

Mumbai Air Pollution
esakal
आपलं मुंबई शहर आज ‘स्मार्ट’ होण्याच्या शर्यतीत धावत आहे. जगातील विविध शहरांशी स्पर्धा करत आहे; पण या धावपळीत आपण आपल्या आयुष्याचा मूलभूत आधार, शुद्ध हवा, पाणी आणि शांतता गमावून बसलो आहोत. सिमेंटच्या जंगलांनी जमिनीवर ताबा मिळवला आहे आणि धुराच्या लोटांनी आकाशाचा निळा रंग पुसून टाकला आहे. या शहराची आजची अवस्था पाहिल्यास असे वाटते की, आपण प्रगतीच्या नावाखाली स्वतःच्याच विनाशाचा आराखडा तयार करत आहोत.
शहरांमधील हवेची गुणवत्ता आज चिंतेचा सर्वात मोठा विषय बनली आहे.भारतीय हवामान विभागाने दिलेल्या फेब्रुवारी २०२६ च्या ‘एक्यूआय कॅलेंडर’कडे नजर टाकली, तर परिस्थितीची भीषणता स्पष्ट होते. फेब्रुवारीमधील बहुतेक दिवस हे ‘मध्यम’ ते ‘वाईट’ या श्रेणीत मोडतात.
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पीएम १० चे प्रमाण १३०-१४० च्या दरम्यान होते. पीएम २.५ आणि पीएम १० (हवेतील अतिसूक्ष्म कण) हे इतके घातक असतात की ते आपल्या फुफ्फुसांच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचून रक्ताभिसरण संस्थेत बिघाड करतात. १६ फेब्रुवारी रोजी पीएम १० चा आकडा लक्षणीय वाढला होता, तर १८ फेब्रुवारीला कार्बन मोनॉक्साईड १७० च्या स्तरावर होता. हा वायू रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करतो. ओझोन आणि नायट्रोजन डायऑक्साइड चे वाढते प्रमाण हे वाहनांच्या उत्सर्जनाचे थेट परिणाम आहेत. एक्यूआय १०० च्या वर जातो, तेव्हा तो सामान्य माणसासाठी त्रासदायक आणि दमा असलेल्या रुग्णांसाठी जीवघेणा ठरू शकतो.