

R K Laxman Birth Anniversary
esakal
आलोक
कावळा हा आर. के. लक्ष्मण यांचा सर्वात आवडीचा पक्षी. त्यांच्या घरातल्या भिंतीवर कावळ्यांची पेंटिंग्स लावली होती. एकदा त्यांच्या घरात बरेच पाहुणे आले होते. एका लहान मुलाने जड वस्तू घेऊन त्या कावळ्याच्या फ्रेमवर फेकली! त्या मुलाला तो कावळा खरा वाटला! हा प्रसंग म्हणजे माझ्या चित्राला मिळालेली सर्वात मोठी दाद, असं लक्ष्मण म्हणायचे.
माणूस चांगला असल्याशिवाय त्याचा विनोद चांगला होऊ शकत नाही.. ती संवेदना असावी लागते.. संवेदना नसली तर तो विनोद उथळ वाटतो, अश्लील वाटतो, बालिश वाटतो. दुःख नीट समजल्याशिवाय विनोद नीट करता येत नाही, हे शास्त्र आहे.. कारण खऱ्या विनोदाचा उगम हा दुःखातूनच होतो. हे शास्त्र डोक्यात ठेवून जेव्हा मी आर. के. लक्ष्मण यांच्या कामाकडे बघतो, तेव्हा मला ते फार श्रेष्ठ वाटतात. आज (ता. २४) त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त..
वर्ष असावे १९८०. अमेरिकन कार्टूनिस्ट रॅनन ल्यूरी भारतात आले होते. भारतातील प्रमुख व्यंगचित्रकारांची भेट घेण्याचे त्यांनी ठरवले. आर. के. लक्ष्मणांच्या कारकिर्दीचा तो सुवर्णकाळ होता. ल्यूरीनी आरकेंना विचारले, ‘‘मिस्टर लक्ष्मण, भारतातील एक नंबरचा कार्टूनिस्ट कोण?’’ आरके म्हणाले, ‘‘मी!’ ...ल्यूरी हसले. म्हणाले, ‘‘ओके. दोन नंबरचा कोण?’’ आरके म्हणाले, ‘‘मी!’’.. ‘‘तीन?’’... ‘‘मी’’...‘‘चार?’’ ‘‘मी!’’...दहा नंबरपर्यंत आरके स्वतःचच नाव घेत राहिले... अतिशय गंभीर चेहऱ्याने..!