स्वराज्य सौदामिनी ताराराणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वराज्य सौदामिनी ताराराणी}

स्वराज्य सौदामिनी ताराराणी

सध्याच्या जगात वावरताना इतिहास विसरून चालत नाही. त्यातही महाराष्ट्रात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून 'हिंदवी स्वराज्य' स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला नेहमी प्रेरणा देतो. शिवरायांचा गौरवशाली इतिहास दाखविण्यासाठी अनेक मराठी चॅनेल्स पुढाकार घेत आहेत. काही वर्षांपूर्वी 'राजा शिवछत्रपती' ही मालिका सुरू होती. त्यानंतर 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'जय भावानी जय शिवाजी' अन् आता सुरू असलेली 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिका खऱ्या अर्थाने इतिहासाची पाने उलगडत आहेत.

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका सध्या एका मराठी चॅनलवर सुरू आहे. त्यामुळे ताराराणींचा इतिहास जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर स्वराज्यावर चालून येणाऱ्या संकटांना दूर ठेवण्याचं काम ताराराणींनी केलं. त्यांनी मोगलांपासून जनतेचं संरक्षणचं केलं नाही, तर स्वराज्याचा बचावही केला, त्यांच्याविषयी जाणून घेऊयात...

महाराणी ताराराबाई यांच्याबद्दल...
- जन्म : 14 एप्रिल 1675
- जन्मस्थान : सातारा जिल्हा
- वडील : सरसेनापती हंबीरराव मोहिते
- पती : छत्रपती राजाराम राजे
- मुले : शिवाजी (दुसरे)
- मृत्यू : 9 डिसेंबर 1761


ताराराणी या मोठ्या कर्तृत्ववान होत्या. संपूर्ण आयुष्यात त्या विविध संकटांना सामोरं गेल्या तोंड. एवढंच काय, त्यांनी पतीच्या निधनानंतरही स्वराज्याचं रक्षण केलं. मोगलांशी दोन हात केलेत. जवळपास सात वर्षे त्यांनी औरंगजेबाशी लढा दिला. त्यामुळे इतिहासात त्यांचा उल्लेख कर्तबगार राजस्त्री म्हणून केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यात ताराराणी यांचही श्रेय आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असल्यामुळे ताराराणींना लहानपणापासूनच तलवारबाजी अन् युद्ध कलेचं प्रशिक्षण मिळालं होत. पुढे ताराराणींचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा राजाराम राजे यांच्याशी झाला. राजाराम राजे व ताराराणी यांना शिवाजी नामक पुत्र झाला. पुढे ते स्वराज्याच्या गादीवर बसले.

हेही वाचा: आरोग्यदायी बदाम खा अन् सुदृढ रहा!


छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याचा कारभार राजाराम राजे यांच्याकडे आला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या अतिशय अवघड काळात (1689 ते 1700) त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा त्यांनी मोठा कालखंड तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. 3 मार्च 1700 रोजी सिंहगडावर त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर ताराराणींनी स्वराज्य कारभार सांभाळण्याचा निर्णय घेतला. एक स्त्रीदेखील स्वराज्य सांभाळू शकते, हे त्यांनी दाखवून दिलं. बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे, पिलाजी गोळे, गिरजोजी यादव या सैनिकांचा सैन्यात समावेश केला. त्यांच्या मदतीने त्यांनी स्वराज्यावर येणाऱ्या संकटांवर मात करायला सुरुवात केली. कारण ताराराणींनी स्वराज्य रक्षणाचा दृढ वसा घेतला होता.

मोगलांच्या ताब्यात गेलेला पन्हाळा किल्ला 1705 मध्ये पुन्हा हस्तगत केला. कारंजा ही राजधानी बनवून ताराराणींनी आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीला सुरुवातच केली. राजाराम राजांच्या निधनानंतर उत्तराधिकारी पद छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहूराजे यांच्याकडे जायला हवे होते. मात्र, ते त्यावेळी लहान होते. शिवाय, पुढच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. त्यामुळे ताराराणी यांचा मुलगा शिवाजी यांना गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार सुरू केला. ताराराणींनी औरंगजेबसारख्या बलाढ्य बादशहाशी सुमारे सात वर्ष लढा दिला. इतकंच नाही, तर स्वराज्यावर चालून येणाऱ्या अनेक संकटांवर मात करत रयतेला संरक्षण दिलं. सैन्यातही आत्मविश्वास निर्माण केला. वयाने लहान असल्यामुळे शाहू महाराज यांना गादीवर बसता येत नव्हतं, म्हणून ताराराणी यांनी आपला मुलगा शिवाजी यांना गादीवर बसवलं. मात्र, औरंगजेबाच्या मृत्युनंतर शाहू महाराज कैदेतून सुटले.

हेही वाचा: आरोग्यदायी बदाम खा अन् सुदृढ रहा!

दरम्यान, स्वराज्याच्या गादीवर बसण्याचा खरा मान शाहू महाराजांचा आहे, असं दरबारातील काही सरदारांना वाटू लागलं. त्यामुळे शाहू महाराज आणि ताराराणी असे दोन गट निर्माण केले. खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव हे सरदार आधी ताराराणींच्या गटात होते, ते शाहू महाराजांना जाऊन मिळाले. शाहू महाराजांनी १७०७ मध्ये ताराराणींच्या मुलाविरुद्ध युद्ध घोषित केलं. बाळाजी विश्वनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ऑक्टोबर १७०७ मध्ये खेड येथे लढाई झाली. त्यात शाहू महाराजांचा विजय झाला. ताराराणींच्या वर्चस्वाखाली असलेले किल्ले हळूहळू शाहू महाराजांना मिळाले. याशिवाय, बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणींच्या गटातील विश्वासू सरदारांना शाहू महाराजांच्या बाजुने करून घेतलं. शाहू महाराजांनी आपली स्वतंत्र सत्ता साताऱ्यात स्थापन केली. यामुळे ताराराणी यांनी पराभव स्वीकारून कोल्हापुरात आपलं राज्य स्थापन केलं.

आपल्या पराक्रमामुळे ताराराणींनी केवळ स्वराज्यच नाही, तर मोगल, आदिलशहा, निजामशहा ते थेट दिल्लीपर्यंत हाहाकार माजवून ठेवला होता. कवी गोविंद यांनी ताराराणी यांचं चरित्र, त्यांनी गाजवलेला पराक्रम हा एका कवितेतून मांडला आहे. ते म्हणतात...

दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा ||

हेही वाचा: आरोग्यदायी बदाम खा अन् सुदृढ रहा!

दरम्यान, ताराराणींनी त्यांच्या कारकिर्दीत खूप मोठे पराक्रम करून दाखवले. एक स्त्री असून औरंगजेब आणि पूर्ण मोगल साम्राज्याला पाणी पाजलं. या थोर महाराणीचं 9 डिसेंबर 1761 रोजी निधन झालं. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर ताराराणींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची समाधी क्षेत्र माहुली येथे आहे.

ताराराणी यांनी मोगलांशी दिलेला लढा इतिहासात त्यांच्या कारकिर्दीचा ठसा उमटवतो. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. ताराराणींच्या पराक्रमाची गाथा अनेक साहित्यामध्ये वाचायला मिळेल. त्यापैकी 'महाराणी ताराऊसाहेब' हे पुस्तक अशोकराव शिंदे यांनी लिहिले आहे, तर 'क्षेत्राणी शिवस्नुषा ताराराणी' हे पुस्तक रमेश शांतिनाथ भिवरे यांनी लिहिले आहे. या दोन पुस्तकांतून ताराराणींचे चरित्र, व्यक्तिमत्व, धाडस अन् पराक्रमाचं अचूक वर्णन केलं आहे.

टॅग्स :Maharashtra News
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top