवस्थापनासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

पुणे वेधशाळेचे माजी हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले की, "गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांची करिअरची दिशा बदलली आहे. यात हवामान हा विषय विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित होत आहे. आता हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा झाला आहे. बदलत्या हवामानाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने येथे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथील सर्व विद्यार्थी हवामान दूत बनले पाहिजेत. त्यांना हवामानविषयक बहुतांश बाबी कळणार असून हेच विद्यार्थी उद्याचे हवामानतज्ज्ञ   बनणार आहेत. त्यासाठी हवामान चळवळीची सुरुवात शाळेपासून होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना माहिती देण्याकरिता इंटरनेट हवामान केंद्र सुरू करण्यात
येणार आहे. त्याद्वारे हवामानाची माहिती सगळ्यांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे."

ग्राममंगल मुक्तशाळेचे प्रमुख डॉ. रमेश पानसे म्हणाले की, "आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. आता ही शेती बेभरशाची झाली आहे. शेतकऱ्यांना अगोदरच हवामानाची माहिती मिळाली, तर होणारे नुकसान टाळता येणार आहे. या केंद्रातून शेतकऱ्यांना विविध बाबींची माहिती मिळणार असल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल. ही माहिती रोज मिळणार असल्याने काय बदल होतात, याची माहिती विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना कळणार आहे. त्यासाठी हे हवामान केंद्र सर्वांसाठी खुले राहील."

संस्थेपर्यंत कसे जाल?
‘ग्राममंगल’चे ऐने येथील केंद्र मुंबईपासून १३० किमी अंतरावर आहे. डहाणूच्या आधी येणाऱ्या वाणगांव स्थानकात उतरावे. येथून ऐने गाव ११ किमीवर आहे. ठाण्याहून भिवंडी-वाडामार्गे बोईसरला आणि तिथून ऐनेला जाता येते.

रमेश पानसे - ७५०७८०१९९९