Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sextortion }

Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

युवराज नरवणकर, वकील, मुंबई उच्च न्यायालय

भारत ही जगाची सेक्सटॉर्शनची राजधानी बनेल असे धक्कादायक भाकीत नुकतेच ब्रिटनमधील एका संशोधन संस्थेने वर्तवले. दुर्दैवाने ही गोष्ट खरी होताना दिसते आहे. २०२२मध्ये फक्त पुण्यातच यासंदर्भातील १४०० गुन्हे नोंदवले गेलेत...

सेक्सटॉर्शनसारख्या घृणास्पद गुन्ह्यातील भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. फक्त या वर्षाचा विचार केला तर केवळ पुण्यामध्ये जवळपास १४०० हून जास्त केसेस नोंदवल्या गेल्या. पूर्ण भारतातील आकडा यापेक्षा कित्येक पटींनी मोठा आहे.

कारण या गुन्ह्याचे स्वरुपच इतके विचित्र आहे की, फसवल्या गेलेल्यापैकी १०-१२ टक्के लोकच तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येतात. बाकीचे अनेकजण लाजेस्तव किंवा अपमान, मानहानीच्या भीतीने पुढेच येत नाहीत.

एकतर ते सहन करतात, पैसे भरतात नाहीतर त्यातील काही मनाने कमकुवत लोक काहीवेळा अपमान आणि छळवणूक सहन न झाल्याने आत्महत्येपर्यंतही जातात. नुकतेच पुण्यात दोघांनी सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्येचा मार्ग पत्करला.

आज समाजातील प्रत्येक घटक कोणत्या ना कोणत्या समाजमाध्यमांवर आहेच. फेसबुक असेल, इन्स्टा असेल किंवा व्हॉट्सअप.

सुरूवातीला केवळ गरजेपुरती अथवा संपर्कापुरती मर्यादित असलेली ही माध्यमे नंतरच्या काळात निकडीची बनली. त्यावरील माणसाचे अवलंबित्व वाढतच गेले. हळूहळू ही आवड आणि अवलंबित्त्व व्यसनात बदलताना दिसत आहे.

एखाद्या फेक किंवा नकली प्रोफाइलवरुन दुसऱ्याला मेसेज करणे, त्यातून ओळख वाढवणे आणि त्या व्यक्तीची नग्न व्हिडीओ क्लिप किंवा मॉर्फ केलेल्या एखाद्या फोटोच्या माध्यमातून त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून पैसे उकळणे असे काहीसे या गुन्ह्याचे स्वरूप आहे. (sex + extortion)

गुन्ह्याचा केंद्रबिंदू कुठे?

या गुन्ह्याचे केंद्रबिंदू हे प्रामुख्याने राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये आढळून येतात परंतु अलीकडच्या काळामध्ये भारतातील बहुतांशी भागांमध्ये यांचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येते.

साधारणतः 45 ते 60 या वयोगटातील आर्थिकदृष्ट्या सबळ पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये सेक्सटॉर्शनची शिकार होताना दिसत आहेत.

या वयोगटातील व्यक्ती अधिकारी पदाचे किंवा समाजातील प्रतिष्ठीत वर्गातील असल्यामुळे साहजिकच स्वप्रतिमेला घाबरून या लोकांकडून तक्रार केली जाण्याची शक्यतासुद्धा कमी असते.

सेक्सटॉर्शन करणाऱ्या गटांची मोड्स ऑपरेंडी

सुरुवातीला इंटरनेटवरून एखाद्या आकर्षक महिलेचे छायाचित्र वापरून एखादी खोटी प्रोफाइल बनवली जाते. ती खरी वाटावी, यासाठी अशा प्रोफाइल नियमीत अपडेट केल्या जातात. त्यावरुन अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जातात.

अनेकदा व्हाट्सअपवर थेट संदेश पाठवला जातो. कुतूहलापोटी किंवा प्रलोभनाला भुलून समोरच्या व्यक्तीने काही विचारणा केली तर वरकरणी सामान्य वाटेल, असे संभाषण सुरु होते. सुरूवातीला सामान्य वाटणारे हे बोलणे हळूहळू अश्लीलतेकडे झुकते.

पूर्वीच्या काळी लैंगिक संदर्भातील गुन्ह्यांमध्ये शारीरिक संबंध आलेले असणे, अत्यावश्यक असते, अशी लोकांची मानसिकता होती. त्याच पद्धतीने त्यांचे मानसिक कंडिशनिंग होते.

अशा प्रकारच्या आभासी जगामध्ये प्रत्यक्षात कोणताही शारीरिक संबंध येतच नसल्यामुळे किंवा कोणी घरी येण्याचा किंवा कोणाकडे जाण्याचा प्रश्न नसल्यामुळे साधारणत: या मध्यम पिढीतील व्यक्तीला अशा प्रकारचे चॅटिंग सुरक्षित वाटते आणि इथेच सेक्सटॉर्शनचा खेळ सुरू होतो.

हळूहळू ओळख वाढवून काही अश्लील क्लिप्स किंवा फोटो पाठवले जातात आणि त्या बदल्यात त्या व्यक्तीला देखील अशा स्वरूपाचे अश्लील फोटो किंवा क्लिप्स पाठवण्यास सांगितले जाते. उतावीळपणे पाठवलेल्या अशा अश्लील क्लिपांचा आणि फोटोंचा वापर करून नंतर त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केले जाते.

सोशल मीडियाचा वापर

आजकाल नेटवर्कच्या तक्रारीमुळे अनेकदा लोक व्हाट्सअप कॉल करण्यास प्राधान्य देतात. अशा फेक प्रोफाइलवरुन थेट व्हॉट्सअप कॉल येतो आणि समोरच्या व्यक्तीने ते बेसावधपणे उचलल्यास त्याला समोरून अश्लील वर्तन करणारी स्त्री दिसून येते.

पीडित व्यक्तीला सगळ्या प्रकार समजेपर्यंत आणि त्या व्यक्तीने तो फोन बंद करेपर्यंत जो कालावधी लागतो त्या थोडक्याशा कालावधीत ती व्यक्ती ते फुटेज बघत असतानाची क्लिप व्हायरल केली जाईल, असा धमकीवजा संदेश देऊन पैसे उकळले जातात.

काही वेळा अशा कॉल्समध्ये खऱ्या महिलांचा वापरही केला जातो. आणि त्यामुळे सेक्सटॉर्शनचे रुपांतर एका अत्यंत घृणास्पद सामूहिक गुन्ह्यामध्ये होते.

फेक प्रोफाइलचे जाळे

फेक प्रोफाइल अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी काम करतात. ही प्रोफाइल्स खरी असल्याचे भासवण्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या वापरण्यात येतात.

व्यक्ती एखादी व्यवसायिक असेल तर अशा व्यवसायासंदर्भातील एखादा प्रश्न घेऊन फेक प्रोफाइलमार्फत संवादाची सुरूवात करण्यात येते. उदा. रुग्ण असल्याची बतावणी करत डॉक्टर किंवा वकिलांना पक्षकार बनून संपर्क करण्यात येतो.

वरपांगी व्यवसायिक वाटणाऱ्या अशा संपर्क संदेशाचे रुपांतर बेमालूमपणे सेक्सटॉर्शनमध्ये करण्यात येते.

डीप फेक

यातील सर्वात भयानक प्रकार म्हणजे डीप फेक Deep Fake. व्यक्तीचे बाकी पूर्ण शरीर तसेच ठेऊन कृत्रिम तंत्रज्ञानाद्वारे त्या व्यक्तीच्या चेहरेपट्टीचा अभ्यास करून त्या शरीरावरील चेहरा बदलला जातो. हुबेहुब दुसरा चेहरा लावला जातो, त्याला डीप फेक म्हटले जाते.

आपण समाज माध्यमांच्या प्रोफाइलवर आपली छायाचित्रे शेअर करत असतो. त्याचाच वापर करून डीप फेक तंत्रज्ञानाद्वारे संबंधित व्यक्तीचे नग्न छायाचित्र तयार करण्यात येते.

तांत्रिक बाबींमध्ये अत्यंत प्रगत असलेल्या या तंत्रज्ञानामुळे खरे किंवा खोटे पटकन ओळखणे अत्यंत दुरापास्त असते.

असे फोटो संबंधित व्यक्तीला पाठवून त्याच्याकडून पैशाची मागणी केली जाते. अन्यथा ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जाते.

सामाजिक प्रतिष्ठेला घाबरून व्यक्ती साहजिकच याला बळी पडतो.

कोणती काळजी घ्याल?

  • आपल्या कुटुंबाचे फोटो पब्लिक करणे शक्यतो टाळावे.

  • समाजमाध्यमांवर फोटो टाकल्यास त्यासाठीचे प्रायव्हसी सेटिंग केवळ मित्रयादीपुरते मर्यादित ठेवावे.

  • आभासी जगात मित्र जपून निवडावेत हे सांगणे नलगे.

  • कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा मेसेजला प्रत्युत्तर देणे, अनोळखी नंबरवरुन आलेला व्हॉट्सअॅप कॉल उचलणे, पूर्णपणे टाळावे. कुतुहलापोटीसुद्धा असले धाडस करू नये.

  • अनोळखी अँड्रॉइड अॅप्लिकेशन्सना मायक्रोफोन किंवा कॅमेऱ्याला अॅक्सेस देण्याची परवानगी देऊ नये. अनेक प्रकरणांमध्ये असे कॅमेरे दूरस्थपणे चालवले जातात आणि अश्लील फुटेज टिपले जाते.

  • आपल्या मोबाइल अथवा संगणकावर एक चांगले स्टँडर्ड अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरणेही आवश्यक आहे.

  • अल्पवयीन मुलांकडे मोबाइल देताना, त्यांत सोशल मीडियावरील अॅप्स नसतील अथवा असल्यास त्याचा मर्यादित वापर होईल, याची योग्य ती काळजी घ्यावी.

  • इंटरनेटवरील प्रत्येक गोष्ट अक्षय्य राहते, हे लक्षात ठेऊन अशा प्रकारांपासून चार हात लांब राहणंच श्रेयस्कर.

फसवणूक झाल्यास काय कराल?

  • दुर्दैवाने एखादी व्यक्ती याला बळी पडलीस तर घाबरून गप्प बसू नये.

  • धमक्यांना बळी पडू नये आणि गुन्हेगारांना पैसे पुरवू नये.

  • तातडीने सायबर पोलिसांनी कळवणे महत्त्वाचे आहे.

  • संबंधित सायबर पोलिसांना गुप्ततेची विनंती करता येते. अशा विनंतीची संबंधित यंत्रणेने योग्य ती दखल घेतली नाही, तर तोसुद्धा एक गुन्हा ठरतो.

  • अशा कोणत्याही गुन्ह्याची पहिली लक्षणे दिसताच सर्व मेसेजिंक रेकॉर्ड, छायाचित्रे आणि चॅटिंग याचे स्नॅपशॉट काढून ठेवून ते सेव्ह करणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. व्हाट्सअपची चॅट हिस्ट्रीसुद्धा स्वतःस मेल करता येते.

  • फेसबुकवर एखादे फेक प्रोफाइल आढळून आले तर ती प्रोफाइल रिपोर्ट करण्याची सोय फेसबुकवर असते.

  • एखाद्याचे मॉर्फ फोटो कुणी त्याच्या प्रोफाइलवर अपलोड करण्यासंदर्भातील धमकी दिली तर आवश्यक असल्यास आपापल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर अशा संदर्भातील एक डिसक्लेमर देणेही शक्य असते.

परंतु सेक्सटॉर्शन आणि एकूणच सायबर फसवणुकीसंदर्भातील पहिले पाऊल म्हणजे तातडीने त्याची तक्रार नोंदवणे. अन्यथा हा विषय खासगीतच संपवू, अशा दुर्दैवी विचारसरणीने पीडित व्यक्ती या सेक्सटॉर्शनच्या दलदलीत अधिक खोल रुतत जाते.

त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसला नाही तर आत्महत्येसारखा दुर्दैवी पर्यायापर्यंत अथवा मानसिक स्वास्थ्य हरवण्यापर्यंत व्यक्तीचे नुकसान होऊ शकते.

दिवसेंदिवस वाऱ्यासारखा पसरत जाणारा हा सायबर फसवणुकीचा जाळ आपल्याला चटके देऊ नये, यासाठी पुरेशी काळजी घ्यायलाच हवी.