Global View- का जिंकली भारतीयांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांची मनं..... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आॅस्ट्रेलियातील भारतीय साॅफ्टपाॅवर}
भारतीयांची कुठली गुणवैशिष्ट्ये भावतात...

का जिंकली भारतीयांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांची मनं.....

डॉ. प्राक्तन वडनेरकर

आज कोणत्या देशावर आक्रमण करून देश जिंकता येत नाही; पण या ज्ञानपरंपरा चालवणाऱ्या, निसर्गाशी नातं जोडणाऱ्या, मूलतः सौम्य असलेल्या भारतीय वंशीयांनी ऑस्ट्रेलियातील नेत्यांची मने जिंकली आहेत....काय आहे हे वास्तव

जगभर सुरू असलेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा टाळता न येणारे वास्तव आहे; पण म्हणतात ना, जिथे सुईने काम होतंय तिथे तलवारीची काय गरज? हे सुईचे काम ऑस्ट्रेलियात ‘सर्वेऽपि सुखिनः सन्तु’ म्हणणारे परदेशात राहायला गेलेले उच्चशिक्षित भारतीय वंशीय करत आहेत. त्यांनी सोबत आणलेली संस्कृतीमूल्ये अँग्लो ऑस्ट्रेलियन समाजाला मोहिनी घालत आहे. आज कोणत्या देशावर आक्रमण करून देश जिंकता येत नाही; पण या ज्ञानपरंपरा चालवणाऱ्या, निसर्गाशी नातं जोडणाऱ्या, मूलतः सौम्य असलेल्या भारतीय वंशीयांनी ऑस्ट्रेलियातील नेत्यांची मने जिंकली आहेत. (Why Indian Origin People getting more acceptance in Australia)

नुकतेच निवडले गेलेले ऑस्ट्रेलियाचे (Australia) पंतप्रधान अँथोनी अल्बनीज यांचा हिंदू चिन्ह असलेला स्कार्फ घातलेला फोटो प्रसिद्ध झाला. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानपदाचे मुख्य दावेदार असलेले नेते, भारतीय हिंदू (Indian Hindus) डायस्पोराचा पाठिंबा मिळवण्यासाठी गेले होते. विशेष म्हणजे कार्यक्रमात त्यांनी घातलेला केशरी स्कार्फ (Saffron Scarf) आणि त्यावर असलेले विश्व हिंदू परिषदेचे चिन्ह. मग काय चर्चा तर होणारच. त्यावर ऑस्ट्रेलियातील सरकारी ‘एबीसी’ चॅनेलवर खूप चर्चा आणि त्याचबरोबर टीका झाली.

भारतीय उजव्या विचारसरणीवर सडकून टीका करणारी ऑस्ट्रेलियन समाजमाध्यमं, याकडे दुर्लक्ष करतील, असं वाटणं मूर्खपणाचंच आहे. त्यात हिंदू कौन्सिलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जाताना त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाईल, याचा अंदाज अल्बनीजसारख्या तीन दशक राजकारणात मुरलेल्या नेत्याला नसावा, हेही तसं शक्य नाही. इथे प्रश्न पडतो, ऑस्ट्रेलियन बहुसांस्कृतिक शहरात स्थानिक व्हाईट सुप्रीमसीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा रोष पत्करून ऑस्ट्रेलियन भारतीय समाज हा इलेक्शन कॅम्पेनचा महत्त्वाचा भाग का असावा? नक्कीच याचे उत्तर तितकं सोप्पं नाही.

इंडो-ऑस्ट्रेलियन मतदारांवर प्रभाव टाकणारे सध्याचे पंतप्रधान अल्बनीज हे एकटेच नाहीत. माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीदेखील निवडणुकीच्या आधी त्यांच्या जवळच्या मित्रासाठी, म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी केलेली खिचडी आणि त्यावर केलेले ट्विट हेदेखील माध्यमांच्या चर्चेत होते. जरी हे ट्विट सिम्बॉलिक असले, तरी इंडो-ऑस्ट्रेलियन समाजातून याचे स्वागत होईल, हे अपेक्षित होते. म्हणूनच की काय इंडो ऑस्ट्रेलियन समाजाने लाडक्या ‘नमो’ नावाप्रमाणे स्कॉट मॉरिसन यांना ‘स्कोमो’ हे नाव दिले.

२०२२ मध्ये झालेल्या केंद्रीय निवडणुकीमध्ये (Elections) लिबरल आणि लेबर या दोन मुख्य राजकीय पक्षांनी भारतीय वंशाच्या मतदारांना आकर्षित करण्याचे केलेले प्रयत्न हे विशेष दिसून आले. प्रमुख नेत्यांनी भारतीय प्राबल्य असलेल्या पश्चिम सिडनी या मेलबर्न शहरातील प्रचार फेऱ्या या नक्कीच दिशाहीन नव्हत्या. यामध्ये ऑस्ट्रेलियातील हिंदू कमिशनच्या माध्यमातून भारतीय समाजाला मायग्रेशनमधील येणाऱ्या समस्या जाणून घेणे अथवा स्वस्तिकसारखी हिंदू अस्मितेची चिन्हे, बॅन न करणे यांसारखे अनेक विषय होते.

२०१० ते २०२० या मागील दशकात भारतीय वंशाच्या लोकांमध्ये झालेली दुपटीने वाढ हे यामागील मुख्य कारण आहे. २०११ मध्ये भारतीय वंशांच्या लोकांची साडेतीन लाखांची लोकसंख्या, आज २०२२ पर्यंत साडेसात लाखांच्या घरात पोचली आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटनुसार स्थलांतरितांपैकी प्रत्येक पाच लोकांमागे एक भारतीय आहे. म्हणजेच भारतीय स्थलांतरितांचे प्रमाणही खूप आहे. इथे विशेष हे की, याच काळात चायनीज ऑस्ट्रेलियन लोकांची संख्या फक्त दोन लाखांनी वाढली.

ऑस्ट्रेलियात मतदान (Voting) सक्तीचे आहे, याचाच परिणाम असा आहे की एकूण लोकसंख्येच्या २.८ टक्के असलेला भारतीय समाज हा येथील स्थानिक नेत्यांना चिनी डायस्पोरापेक्षा जास्त महत्त्वाचा वाटू लागला आहे. याचंच प्रतिबिंब येथील निवडणूक प्रक्रियेतही दिसून आलं. २०२२ मध्ये झालेल्या केंद्रीय निवडणुकीत १०० नॉन-युरोपियन लोकांनी निवडणूक लढवली. त्यापैकी दोन-तृतितांश हे भारतीय वंशाचे लोक हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्याचप्रमाणे त्याआधीच्या म्हणजेच, २०१९ च्या संसदेत भारतीय वंशाचे २१ लोक हे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच ऑस्ट्रेलियन राज्यसभेत होते. तसेच सहा भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियन हे सिनेटमध्ये म्हणजेच लोकसभेत लोकांनी निवडून पाठवले होते.

फक्त केंद्रीय निवडणुकीतच नाही, तर राज्यांच्या निवडणुकीत तसाच काहीसा ट्रेंड येथील स्थानिक लोकांनी दाखवला. व्हिक्टोरिया राज्यात २०१८ सालच्या निवडणुकीत ३७ (१४ लेजिस्टेटिव्ह असेम्ब्ली आणि १४ लेजिस्टेटिव्ह कौन्सिल); तर न्यू साऊथ वेल्स राज्याच्या २०१९ च्या निवडणुकीत १७ (११ लेजिस्टेटिव्ह असेम्ब्ली आणि ६ लेजिस्टेटिव्ह कौन्सिल) भारतीय वंशाचे लोक निवडून गेले होते. हे झाले केंद्रीय आणि राज्यांच्या निवडणुकीबाबत.

यापेक्षा जास्त प्रमाणात भारतीय वंशाचे लोक हे महानगपालिकेच्या निवडणुकीत उभे होते. २०१६-२०१७ मध्ये ३३ भारतीय वंशांचे नगरसेवक न्यू साऊथ वेल्स राज्यात; तर १२२ व्हिक्टोरिया राज्यात निवडून आले. जिथे एकूण लोकसंख्येच्या फक्त तीन टक्के भारतीय समाज आहे, अशा ठिकाणी हे प्रमाण भारतीय वंशांच्या वाढत्या प्रभावाची आणि स्वीकारार्हतेची ग्वाही देते;
मात्र संख्येनी तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चायनीज ऑस्ट्रेलियन समाजाबाबत प्रभाव दिसून येतो; पण स्वीकारार्हता मात्र तितकीशी दिसून येत नाही.

हेही वाचा: ..महासत्ता बनायचे तर गरज आहे सावरकरांचे हिंदुत्व समजून घेण्याची

सिडनी मेलबर्नसारख्या शहरांच्या भागात चिनी वंशीयांचा प्रभाव नक्कीच आहे आणि तो दिसूनही येतो. जगभरात विकल्या जाणाऱ्या स्वस्त चायनीज वस्तूंची दुकाने इथेही लोकप्रिय आणि कोपऱ्याकोपऱ्यावर दिसून येतील; पण त्या स्वस्त वस्तू वापरून चीनबद्दलची धारणा बदलत नाही. कित्येक भागात तुम्हाला दुकानांवरील नावाच्या पाट्यादेखील चायनीज भाषेत लिहिलेल्या दिसतील. त्याने चिनी वंशीयांबद्दल अधिक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. शहरांमधील वाढणारे अशी चायना टाऊन्स नक्कीच स्थानिक लोकांसाठी चिंतेचा विषय आहे.

२०१९ मध्ये पहिला चायनीज वंशांचा ऑस्ट्रेलियन हा संसदमध्ये निवडून गेला आणि तोदेखील त्याच्या चायना कम्युनिस्ट पार्टीसोबत असलेल्या त्याच्या संबंधामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला. या व्यतिरिक्त कोविड-१९ नंतर चायनीज वंशीयांबद्दल सामान्य अँग्लो-ऑस्ट्रेलियन माणसाच्या मनात रागाची भावना अजून वाढली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन चिनी वंशीयांचा विरोधाचा रंग दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे.

मग भारतीय समाजाबद्दल असं काय वेगळं आहे की, ज्यामुळे येथील नेत्यांना आणि स्थानिकांना भारतवंशीय जास्त जवळचे वाटतात. भारतीय वंशाच्या लोकांबरोबर, अँग्लो-ऑस्ट्रेलियनदेखील हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाकडे आकर्षित झालेले दिसतात. विशेष करून कर्म, अध्यात्म यांसारखे तत्त्वज्ञान आणि शाकाहार हे त्यांना खूप विलक्षण वाटतात. कोणत्याही धर्मगुरूशिवाय, एखादे विशेष नियमाचे धार्मिक पुस्तक नसलेला आणि सर्व प्रथा, संस्कृती आपलीशी करणारा हा धर्म आधुनिक तरुण पिढीला खूप जास्त आवडतो, म्हणून काय तर अनेक ठिकाणी तरुण अँग्लो ऑस्ट्रेलियन कीर्तनाच्या कार्यक्रमांना गर्दी करताना दिसतात. योगदेखील खूप लोकप्रिय असून योग शिकवणारे क्लासेस आणि क्लब, हे जागोजागी दिसून येतात.

या गोष्टीची आवड निर्माण करण्यास मुख्य कारणीभूत आहेत ती ऑस्ट्रेलियात वाढलेली हिंदू मंदिरं. १९७१ मध्ये कृष्णाचे पहिले इस्कॉन मंदिर सिडनीमध्ये सुरू झाले. आज ऑस्ट्रेलियात एकूण ५१ हिंदू मंदिरं आहेत, ज्यामध्ये गणपती, दुर्गा, हनुमान, कृष्ण, मुरुगन आणि शिर्डी येथील साईबाबा यांची मुख्य मंदिरं असून तिथे येणारा भाविकदेखील विविध रंगाचा, वेगळ्या भाषा बोलणारा त्याचबरोबर विविध वंशाचा दिसून येतो. इस्कॉन आणि स्वामिनारायण मंदिरात आयोजित केले जाणारे जन्माष्टमी, होळी आणि रथयात्रा नक्कीच आकर्षणाच्या केंद्रस्थानी असतात. त्याचबरोबर रंगीबेरंगी, खादीचे कपडे घेण्याचा ट्रेंड तरुण मुलांमध्ये दिसून येतो. एकूणच ही मंदिरं भारतीय संस्कृतीची राजदूत बनली आहेत.

अँग्लो ऑस्ट्रेलियन लोकांना जरी वरवर हा भारतीय हिंदू समाज एक दिसत असला, तरी पण अगदी भारताप्रमाणे येथील हिंदू समाज हा विविधतेने भरला आहे आणि हे ऑस्ट्रेलियन नेतेमंडळी चांगलेच जाणून आहेत. गुजराती समाजाची स्वामिनारायण मंदिरं, पंजाबी समाजाच्या गुरुद्वारा, तमिळ या साऊथ इंडियन लोकांची साईबाबा, शंकर आणि मुरुगन मंदिर अशी विभागणी सहज दिसून येते. मराठी भाषकांचेदेखील गणपती किंवा दिवाळीसारखे कार्यक्रम होतात. आजकाल पुण्या-मुंबईसारखी ढोल पथकेदेखील सिडनीसारख्या शहरात स्थापन झाली आहेत; पण एकूणच त्याला ती भव्यता नसते.

आज पंजाबी आणि हिंदी भाषकांची संख्याही भारतीय वंशीयांमध्ये जास्त आहे. पंजाबी समाजाच्या मागील अनेक पिढ्या या ऑस्ट्रेलियात आहेत. त्याचबरोबर व्यावसायिकतेसाठी ओळखला जाणारा गुजराती समाज, हा सधन आहे. हे येथील ऑस्ट्रेलियन नेत्यांना चांगले माहिती आहे. म्हणूनच की काय, ते आवर्जून या मतदारांसाठी स्वामिनारायण मंदिरं किंवा गुरुद्वारांना भेटी देताना दिसतात.

हेही वाचा: 'ग्राममंगल मुक्तशाळा' मुलांच्या कलांनी शिक्षण देण्याची आदर्श पद्धती

भारतीय ऑस्ट्रेलियन लोकांनी सोबत आणलेली खाद्यसंस्कृतीही पोषक ठरते आहे. मसालेदार उत्तर भारतीय, विशेष लहेजा असलेले दक्षिण भारतीय जेवण हे आंग्ल-ऑस्ट्रेलियन समाजाच्या विशेष आवडीचे आहे. अन्नाच्या माध्यमातून एखाद्याचे हृदय जिंकायचा हा तो प्रयत्न.
कॉलोनीयल इतिहासामुळे, भारतीय-ऑस्ट्रेलियन हे अस्खलित इंग्लिश बोलू शकतात. त्याचबरोबर ते त्यांच्या मूळ भाषाही बोलतात. याचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय फायदे नक्कीच या समाजाला मिळतात. भारतीय ऑस्ट्रेलियन समाज हा उच्चशिक्षित असून, २०१६ च्या सर्वेक्षणानुसार जवळपास ३७ टक्के लोक हे व्यावसायिक असून १३ टक्के लोक हे मॅनेजरच्या हुद्द्यावर काम करतात.

हेच प्रमाण इतर कोणत्याही वंशाच्या लोकांपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात येणाऱ्या विद्यार्थ्यीपॆकी १२ टक्के विद्यार्थी हे भारतीय असतात आणि हे ऑस्ट्रेलियन सरकारच्या तिजोरीत कमीत कमी सहा-सात बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर जमा करतात. लोकहितवादी म्हणायचे, जिथे समाज शिक्षित आणि जागरूक आहे तिथले सरकार हे तुमचे सेवक म्हणून काम करतात. हे जगभरात दिसून येते आणि हे इथे ऑस्ट्रेलियातही तितकेच खरे आहे.

असं म्हणतात, मूळ स्थानिक ऑस्ट्रेलियन म्हणजेच अबोरिजिनल या ऑस्ट्रेलिया बेटावर मागील ६५ हजार वर्षांपासून राहतात. २०१३ मध्ये झालेल्या जेनेटिक संशोधनात असे दिसून आले की, या मूलनिवासी लोकांचा बाहेरील जगाशी संपर्क प्रथम चार हजार वर्षांपूर्वी आला आणि ते लोक भारतीय होते. म्हणजे भारतीय आणि ऑस्ट्रेलिया खंडाचा संबंध आणि इतिहास हा जवळपास १४१ पिढ्यांचा आहे आणि ते अनेक गोष्टीतून दिसूनही येते.

अबोरिजिन समाजामध्ये काही स्थानिक झाडे आणि काही विशेष पदार्थ यांना अग्नी देण्याची प्रथा आहे. त्याने इडा-पिडा पळून जातात, अशी त्यांची धारणा आहे. त्याबरोबर अनेक झाडांचा उपयोग हा समाज वैद्यकीय उपचारांसाठी करतो. भारतातील हवन आणि आयुर्वेद यांच्या जवळ जाणारी ही प्रथा आणि धारणा आहे. त्याचबरोबर या धारणा भारतातील हिंदू धर्माप्रमाणे निसर्ग, प्राणी आणि भूगोल यांच्याशी संबंधित आहेत.

नॅशनल जिओग्राफिकचे प्रसिद्ध छायाचित्रकार फ्रान्स लँटिंग भारतात फिरल्यानंतर असं म्हणतात, ‘‘भारतात सर्वत्र जीवन एका अध्यात्मिक परिमाणाने भरलेले आहे, जे लोकांना निसर्गाशी अनोख्या पद्धतीने जोडते. या संस्कृतीत, सर्व जीवन आणि निसर्गाचा विचार एका धाग्याने जोडलेला आहे. जगाबद्दल विचार करण्याची ही एक वेगळी पद्धत आहे. ही अशीच निसर्गाशी जुळलेली दैनंदिन दिनचर्या येथील अबोरिजनल माणसाची असते. भारतीय सामान्यत: इतरांशी सुसंवाद आणि ऐक्याला महत्त्व देतात, त्यांच्या समुदायाशी आणि नातेवाईकांशी मजबूत संबंध ठेवतात. वडीलधाऱ्यांचा मान, कुटुंबाचे महत्त्व यांसारख्या अनेक गोष्टींमुळे, त्याचबरोबर भारतीय माणसाच्या स्किन टोनमुळेदेखील अबोरिजिनल समाजाला भारतीय समाज, अँग्लो-ऑस्ट्रेलियन समाजापेक्षा जास्त जवळचा वाटतो.

आणि शेवटी पण सर्वात महत्त्वाचे, म्हणजे भारताचे वाढलेले सामरिक आणि आर्थिक बळ. भारत हा जपान-अमेरिका-ऑस्ट्रेलिया यांच्यासह ‘क्वाड’चा सदस्य आहे. हिंद-प्रशांत महासागरात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाला शह देण्यासाठी स्थापन झालेली ही चार देशांची संघटना. यात भारताचा सहभाग हा कदाचित सर्वात महत्त्वाचा आहे. आज भारतात ३० नवीन युनिकॉर्न स्टार्टअप्स असो या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये भारताचे योगदान कोणी नाकारू शकत नाही. कमला हॅरिस असो वा सुनीता विल्यम्स किंवा सुंदर पिचाई असो किंवा सत्या नाडेला, एकूणच जागतिक अर्थकारणाच्या आणि कंपन्यांच्या भरभराटीत भारतीयांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान खूप मोठे आहे.

बळाचा वापर न करता हवी ती दीर्घकालीन धोरणात्मक उद्दिष्टे आणि इंटरेस्ट साध्य करणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. आज जगभर सुरू असलेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा हे न टाळता येणारे वास्तव आहे; पण म्हणतात ना, जिथे सुईने काम होतंय तिथे तलवारीची काय गरज? हे सुईचे काम ऑस्ट्रेलियात ‘सर्वेऽपि सुखिनः सन्तु’ म्हणणारी परदेशात राहायला गेलेली उच्चशिक्षित भारतीय वंशीय करत आहेत. त्यांनी सोबत आणलेली संस्कृतीमूल्ये अँग्लो ऑस्ट्रेलियन समाजाला मोहिनी घालत आहे. आज कोणत्या देशावर आक्रमण करून देश जिंकता येत नाही; पण या ज्ञानपरंपरा चालवणाऱ्या, निसर्गाशी नातं जोडणाऱ्या, मूलतः सौम्य असलेल्या भारतीय वंशीयांनी ऑस्ट्रेलियातील नेत्यांची मने जिंकली आहेत.