Types of Vedas: वेदांचे प्रकार

कोशल हे प्राचीन भारतातील १६ महाजानपदांपैकी एक होतं. याचं क्षेत्र आधुनिक गोरखपूरच्या जवळ होतं. याची प्रथम राजधानी अयोध्या व द्वितीय राजधानी श्रावस्ती होती.
Types of Vedas
Types of Vedassakal
Summary

Types of Vedas: कोशल हे प्राचीन भारतातील १६ महाजानपदांपैकी एक होतं. याचं क्षेत्र आधुनिक गोरखपूरच्या जवळ होतं. याची प्रथम राजधानी अयोध्या व द्वितीय राजधानी श्रावस्ती होती.

- श्रीकृष्ण पुराणिक, saptrang@esakal.com

शुक्ल यजुर्वेदाच्या पुढं १५ शाखा झाल्या, हे गेल्या वेळच्या लेखात आपण पाहिलं. त्या शाखा अशा - जाबाल, बौधेय, कण्व, माध्यंदिन, शापेय, स्थापायनीय, कपोल, पांडरवत्स, आवटिक, परमावटिक, पाराशर, वैणेय, वैधेय, वैतनेय, वैजव). त्यापैकी माध्यंदिन आणि कण्व अशा दोनच शाखांचा सद्यकाळी अभ्यास केला जातो असं दिसतं.

त्यातही माध्यंदिन शाखेची संहिता अधिक प्रमाणात प्रचलित असल्याचं दिसून येतं. इथं संस्करणासाठी महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठककृत मुद्रित प्रतीचा (१९४२) आधार घेतलेला आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या ‘वाजसनेयी संहिता’ असं नाव असलेल्या (आणि बरंच साम्य असलेल्या) दोन शाखा आहेत:

वाजसनेयी माध्यंदिन : मूळची बिहार इथली.

वाजसनेयी कण्व : मूळची, कोशल इथली.

कोशल हे प्राचीन भारतातील १६ महाजानपदांपैकी एक होतं. याचं क्षेत्र आधुनिक गोरखपूरच्या जवळ होतं. याची प्रथम राजधानी अयोध्या व द्वितीय राजधानी श्रावस्ती होती. वाजसनेयी माध्यंदिन ही शाखा उत्तर भारत, गुजरात, महाराष्ट्रातील नाशिकच्या उत्तरेकडील भागात प्रसिद्ध आहे, तर कण्व ही शाखा दक्षिणेतील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तसंच ओडिशा या भागांत प्रसिद्ध आहे.

आदि शंकराचार्यांच्या चार प्रमुख शिष्यांपैकी एक असलेल्या सुरेश्वराचार्य यांनी कण्व शाखेचा स्वीकार केला. त्यांच्या गुरूंनी आपस्तंब कल्पसूत्रासहित तैत्तिरीय शाखा अवलंबली. म्हैसूरजवळ असलेल्या, भारतातील दुसऱ्या मोठ्या, श्रीरंगम् इथल्या रंगनाथस्वामीच्या देवळात कण्वशाखीय वैदिक पद्धतीनं पूजा-अर्चा होते.

Types of Vedas
Hindu Rituals : लहानपणी कान टोचण्याची प्रथा का आहे?

रघुवंशानं, दशरथानं, रामानं व त्याच्या वंशजांनी शुक्ल यजुर्वेदाचं अनुसरण केलं. शुक्ल यजुर्वेदाशी दोन उपनिषदं संलग्न आहेत - ईशोपनिषद व बृहदारण्यकोपनिषद. त्यांपैकी, ‘बृहदारण्यक’ हे सर्व उपनिषदांत आकारानं मोठं आहे. ईशोपनिषदालाच ‘ईशावास्य उपनिषद’ असंही म्हटलं जातं.

वाजसनेयी संहितेत, पुढील मंत्रांचे एकूण ४० अध्याय आहेत (ओडिशात -४१ अध्याय). ते असे:

अध्याय १ व २ : नवीन व पूर्ण चंद्राहुती. याला दर्श व पूर्ण इष्टी असं म्हणतात.

३ : अग्निहोत्र : असा होम (आहुती), जो रोज केला जातो. अग्नी विझू दिला जात नाही. महाभारतात अश्वमेधिक पर्वाच्या अंतर्गत अध्याय ९२ मध्ये अग्निहोत्राचं महत्त्व काय याचं वर्णन आलं आहे.

४ ते ८: सोमयज्ञ : आपली शरीरप्रकृती उत्तम, आनंदी राहावी म्हणून जीवकल्याणार्थ हा महायज्ञ केला जातो. वातावरणात शुद्धी उत्पन्न व्हावी, प्राणवायू शुद्ध व्हावा हा याचा उद्देश असतो. प्रत्येक ऋतूसाठी एक प्रवर्ग असतो, म्हणून सोमयज्ञात सहा प्रवर्गक्रिया असतात. प्रवर्गक्रिया ऋतु-संतुलनाच्या उद्दिष्टानं केल्या जातात.

९ व १०: वाजपेय व राजसूय : सोमयज्ञाचे दोन सुधारित प्रकार. वाजपेय एक प्रकारचा श्रौतयज्ञ आहे. हा यज्ञ केवळ ब्राह्मणांद्वारा किंवा क्षत्रियांद्वाराच करावा, असं ‘शतपथ ब्राह्मणा’त नमूद आहे. हा यज्ञ ‘राजसूय’ यज्ञापेक्षाही श्रेष्ठ मानला गेला आहे.

११ ते १८: अग्निचयनासाठी, विशेषकरून वेदी व कुंडनिर्माण.

Types of Vedas
Hindu Rituals : देवापुढे कोणता दिवा लावणं शुभ? तूपाचा की, तेलाचा...

१९ ते २१: सौत्रामणि, पूर्व दिशेचा स्वामी इंद्र याच्या प्रीत्यर्थ हा यज्ञ केला जातो. सौत्रामणि = सु-त्रमण. अर्थात् उत्तम प्रकारे रक्षण करणं. तैत्तरीय संहितेत इंद्राच्या इतस्ततः विखुरलेल्या शक्ती एकत्रित करण्यासाठी सौत्रामणी यागाचं वर्णन आलं आहे.

‘तत्देवः सोत्रमन्या संभरण.’ अर्थात्, सर्व देवांनी इंद्राच्या इतस्ततः विखुरलेल्या शक्ती एकत्रित करून आपलं रक्षण केलं. सौत्रामणि यागानं संघटन होतं आणि राष्ट्रशक्तीदेखील वाढते.

आत्मरक्षणासाठीही आपल्या विखुरलेल्या शक्ती एकत्रित करण्याची गरज असते. आत्मरक्षण, राष्ट्ररक्षण करण्याची असमर्थता हा मोठा अपराध समजला जातो. आत्मरक्षणानं मनुष्य समर्थ होतो आणि राष्ट्रतेजोवृद्धी होते.

२२ ते २५: अश्वमेधयज्ञ : ‘सार्वभौम राजा’ अर्थात्, एक चक्रवर्ती नरेशच अश्वमेध यज्ञ करण्याचा अधिकारी मानला जात असे. सर्व पदार्थप्राप्ती, सर्व विजयप्राप्ती, समस्त समृद्धिप्राप्तीसाठी हा यज्ञ केला जात असे.

२६ ते २९ : वेगवेगळ्या धार्मिक प्रयोजनांसाठी पूरक मंत्र.

Types of Vedas
Krishna Janmashtami : वास्तूदोष घालवते बासरी

३० व ३१: पुरुषमेधयज्ञ : हिंदू धर्मात केले जाणारं एक धार्मिक अनुष्ठान. चाळीस दिवसांच्या या यज्ञसमाप्तीपश्चात यज्ञकर्ता गृहत्यागपूर्वक वानप्रस्थाश्रम प्रवेश करू शकतो.

३२ ते ३४: सर्वमेधयज्ञ : या यज्ञात सर्व प्रकारचं अन्न व वनस्पतींचं हवन होतं. सर्वमेधयज्ञाचा उल्लेख महाभारतात आला आहे. महाभारतानुसार, हा एक प्रकारचा सोमयागच आहे.

३५ : पितृयज्ञ : अर्थात् पितरांसाठी केलेलं तर्पण, पिंडदान व श्राद्ध. माता-पिता, गुरू, अन्य आश्रित-संबंधी यांची रोज सेवा आणि त्यांच्या संतोषासाठी योग्य व्यवस्था करणं म्हणजे ‘पितृयज्ञ’

३६ ते ३९: प्रवरयज्ञ : प्रमुख आठ ऋषींच्या वंशपरंपरेत जेवढे मंत्रद्रष्टा ऋषी आले आहेत ते सर्वगोत्र संबोधले जातात. ‘प्रवरमंजरी’ जवळजवळ पाच हजार गोत्रांची सांगितली गेली आहे.

‘ऐतरेय ब्राह्मणा’नुसार जे आपले गोत्र विसरले, ते आपल्या पुरोहितांच्या नावानं जाणले जातात. कारण, त्यांचे प्रवर (यज्ञ करणारे) त्यांचे पुरोहितच असतात. ज्या मंत्रांचा वापर यज्ञात व कर्मकांडात असतो त्या मंत्रांचं स्पष्टीकरण यात आहे.

४० : हा शेवटचा अध्याय म्हणजेच प्रसिद्ध ईशोपनिषद होय.

कृष्ण यजुर्वेद : यजुर्वेद या संस्कृत शब्दाचा अर्थ (यजुस् + वेदः = यजुर्वेद) असा होतो. हा हिंदूंच्या चार वेदांपैकी दुसरा वेद आहे. या वेदाची रचना ख्रिस्तपूर्व ६००० या काळात झाली, असा एक मतप्रवाह आहे. याविषयी विविध अभ्यासकांत मतमतांतरं आहेत.

यजुर्वेदसंहितेत वैदिक काळातील यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्रांचा समावेश आहे. त्यांच्या प्रस्तुतीकरणात व वापराच्या पद्धतीत ब्राह्मणग्रंथ व श्रौतसूत्रं यांनी मोलाची भर घातली.

यज्ञसंस्थेचा तपशीलवार विचार या संहितेनं मांडला आहे. धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद मानला जातो. हा यजुर्वेद ब्रह्मदेवानं लिहिला आहे, असं मानलं जातं आख्यायिकेनुसार, ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.

कृष्णयजुर्वेदाच्या चार शाखा आहेत.

१. तैत्तिरीय संहिता : मूळची पांचालची, २. मैत्रयणी संहिता: मूळची कुरुक्षेत्राच्या दक्षिणेकडील भागातली, ३. चरकसंहिता: मूळची, मद्र व कुरुक्षेत्रप्रांतातली ४. कपिष्ठलसंहिता: दक्षिण पंजाबातील प्रत्येक शाखेसमवेत, ब्राह्मणे व बहुतेकांसमवेत श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, आरण्यके, उपनिषद व प्रतिशाख्ये संलग्न होते. कृष्णयजुर्वेदाच्या तैत्तिरीय ब्राह्मणात अनेक कथा आल्या असून त्यांचं तात्पर्य ‘यज्ञ’ हे आहे.

तैत्तिरीय शाखा : यापैकी प्रसिद्ध व चांगली जतन केलेली संहिता आहे ती म्हणजे तैत्तिरीय संहिता. हे नाव ‘निरुक्तकार यास्काचार्य’ यांचा शिष्य ‘तैत्तिरी’वरून पडलं. त्यात सात अध्यायांचा, कांडांचा समावेश आहे. त्याची पुढं ‘प्रपाठक’ व नंतर ‘अनुवाक्’ म्हणून विभागणी झाली आहे. त्यांपैकी काहींनी हिंदू धर्मात मानाचं स्थान पटकावलं आहे.

Types of Vedas
Hindu Rituals : लहानपणी कान टोचण्याची प्रथा का आहे?

उदाहरणार्थ : तै-४.५ व ४.७ ज्यात ‘रुद्रचमक’ आहे आणि १.८.६.१ यात महामृत्युंजय मंत्र. ‘भूः, भुवः, स्वः’ हे बीजमंत्र ऋग्वेदातील सवितृ गायत्रीमंत्रास जोडलेले असलेला मंत्र हा यजुर्वेदातील आहे. दक्षिण भारतात, कृष्णयजुर्वेदाच्या तैत्तिरीय पाठ्य असलेल्या शाखेचं सध्या प्रचलन आहे.

या शाखेच्या लोकांत आपस्तंबसूत्र हे सर्वमान्य आहे. तैत्तिरीय शाखेत, तैत्तिरीय संहिता (सात कांड), तैत्तिरीय ब्राह्मण (तीन कांड), तैत्तिरीय प्रश्न (सात प्रश्न), तैत्तिरीय उपनिषद (शिक्षावली, आनंदवल्ली, भृगुवल्ली व महानारायण उपनिषद) येतात.

उच्चारणाचं वेगळेपण : इतर वेदांपेक्षा स्वर व उच्चार यांबाबतीत शुक्ल यजुर्वेद हा फार वेगळा आहे. माध्यंदिन शाखेचे लोक ‘य’च्या जागी ‘ज’ आणि ‘श’च्या जागी ‘ख’ उच्चारतात. काही वर्ण द्वित्व पद्धतीनं उच्चारले जातात. अनुस्वाराचा उच्चार विशेष सानुनासिक केला जातो आणि स्वर मानेनं व्यक्त न करता हातानं व्यक्त केला जातो.

‘विष्णुपुराणा’मध्ये तैत्तिरीय शाखेच्या उद्गमाविषयी पुढीलप्रमाणे पुराणकथा आलेली आहे : व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी यजुर्वेदाच्या विविध शाखा आपल्या शिष्यांना शिकवल्या. याज्ञवल्क्य हा त्यांचा एक शिष्य होता.

याज्ञवल्क्य हे वैशंपायन ऋषींकडून परंपरेनुसार वेद शिकले. ते त्यांचे मामा होते. त्यांचा जन्म हा या कामासाठीच देवदत्त होता असं मानलं जातं. ते एकपाठी (एकसंधिग्रही) होते. एका शिकवण्यातच तो ते आत्मसात करू शकत असत.

वेदांच्या निरूपणात दोघांमध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद झाले. एका प्रसंगी वैशंपायन ऋषी इतके संतापले की, त्यांनी त्यांचं ज्ञान परत मागितलं. याज्ञवल्क्य यांनी ते ओकून टाकलं. वैशंपायन ऋषींच्या एका शिष्यानं, जो ते ग्रहण करण्यास उत्सुक होता, तित्तिर पक्षाचं रूप घेऊन ते खाऊन टाकलं. म्हणून, हिला ‘तैत्तिरीय संहिता’ असं म्हणतात.

गुरूनं दिलेलं सर्व ज्ञान ओकून टाकल्यावर, याज्ञवल्क्यांनी सूर्याची आराधना केली व सूर्यनारायणाकडून थेट नवीन ज्ञान प्राप्त केलं. त्यासाठी सूर्यानं घोड्याचं रूप घेतलं होतं, अशी आख्यायिका प्रचलित आहे.

वैशंपायनांच्या मूळ संहितेला तो शुक्ल यजुर्वेद आणि ओकून टाकलेल्या ज्ञानातून स्वीकारलेला तो कृष्ण यजुर्वेद अशी मान्यता आहे. अशाच प्रकारची कथा भागवतपुराणातही आलेली आहे.

सामवेद : चार वेदांमध्ये साम हा तिसऱ्या ‍या क्रमांकाचा वेद आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्णानं त्याच्या विशेष विभूतींचं वर्णन करताना ‘वेदानां सामवेदोऽस्मि’ म्हणून सामवेदाचा गौरव केला आहे. साम म्हणजे ‘गायचा मंत्र’ व ‘गान’ असं दोन्ही असल्यामुळे सामवेदाचे दोन मुख्य भाग आहेत.

मुख्य भागाला ‘आर्चिक’ असं म्हणतात व दुसऱ्या‍ भागाला ‘गान’ असं म्हणतात. आर्चिक म्हणजे ऋचांनी बनलेली गानयोग्य मंत्रांची संहिता. हिचे दोन भाग आहेत - पूर्वार्चिक व उत्तरार्चिक.

दोन्ही भागांत मिळून एकूण मंत्रसंख्या १८७५ आहे. ऋग्वेदात जशी ‘मंडल’, ‘सूक्त’, ‘मंत्र’ अशी रचना आहे तसे पूर्वार्चिकात सहा अध्याय आहेत आणि त्यांत सहा प्रपाठक (याला ‘कांड’ असंही म्हणतात) आहेत. ‘अर्ध’, ‘दशति’ आणि ‘मंत्र’ अशी ही रचना आहे.

काही प्रपाठकांत केवळ ‘प्रथमार्ध’च आढळतो. वेगवेगळ्या ऋषींनी एका देवतेला उद्देशून व एकाच छंदात रचलेल्या ‘साधारणपणे’ दहा दहा मंत्रांच्या समूहाला ‘दशति’ असं म्हटलेलं आहे.

‘साधारणपणे’ असं म्हणण्याचं कारण म्हणजे, काही ‘दशतिं’मध्ये कमी-जास्त मंत्रांची संख्या दिसते. पूर्वार्चिकातील पहिल्या प्रपाठकात अग्निदेवतेवर मंत्र असल्यामुळे त्यास ‘अग्निकांड’ असं म्हटलेलं आहे. प्रपाठक २ ते ४ ही इंद्रदेवतेवर असल्यामुळे त्यास ‘ऐंद्रकांड असं म्हटलेलं आहे. पाचव्या प्रपाठकात सोमदेवतेला उद्देशून मंत्र आलेले असल्यामुळे त्याला ‘पवमानकांड’ असं म्हटलेलं आहे.

सहाव्या प्रपाठकात विविध ऋषी, छंद व देवता असल्यामुळे त्यास ‘आरण्यककांड’ असं म्हटलेलं आहे. त्यानंतर ‘महानाम्यार्चिक’ म्हणून दहा ऋचांचं एक परिशिष्ट जोडलेलं आहे. पूर्वार्चिकामध्ये एकूण ६५० मंत्र आहेत.

गानदृष्ट्या पूर्वार्चिकातील प्रत्येक ऋचेवर निरनिराळ्या ऋषींनी रचलेल्या गानांची स्वरांकनासह (नोटेशनसहित) एकत्रित मांडणी गानग्रंथांमध्ये केलेली आहे. पहिल्या पाच प्रपाठकांतील मंत्रांवरील गाने ‘ग्रामेगेय’नामक ग्रंथात आहेत, तर आरण्यक प्रपाठकांतील मंत्रांवरील गाने ‘अरण्येगान’नामक ग्रंथात आहेत.

उत्तरार्चिकात २१ अध्याय ९ प्रपाठकांत विभागलेले आहेत. यात एकूण १२२५ मंत्र आहेत. उत्तरार्चिकातील मंत्र यज्ञांना अनुसरून एकत्र केलेले आहेत.

सोमयागातील स्तोत्रे साधारणतः तीन ऋचांवर गायिली जातात. त्यामुळे उत्तरार्चिकात बहुशः ‘तृच’ म्हणजे ३-३ ऋचांची मांडणी केलेली असते. ही स्तोत्रे पूर्वार्चिकातील एकर्च गानांनुसार गायिली जातात.

म्हणजेच, गानमंत्र किंवा चीज उत्तरार्तिकातील, तर गानपद्धती, मॉडेल किंवा राग पूर्वार्चिकातील, अशा प्रकारे स्तोत्रगायन केलं जातं. उत्तरार्चिकातील ‘तृचां’पैकी पहिली ऋचा पूर्वार्चिकात येते. अशा २८७ ऋचा उत्तरार्चिकात पुन्हा येतात.

त्यामुळे दोन्ही आर्चिक संहिता मिळून एकूण मंत्रसंख्या जरी १८७५ असली तरी पुनरावृत्त २८७ ऋचा वगळून एकूण १५०४ च होतात. त्यापैकी ९९ ऋचा सध्या उपलब्ध असलेल्या ऋग्वेदसंहितेत आढळत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com