संशयीवृत्तीने पोखरलंय? आनंद मूर्ती गणेशाकडून शिका ५ गोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Chaturthi Special Article}

मनात संशयाने घर केलंय? आनंद मूर्ती गणेशाकडून शिका या ५ गोष्टी!

- विवेकशास्त्री गोडबोले

काही लोक इतरांच्या प्रत्येक गोष्टीचा किस काढत बसतात. तर्काचा उपयोग ते गोष्ट गंभीरपणे समजून घेऊन लाभान्वित होण्याच्या उद्देशाने न करता त्याचा अनुचित उपयोग करून ती गोष्ट कुरतडत राहतात. त्याला ते विवेक समजतात; परंतु तो सद्विवेक नसून कुविवेक असतो हेच बाप्पाच्या वाहनातून समजून घ्या...

गणेश चतुर्थी: आपण सर्वच जण या गणेशोत्सवाची अत्यंत आतुरतेने वाट पाहात असतो. यामध्ये आबालवृद्ध सर्वच जणांचा समावेश असतो. तसे आपण सर्वच भारतीय उत्सवप्रिय आहोत; परंतु या गणपती उत्सवाचे विशेष आकर्षण आहे. गणपती हा देव आनंदाचा देव आहे. आनंदाला विरुद्ध अर्थाचा शब्द नाही.

हा देव पृथ्वी तत्त्वाचा देव आहे. पृथ्वीचे जे जे सदगुण शास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहेत, तसे ती सर्वांवर प्रेम करते; किंबहुना प्रेमनिर्मितीच पृथ्वीपासून आहे. पृथ्वीचे एक नाव क्षमा आहे. एक नाव उर्वरा आहे. जेवढे पेराल त्याचे शंभर पट ती परत देते. पृथ्वीचे अनेक गुण सांगू लागलो, तर खूप विस्तार होईल. तात्पर्य इतकेच पृथ्वीच्या सर्वच्या सर्व सदगुणांना वृद्धिंगत करणारा देव म्हणजेच श्री गणेश.

या गणेश उत्सवाला पार्थिव गणेश उत्सव असेही नामाभिधान आहे. कारण या उत्सवात मातीचा गणपती घरी आणून त्याची पूजा अर्चा भजन पूजन सर्व काही केले जाते. सर्वच जण त्याची आरती अत्यंत प्रेमाने आवडीने करतात. गणपती, गणेश गुणेश, गमुख ही सर्व नावे ज्या गणपती बाप्पाला आहेत, तो समूहाचा नायक आहे. बाह्य जगतात समूहांना एकत्र करणारा आणि त्या समूहांकडून महत कार्य करून घेणारा गणेश आपल्या शरीरातील अंतर्यात्रेत सुद्धा अतिशय मोठी भूमिका बजावतो. पंचज्ञानेंद्रिये, पंच कर्मेद्रिये, पंच तन्मात्रा, पंचकोष, मन, बुद्धी, अहंकार इत्यादी गुणांना सुचारू रुपाने कार्य प्रवण करणारा तो गणाधीश आहे.

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

गणपती हस्ती मुख आहे. आपण या हस्ती मुखाचा थोडा विचार करू. जंगलात राहणारा हत्ती या प्राण्याबद्दल सर्वांनाच कुतुहल असते. प्राणी संग्रहालयात सुद्धा हत्तीपाशी आपण किती वेळ गेला हे समजत नाही. खरोखरच हत्तीमध्ये खूप वैशिष्ट्ये आहेत. हत्ती कळपाने राहतात. हत्तीच्या कळपाचे सर्व निर्णय त्या कळपातील मोठी हत्तीण घेते. हत्तीला २५ किलोमीटर अंतरावरील गंध समजतो. हत्ती सतत कान हलवत असतो. अर्थातच तो कायम सतर्क, सावध असतो.

हत्ती हा शक्तीने प्रचंड आहे आणि तो शाकाहारी आहे. हत्तीला आंघोळ प्रिय आहे. हत्तीची स्मरणशक्ती किंवा बुद्ध्यांक खूपच मोठा आहे. हत्तीचे बारीक डोळे खूप लांब अंतरावर असलेले पाणी ओळखतात आणि त्या प्रमाणे स्थलांतर करतात. हे सर्व गुण माणसाला अत्यंत आवश्‍यक आहेत. गणपतीच्या हस्तीमुखात हे सर्व गुण एकत्र आहेत. म्हणूनच की काय मनुष्याचे शरीर आणि हत्तीचे मुख असा गणेश आपल्याला अत्यंत प्रिय वाटतो.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

गणपती हा बुद्धीचा आणि सर्व प्रकारच्या कलांचा देव आहे. तो शब्दप्रिय आहे. सूरप्रिय, तालप्रिय आणि नृत्यप्रिय आहे. अर्थात या सर्वांमध्ये सुमधुरता भक्ती, प्रेम अपेक्षित आहे. कर्कशपणा, विपरित संगीत किंवा हिडिस, बीभत्स नृत्य त्याला अजिबात आवडत नाही. तसेच कुकर्म कुमार्ग, व्याभिचार, अतिरेक आणि व्यसनाधिनता आणि भ्रष्ट आचार या गोष्टी कोणत्याच देवाला आवडत नाहीत. आणि विशेषतः या पृथ्वीच्या देवाला तर नाहीच नाही. गणेश हा वैश्‍विक देव आहे. त्यामुळे संपूर्ण जगात आपण कोठेही गेलो तरी गणपतीचे आणि त्याच्या स्वभावाचे अस्तित्व आपल्याला पाहावायास मिळते. कारण तो आनंदाचा कंद, आनंद निर्माता आणि आनंद स्वरुप आहे. या वर्षी आपण सर्वच जण श्री गणेशाच्या सानिध्यात आनंदाचे डोही आनंद तरंग या संत वचनाचा अनुभव घेऊया.

हेही वाचा: मूर्तिपूजा का करावी? मूर्ती नेमकी कशी असावी?.....घ्या जाणून

वेगवेगळ्या कोश आणि ग्रंथांत सांगितलेले गणेशाचे आध्यात्मिक रूप

हत्तीचे कान व डोळे
हत्तीचे कान तर पंख्याइतके मोठे असतात. मग ज्ञानवान माणसाला इतके मोठे कान घेण्याची काय बरे आवश्‍यकता आहे? कानाला एक महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय मानण्यात येते. जेव्हा एखाद्याला आपण आवश्‍यक व महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतो तेव्हा त्याला नीट कान देऊन ऐक असे म्हणतो. गुरूही जेव्हा आपल्या शिष्याला मंत्र देतो तेव्हा तो त्याच्या कानातच उच्चारण करतो. भगवंतांनी जेव्हा गीता ज्ञान दिले तेव्हा अर्जुनाने ते कानांनीच ऐकले. म्हणून मोठे-मोठे कान ज्ञानश्रवणाचे प्रतीक आहेत. ते लक्षपूर्वक जिज्ञासू वृत्तीने व ग्रहण करण्याच्या भावनेने एकचित्त होऊन ऐकण्याचे प्रतीक आहेत.

अशा रीतीने ऐकल्याशिवाय माणूस विशालबुद्धी होणेच शक्‍य नाही किंवा हत्तीसारखा विशाल डोक्‍याचा बनणेच शक्‍य नाही. ज्ञानसाधनेत श्रवण, मनन व निदिध्यास हे तीन पुरुषार्थ सांगण्यात आले आहेत. यात सर्वप्रथम आहे श्रवण, ज्ञानसागर. परमात्म्याच्या विस्तृत ज्ञानाचे श्रवण करण्यास हे मोठे कानच उपयुक्त आहेत. गणपतीचे डोळे हत्तीच्या डोळ्यांसारखे चित्रित करण्यामागे गहन रहस्य आहे. हत्तीच्या डोळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला लहान वस्तूही मोठी दिसू लागते.

घुबडांच्या डोळ्यांचेही वैशिष्ट्य आहे. त्यांच्या बाहुल्या सूर्याच्या प्रकाशाने दिपून जातात. म्हणून घुबड दिवसा आपले डोळे मिटून घेते. मांजराच्या डोळ्यांचेही वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे मांजराला रात्रीच्या अंधारातही स्पष्ट दिसू शकते. तसेच हत्तीच्या डोळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला लहान वस्तूसुद्धा मोठ्या दिसतात. जर त्याला लहान दिसल्या असत्या तर तो सर्वांना आपल्या पायाखाली तुडवत गेला असता. याचप्रमाणे ज्ञानवान माणसाचाही आपला एक विशेष गुण असतो. तो लहानातही मोठेपणा पाहतो. प्रत्येकाचा मोठेपणा त्याच्या दृष्टीपुढे उभा राहतो म्हणून तो प्रत्येकाला मान देतो. त्याचे मन आपल्या शब्दांनी तुडवत नाही. तेव्हा ज्ञानी माणसाचे डोळे या गुणांमुळे हत्तीच्या डोळ्यांच्या रूपात चित्रित करणे योग्यच आहे.

हत्तीची सोंड (तुंड)
आपणास विचार पडला असेल की, 'बरे हत्तीच्या डोक्‍याचे कारण समजले, पण इतक्‍या महान शिवसुताला (शिवपुत्र) सोंड का म्हणून दिली आहे? परंतु जर आपण सोंडेच्या वैशिष्ट्यांकडे लक्ष द्याल तर असे करणेच योग्य आहे हे आपल्या ध्यानात येईल . हे तर आपणास माहीतच असेल की हत्तीची सोंड इतकी मजबूत व शक्तिशाली असते की, तो तिच्या साह्याने वृक्षच उखडून टाकून त्याला वर उचलतो. जणू काय तो बुलडोझर व क्रेन या दोघांचे कार्य एकाच वेळी करतो. (Meaning of Ganesha Murti Trunk)

त्याला वाटल्यास सोंडेने एखादी वस्तू तो उखडून टाकेल, वर उचलून फेकून देईल किंवा छोट्या छोट्या मुलांना प्रणामही करील. एखाद्याला तो फूलही अर्पित करील किंवा तांब्यात पाणी घेऊन एखाद्याची पूजाही करील. तो सोंडेने केवळ मोठा वृक्षच नव्हे तर सुईसारखी सूक्ष्म वस्तूही उचलू शकतो. याचप्रमाणे ज्ञानवान माणूसही आपल्या स्थूल सवयी मुळासकट उखडून फेकून देण्यात समर्थ असतो. तसेच सूक्ष्माहून सूक्ष्म गोष्टी धारण करण्यास आणि इतरांना सन्मान, स्नेह व आदर देण्यात कुशल असतो. आपले जुनाट संस्कार मुळासकट उपटून टाकून देण्यासही हत्ती किंवा त्याच्या सोंडेसारखी आध्यात्मिक शक्ती लागते. आणखी एक गोष्ट म्हणजे हत्ती आपल्या सोंडेने हुंगूनही वस्तू ओळखतो. याच प्रकारे ज्ञानवान माणूसही इतर व्यक्तींना लवकरच ओळखून घेतो. म्हणून हत्तीचे केवळ डोकेच नव्हे तर सोंडही ज्ञानवान माणसाच्या काही वैशिष्ट्यांचे प्रतीक आहे.

हेही वाचा: लालबागचा राजा आणि आदेश बांदेकरांच्या शिवसेना प्रवेशाचं कनेक्शन, वाचा Exclusive मुलाखत

हत्तीचे डोके
सर्व पशू-पक्ष्यांत हत्तीला बुद्धिमान मानले जाते. माणसाला त्याचा अनुभवही आलेला आहे. हत्तीचे डोके मोठे असते आणि त्याची स्मृती तीक्ष्ण असते, असे दिसून आले आहे. आपल्या माहुताला तो चांगल्या रीतीने जाणतो आणि ओळखू शकतो. म्हणून इंग्रजीतही एक म्हण आहे की, "As wise and faithful as an elephant.' ज्या माणसाला आत्मा आणि परमात्मा यांचे स्पष्ट ज्ञान प्राप्त झालेले असेल व सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचाही बोध झालेला असेल त्याला संस्कृत भाषेत "विशाल बुद्धी' असे म्हणतात. असा विशाल बुद्धी माणूस ज्याला परमपिता परमात्म्याची स्मृती कायम असेल आणि ज्याचा परमात्म्यावर अढळ विश्‍वास व श्रद्धा असेल त्याचे डोकेही (जे बुद्धीचे स्थान आहे) हत्तीच्या डोक्‍याच्या रूपात चित्रित करणे रास्त आहे. (Why Ganpati Has Elephant Head)

सर्वसाधारण व्यवहारातही जेव्हा बऱ्याचशा गोष्टी एखाद्याच्या आठवणीत राहतात व तो विशालबुद्धी माणसासारख्या गोष्टी बोलत असतो तेव्हा लोकांच्या अंतःकरणातून हे शब्द बाहेर पडतात की, "कमाल आहे याचा मेंदू तर हत्तीसारखा आहे.' हत्तीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तो जेव्हा गल्लीबोळातून किंवा बाजारातून जात असतो तेव्हा माकडे वाकुल्या दाखवोत व कुत्री भुंकोत, तो त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यांच्या निरर्थक गोष्टींकडे तो दुर्लक्ष करतो. त्यांच्या क्षुद्र कृत्यांनी तो उत्तेजितही होत नाही किंवा गायी, बकऱ्यांप्रमाणे पळूही लागत नाही. तो आपल्यातच मस्त राहतो. आपली सोंड इकडे-तिकडे फिरवत आपल्या राजेशाही संथ चालीने आत्मविश्‍वासपूर्वक आपला मार्ग आक्रमित राहतो. ज्ञानवान व योगयुक्त असणाऱ्या माणसाचीही अशीच लक्षणे असतात, म्हणून हे सर्व गुण एकाच वेळी व्यक्त करण्यासाठी हत्तीचे डोकेच सर्वथैव योग्य आहे.

रिद्धी आणि सिद्धी
गणपतीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी नावाच्या त्याच्या दोन बायका दाखविण्यात येतात. या दोन बायका म्हणजे अनुक्रमे ज्ञान व त्याद्वारे मिळणारे साफल्य यांची प्रतीक होत. जो बुद्धिमान असेल तो पूर्ण विचारांतीच कार्य करील. दूरदर्शीपणाचा उपयोग करील. त्यामुळे त्याला सिद्धी किंवा साफल्य जरूर प्राप्त होईल. साफल्य हा तर ज्ञानवान माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कित्येकदा गणपतीच्या चित्रांत त्याच्याबरोबर केळीचा खांब व लक्ष्मीही चित्रित करण्यात येतात.

केळीच्या रोपट्याचे हे वैशिष्ट्य असते की, त्याचे वरचे एक पान काढले तर त्याखाली दुसरे पान व तेही काढले तर तिसरे पान आढळते. आपल्या या वैशिष्ट्यामुळे 'केळ' ही गोष्ट सुचविते की, ज्ञानवान माणसाच्या बोलण्यात गहनता असते. त्याचे बोलणे आपण वर वर न ऐकता त्याच्या खोलात शिरलो तर अनेक रहस्ये स्पष्ट होतील, म्हणून एका हिंदी कवीने म्हटले आहे की, " जैसे केले के पात-पात में पात। वैसे ज्ञानी की बात बात में बात।''तेव्हा गणपतीच्या बरोबर 'केळ' चित्रित करण्यामागे हा भाव असतो की ज्ञानवान माणसाच्या गोष्टीत गहनता असते.

गणपतीचे वाहन - मूषक
हे किती विचित्र वाटते की, इतक्‍या भरभक्कम गणपतीचे वाहन "उंदीर' आहे, अवश्‍य याचाही एखादा गहन अर्थ असेल. उंदराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वस्तू मग ती महाग वा स्वस्त असो तो ती कुरतडत असतो. आपल्या खादाडपणामुळे तो इतरांच्या वस्तू कुरतडत बसतो. अगदी याचप्रमाणे काही लोक इतरांच्या प्रत्येक गोष्टीचा मग तो कितीही शहाणपणाची व मूल्यवान का असेना, किस काढत बसतात. तर्काचा उपयोग ते गोष्ट गंभीरपणे समजून घेऊन लाभान्वित होण्याच्या उद्देशाने न करता त्याचा अनुचित उपयोग करून ती गोष्ट कुरतडत राहतात. त्याला ते विवेक समजतात; परंतु तो सद्विवेक नसून कुविवेक होय. (Why Mouse is Vahana of Ganesha)

ते हंसाचे नव्हे तर उंदराचेच लक्षण आहे. ज्ञानवान माणूस अशी वृत्ती आपल्या काबूत ठेवतो. तो तर्क जरूर करील पण कुतर्क कधीही करणार नाही. आपल्या काबूत ठेवूनच तो तर्काचा उपयोग करतो. याच अर्थाने उंदीर (मूषक) गणपतीचे वाहन आहे. गणपती विवेकवान व तर्कसंपन्न आहे, पण तर्काला कुरतडण्यासाठी स्वैर सोडत नाही. त्याचे वाहन उंदीर म्हणजे विवेकाने अविवेकावर विजय प्राप्त केल्याचे प्रतीक आहे. उंदीर गुपचूपपणे बीळ बनवित घरात प्रवेश करतो आणि लपून अंधारात कुरतडण्याचे काम करतो. याचप्रमाणे संशय अथवा अविवेकही अज्ञानरूपी अंधारात येऊन बिळात लपल्याप्रमाणे अप्रत्यक्षरीत्या आपले काम करण्यास सुरवात करतो आणि माणसाच्या ज्ञानाची मुळे कुरतडून निकामी करून टाकतो म्हणून माणसाने संशयवृत्ती आपल्या काबूत ठेवावयास हवी.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”