

Indian Election Reform Committees and Reports
esakal
संसदीय लोकशाहीमध्ये भारतात होणाऱ्या निवडणुकांच्या एकूणच कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची गरज वारंवार अधोरेखित करण्यात आली आहे. सातत्याने विविध आयोग आणि इतर यंत्रणांनी निवडणूक कार्यपद्धतींमध्ये अनेक स्वरूपाचे बदल सुचविले आहेत. निवडणुकीचा खर्च कसा कमी करावा आणि कलंकित पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यापासून कसे रोखावे; हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, या महत्त्वाच्या मुद्द्यांवर कोणतीही चर्चा होताना दिसत नाही.
भारतामध्ये निवडणूक सुधारणा आवश्यक असल्याचे मत यापूर्वी वारंवार व्यक्त करण्यात आले असून, त्याबद्दल विविध यंत्रणांना वाटत असलेली चिंताही नवी नाही. गेल्या काही दशकांत भारतीय निवडणूक व्यवस्थेत सुधारणा घ डवून आणण्यासाठी अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. निवडणूक सुधारणा घडवून आणण्याच्या बाबतीत काहीच पुढे सरकले नाही, असे नाही. भारतीय निवडणूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यामुळेच निवडणुका मतदारांच्या दृष्टीने त्यांचा सहभाग वाढवणाऱ्या ठरल्या आहेत. निवडणूक आयोगासाठी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेणे सुलभ झाले आहे; तसेच उमेदवारांच्या दृष्टीने त्याची जबाबदारी अधिक वाढली आहे. मात्र, दोन मुद्द्यांकडे गंभीर लक्ष देणे आवश्यक आहे. निवडणुकीचा खर्च कसा कमी करावा आणि कलंकित पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यापासून कसे रोखावे या दोन मुद्द्यांकडे अधिक लक्ष आवश्यक वाटते.