तमिळनाडूत सुरक्षित आहे मराठ्यांचा इतिहास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

History of Marathas is safe in Tamil Nadu thanjavur}

तमिळनाडूत सुरक्षित आहे मराठ्यांचा इतिहास!

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांपर्यंत मराठा राजवटीतील घटनांवर, आस्थाकेंद्रांवर आणि व्यक्तींवरही अनेकदा वाद विवाद होतात. वैचारिक किंवा राजकीय हेतूने केलेल्या या वादविवादांमुळे संपूर्ण महाराष्ट्र आंदोलीत होतो. अशा वेळी खरे ऐतिहासिक तथ्य पडताळण्यासाठी महाराष्ट्रात एकही विश्वासार्ह ठिकाण किंवा दस्ताऐवज मिळत नाही. मात्र पुण्यापासून दक्षिणेत १,२०० किलोमीटर अंतरावर, कावेरीच्या समृद्ध खोऱ्यात वसलेले तंजावर शहर मराठ्यांच्या इतिहासातील दस्ताऐवजांचा समृद्ध खजिनाच आपल्यासमोर खुले करते. चला तर मराठ्यांच्या दक्षिणेतील या राजधानीची शब्दभ्रमंती करूयात...

हेही वाचा: भोजपुरी सिनेमा घडतोय की बिघडतोय!

भल्या पहाटे थोडंस इग्रंजी समजणाऱ्या तमीळ भाषिक अण्णाने घरात प्रवेश केला. सीट.. सीट म्हणत त्यांना खुर्चीवर बसवत, जुजबी इंग्रजीत त्यांच्याशी बातचीत केली. अनोळख्या प्रांतात स्थानिक चालक हवा म्हणून सध्या कारैकाल (पदूच्चेरीत) असलेल्या माझ्या मामाने शेजारच्या इंग्रजी विषयातील प्राध्यापक मॅडमची मदत घेतली. त्यांनीही स्थानिक ट्रॅव्हलशी घासाघीस करत योग्य दरात आणि थोडाफार इंग्रजी समजणाऱ्या ड्रायव्हरची व्यवस्था केली. आज तंजावर आणि कुंभकोणमची सफर घडविणाऱ्या या सारथ्यास चहापान केल्यानंतर आम्ही निघालो.

कारैकालमधून सुर्योदयाआधीच आम्ही बाहेर पडलो. प्रशस्त रस्ते, नुकताच पडलेला पाऊस, रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाताची मोठमोठे शेत, एका कडेला कॅनॉल आणि समृद्ध दिसणारी गावे भरभर मागे सरकत होती. इथल्या मंदिरांचे टायमिंग माहीत असल्यामुळे ड्रायव्हरने गाडी वेगाने घेतली. कारण पुण्याप्रमाणे दक्षिणेतील देवही १ ते ४ झोप घेतात. या काळात मंदिराची दारे बंद असतात. तंजावर मध्ये पोहचलो तर नेहमीचं शहर नजरेस पडले. चौक, सिग्नल, वाहनांची गर्दी आणि बरच काही. मात्र येथील मंदिरांची ठेवण आपले लक्ष वेधून घेते. ड्रायव्हरने गाडी जेंव्हा तंजावर बीग टेंपल, अर्थात बृहदेश्वर मंदिरासमोर पार्क केली. तेंव्हा आम्ही सर्वच अवाक झालो.

द्रविड शैलीत बांधलेले जवळजवळ ४५ एकरातील भव्य दिव्य मंदिर भारतीय सुवर्णकाळाचा देदीप्यमान इतिहासाचे पान उलगडत होते. त्याचे उंचचउंच गवाक्ष हिंदू पौराणिक कथांचे मूर्तिमंत स्वरूप होते. चौरसामध्ये बांधलेली मंदिराची संरक्षण भिंत, तिला असलेले भव्य प्रवेशद्वार मनमोहक होते. मंदिराच्या मुख्य आवारात जाण्यासाठी तीन प्रवेशद्वार लागतात. पहिल्याच प्रवेशद्वारावर भारतीय पुरातत्त्व विभागाने लावलेली पाटी दिसते. सुमारे हजार वर्षांपूर्वी राजा राजा चोल यांनी या बृहदेश्वर मंदिराची स्थापना केली होती. पुढे पंड्या आणि मराठा शासकांनी त्यांची देखभाल व इतर छोट्या मंदिरांचे बांधकाम केले आहे. दाक्षिणात्य शैलीतील मंदिरावर अक्षरशः हजारो मुर्त्या कोरल्या आहेत. तीन प्रवेशद्वारानंतर आपण मुख्य आवारात प्रवेश करतो. खरं तर ही मंदिरे केवळ पूजापाठ करण्याचे ठिकाण नव्हते. तर हे भरतनाट्यम सारखे कलाप्रकारांच्या आराधणेचे केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्र आणि त्याहीपेक्षा तमीळ संस्कृती, भारतीय विद्यापीठाचे केंद्र होते.

मुख्य बृहदेश्वर मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी इतर छोट्या मंदिरांचा आम्ही आढावा घेतला. मंदिराच्या डाव्या बाजूला गणपतीचे छोटे मंदिर आहे. की जे भोसले सरदारांनी १९व्या शतकात बांधले होते. चौकोनी आवारात असलेल्या ओसऱ्यांवरही अनेक देवी देवता होते. नटराजाचं मंदिर, मुरगन मंदिर आणि सर्वात महत्त्वाचे नंदी मंडप आकर्षक होता. गेली हजार वर्षात तमीळ संस्कृतीत येणारे विविध भक्ती संप्रदाय आणि संस्कृतीने या मंदिराच्या आवारास वास केला आहे. मंदिराच्या प्रत्येक भागात एक आकर्षक मूर्त, त्यामागची हिंदू पौराणिक कथा आणि डोळ्यांचे पारणे फिटेल अशी रचना उपलब्ध आहे.

हेही वाचा: स्वराज्य सौदामिनी ताराराणी

मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या खालच्या भागात राजराजेश्वर चोल यांनी लिहिलेले शिलालेख कोरले आहेत. मंदिराची उभारणी आणि एकंदरीत इतिहास तमीळ आणि संस्कृत भाषेत लिहिले आहे. विशेष म्हणजे मराठी मोडी भाषेतील शिलालेखही आपल्याला गणपती मंदिराच्या पायऱ्यांवर पाहायला मिळतो. बरं झाला चोल राजांनी आणि पुढे मराठाशासकांनी येथे शिलालेख लिहून ठेवलेत. निदान त्यामुळे तरी या मंदिरांची जडणघडण आणि देदीप्यमान इतिहास समोर आला. मुख्य प्रवेश करताना तुम्ही सभा मंडपातून जातत. खांबावर कोरलेले आकर्षक मुर्त्या, एक मोठी सभा भरेल एवढी जागा अस सगळ ओलांडत तुम्ही बृहदेश्वराच्या अर्थात शंकराच्या पिंडीजवळ जातात. समृद्ध परंपरांचा, सांस्कृतिक वारशाचा अनभिषिक्त स्वामी आपल्या समोर उभा राहतो. दक्षणेचे वैभवाची एक झलक पाहून आपणही क्षणभर स्तब्ध होतो. आजचा आपला वर्तमान या भरजरीत इतिहासापासून किती भिन्न आहे. याची जाणीव या निमित्ताने होते. दर्शन घेतल्यावर पुजारी आपल्या हातात एक सुगंधी सफेद उदी देतो. ती कपाळाला आडवी लावून भरल्या मनाने आपण बाहेर पडतो. विशेष म्हणजे या मंदिराचा कळस ८० टनाचा आहे. हे समजल्यावर आपण एक प्रकारे गतवैभवाचा विचार करत.

बृहदेश्वराच्या दर्शनानंतर आम्ही शहराच्या मध्यभागी स्थित असलेल्या मराठा पॅलेसला गेलो. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर डाव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा दिसतो. महाराजांना अभिवादन केल्यानंतर आपली पावले आपओपच सरस्वती महालाकडे वळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ व्यंकोजी अथवा एंकोजी महाराज भोसले यांची सत्ता तंजावरात होती. दक्षिणेतील या मराठी राजाचा येथील संस्कृतीवर आणि समाजजीवनावर छाप आहे. अर्थात चोल आणि पंड्या राजांच्या तुलनेत कमी परंतू मराठा राजवटीत येथे कोणत्याच अन्याय झाला नाही. आणि तंजावर अधिकच समृद्ध होत गेले, अशी येथील लोकांची भावना आहे. असो.. सरस्वती महालात अगदी ताम्रपटापासून ते बोरूने लिहिलेल्या बखरींपर्यंत विपुल साहित्य पाहायला मिळते. व्यकोंजी राजांचे वंशज सरफोजी भोसले द्वितीय (१७९२ ते १८३२) यांनी आपल्या कार्यकाळात हे शाही ग्रंथालय अधिक समृद्ध केले. हे ग्रंथालय संपूर्ण जगातले मध्ययुगीन काळातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथालय मानले जाते.या ग्रंथालयात ४९,००० ग्रंथ आहेत आणि सुमारे ४६,००० हस्तलिखिते संग्रहित केलेली आहेत. त्यातील काही प्राचीन असून भूर्जपत्रांवर व ताडपत्रांवर लिहिलेली आहेत. त्यात मध्ययुगीन काळातील वाल्मीकी रामायण, कंब रामायण व इतर पुरातन ग्रंथांच्या ताडपत्रावरील आवृत्त्या आहेत. कागदांवर लिहिलेल्या हस्तलिखितांमध्ये इसवी सन १४६८ मध्ये लिहिलेले भामती, भगवद्गीतेचे सर्वात लहान आकारातील हस्तलिखित, अंबर होसैनी या मुसलमान कवीने केलेले भगवद्गीतेचे मराठी निवेदनाचे हस्तलिखित, तत्त्व चिंतामणी हा बंगाली लिपीतील संस्कृत ग्रंथ यांचा समावेश आहे.समर्थ रामदासांचा दासबोध आणि प्रतिमाही येथील संग्राहलयात आहे.

हेही वाचा: का कोमेजली कासची फुले?

इसवी सन १६७६ ते १८५५ च्या मराठा राज्यकाळात लिहिली गेलेली अनेक मराठी हस्तलिखिते या ग्रंथालयात जतन केलेली आहेत. त्यांची संख्या साधारण १८५६ आहे. यात संतकवी रामदासी व दत्तात्रय मठातील विपुल साहित्य आहे. पुढे जेव्हा हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले गेले. त्यावेळेस अनेक मराठी पंडित व विद्वानांनी लिहिलेल्या १२२० हस्तलिखितांची या संग्रहात भर घातली गेली. आता त्यांची संख्या ३०७६ इतकी आहे. यातील बरेचसे साहित्य महाराष्ट्रात उपलब्ध नसल्याने त्याला दुर्मिळतेचे एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. माधव स्वामींचे रामायण, महाभारत, मेरु स्वामीचे अवधूत गीता टीका व रामसोहळा, मुकुंद स्वामींचे श्री रामकृपा विलास, राघव स्वामीचे आत्मबोध, आणि अनंत मुनी यांची भगवद् गीता यांचा या दुर्मिळ हस्तलिखितांत समावेश आहे. याखेरीज तमीळ, संस्कृत, उर्दू हस्तलिखितांचाही या ग्रंथालयात समावेश आहे. मोडी लिपीतील राज्यकारभार विषयक दैनंदिनी, हिशेब, टिप्पणी, पत्र व्यवहार या सारखी लिखितेही या ग्रंथालयात जतन केलेली आहेत. याखेरीज मराठी भाषेतील आणि मोडी लिपीत लिहिलेल्या चार प्राचीन ताम्रपट्टिका या ग्रंथालयात दर्शनी ठेवलेल्या आहेत. तसेच येथे अनेक प्राचीन नकाशांचाही संग्रह केलेला आहे. सध्या हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले असून त्यातील संग्रहाचा संदर्भ कोश म्हणून वापर करता येतो.

महाराष्ट्रात दुर्देवाने असे एकही संदर्भ ग्रंथालय नाही. राज्यात विविध कारणाने वैचारिक वादंग घातले जाते. अशा वेळी या ग्रंथालयातील दस्ताऐवजांचा संदर्भ म्हणून वापर शक्य आहे. सरफोजी द्वितीय यांनी इंग्रजांकडून या ग्रंथालयाला हात न लावण्याचे वचन घेतले होते. त्यांच्या या व्यासंगामुळे महाराष्ट्राची एक अनमोल धरोहर सदूर दक्षिणेत तंजावर राज्यात सुरक्षीत आहे. तेथील प्रशासनाने दुर्मिळ हस्तलिखितांचे डिजीटायझेशन केले असून सर्वांसाठी हे ग्रंथालय खुले केले आहे. इथेच एक तंजावरच्या इतिहासावर पर्यटनावर चित्रफीतही दाखविण्यात येते. संग्रहालये, भोसल्यांचे राजदरबार नक्कीच पाहण्यासारखा आहे. गाडीतून परतताना आम्ही ओतप्रोत झालो होतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top