पुणे - मागच्या वर्षीपर्यंत वर्षाकाठी लाखभरावर असणारी फी या वर्षी अचानक दीड लाखांवर गेली. त्यासोबतच अन्य खर्च देखील वाढले आहे. बरं एवढंच नाही मुलाच्या अभ्यासात देखील म्हणावी तशी प्रगती दिसेना. शाळा आमच्याच नावाने ओरडते आहे. तुम्ही घरी नीट अभ्यास घ्यायला हवा असं शाळेचं म्हणणं आहे. त्यासाठी मुलाला क्लासदेखील लावला आहे. पण इतक्या ठिकाणी पैसे भरून देखील मुलगा एक दोन विषयात नापास होतो आहे.. सध्या सहावीत असणाऱ्या धैर्यची आई सांगत होती.
आम्हाला आता ही शाळेची फी भरणे अतिशय कठिण वाटत असल्याचे ती सांगत होती. अनेक पालक शाळेच्या फीवाढीविरोधात आहेत पण आंदोलन करून देखील त्याचा फारसा उपयोग झाला नाही. माझ्यासाठी माझं मूल जास्त महत्वाचं असल्याने मी शाळेच्या विरोधात फार जायचं नाही असं ठरवलं. मुलगा अगदी तीन वर्षाचा असल्यापासून त्या शाळेत जातो आहे. लहानपणापासून आम्ही लाखात फी भरली आहे पण आता ती वाढणारी फी आमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर करू लागली आहे. बरं तोही पेलाला असता पण अभ्यासातही म्हणावी अशी प्रगती नाही... काय करावे..?
अशा धैर्यचे आईवडिल आज घराघरात आहेत. मुलांच्या शाळेच्या वाढणाऱ्या फीचे नियोजन करताना त्यांची चांगलीच दमछाक होते आहे. आणि मुलांच्या शिक्षणात मध्यावर आल्यावर आता पालकांना प्रश्न पडला आहे की शाळेच्या फीसाठी इतकी मोठी गुंतवणूक खरोखरच योग्य आहे का.? प्रायमरी शिक्षणावर आपण आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला का..? हा वाढणारा खर्च कसा मॅनेज करवा, पैशाचे नियोजन आणि शिक्षण यांचा समतोल कसा साधावा.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 'सकाळ प्लस' च्या या लेखाच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करूया..