Navarartri Festival- नवरात्रीचा सण अन्नसुरक्षेसाठीचा आशिर्वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्री आणि भारतीय कृषी संस्कृती}
नवरात्र आणि कृषी संस्कृती

नवरात्रीचा सण अन्नसुरक्षेसाठीचा आशिर्वाद...

- डॉ. नागेश टेकाळे

प्रत्येक सण, उत्सव हा निसर्गाच्या प्रती आदर तर आहेच पण त्यामध्ये शेतीचा, कृषि संस्कृतींचा सन्मान सुद्धा आहे. हजारो वर्षापूर्वी शेती व्यतिरिक्त कुठलाच विकास नव्हता, या सणांना निसर्ग आणि कृषी संस्कृती संवर्धनाची परंपरा आहे...कशी ती घ्या जाणून

सहिष्णुता आणि सर्वधर्म समभाव या दोन भक्कम चिऱ्यावर उभी असलेल्या भारतीय हिन्दू संस्कृतीच्या मंदिराची प्रत्येक पायरी ही विविध सण, वार, उत्सव, व्रतवैकल्ये यांनी सजलेली आहे. या सर्व पायऱ्या ओलांडूनच आपणास या संस्कृतीचे खरे दर्शन घडते. या सर्व सण, उत्सवांना हजारो वर्षांची परंपरा आहेआणि हे सर्व सण उत्सव आपली शेती आणि ती कसणारे शेतकारी यांच्याशी जोडलेले आहेत. (Relation of Navaratri with Farming Culture)

पूर्वी जंगले ही वृक्ष, वेली, झुडपे विविध प्रकारच्या तृणांनी समृध्द होती. याच जंगलाने (Jungle) मानवाला आपले वृक्ष, तृणरूपी गवताचे प्रकार तर दिलेच सोबत दोन पावले मागे सरकत सकस कसदार जमिन सुद्धा दिली. याच जमिनीवर माणूस शेती (Farming) करू लागला. तृणधान्ये विकसित झाली आणि भटकणारा माणूस एका ठिकाणी स्थिर होऊन शेतीच्या रूपाने अन्न सुरक्षा प्राप्त करू लागला आणि याचेच ऋण म्हणून हे सण उत्सव सुरू झाले.

प्रत्येक सण, उत्सव (Festivals) हा निसर्गाच्या प्रती आदर तर आहेच पण त्यामध्ये शेतीचा, कृषि संस्कृतींचा सन्मान सुद्धा आहे. हजारो वर्षापूर्वी शेती व्यतिरिक्त कुठलाच विकास नव्हता, या सणांना निसर्ग आणि कृषी संस्कृती संवर्धनाची परंपरा आहे. या सणांचा उल्लेख महाकाव्ये, पुराणे, उपनिषीधात सुद्धा आहे. गणेश उत्सव, नवरात्री, दुर्गापूजा, दसरा, दिवाळी, होळी, रंगपंचमी, गौरी या सर्व सणांना कृषी संस्कृतीचे अधिष्ठान आहे.

श्रावण महिण्यामधील प्रत्येक दिवस सणासारखाच साजरा होतो. बी पेरणी पासून पिक उत्पादनापर्यंत सर्व कृषी घटना या सणांना जोडलेल्या आहे. रब्बीला कोणकोणते धान्य पेरावयाचे हे नऊ दिवसाचे नवरात्र आपणास सांगते, मोहरी पिवळ्या फुलांनी फुलली की बसंत पंचमी साजरी होते. चैत्र गौरी हा आंबा महोत्सवाचे प्रतिकच असते तर दक्षिणेकडील पोंगल, ओनम हे मोठे सण शेत धान्याने कसे भरले आहे याचे प्रतिक दर्शवितात. प्रत्येक सण, उत्सव हे सुख, शांती समाधान तर देतांतच त्याचबरोबर एकत्र कुटुंबपद्धतीचे गावांच्या एकीकरणाचे दर्शन सुद्धा घडवतात. नवरात्रीत ९ दिवसांचा सण, यांमध्ये ९ देवीचे अवतार आपणास सृष्टीचे 9 विविध रंगाची रूपे दाखवतात.

हा महिलांचा उत्सव आहे. प्रत्येक दिवशी विशिष्ट रंगाची साडी हे त्या काळामधील निसर्गाची, कृषीच्या रंगांची उधळण होते. नवरात्री हा सण म्हणजे खरिप हंगामाचा रब्बी हंगामाला आशिर्वाद असतो. या आशिर्वादातून हे सांगितले जाते की जमिन भरपूर पाणी प्यायली आहे, आता वापसा उत्तम झाला आहे. रब्बीची पेरणी करा, भरपूर उत्पन्न मिळेल आणि अन्न सुरक्षा सुद्धा.

नवरात्रीचा उत्सव पहिल्या दिवशी घट स्थापनेने सुरू होतो. या दिवशी शेतकरी आंबा अथवा पळसाची पाने एकत्र शिवून त्याचा मोठा चौकोनी द्रोण तयार करतात. या द्रोणामध्ये रब्बीसाठी राखून ठेवलेल्या वेगवेगळ्या जमिनीमधील ओंजळ भर माती घेऊन द्रोण काठोकाठ भरतात. द्रोणाच्या मध्यभागी भाजलेल्या मातीचा लहान कलश रोवला जातो आणि त्यात

शेतामधील विहिरीचे पाणी भरले जाते. असा द्रोण तयार झाल्यानंतर शेताच्या घरामधील रब्बीसाठी ठेवलेले बियाणे चिमूट चिमूट या मातीत घरामधील वृध्द स्त्रीच्या हस्ते मिसळले जाते. नवरात्रीच्या ९ दिवसात मातीच्या कलशामधून दररोज टाकलेले थोडे थोडे पाणी नियमित सर्व बाजूला तळापासून ते वरपर्यंत झिरपत जाते आणि मातीत ४० ते ४५% आद्रता निर्माण होऊन बी अंकुरण्यास सुरवात होते. दसऱ्याच्या दिवशी सकाळी द्रोण विविध हिरव्या रोपांनी भरून गेलेला आढळतो. घरामधील वृद्ध लोकांना या द्रोणामधील बियाणांचे रुजविण्याचे प्रमाण समजते आणि त्यानूसार ते बियाणे शेतामध्ये रब्बीला पेरण्यासाठी वापरतात.

आजही मला आठवते, माझ्या स्व. आईकडे रब्बीसाठी ठेवलेली २०/२२ प्रकारची बियाणे होती आणि नवरात्रीच्या द्रोणात ती सर्व बियाणे टाकत असे आणि आश्चर्य म्हणजे त्यातील प्रत्येक बियाणे १०० टक्के रुजत असे. यातील आठ ते दहा बियाणं आमच्या शेतासाठी असत तर उरलेली बियाणे आई इतर गरजू शेतकऱ्यांना देत असे. मात्र परत देण्याच्या हमीवरच.

शेतकरी आमच्या घरी घटाचे दर्शन घेण्यास येत आणि घटामधील बियाणीची उगवण क्षमता पाहून त्या विशिष्ट बियाणांची मागणी करत. पूर्वी माझ्या आईप्रमाणे प्रत्येक गावांत अशा अनेक बीज माता होत्या. दसऱ्याच्या दिवारी आम्ही पांढऱ्या शुभ्र टोपीच्या पूढच्या भागात घटामधील रोपाचे तुरे लावून शिलंगणासाठी गावा बाहेर जात असू. सर्व गावच तेथे येत असे आणि तेथे आपट्याची पाने एकमेकांना देतांना या टोपीमधील हरित तुऱ्याची पाहणी करत बियाणे उपलब्धीची माहिती मिळत असे. नवरात्रीमधून आपणास या पारंपारिक कृषी संस्कृतीची खरी ओळख मिळते.

या कृषी संस्कृतीचे काही मुद्दे येथे अधोरेखित होतात.

१) द्रोण हा हिरव्या पानाचा असतो, त्याचे काठ अर्थातच हिरवे असतात म्हणजेच तुमच्या शेताचे बांध वृक्ष श्रीमंती ने समृद्ध असावे यांचे हे द्योतक असते. द्रोण बांबूच्या बारीक काडीने शिवलेला असतो. बांबू संवर्धनाचा हा सुद्धा संदेश असतो.

2) द्रोणामधील माती सेंद्रिय शेतीचे प्रतिक असते.

3) या सणामध्ये पारंपारिक बियाणांचेच संवर्धन होते.

४) द्रोणाच्या सहाय्यानी आपणास बियांची रुजवण क्षमता समजते.

५) ज्या बियाणांची रुजवण क्षमता ५० टक्के अथवा कमी असते ते रब्बीला वापरले जात नाहीत.

६) बियाणांची आपापसात देवाण घेवाण होते.

७) ठिबक सिंचनाचे महत्व अधोरेखित होते.

८) मातीत ४० ते ४५ टक्के आद्रता असेल तर रब्बी १०० टक्के यशस्वी उत्पादन देते हे सुद्धा समजते.

९) मातीमधील सेन्द्रिय सत्व योग्य आहे काय ? याची माहिती बी रूजवण्यावरून समजते व त्यानुसार रब्बीच्या पिकाला सेंद्रिय खत द्यावयाचे की नाही हे ठरविता येते.

१०) उपयुक्त जिवाणूचे महत्व लक्षात येते.

११) या पद्धतीत बिज परिक्षण, माती परिक्षण, पाणी परिक्षण याचा अभ्यास तर होतोच पण त्याच बरोबर घरामधील बीज मातेचा सन्मान सुद्धा होतो.

१२) बी रूजवण्याच्या आणि अंकुर वर येऊन पहिले पान व त्याचे प्रकाश संशलेषणाचा कालावधी ९ दिवसाचा असतो.

१३) द्रोणामधील माती आपल्याच शेतामधील आणि पाणी सुद्धा आपल्याच विहिरीचे असावे हे अपेक्षित असते.

आज दुर्दैवाने या सणामागची कृषि संस्कृति लुप्त होत असून फक्त उपवास, नृत्य आणि आवाजाची पातळी वाढली आहे, दुदैवाने यामागची शास्त्रीय बैठक कुणीही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, असे का झाले असावे ?

१) नवरात्री महोत्सव शेतकऱ्याकडून शहरवासीयाकडे हस्तांतरीत झाला आहे.

२) शेतात सेंद्रिय माती आता अभावानेच आढळते.

३) विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

४) खपली गहू, खुरासणी व इतर पारंपारिक रब्बी बियाणे आणि घरोघरच्या बिजमाता लुप्त झाल्या आहेत.

५) शेतांना बांधच अस्तित्वात नाहीत.

६) उपयुक्त जिवाणू नष्ट होत आहेत त्यामुळे मातीची पाणी धारणा संपून तिच्या वाळवंटीकरणाकडे प्रवास सुरू आहे.

पूर्वी नवरात्रीच्या ९ दिवशी माझ्या घरात द्रोणामधील मातीचा सुगंध दरवळत असे. आता कुठेही जा, मातीला रासायनिक दर्पच आहे. नवरात्री हा स्त्रियांच्या सन्मानाचा बीज मातांचा उत्सव, आज आपण घरच्या स्त्रीचे सोन्द्रिय शेती आणि पारंपारिक बीज संवर्धनामधील योगदान स्विकारण्यास तयार नाही हीच खरी शोकांतिका आहे. नवरात्रीचा खरा कृषि संवर्धनाचा अर्थ आणि घरच्या स्त्रीचे देवी रूप आजच्या तरुण शेतकऱ्यांना जाणून घेण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धती आणि वृद्ध मायबापाचा सन्मान होण्यासाठी या सणामागचे विज्ञान समजून घेणे होणे ही काळाची गरज आहे.