
मंजुनाथ शेट्टी ते मंजम्मा जोगती!
कर्नाटकमधील लोकनृत्य कलाकार मंजम्मा जोगती यांना राष्टपतींच्या हस्ते नुकताच पद्म श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पदर घेऊन राष्ट्रपतींची दृष्ट काढण्याच्या खास पद्धतीमुळे त्या आणखी चर्चेत आल्या. हा व्हिडिओ समाज माध्यमावर फारच चर्चेचा विषय ठरला. आज मंजम्मांची चर्चा सगळीकडे होत आहे, कारण त्यांना पद्म श्रीने सन्मानित करण्यात आले आहे. लोकनृत्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे. पण इथवरचा त्यांचा प्रवास साधा-सोपा नसून आपल्या कल्पनेपलीकडचा आहे.
जन्मदात्या आई-वडिलांनी साथ सोडली. जगण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली. मला आवड होती म्हणून नाही तर भूक भागविण्यासाठी एक आधार म्हणून मी नृत्य शिकले. आणि या नृत्याच्या बळावरच जगणं सुसह्य झालं, असं मंजम्मा सांगतात.
मंजम्मा यांचा १८ एप्रिल १९६४ रोजी बेल्लारी जिल्ह्यातील कल्लुकंब या गावात झाला. त्यांचं नाव मंजुनाथ शेट्टी होतं. त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. आपल्या सुरवातीच्या आयुष्याबद्दल मंजम्मा सांगतात की, त्यांना पंधराव्या वर्षांपासून मुलींमध्ये राहायला, खेळायला आवडायचे. तेव्हापासून त्यांनी स्वतःला एक महिला असल्यासारखे वाटू लागले. हावभावही महिलांसारखेच होते. किशोरवयीन अवस्थेत असताना यामुळे त्यांचे आई-वडील चिंतित होते. त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवलं. मंदिरांमध्ये अनुष्ठान केलं. पण काही फरक पडला नाही. तेव्हा त्यांच्या घरच्यांना कळलं की माझ्यात ‘ट्रांसजेंडर’चे गुण आहेत. १९७५ मध्ये मला हुलीगेयम्मा मंदिरात घेऊन गेले. जिकडे ‘जोगप्पा’ बनण्याची दीक्षा दिली जाते.
हेही वाचा: तुमचा पाल्य तुमचे ऐकत नाही, काय करावे?
जोगप्पा किंवा जोगती ही लोकं ‘ट्रांसजेंडर’ असतात व ते स्वतःला यल्लमा देवीशी विवाह झालेले मानतात. देवी यलल्माला उत्तर भारतात माता रेणुका या नावाने ओळखले जाते. ते या देवीचे भक्त असतात. अशा देवाशी लग्न लावलेल्या मुलींना जोगती व मुलांना जोगता म्हटले जाते. ही परंपरा जवळजवळ ३०० वर्षांपासून सुरू आहे. एकदा का एखाद्या मुलीचे देवाशी लग्न झाले की ती इतर कोणाशीही लग्न करू शकत नाही. मग तिला आयुष्यभर देवाची सेवा करत फिरावे लागते. नाव देवाचे असले तरीही प्रत्यक्षात या मुलींच्या नशिबी इतरांचीच ‘सेवा’ करणे येते. आणि इकडूनच मंजुनाथ शेट्टी यांचं नाव मंजम्मा जोगती झालं.
हेही वाचा: अंटार्क्टिकाचे भवितव्य
घरचा मुलगा संपला होता. यामुळे आईला दुःख झाले व कित्येक दिवस त्या गऱी एका जागी पडून रडत होती. माझ्यासाठी माझा मुलगा आता मेला आहे, अशी आईची भावना झाली. आईची ही अवस्था पाहून मंजम्मालाही ते सहन झले नही व त्यांनी विष घेतले. पण त्यांना रुग्णालयात नेऊन उपचार केल्यामुळे प्राण वाचले. या घटनेनंतर ठीक झाल्यानंतर मंजम्मानी घर सोडण्याचा निर्णय घेतला. पण रहायचं व खायचं काय, हा प्रश्न होताच. मग भीक मागून दिवस धकलत राहिली. येथून मंजम्मा यांचा खडतर प्रवास सुरू झाला.
‘एकला चलो रे’ म्हणत भीक मागून जगण्याची वेळ त्यांच्यावर आली. या दरम्यान त्यांचे शारीरिक शोषणही झाले. या सगळ्याला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण त्या दरम्यान त्यांची ओळख दावणगिरी येथी बसस्थानकावर एका वडील व मुलाशी झाली. त्यावेळी वडील गाणी म्हणत होते व मुलगा डोक्यावर कळशी ठेऊन नृत्य करत होता. यालाच जोगती नृत्य म्हणतात. जोगम्मांना ते फार आवडलं आणि हे नृत्य शिकण्याचं त्यांनी ठरवलं. जोगम्मा रोज त्यांच्या झोपडीत जाऊन नृत्य शिकू लागली. त्यांनी मन लावून जोगती नृत्याचं शिक्षण घेतलं. या नृत्यावरचं त्यांचं प्रेम व लगाव पाहून एका जोगप्पा साथीने त्यांची ओळख कालव्वा या लोक कलाकाराशी करून दिली. तेथून मंजम्मा यांचा वेगळा प्रवास सुरू झाला. कालव्वा त्यांचे जोगती नृत्य पाहून भारावून गेले व त्यांनी जोगम्माला वेगवेगळ्या नाटकांत छोट्या-मोठ्या भूमिका द्यायला सुरुवात केली. कालव्वा यांच्या निधनानंतर मंजम्मांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सांभाळ केला. पुढे मग मंजम्मा जोगती या नावाने कार्यक्रम होऊ लागले. आणि हळूहळू मंजम्मा ‘जोगती’ नृत्याची ओळख झाली.
२००६ मध्ये मंजम्मा जोगती यांना कर्नाटक जनपद अकादमी पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. त्यानंतर २०१० मध्ये त्यांना कर्नाटक राज्योत्सव पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यानंतर २०१९ मध्ये मंजम्मा जोगती यांना ‘कर्नाटक जनपद अकादमी’चे अध्यक्षपद दिले गेले. या संस्थेची अध्यक्ष बनणाऱ्या त्या पहिल्या ट्रांसजेंडर व्यक्ती ठरल्या. ही संस्था राज्यात कोलकलेला पुढे नेण्याचे कार्य करते.
हेही वाचा: हिवाळी ट्रेकिंगसाठी खुणावणारी काही उत्तम ठिकाणं!
हेही वाचा: लॉकडाउनला करुयात नॉकडाउन
मंजम्मा जोगती यांनी ‘नाडुवे सुलिवा हेन्नु’ या त्यांच्या आत्मकथेमध्ये त्यांच्या जीवनावर व जोगती नृत्यावर बरीच माहिती दिली आहे. त्यांचे आत्मचरित्र हावरी जिल्ह्यातील शाळांमध्ये व कर्नाटक लोक विश्वविद्यालयात शिकवलं जातं.
जोगती नृत्य म्हणजे काय?
जोतती नत्य हे जोगप्पा लाकांचे नृत्य आहे. हे पारंपारिक नृत्य जे लोक करतात ते ‘ट्रांसजेंडर’ असतात. उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील काही भागात हा प्रकार आहे. जोगम्मांनी जोगती नृत्यच जगण्याचं साधन म्हणून निवडलं आणि मागे पाहिलंच नाही. ‘जर मी भीक मागायचं किंवा वेश्या व्यवसाय करायचं ठरवलं असतं तर आज मी जिवंतच नसती. जोगती नृत्यानेच मला जिवंत ठेवलं. जोगती नृत्य व जोगप्पा समुदाय असाच पुढे जाऊ दे. जोगती नृत्याने माझ्यासाठी जेवढं केलं तेवढं या नृत्यासाठी करण्याची मला ताकद मिळो’, अशी भावना मंजम्मा जोगती यांनी व्यक्त केली.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”