
मोबाईल, सोशल मीडिया आणि एआयच्या जमान्यात वाचन मागे पडलेय, असे आपण सर्रास म्हणतो; मात्र उलट प्रगत तंत्रज्ञानाच्या या जमान्यातच वाचन हे कधी नव्हे तेवढे महत्त्वाचे ठरले आहे. वाचन केवळ मनाला आनंद देणारे, कुतूहल, उत्सुकता जागवणारे नसते; तर वाचनामुळे तुम्ही आपल्या आयुष्यात, व्यावसायिक जीवनात एक उंची गाठू शकता. जगातील अनेक मोठ्या व नामवंत व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला तर तुम्हाला याची प्रचीती येईल. मेंदू आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन किती महत्त्वाचे आहे, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास, अनेक संशोधने जगात समोर आली आहेत. वाचन हे स्ट्रेस बस्टर आहे. त्यामुळे अलीकडे कॉर्पोरेट कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वाचते करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याच अनुषंगाने वाचनामुळे स्वतःच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल घडले, यासोबत जगभरातील अनेक व्यक्तिमत्त्वांचा कसा विकास झाला, याची कथा सांगणारे ‘विन दी बॅटल ऑफ युअर माईंड - इन द एज ऑफ सोशल मीडिया’ हे लेखिका रिता राममूर्ती गुप्ता यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.