
राहुल गांधींनी काँग्रेसच्या पक्षसंघटनेची बांधणी करून महत्त्वाची पदे बहाल केल्याशिवाय काम करायचे नाही, या नकारात्मक मानसिकतेत वावरणारे काँग्रेसजन रस्त्यावरील आंदोलनाविषयी गेल्या बारा वर्षांपासून उदासीन राहिले आहेत.
गे ल्या दीड वर्षांमध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील कथित गैरप्रकार आणि बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या वादग्रस्त विशेष सखोल पुनरावलोकनामुळे संभाव्य मतचोरीचा आरोप अशा दोन्ही मुद्यांना हात घालून राहुल गांधी यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांमध्ये तथ्य वाटल्याने भारतीय निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी ११ ऑगस्ट रोजी काढलेल्या मोर्चात संसदेतील विरोधी पक्षांचे तीनशेहून अधिक खासदार रस्त्यावर उतरले.
पाठोपाठ १७ ऑगस्टपासून बिहारमध्ये मतचोरीच्या विरोधात राहुल गांधींनी सुरु केलेल्या दोन आठवड्यांच्या व्होटर अधिकार यात्रेमध्ये लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने पूर्ण ताकदीने झोकून देत ती यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. या यात्रेला बिहारच्या जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मुख्यतः राहुल गांधी यांना बघण्यासाठी आणि त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांच्या समर्थनासाठी गर्दी झालेली दिसत आहे.