What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

अण्णा चारधाम यात्रेचा दौरा करून नुकतेच परतले. गंगा स्नान करून पवित्र झाले होते. घरी आल्यापासून अण्णांचा सगळाच होरा बदलून गेला होता.
What Is Moksha
What Is MokshaSakal
Summary

अण्णा चारधाम यात्रेचा दौरा करून नुकतेच परतले. गंगा स्नान करून पवित्र झाले होते. घरी आल्यापासून अण्णांचा सगळाच होरा बदलून गेला होता.

- अभिजित डाखोरे

अण्णा चारधाम यात्रेचा दौरा करून नुकतेच परतले. गंगा स्नान करून पवित्र झाले होते. घरी आल्यापासून अण्णांचा सगळाच होरा बदलून गेला होता. तोंडात रामनामाशिवाय दुसरे काही नव्हते. भक्ती, पूजा, मोक्ष असे शब्द सारखे कानावर पडत होते. पूजेच्या खोलीत अण्णा भक्तीत तल्लीन राहत होते. कोणीही भेटायला आले की, त्याला अण्णा रामनामाचा महिमा सांगायचे.

आज रविवार असल्याने मला आराम होता. मी खोलीत बघितले आणि न राहून अण्णांना आवाज दिला.

‘अण्णा, अहो अण्णा!’

थोड्या वेळात अण्णा पूजा थांबवून बाहेर आले. गळ्यात रुद्राक्ष माळ, हातात जपमाळ, अंगावर भगवे वस्त्र असा अवतार दिसताच मी विचारले,

‘अण्णा, मठाधिपती होण्याचा विचार दिसतोय.’

‘आरं पार्था!’, अण्णा तीर्थावरून आल्यानंतर नेहमीच्या शिव्या विसरून माणसांना देवाच्या नावाने संबोधत होते. त्यामुळे माझ्याकडे बघत ते मला कधी पार्था, आर्यपुत्र, तर मम्मीला माऊली तर कधी माते म्हणायचे.

‘आरं पार्था, ह्यो समदा तीर्थाचा परिणाम. माणसानं यकदा तीर्थ करावं आन पुण्य पदरी पाडावं.’

म्हणतच अण्णा पद्मासन करून ध्यानाच्या मुद्रेत सोप्यावर बसले.

‘टिन्या, तुया मम्मीच पुण्य म्हून मला काशी घडली.’

‘मम्मीचे पुण्य?’

‘आरे, ती उत्तरेतील देवाइले नवस बोलली व्हती. त्याच देवाईच्या आशीर्वादान आपलं समदं ओके झाल्यावर नवस फेडाले जा लागन का न्हाई?’

‘तुम्ही याआधी उत्तरेत गेले नव्हते का कधीच?’

मी चेंडू टाकला तसे अण्णा त्याच चेंडवाला टोलवत म्हणाले,

‘गेलो व्हतो यकदा. ते आमच्या नेत्याने पाठवले व्हते तव्हा. पर तव्हा मंदिर व्हाच व्हत.

पर आता ते मंदिर पायले आन डोळे फिरल्यागत झाले. जय जय रघुवीर समर्थ.’

‘अण्णा राजकारण सोडून बुवा होण्याचा मानस दिसतो’

‘आरं माणसा! आजकाल समद्या शक्ती परीस बुवाशक्ती पावरबाज हाये. आमी ठरवलं हाये, समदे मोह सोडाचे, दारू, मटन, सोडाचे आनं राम नामात तल्लीन व्हवून आश्रमात बसाचं.’

‘आश्रम अण्णा!’

‘व्हय आश्रमच! आरं, आपला फार्महाऊस हायेना थोच आश्रम करीन म्हणतो.’

अण्णांनी डोळे मिटले आणि वर बघत काहीतरी पुटपुटले.

‘अण्णा वर काय असते?’

‘आरं वरती देवाची वसती अस्ते. आन त्योच आपला हायकमांड असतो. त्याचा आदेश म्हंजी फायनल. बुवा बनून राम नाम घेण्यात लई समाधान वाटते बग.’

‘पण अण्णा तुमचे राजकारण?’

‘आरं, राजकारण आमचा पिंड हाये, आनं थो बुवा बनून बी करता येते हे म्या तीर्थाला जावून शिकलो. म्हंजी आपलं राजकारण बी व्हते आन मोक्ष बी भेटते.’

‘वा अण्णा मानले तुम्हाला!

एक दगडात दोन पक्षी’

‘आर! आपण राजकारणी माणसं आपल्याले यका दगडात दोन पक्षी बी मारता आले पायजेन आन दोन पक्ष्यात बी रायता आले पायजेन.’

असं म्हणतच अण्णांनी जपमाळ डोळ्यांना लावली.

‘बरं टिन्या यक सांग गड्या, जवा आमी तीर्थाले गेलो तवा इकडचा कारभार यवस्थित व्हता न?’

‘एकदम ओके अण्णा’

‘वारे शेर!’

‘फक्त विरोधकांनी बोंब ठोकली.

अण्णासाहेब आपली पापे धुवायला गेले म्हणून.’

मी असे म्हणतात अण्णांनी डोळे मिटले. तोंडाने शिव्यांऐवजी देवाचे नाव घेतले. आणि तशाच खालच्या स्वरात म्हणाले,

‘आरं इरोधक म्हंजी नुसता अडाणीपणाचा बाजार. ते काय करीत हाये ह्ये त्याइले समजत न्हाई हाये. आमाला जसे तीर्थात ऋषी, मुनी, योगी भेटले तसे त्याइले भेटले असते तर, आज थे आमचे इरोधक नसते. लोकाइले यक सवय असते.

लोक कामाचं बोलणं झालं की बोलण्याचं काम करतेत. आरे आपण बँका, पतपेढ्या काढल्या गरीबाले कर्ज भेटावं म्हून. शाया, कारखाने काढले थे पोराइले नोकऱ्या भेटावं म्हून. आण एवढं करूनबी लोक बोलतेच तवा यक काम कराच जोरदार माउंद कराच म्हंजी समदे चूप बसतेत. आता आमी ठरवलं म्हंजी ठरवलं. आश्रमात जाचं तपस्वी व्हाच आन मोक्ष घ्याचा.’

‘मोक्ष म्हंजी अण्णा’

मी विचारले

‘आरं मोक्ष लई डेंजर गोष्ट अस्ते.

पर तुले सोपं करून सांगतो. बार बार जलम घेणे आन मरणे या यादीतून आपलं नाव काढून टाकणे म्हंजी मोक्ष असते.’

‘पण अण्णा तुम्ही आश्रमात गेल्यावर मम्मीचे कसे होणार?’

‘आर एवढं बी कळेना तुले. आमी आश्रमात जावुन गुरू झाल्यावर शिष्याइले गुरू माता लागन का न्हाई? थे बी गुरूमाता व्हईन.’

‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

‘का मालूम! पर असे उलट सवाल गुरुले ईचाराचे नसते.’

म्हणतच अण्णा सोप्यावरून उठण्याचा प्रयत्न करायला लागले. पण त्याचं पद्मासन काही सुटत नव्हते.

पाय एकमेकांत खूप फसले होते.

‘आरं असे फसलेले पाय बाहेर काढण म्हंजी मोक्ष भेटणं व्हय.’

‘अण्णा समजा तुम्हाला मोक्ष मिळाला तर काय होईल?’

What Is Moksha
Types of Vedas: वेदांचे प्रकार

‘मग आमी देवाच्या पंगतीले बसणार, इंद्रासंग सोमरस पीत, अप्सराईचे डॅन्स पायनार.’

‘किती वर्षे?’

‘लई वरीस!’

‘मग तुम्हाला एकच एक गोष्ट करताना कंटाळा नाही येणार?’ माझ्या प्रश्नावर अण्णा थोडे गंभीर झाले डोळे मिटले माळ जपली आणि तडक उठून उभे झाले. अंगावरचे भगवे काढले, जानवे काढले, जपमाळ आणि रुद्राक्ष माळ खुंटीला लटकविल्या.

‘काय झाले अण्णा?’

‘आर देवाच्या मांडीला मांडी लावून किती साल बसायचे? ह्यो तुया सवाल डायरेक्ट गुरुले फारवर्ड केला. त्यायच्याकड बी त्याच उत्तर नव्हतं. मग गुरुची आज्ञा घेतली आन संन्यास घेण्याचा इचार आमी माग घेतला.’

‘पण अण्णा मोक्ष!’

‘च्यामारी! टवळीच्या! आरं माणसानं समजून जर घेतला थ इथसाच मोक्ष असतो’

‘ते कसे काय अण्णा?’

‘एवढं बी कळेना तुले. आमी या देशाचा जो इकास केला हाये थो स्वर्गा पेक्षा बी डबल हाये.

आरं तुयी मम्मी यकांदया अप्सरेपरिस काय कमी हाये का? आन देशीची सर त्या सोमरसाले येनार हाये का?’

म्हणतच अण्णा सातमजली हसले. आणि दौऱ्याची धूळ झटकून आंगोळ करायला स्वीमिंग पूलवर निघून गेले.

हिंगणघाट, जि. वर्धा

मो. ९९७५०५५३१०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com