ravi amale writes psychology of tv debates trp ratings
ravi amale writes psychology of tv debates trp ratings

टीव्ही डिबेटच्या मासळी बाजाराचे मानसशास्त्र!

नैतिकतेच्या नावाने जे आजवर नाकाने कांदे सोलत होते, ते राष्ट्रभक्तीचे आणि सत्याचे आणि न्यायाचे स्वयंघोषित मक्तेदारही भ्रष्ट आचाराच्या चिखलाने नखशिखांत लिप्त असल्याचे पाहून वृत्तवाहिन्यांच्या प्रेक्षकांचे खचितच आणखी मनोरंजन झाले असेल. स्नानगृहात सारेच दिगंबर असतात अशी एक म्हण आहे. त्याचा प्रत्ययही या निमित्ताने अनेकांना आला असेल. या म्हणजे-टीआरपी घोटाळ्याच्या निमित्ताने.

टीआरपी ही दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या विश्वातील कळीची संज्ञा. टीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट. एखाद्या वाहिनीवरचा एखादा कार्यक्रम किती प्रेक्षकांनी पाहिला, ते प्रेक्षक नेमक्या कोणत्या सामाजिक आणि आर्थिक गटातले आहेत, त्यांनी किती वेळ तो कार्यक्रम पाहिला. थोडक्यात कार्यक्रमाची लोकप्रियता, त्याची खिळवून ठेवण्याची क्षमता आणि तो पाहणाऱ्या प्रेक्षकांचा दर्जा हे सारे टीआरपी सांगतो. ते वाहिन्यांसाठी खूप महत्त्वाचे असते. कारण ते जाहिरातदारांसाठी महत्त्वाचे असते. जाहिरातदार एखाद्या कार्यक्रमास जाहिरात देतात ते हा टीआरपी पाहून. या टीआरपीचे काम पाहते बार्क म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल. तर काही वृत्तवाहिन्यांनी-त्यात रिपब्लिक टीव्ही ही वाहिनी महत्त्वाची-आपले कार्यक्रम अधिक लोकप्रिय आहेत हे जाहिरातदारांना दाखविण्यासाठी त्यात घोटाळे केले. बार्ककडे खोट्या आकडेवारीची नोंद होईल अशा काही क्लृप्त्या वापरल्या, असा आरोप आहे. त्यावरून आता पोलिस तपास सुरू आहे. 

या घोटाळ्याच्या मुळाशी अर्थातच अर्थकारण आहे. फिक्की (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) नावाची उद्योजकांची संघटना आहे. तिच्या 2019च्या अहवालानुसार, भारतातील माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राचा आकार आहे एक लाख 82 हजार कोटींचा. त्यातील दूरचित्रवाणी क्षेत्र आहे 78 हजार 800 कोटी रुपयांचे. तर यातील मोठ्यातला मोठा लोण्याचा गोळा आपल्या ताटात यावा यासाठी वाहिन्यांचे भांडण सुरू आहे. टीआरपी घोटाळा जन्मला त्या लोण्याच्या लालसेतून.

ते जेवढे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे, तेवढेच अनैतिकही आहे. पण भ्रष्टाचार ही नव-सामान्यता असल्याच्या या काळात आता काही जण असे म्हणू लागले आहेत, की समजा एखाद्या वाहिनीने केला टीआरपी घोटाळा, तर त्यात सामान्य नागरिकांचे काय नुकसान झाले? आणि तसे नसेल, तर त्याचा एवढा गवगवा करण्याचे कारणच काय?

कारण आहे. वाहिन्या आणि जाहिरातदार यांच्यातील अर्थकारणाशी भलेही आपल्याला फारसे देणे-घेणे नसेल, परंतु टीआरपीवर लक्ष ठेवून जे कार्यक्रम सादर केले जातात, त्यांच्याशी तर एक प्रेक्षक म्हणून आपला संबंध आहेच. अमुक अमुक कार्यक्रमाला वा अमक्या-तमक्या वृत्तवाहिनीला अधिक टीआरपी आहे याच्या जाहिराती केल्या जात असतात, ते काही जाहिरातदारांना समजावे म्हणून नव्हे. जाहिरात कंपन्यांना त्याचे अहवाल बार्कद्वारे परस्पर जातच असतात. या टीआरपीच्या आणि 'आमचाच चॅनेल नंबर वन' वगैरे जाहिराती केल्या जातात त्या प्रेक्षकांना खेचण्यासाठी, भुलविण्यासाठी. या जाहिरातींमागे असते ते प्रोपगंडातील बँडवॅगन तंत्र. 'बघता काय, सामील व्हा' हा संदेश प्रसृत करणाऱ्या या जाहिराती. सगळेच हा कार्यक्रम वा ही वाहिनी पाहात आहेत, तेव्हा तुम्हीही तेच पाहा असे सूचन देणाऱ्या या जाहिराती. त्यांचा परिणाम लोकमानसावर होतच असतो. तेव्हा टीआरपी रेटिंग हे बघ्यांची संख्या वाढविण्यासाठीही वापरले जाते हे लक्षात घेतले पाहिजे.

येथे आपण विचार करीत आहोत वृत्तवाहिन्यांचा. आपल्या या सर्व राष्ट्रीय वृत्तवाहिन्या पाहिल्या, तर एक बाब लगेचच लक्षात येते की तेथे हल्ली बातम्या जरा कमीच असतात. मासिकांमध्ये पूर्वी पानपूरक म्हणून काही मजकूर दिला जात असे. मोकळ्या जागा भरणे हेच त्याचे मुख्य काम. आपल्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरील तथाकथित बातम्यांकडेही हेच महत्कार्य सोपविलेले असते. ते वृत्तनिवेदक-वजा-न्यायाधीश एकच बातमी घाण्याच्या बैलाप्रमाणे फिरवून फिरवून देत तमाम बघ्यांना पिळून काढत असतात ते उगाच नव्हे. तर आपल्या राष्ट्रीय वाहिन्यांवर या अशा बातम्यांहून अधिक महत्त्व दिले जाते ते वादचर्चेच्या कार्यक्रमांना. हे कार्यक्रमच वाहिन्यांना टीआरपी मिळवून देत असतात. सद्यस्थितीत हे टीआरपीचे आकडे किती खरे, किती खोटे हे सांगणे कठीणच. पण गेले सुमारे 172 आठवडे रिपब्लिक टीव्ही रेटिंगच्या स्पर्धेत पहिल्या स्थानी आहे आणि त्यांच्या प्राईम टाईम डिबेट नामक वादचर्चेच्या कार्यक्रमाचा मार्केट शेअर आहे 75.8 टक्के.

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हा प्राईम टाईम डिबेटचा कार्यक्रम म्हणजे सबकुछ अर्णब गोस्वामी. आपण म्हणजेच राष्ट्र अशा भूमिकेतून ते तेथे बोलत वा ओरडत असतात व त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी काहींना अर्णब यांच्या मुद्द्यांची री ओढण्याचे काम असते, तर उरलेल्यांकडे अर्णब यांचे शब्दफटकारे खाण्याची भूमिका असते. बाकी काही सोयच नसते त्यांना. अन्य वृत्तवाहिन्यांवरही यापेक्षा वेगळे चित्र नसते. तेथेही वादचर्चेच्या कार्यक्रमांचे स्वरुप आणि पातळी अशीच असते. आणि यातून आपला प्रेक्षकवर्ग त्याची मते तयार करीत असतो. त्याच्या भूमिकांवर शिक्कामोर्तब करून घेत असतो. वादचर्चेच्या कार्यक्रमांची ही रुपरेषा आपल्या वृत्तवाहिन्यांनी उचललेली आहे अमेरिकेतील फॉक्स न्यूज या वाहिनीकडून. प्रेक्षकांना आपल्याकडे वळविण्यासाठी, आलेल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि अखेरीस प्रेक्षकांना आपणास हव्या त्या विचारांचे बळी बनविण्यासाठी या वाहिन्या काही खास तंत्रे वापरत असतात. टीआरपीचा, लोकप्रियतेचा आणि त्या माध्यमातून प्रेक्षकांवर नियंत्रण ठेवण्याचा हा सारा खेळ समजून घेण्यासाठी या तंत्रांचा परिचय करून घेणे आवश्यक ठरते.

पॅनिक माँगरिंग - समाजात सतत घबराट पसरवायची, सातत्याने भयभावना जागृत ठेवायची आणि त्याद्वारे प्रेक्षकांची तर्कबुद्धी बधीर करून टाकायची. लोकांची तार्किक विचार करण्याची क्षमता कमी झाली की मग ते कशावरही विश्वास ठेवतात.

ऍड-होमिनम - हे एका तर्कदोषाचे नाव. यात केले काय जाते, तर समोरच्या व्यक्तीने एखादा मुद्दा मांडला, की त्याला उत्तर देताना त्या व्यक्तीचे म्हणणे बाजूला ठेवायचे आणि त्या व्यक्तीवरच हल्ला चढवायचा. तिच्यावर चिखलफेक करायची. ती चारित्र्यहीन आहे, विश्वासार्ह नाही, निर्बुद्ध आहे, राष्ट्रद्रोही आहे… अशी टीका करायची. 'तुझा पगार किती, तू बोलतो किती' हे विधान हा त्याचाच एक नमुना. यात काय बोलले यापेक्षा कोण बोलले यावरच भर दिला जातो.

प्रोजेक्शन वा फ्लिपिंग - समोरची व्यक्ती - उदाहरणार्थ बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असे म्हणत असेल, तर या तंत्रात काय केले जाते, तर ती व्यक्तीच बलात्काऱ्यांची समर्थक असल्याचा आरोप केला जातो. म्हणजे त्या व्यक्तीचे मतच उलटून टाकायचे.

स्केपगोटिंग - हे पॅनिक माँगरिंगसारखेच तंत्र. त्यात समोर एक शत्रू उभा केला जातो. तोच आपल्या सगळ्या समस्यांना कारणीभूत असल्याचे मांडले जाते आणि म्हणून त्याच्याविरोधातील हिंसाचार, त्यांचे पशूकरण न्याय्यच आहे अशी भावना निर्माण केली जाते.

इतिहासाचे पुनर्लेखन - ऐतिहासिक तथ्ये काहीही असोत, ती आपल्या विचारांच्या, भूमिकांच्या, मतांच्या साच्यात घट्ट बसवायची. त्यासाठी त्या तथ्यांची मोडतोड करावी लागली तरी बेहत्तर. सत्योत्तरी सत्य म्हणतात ते हेच.

पॉप्युलिझम - आपण म्हणजेच समाज, आपण म्हणजेच राष्ट्र, अशी भूमिका घेऊन समोरच्याला प्रश्न विचारायचे. आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत असे प्रेक्षकांच्या मनावर ठसवायचे. 'नेशन वॉन्ट्स टू नो' हा त्याचाच एक भाग.

वादचर्चेत या तंत्रांचा वापर तर केला जातोच, पण हे कार्यक्रम आपल्या प्रेक्षकांना बांधून ठेवणारे असावेत, त्यांच्या मनातील राग, भय, द्वेष आदी भावनांचा परिपोष करणारे असावेत यासाठी त्यांचे एक खास स्वरूपही तयार करण्यात आलेले असते. त्यातील पहिला भाग असतो वादचर्चेच्या मांडणी वा फेरमांडणीचा. फ्रेमिंग वा रिफ्रेमिंगचा. हे कसे केले जाते, तर चर्चेसाठी तोच विषय घ्यायचा जो प्रेक्षकांना आकर्षित करील. पण त्याची चौकट मात्र आपल्याला हवी तशीच निर्धारित करायची. त्या चर्चेचे निष्कर्षही आधीच नक्की करायचे. वादचर्चेचा मथळा वा त्यासाठी वापरले जाणारे ट्विटर हॅशटॅग हे पाहिले की हा मुद्दा लक्षात येईल. एकदा निष्कर्ष नक्की ठरला म्हणजे मग तो मान्य असलेले प्रेक्षक तेथे चिकटून बसणारच.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता या चर्चेत भांडण्यासाठी 'पॅनेलिस्ट' हवेत. ते निवडतानाही चलाखी करायची. आपल्या बाजूने तगडे विवादपटू बसवायचे आणि विरोधी बाजू मांडण्यासाठी तुलनेने किरकोळ वा मुखदुर्बळ तज्ञ बसवायचे. आपल्या बाजूने टीव्ही-स्मार्ट अशी माणसे बसवायची आणि विरोधी बाजूला टीव्हीच्या पडद्यावर शोभून दिसणार नाहीत अशा व्यक्ती बसवायच्या. चर्चेत त्यांचे आवाज दडपायचे. त्यांना फारसे बोलूच द्यायचे नाही.

आणि यानंतर येते विषयाची मांडणी वा फेरमांडणी. ती आपल्याला सोयीस्कर अशीच करून घ्यायची. मुद्द्यांना फाटे फोडायचे. ते भावनेच्या पातळीवर न्यायचे. आणि त्या हिंदोळ्यावर मग लोकमानसाला हवे तसे झुलवायचे आणि सत्य नियंत्रित करायचे.

एरवी वादचर्चेचे कार्यक्रम हे गंभीरपणे व्हावेत अशी एक अपेक्षा असते. पण या वृत्तवाहिन्यांनी ती केव्हाच धुळीला मिळविलेली आहे. आरडाओरडा, शिवीगाळ, चिखलफेक, तथ्यांचे विरुपन, सत्याची मोडतोड, अर्धसत्यांचा सुकाळ यातून प्रेक्षकाच्या हाती अखेर काय लागणार? तर केवळ मनोरंजनाचे सुख. आपल्या विरोधी मते असलेल्या कुणाला कुणी तरी ठोकून काढल्याचे सुख. रस्त्यावर भलत्याच कुणाचे तरी भांडण पाहिल्यानंतर मिळणारा विकृत आनंद आणि हे मनोरंजन यांची जातकुळी एकच. यातूनच असे कार्यक्रम लोकप्रिय होत असतात. टीआरपीचा खेळ गुंफला जातो तो त्यांभोवती. त्याचे दोन हेतू. एक म्हणजे जाहिरातदारांना आकर्षित करून पैसे मिळविणे आणि दुसरा हेतू - हा कार्यक्रम लोकप्रिय आहे असे भासवून अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करून घेणे.  आता या सगळ्या खेळात सुजाण नागरिक म्हणून आपण कुठे असतो? प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे असाच हा प्रश्न आहे. अखेर हा आपली तर्कबुद्धी, विवेकशक्ती शाबूत ठेवण्याचा प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com