

Indian Sculptors Ram Sutar
esakal
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे निर्माते आणि ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. १७ डिसेंबरच्या मध्यरात्री दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कलाक्षेत्रातील कामगिरीवर आणि व्यक्तिमत्त्वावर दृष्टिक्षेप.
ओल्या मातीचा सुगंध स्टुडिओतील हवेत दरवळत होता. त्यात निर्मितीचा एक शांत ध्यास जाणवत होता. २०२२ मध्ये जेव्हा मी राम सुतारांच्या ‘नॉयडा स्टुडिओ’च्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले, तेव्हा वाटले होते , कदाचित तिथे फक्त पूर्णत्वाला आलेली शिल्पं पाहायला मिळतील किंवा कामात मग्न असलेल्या तरुण शिकाऊ हातांची गर्दी दिसेल. मात्र त्याऐवजी, माझी नजर उंचावर उभे राहून शिल्प साकारणाऱ्या हातांवर खिळली. सात-आठ फूट उंचावर शिडीवर एक व्यक्ती उभी ठाकली होती. एका अवाढव्य पुतळ्याच्या कामात ती व्यक्ती पूर्णपणे मग्न होती. हात एका लयबद्ध रीतीने आणि कौशल्याने चालत होते. मी जवळ गेलो, तेव्हा लक्षात आले की ते स्वतः राम सुतार आहेत. त्यांनी घडवलेल्या शेकडो मूर्तींइतकीच ती प्रभावी होती.