श्रीवल्ली! विजय खंडारेंनी गायलेल्या मराठी व्हर्जनची खास गोष्ट
- तनिष्का डोंगरे
मराठी माणसामध्ये असलेले ‘टॅलेंट’ लपून राहत नाही. मग ते क्षेत्र कोणतेही असो, त्यामध्ये आपल्याकडून काही चांगले देण्याचा प्रयत्न केला जात असतो. सध्या मनोरंजन क्षेत्रात गाजत असलेला पुष्पा हा सिनेमा अनेकांनी पाहिला असेल. परंतु, त्याचे मराठीतील गाणे पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मात्र तुलनेने जास्त आहे. चित्रपट येण्याआधीच हे गाणे चित्रित करण्यात आले होते. खरं हे गाणे म्हणजे श्रीवल्लीचे व्हर्जिन आहे असे म्हटले जाते. परंतु हे गाणे काही या सिनेमावर आधारितच आहे असे नाही. त्यामध्ये साम्य आहे ते प्रेम या एकाच धाग्याचे. त्यामुळे भाषा कोणतीही असो त्यामध्ये दडलेल्या भावना मात्र सारख्याच असतात. हे या गाण्यातून पूर्णपणे समजते. मराठी व्हर्जिन असलेले हे गाणे गायले आहे विजय खंडारे यांनी. तसेच त्यामध्ये अभिनय, दिग्दर्शनाचा मोठा भागही त्यांनी स्वत:च सांभाळला आहे. खरं तर कुठलीही कलाकृती करताना त्यामध्ये टीम वर्क महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे विजय यांनाही त्यांच्या कुटुंबीयांचा, मित्र-मैत्रिणींची मदत मिळाली आहे. केवळ आपल्या युट्यूब चॅनेलच्या प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आलेले गाणे आज अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पसंतीस उतरते आहे.
अनेकांच्या मनावर राज्य करणारे हे गाणे सध्या प्रत्येकाच्या तोंडातून ऐकायला मिळते आहे. अमरावतीतील निंबोरा गावात राहणारे हे जोडपे आता घराघरात पोहोचले आहे. विजय यांच्या सोबत अभिनय केला आहे त्यांच्या पत्नी तृप्ती खंडारे यांनी.
याबाबत विजय सांगतात, स्वप्नातही असे वाटले नव्हते की, हे गाणे असे गाजेल म्हणून. गंमत म्हणून हे गाणे लिहिले गेले. पण ते पूर्ण महाराष्ट्रभर आवडलं. त्याबद्दल अभिमान वाटतो आहे. या गाण्यासाठी कॅमेरा इक्विपमेंट न वापरता मोबाईल फोनवर गाणे शूट केले गेले आहे. त्याला सहा मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळत आहेत. खरं तर हे काम चांगलंच करायचं होतं परंतु परिस्थितीनुसार नाही होऊ शकलं. कॅमेरामनचा खर्च परवडणारा नव्हता त्यामुळे घरच्याघरीच फोनवर हे गाणं शूट केलं गेलं.
या गाण्याचे शूटिंग विजय यांच्या बहिणीने केले आहे. विजय सांगतात, ‘‘माझ्या घरचे व्हिडिओ शूट होतात ते सगळे माझी बहीणच आंचल शूट करते. हिरोईन म्हणून पत्नीलाच घेतले कारण मी ग्रामीण भागात राहतो. इथे लोकांची मानसिकता नसते की, दुसऱ्या सोबत अभिनय करण्याची. त्यातच इतर कोणालाही त्रास नको म्हणून माझ्या पत्नीलाच मी या गाण्यासाठी निवडले. ग्रामीण भागात व्हिडिओ करण्यासाठी मुलींना परवानगी नसते. त्यामुळे पत्नीलाच पुढे केले.’’