

Raghav Chadha AAP Dispute
esakal
सुनील चावके, ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून अरविंद केजरीवाल यांच्याविषयीच्या आकर्षणाला ओहोटी लागली असताना राघव चढ्ढा यांच्या राजकीय ‘टीआरपी’ला झळाळी लाभली. केजरीवालांनी गमावलेल्या काही महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी हा एक.
जनलोकपाल आंदोलनाचे विसर्जन होऊन अण्णा हजारे यांच्याशी काडीमोड घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या ‘आम आदमी पार्टी’ने १४ वर्षांच्या काळात केंद्रातील सरकारांच्या विरोधात आवाज उठवून अनेक आश्वासक चेहरे देशाच्या राजकारणात प्रस्थापित केले आणि दोन राज्यांमध्ये प्रचंड बहुमताची सरकारे स्थापन करून अल्पावधीत राष्ट्रीय पक्ष होण्याची करामत साधली. पण ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास टाकला तेच सर्वांत आधी केजरीवाल यांच्यापासून दुरावले. राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटविण्यात आलेले राघव चढ्ढा हे त्याचे ताजे उदाहरण. केजरीवाल यांची संशयी वृत्ती, केंद्रातील सत्तेचा वापर करुन सर्वच प्रतिस्पर्धी पक्षांतील दुसऱ्या फळीतील नेत्यांवर दबाव टाकण्याची भाजपची रणनीती आणि अल्पावधीत यशाच्या शिखरावर पोहोचल्यामुळे अशा नेत्यांची वाढलेली राजकीय महत्त्वाकांक्षा त्यास कारणीभूत ठरली.