हौस ऑफ बांबू : रिकाम्या खुर्च्या, कोरी पुस्तके आणि एक संमेलन...!

प्रिय आदरणीय गिरीशभाऊ महाजन, स्वागताध्यक्ष, ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, अमळनेर, यांसी अनेकानेक नमस्कार. मी एक साधासुधा, धडपड्या (पण, पुण्याचा) प्रकाशक असून मराठी भाषेची यथाशक्ती (पक्षी : आंतरराष्ट्रीय पातळीवर) सेवा करीत आहे.
ravindra shobhane chairman of amalner 97th akhil bharatiya marathi sahitya sammelan
ravindra shobhane chairman of amalner 97th akhil bharatiya marathi sahitya sammelanSakal

नअस्कार, साहित्य संमेलनाचे सूप वाजले तरी त्याचं कवित्व संपत नाही. त्यातही प्रकाशकमंडळी खूपच रागावलेली आहेत, असं कानावर होतं. पण कविसंमेलन, भाषणे, भोजन या गडबडीत त्यांकडे लक्षच गेलं नाही, त्यामुळं ते नक्की का रागावले आहेत, हे मी कसं सांगू? पण एक पत्रच माझ्या हाती लागलं, तेच इथे देत आहे.- कु. स.चं.

प्रिय आदरणीय गिरीशभाऊ महाजन, स्वागताध्यक्ष, ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, अमळनेर, यांसी अनेकानेक नमस्कार. मी एक साधासुधा, धडपड्या (पण, पुण्याचा) प्रकाशक असून मराठी भाषेची यथाशक्ती (पक्षी : आंतरराष्ट्रीय पातळीवर) सेवा करीत आहे. अमळनेरच्या संमेलनात तुम्ही राहण्या-जेवणाची सोय उत्तम ठेवलीत, याबद्दल आभारी आहे. हवा छान होती, चहाही मस्त होता. पण अमळनेरहून परत (पुण्याला) आल्यानंतर पाठ धरली आहे!

गिरीशभाऊ, आम्हा प्रकाशकांसाठी तुम्ही संमेलनाच्या निमित्ताने जे पुस्तकविक्रीचे गाळे उपलब्ध करुन दिले, त्या गाळ्यांवरुन आता आमचा अखिल भारतीय प्रकाशक संघ किती गाळ्या खाऊन ऱ्हायला आहे, याची कल्पना आहे का?

कुणाचीही हजार-पाश्शेचीही विक्री झाली नाही!! एकाच प्रकाशकाने (नाव अज्ञात आहे) पंचवीस हजारांची विक्री झाल्याचा दावा केला. तोदेखील खोटा असावा, स्पर्धेतील इतर प्रकाशकांची जळवण्यासाठीच हा आकडा फेकला गेला असणार. कारण आम्ही सगळेच तिन्ही दिवस मच्छर मारण्याच्या रॅकेट घेऊन तिथे नुसते बसून होतो.

एकतर संमेलनाच्या मुख्य मांडवापासून पुस्तक विक्री व प्रदर्शनाचे ठिकाण लांब अंतरावर होते. मांडवात आधीच रिकाम्या खुर्च्या अधिक! थोडेथोडके बसलेले उठून पुस्तकांकडे कशाला फिरकतील? त्यात नियोजनात आणखी एक मोठा घोळ झाला होता, त्याकडे लक्ष वेधतो. :

पुस्तकांचे गाळे जिथे होते, तिथे पोचण्यापूर्वी खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले होते. मग बरेचसे रिकामे गाळे, आणि त्यानंतर पुस्तकांची दालने, अशी रचना होती. ही योजना तयार करणाऱ्या इसमाचे नाव आम्हाला सांगावे, ही विनंती. त्याच्या घरासमोर भेळपुरीची गाडी टाकून त्याची जिरवण्याचा आम्हा काही प्रकाशकांचा हिंस्र विचार आहे! असले रचनाकार मराठी भाषेचे खरेखुरे शत्रू आहेत, याची खात्री बाळगावी.

खाद्यपदार्थांच्या दिशेने येणाऱ्या खमंग दर्वळाने चाळवलेले साहित्य रसिक तिथंच अडकत होते. भरपेट खाल्ल्यानंतर पुढे पुस्तकांपर्यंत कोण जाईल? पोट भरले की पुस्तक आठवत नाही हो साहेब! कोऱ्या पुस्तकापेक्षा पावभाजीचा वास अधिक प्यारा असतो हो!! हीच तर आपल्या प्रकाशनव्यवसायाची पुरातन रडकथा आहे. काही (अप्पलपोटे) लेखक आणि कवी तर खाऊन पिऊन आम्हाला लांबवरुन हात दाखवून तोंड रुमालाने पुसत परस्पर निघून गेले...याला काय म्हणावे?

पुस्तकाच्या गाळ्यांचे भाडेही निघू शकले नाही, पुस्तकांचा ट्रान्सपोर्टचा खर्च वेगळाच. तीन दिवस आमच्या प्रकाशनसंस्थेतील माणसे अमळनेरमध्ये अशीच बसून होती, त्यामुळे पुण्यातला धंदाही बुडाला!! तरी आमच्या गाळ्यांच्या

भाड्यापोटी घेतलेली रक्कम परत करावी, ही विनंती. आमच्या प्रकाशक संघाने तशी लेखी विनंती केली आहेच, पण माझी ही रिक्वेस्ट स्वतंत्र मानावी. मागल्या खेपेला उस्मानाबाद संमेलनात असलीच दुरवस्था झाली होती,

तेव्हा स्व. गोपीनाथजी मुंडे यांनी गाळ्यांचे भाडे परत केलेच, शिवाय प्रकाशकांचा सत्कार करुन माणशी पाच-पाच हजार दिले होते, हे स्मरते. (कुठलाही प्रकाशक हे विसरु म्हणता विसरणार नाही. धन्य ते आयोजक, धन्य ते स्वागताध्यक्ष!) तुम्हीही तसेच करावे, आम्ही तुमचीही आठवण करु!!

साहेब, तुमच्याकडे अवघा महाराष्ट्र संकटमोचक म्हणून बघतो. सरकार अडचणीत आले की तुम्ही तातडीने धाव घेऊन (बाह्या सरसावत) हलक्या हाताने संकट दूर करता, असा तुमचा लौकिक आहे. आज मराठी प्रकाशक बांधव तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघतो आहे. त्याचा हिरमोड करु नका. एवढे केलेत, तर तुमचे दोन खंडातील चरित्र सिद्ध व प्रसिद्ध करण्याचा शब्द मी येथे देतो. कळावे. आपला, एक नाडलेला गरीब मराठी प्रकाशक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com