
डॉ. एस. एन. पठाण
रमजानच्या महिन्यात तीस दिवस उपवास केल्याने माणसाची सहनशक्ती व संयम यांची वृद्धी होते. माणसामध्ये असलेले राग, लोभ, मद, मोह, मत्सर आणि विकृती यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याग करण्याची मानसिकता उपवासामुळे निर्माण होते, म्हणून रमजानचे उपवास म्हणजे माणसाच्या आत्मशुद्धी किंवा चित्तशुद्धीची पर्वणीच म्हणावी लागेल.
जरत मुहंमद पैगंबर यांनी १४०० वर्षांपूर्वी सौदी अरेबियाच्या वाळवंटात परमेश्वराच्या आज्ञेनुसार इस्लाम धर्माची मुहूर्तमेढ रोवली. अरबस्तान अज्ञानाच्या गाढ अंधकारात, अंधश्रद्धेत, लोकभ्रमात व अनाचारात गुरफटून गेला होता. त्याच अरबस्तानात इस्लाम धर्माचा भाग्यसूर्य उदयाला आला व त्याच वालुकामय देशाने इस्लाम धर्माच्या माध्यमातून साऱ्या जगाला सौख्य व शांतीचा संदेश दिला.