
टिपू सुलतान : म्हैसूरचा वाघ की जुलमी राजा
म्हैसूरचा वाघ अशी ओळख असलेल्या टिपू सुलतानबाबत अलीकडे उलट- सुलट चर्चा होऊ लागली आहे. मुंबईतील एका मैदानाला त्यांचं नाव देण्यावरून मोठं आंदोलनही नुकतंच झालं. ‘दि सोर्ड आॅफ टिपू सुलतान’ ही संजय खान यांनी दिग्दर्शित केलेली दूरदर्शनवरील मालिका १९९० मध्ये तुफान गाजली होती. त्यात टिपू यांचं मोठं कौतुक होत होतं. नवी दिल्लीत २०१४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये टिपू सुलतान यांचे वर्णन महान योद्धा म्हणून केलं होते. चलरथामध्ये त्यांच्या पुतळ्याचा समावेश होता. मात्र, काळाच्या ओघात टिपू सुलतान यांना विरोध का होऊ लागला आहे, यावर टाकलेला दृष्टिक्षेप......
टीपू सुलतानचे पूर्ण नाव सुलतान सईद वालशरीफ फतह अली खान बहादूर साहब टीपू होते. इंग्रजांविरूद्ध आपल्या साम्राज्याचा बचाव करताना रणागणांवर मरण पावलेल्या भारतीय राजांपैकी एक म्हणून टीपू सुलतान यांचे नाव अजरामर आहे. यासाठी त्यांना भारत सरकारने स्वातंत्र्यसैनिक म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली आहे.
टिपू सुलतान यांनी शिक्षण आणि राजकीय विषयांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर वडिल हैदर अली यांनी त्यांना युद्धाचे प्रशिक्षण दिले. १७७६ मध्ये इंग्रजांविरूद्ध म्हैसूरच्या पहिल्या लढाईत त्यांनी वडिलांना सोबत केली, तेव्हा ते फक्त १५ वर्षांचे होते. या युद्धानंतर दक्षिण भारतात सर्वात शक्तिशाली शासक म्हणून हैदर अली प्रसिद्ध झाले.(Why people opposing Tipu Sultan in the course of time)
हेही वाचा: नेमेची येतो तो’ अर्थसंकल्प
वडिलांच्या मृत्यूनंतर, २२ डिसेंबर १७८२ रोजी टिपू सुलतान यांनी मोठा मुलगा म्हणून वडिलांची जागा घेतली आणि म्हैसूर राज्याचे राजा झाले. त्यानंतर, त्यांनी सैनिकी रणनीतींवर काम करण्यास सुरवात केली. इंग्रजांना रोखण्यासाठी मराठ्यांशी आणि मोगलांशी त्यांनी करार केला. दुसऱ्या एंग्लो-म्हैसूर युद्ध थांबवण्यासाठी १७८४ मध्ये इंग्रजांसोबत मंगलोर करारावर स्वाक्षरी केली. शासक म्हणून टीपू सुलतान कुशल असल्याचे सिद्ध झाले. वडिलांचे अपूर्ण प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आणि युद्धात रॉकेटचा वापर करून सैन्यात नवीन बदलही केले.
टिपू सुलतान हे अत्यंत महत्वाकांक्षी असल्यामुळे त्यांनी आपला प्रदेश वाढवण्याची योजना आखली आणि त्याच वेळी मंगलोरच्या कराराच्या अनुषंगाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सहयोगी राज्य असलेल्या त्रावणकोरवर लक्ष्य केंद्रीत केले. त्यांनी डिसेंबर १७८९मध्ये त्रावणकोरवर हल्ला केला आणि त्रावणकोरच्या महाराजाच्या सैन्याने सूड उगवला. येथूनच तिसरे एंग्लो-म्हैसूर युद्ध सुरू झाले.
त्रावणकोरच्या महाराजाने ईस्ट इंडिया कंपनीला मदतीसाठी आवाहन केले आणि याच्या प्रत्युत्तरात लॉर्ड कॉर्नवालिसने मराठ्यांसह हैदराबादच्या निजामांशी टीपूला विरोध करण्यासाठी आणि मजबूत सैन्य दल तयार करण्यासाठी युती केली.
सन १७९० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने टीपू सुलतानवर हल्ला केला आणि लवकरच कोयंबटूर जिल्ह्यावर आपले नियंत्रण ठेवले. टिपूने कॉर्नवॉलिसवर हल्ला केला, परंतु या मोहिमेत ते अधिक यशस्वी होऊ शकले नाहीत. हा संघर्ष दोन वर्षे चालू राहिला आणि १७९२ मध्ये युद्धाचा अंत करण्यासाठी त्यांनी श्रीरंगपटनामच्या करारावर स्वाक्षरी केली आणि याचा परिणाम म्हणून टिपू सुलतानाला मलबार आणि मंगलोरसह आपले अनेक प्रांत गमवावे लागले.
टिपू सुलतान हे तिसऱ्या मोठ्या युद्धात ४ मे १७९९ रोजी मरण पावले. इंग्रजांनी म्हैसूर ताब्यात घेत टिपू सुलतान यांची तलवार ब्रिटनला नेली.
टिपू सुलतानवरून वाद का?
हेही वाचा: अशी दुर्बीण ज्यामुळे कदाचित एलियनही दिसतील..!
मुंबईतील मालाड येथे मुस्लिम समुदायाची संख्या अधिक आहे. याच भागातून आमदार झालेले अस्लम शेख महाविकास आघाडी सरकारमध्ये वस्त्रोद्योग मंत्री आहेत. शेख यांनी आमदार निधीतून आपल्या परिसरात एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले आहे. यालाच ते टिपू सुलतान यांचे नाव दिले. यावरून बजरंग दल आणि भाजप संतप्त आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, मोठ्या संख्येने हिंदूंच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तीचे नाव आम्ही मैदानाला देऊ देणार नाही.
इतिहासकार टीसी गौडैा यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की टिपू सुलतान यांनी श्रिगेरी, मेल्कोटे नांजनगुंड, सिरीरंगापट्टनम, कोल्लूर आदी ठिकाणी मंदिरांना संरक्षण दिले होते. १७५९ मध्ये आदी शंकराचार्यांनी बनवलेल्या तिरुपतीवर मराठ्यांचा हल्ला झाला होता. त्यावेळी हिंदू भावनांचा आदर ठेवून टिपू सुलतान यांनी याची निर्मिती केली होती.
१९९० च्या सुमारास सरकारी शाळांमध्ये टिपू सुलतान यांचा देशभक्त राजा म्हणून उल्लेख होता. परंतु, १९९९० मध्ये मंदिर आणि मशीद असे वाद सुरू झाले. त्यावेळी राजकारणात जातीय तेढ चव्हाट्यावर आणली गेली. त्याच दरम्यान टिपू सुलतान यांची प्रतिमा एका धर्मनिरपेक्ष शासकावरून मुस्लिम हुकूमशहा अशी बनवण्यात आली. टिपू सुलतान यांच्यावर पुस्तक लिहिणारे चिदानंद मूर्ती यांनी सांगितले, की टिपू एक चाणाक्ष शासक होते. त्यांनी म्हैसूरमध्ये हिंदूंवर अत्याचार केलेले नाहीत. परंतु, तटवर्ती भाग मालाबारमध्ये त्यांनी हिंदूंवर अत्याचार केले होते. काहीजण सांगतात, की टिपू सुलतान यांनी १७८३ मध्ये पालघाट किल्ल्यावर हल्ला करून हजारो ब्राह्मणांची कत्तल केली होती. त्यामुळे, हिंदूंच्या मनात टिपू सुलतानविषयी भीती निर्माण झाली होती. मात्र, इतिहासकार प्रा. बी. शेख अली यांच्या मते, या संपूर्ण कहाण्या सध्याच्या राजकारण्यांनी व त्यांच्या चेल्यांनी बनवल्या आहेत.
टिपू सुलतान हे ब्रिटिश, मराठा आणि निजाम यांच्या संयुक्त सैन्याच्या विरोधात लढलेले देशभक्त होते. ते देशाचे सर्वांत मोठे शत्रू होते, हा त्यांच्या विरोधातील प्रचार केवळ पूर्वग्रहांवर आधारित आहे, असं इतिहासकार प्रा. एनव्ही नरसिंहय्या यांनी म्हटलं. याबाबत त्यांनी म्हटलंय की, ज्यांना इतिहास माहिती नाही, तेच केवळ टिपू सुलतान यांचा द्वेष करतात.
टिपू सुलतान यांनी मेल्कोट, कोल्लूर मुकांबिका या मंदिरांसह इतर मंदिरांना संरक्षण दिलं याच्या नोंदी सरकारी दस्तऐवजांमध्येही आहेत. सर्वप्रथम ब्रिटिशांनी त्यांचं वर्णन जुलमी असं केलं. पण ते ब्रिटिशांशी सातत्याने लढले. त्यामुळं त्यांचा राग टिपूवर असणं साहजिक आहे.
एखाद्या शूर- वीर योद्याप्रमाणे टिपू सुलतान यांना रणांगणावर मृत्यू आला आहे. त्यांनी आपल्या राज्याच्या सर्वांगिण विकासावर भर दिला. मात्र, नंतर ही सर्व माहिती मिटवण्यात आली. याचं कारण म्हणजे ते मुस्लीम होते आणि इतर राज्यकर्त्यांप्रमाणेच तेही शत्रूला निर्दयीपणे संपवत होते. शिवाय आकडेवारी वाढवून सांगितली जात असली तरी, त्यांनी धर्मांतरही करायला लावलं होतं. पण हिंदुबहुल असलेल्या देशात मोठया प्रमाणावर धर्मांतर करून त्यांना राज्य चालवता आलं नसतं, असंही काही इतिहासतज्ज्ञांनी म्हटले आहे.
हेही वाचा: केवळ तीन सेकंदांच्या व्यायामाने व्हा तंदुरुस्त!
खरं तर टिपू सुलतान यांच्या सैन्यात सहा वेगवेगळ्या तुकड्या होत्या. त्यांच्या सैन्यात मराठा आणि राजपूत यांच्याही दोन तुकड्या होत्या. त्यांनी वेगवेगळ्या समाजांमध्ये भेद न करता सर्वांना समान मोबदला दिल्याच्या नोंदी आहेत. टिपू यांच्या काळात जमीन थेट शेतकऱ्याला भाडे तत्वावर दिली जात होती. वंशपरंपरागत पद्धतीनं ती दिली जात होती आणि सर्वांना जमीन मिळायची. टिपू सुलतान यांच्यानंतर ब्रिटिशांनीही टिपू सुलतान यांचं कृषीधोरण स्वीकारलं आणि रयतवारी पद्धत सुरू केली. लॉर्ड कॉर्नवालिस यांची जमीनदारी पद्धत म्हैसूरमध्ये टिकली नाही, कारण टिपू सुलतान यांनी इथं वेगळी पद्धत आधीच विकसित केली होती.
१९८० च्या अखेरीस टिपू सुलतान यांच्या विरोधात संतापाची लाट उसळण्यास सुरुवात झाली. यात प्रामुख्यानं दोन प्रकारच्या कथा समोर आल्या. त्यातली एक म्हणजे तथाकथित धर्मांतराची आणि कन्नड भाषेला प्रोत्साहन न देण्याची. मंदिरांची नासधूस हादेखील मुद्दा होता. हे संपूर्ण संमिश्र असं चित्र आहे. कारण त्यांनी मंदिरांना मदत केल्याचे अनेक पुरावे आहेत.
सध्या तरी टिपू सुलतान हे मुस्लीमांच्या काही विचारांना विरोध करण्याचं प्रतिक बनले आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये, टीपू सुलतान यांचे वर्णन ‘म्हैसूरचा वाघ’ असे केले जाते. टिपू सुलतान कुशल प्रशासक आणि शूर नायक होते. त्यांच्या शौर्यापुढे ब्रिटिशांनाही गुडघे टेकावे लागले होते. या व्यतिरिक्त, ते एक अत्यंत कौतुकास्पद रणनीतिकार देखील होते, अशीही इतिहासात नोंद आढळत आहे. मात्र, इतिहास हा नेहमीच बदलत असतो, ही बाब यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाली आहे. टीपू सुलतानदेखील त्याला अपवाद नाही.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”