

Economic reforms of 1991 and their impact on Indian foreign policy
esakal
समाजात वर्तमानाबद्दल न्यूनगंड आणि भविष्याबद्दल अनिश्चितता वाढायला लागली की इतिहासाला नेहमीच अवाजवी महत्त्व येतं. सोव्हिएत युनियनचे तुकडे झाल्यावर चीनचे नेते दंग यांना अमेरिका आता आपल्याविरुद्ध कारवाया करणार, अशी भीती वाटू लागली. याला उत्तर म्हणून ताकद वाढवण्याबरोबरच त्यांनी चिनी इतिहासाची पुनर्रचना केली. पाश्चात्य देश चीनचे शत्रू आहेत असा आक्रमक राष्ट्रवाद मांडायला सुरुवात केली. याचाच परिणाम म्हणून १९९१ नंतरचा मोठा काळ पूर्व आशियातलं राजकारण दक्षिण चीन समुद्र, आणि तैवान यांभोवती फिरत राहिलं.
२६ डिसेंबर १९९१... या दिवशी सोविएत युनियन आणि शीतयुद्ध दोन्ही इतिहास जमा झाले. आजवरच्या इतिहासात कोणत्याही देशाला न मिळालेला जगातली एकमेव महासत्ता बनायचा मान अमेरिकेला मिळाला. या ऐतिहासिक काळात भारत मात्र चाचपडत होता. १९८५ मध्ये राजीव गांधींनी अर्थव्यवस्थेला गती आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून देशांतर्गत गुंतवणुकीला सुरुवात केली. १९८९ ते १९९१ दरम्यानच्या अस्थिर राजकीय काळात आर्थिक शिस्तीकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे देशावरचा कर्जाचा डोंगर वाढत गेला. १९९०-९१ दरम्यान झालेल्या पहिल्या आखाती युद्धामुळे तेलाच्या किमती आकाशाला भिडल्या. परिस्थिती इतकी गंभीर होती की भारताकडे फक्त दोन आठवडे आयात करता येईल इतकंच परकीय चलन शिल्लक होतं. अशातच १९९१ ला राजीव गांधींची हत्या झाली. लोकशाहीत एखाद्या नेत्याला पर्याय नाही असं कधीच होत नसतं. परिस्थिती नेत्यांना घडवते आणि अनपेक्षितपणे पर्याय उभा राहतो. यावेळीही राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत असलेले पी. व्ही. नरसिंहराव कोणाच्याही ध्यानीमनी नसताना पंतप्रधान झाले.