चित्रपट म्हणजे केवळ कथा नाही.. फ्रेम- शॉट- सीन- सिक्वेन्स या सगळ्या गोष्टी कशा ठरतात? जाणून घ्या..

केव्हा ‘टू शॉट’मध्ये दोन व्यक्ती दाखवाव्यात, केव्हा ‘थ्री शॉट’मध्ये एकाच फ्रेममध्ये तीन व्यक्ती दाखवाव्यात, याचा निर्णय चित्रपटातील प्रसंगानुसार घेतला जातो...
Movie Shooting
Movie Shooting Esakal

सुहास किर्लोस्कर

चित्रपट ही अनेक प्रसंगांची मालिका असते. सिक्वेन्स -दृश्यक्रम अनेक दृश्यांनी बनलेले असतात. एका दृश्यामध्ये अनेक शॉट असतात. कोणता शॉट केव्हा दाखवावा याचा निर्णय चित्रपटाचा संकलक दिग्दर्शकाबरोबर चर्चा करून घेत असतो.

नमक हलाल चित्रपटात भैरो (राम सेठी) नायक अर्जुन सिंगला (अमिताभ) हॉटेलच्या मॅनेजरकडे (रणजीत) घेऊन जातो. मॅनेजरच्या ऑफिसमधला शॉट आहे. मॅनेजर आपल्या खुर्चीवर बसलेला असतो.

प्रसंग कुठे घडतो आहे हे एव्हाना प्रेक्षकांच्या लक्षात आले आहे. मॅनेजर उठून उभा राहतो आणि भैरोला विचारतो, “ये किस चीज को लेके आए हो?” कॅमेरा हलकेच क्लोज-अपमध्ये फिरतो.

आता कॅमेरा आडव्या टेबलाच्या एका बाजूला स्थिर आहे आणि टेबलच्या दुसऱ्या बाजूला तिघे उभे आहेत. अर्जुन सिंग म्हणतो, “लो कल्लो बात, बाबूजी हम चीज नही है। म्हारा नाम अर्जुनसिंग वल्द भिमसिंग वल्द दशरथसिंग है...”

अमिताभ स्वतःची ओळख गावाकडच्या बोली भाषेत करून देतो आणि विचारतो, “बोलो हमारे दद्दूने सही कहां है के नही कहां है।”

यावर रणजीत त्याला विचारतो “तुम शहर में आए हो, ऐसे ही बाते करते हो या तुम्हे इंग्लिश वगैरा भी आती है?”

यावेळी कॅमेरा केबिनच्या दाराजवळ आहे आणि रणजीतच्या समोरून आपण शॉट बघतो. हा शॉट सलग चित्रित झालेला असला तरी आपण बघतो तो कॅमेरा दुसरा आहे, म्हणजेच एक सलग शॉट दोन कॅमेऱ्याने चित्रित केला आहे.

अर्जुन सिंगच्या तोंडी असणाऱ्या “लो कल्लो बात” या वाक्यातील ‘कल्लो’च्या उच्चारावेळी कॅमेरा रणजीतच्या मागे आहे आणि रणजीतच्या ‘ओव्हर द शोल्डर’ आपल्याला अमिताभ आणि त्याच्या मागे उभा असलेला राम सेठी दिसतात.

हा एकच सलग शॉट केबिनमधल्या तिसऱ्या कॅमेऱ्याने आपण बघतो. याचा अर्थ एकाच केबिनमध्ये तीन कॅमेरे लावलेले आहेत. “बाबूजी, ऐसी इंग्लिश आवे की आय कॅन लिव्ह अंग्रेज बिहाइंड... यू सी आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश, आय कॅन लाफ इंग्लिश...”

यानंतर अमिताभने इंग्लिशमध्ये जे काही तारे तोडले आहेत ते कमाल आहेतच. शिवाय हा एकूण दोन मिनिटे सतरा सेकंदाचा सीन तीन कॅमेऱ्यांनी सलग चित्रित केला आहे. तीनही कॅमेऱ्यांनी पूर्ण शॉट चित्रित केल्यानंतर चित्रपटाच्या एडिटरने कोणता संवाद कोणत्या कॅमेऱ्यातून दाखवायचा याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपट ही अनेक प्रसंगांची (Sequences) मालिका असते. सिक्वेन्स -दृश्यक्रम अनेक दृश्यांनी (Scenes) बनलेले असतात. एका दृश्यामध्ये अनेक शॉट असतात. नमक हलाल चित्रपटातील हे दृश्य तीन कॅमेऱ्यांनी चित्रित केले.

कोणता शॉट केव्हा दाखवावा याचा निर्णय संकलकाने दिग्दर्शकाबरोबर चर्चा करून घेतलेला आहे. कोणत्या प्रसंगामध्ये बोलणारी व्यक्ती समोरून दाखवावी, केव्हा ‘टू शॉट’मध्ये दोन व्यक्ती दाखवाव्यात, केव्हा ‘थ्री शॉट’मध्ये एकाच फ्रेममध्ये तीन व्यक्ती दाखवाव्यात, याचा निर्णय चित्रपटातील प्रसंगानुसार घेतला जातो.

सत्ते पे सत्ता चित्रपटातील अमिताभ आणि अमजद खान यांच्यातील “दारू पिने से लिव्हर खराब हो जाता है” हे सुप्रसिद्ध दृष्य सलग पाच मिनिटांचे आहे आणि ते दोन वेगवेगळे कॅमेरे लावून सलग शूट केले आहे.

१९८१साली डबिंग न करता शूटिंगच्या वेळेचाच दोघांचा थोडा घुमलेला आवाज ऐकू येतो आणि ट्रॉली फॅनचा बारीकसा आवाजही ऐकू येतो. पावणे चार मिनिटानंतर एक कट दिसतो परंतु सलग शूट केलेल्या शॉटमधील दुसरा अँगल आपण बघतो.

आराधना चित्रपटातील ‘रूप तेरा मस्ताना’ हे सुप्रसिद्ध गाणे ३ मिनिटे आणि ४५ सेकंदाच्या सलग शॉटमध्ये चित्रित केले आहे, यात एकही कट नाही.

गोलाकार रूळावरून फिरणाऱ्या ट्रॉलीवर कॅमेरा फिरवला आहे. त्या वर्तुळामध्ये शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना शेकोटीभोवती आहेत आणि असा हा कट नसलेला शॉट पंचावन्न वर्षांपूर्वी, १९६९ साली, घेतलेला आहे, हे विशेष.

गाइड चित्रपटातील ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’ या चार मिनिटांच्या गाण्यामध्ये फक्त दोनच कट आहेत. पहिल्या कडव्यापूर्वी तारशेहनाई वाजते त्यावेळी पहिला कट आहे. दुसऱ्या कडव्यापूर्वी सॅक्सोफोन वाजतो त्यावेळी दुसरा कट आहे.

इन्व्हिजिबल कट

“फ्रेम- शॉट- सीन- सिक्वेन्स यामधून एक कथन व्यवस्था मांडलेली असते, ज्याचे तुकडे जोडणे म्हणजे संकलन,” असे अनेक कलाकारांचे चित्रपटकला गुरू प्राध्यापक समर नखाते यांनी सांगितले. आल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित रोप चित्रपटामध्ये काही प्रसंग सलग दहा मिनिटांचे आहेत.

१९४०साली ३५ एम.एम.च्या काळात हिचकॉक यांनी केलेला तो अभिनव प्रयोग होता. या चित्रपटातील काही शॉटमध्ये कट आहेत परंतु अंधाराच्या साहाय्याने ते प्रसंग असे चित्रित करण्यात आले आहेत, की कट लक्षात येत नाहीत. रोप चित्रपटामध्ये ब्रँडन आणि फिलिप हे दोन मित्र त्यांच्या एका मित्राचा -डेव्हिडचा -खून करतात.

डेव्हिडचे प्रेत एका मोठ्या लाकडी पेटीमध्ये ठेवतात आणि त्याच जागेमध्ये एक मोठी पार्टी करून त्या पार्टीला डेव्हिडच्या कुटुंबीयांनाही बोलावतात. नाटकावर आधारित हा चित्रपट एकाच घरामध्ये घडतो.

हिचकॉक यांनी चित्रपट करताना दोन मिनिटांपासून चार, पाच, सात, नऊ आणि दहा मिनिटांचे लाँग टेक शूट केले. हा चित्रपट कमीत कमी आणि लक्षात न येणारे संकलन (इन्व्हिजिबल एडिटिंग) केलेला चित्रपट म्हणून अभ्यासपूर्वक बघण्यासारखा आहे.

आल्फ्रेड हिचकॉक यांनी या चित्रपटात एडिटिंगच्या कटला काही पर्याय सहेतूक वापरले आहेत. उदाहरणार्थ मागे-पुढे हालणारा दरवाजा, चित्रपटातील पात्रांच्या मागे मागे जाणारा कॅमेरा, काही पात्रांच्या पाठीमागून शॉट घेताना त्या पात्राचा सूट बराच पडदा व्यापतो त्यावेळी कट आहे पण तो जाणवत नाही, त्याला इनव्हिजिबल कट म्हणतात.

लाकडी पेटीचे झाकण उघडताना त्या झाकणाने पूर्ण पडदा व्यापला आहे तिथे कट जाणवत नाही. हिचकॉक यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे जात निर्माण केलेला 1917 हा पहिल्या महायुद्धातील घटनेवरचा चित्रपट लाँग टेकसाठी प्रसिद्ध आहे.

बर्डमॅन चित्रपटामध्ये प्रेक्षकांना नायकाच्या बरोबर चालण्याचा अनुभव घेता यावा यासाठी दिग्दर्शक अलेझांड्रो इनारिटू यांनी कमीत कमी कट असणारे अनेक प्रसंग सलग चित्रित केले आहेत.

काही प्रसंग १५ ते २० वेळा चित्रित करून असे बेमालूमपणे जोडले आहेत, की प्रेक्षकांना सलग शॉट बघितल्याचा आणि ग्रीनरूममधून नायकाबरोबर स्टेजवर जाण्याचा अनुभव घेता येतो.

Movie Shooting
New Year Film : २०२४ वर्षातील या चित्रपटांचा धमाका!

मॅच कट

कमीत कमी कट ‘बघितल्यानंतर’ आता काही कट असे बघू ज्यांना प्रेक्षक दाद देतात. काही प्रसंग संवादामधून जोडले जातात. दिवारमध्ये बूट पॉलिश करणारा मुलगा इफ्तिकार बरोबर असलेल्या सुधीरला सांगतो, “फेके हुए पैसे नही उठाता”.

त्यावर इफ्तिकार म्हणतो, “मेरी बात का खयाल रखना, एक दिन ये लडका कुछ बनेगा.” पुढील प्रसंग शाळेमध्ये, त्याच मुलाचा भाऊ शाळेमध्ये सर्वांच्यासमोर उभा आहे आणि त्याच्या शिक्षिका म्हणतात, “देखना ये लडका जरूर कुछ बनेगा, हर सब्जेक्ट में सबसे जादा नंबर इसी के आते है.” हा मॅच कट.

काला पत्थर चित्रपटामध्ये कोळशाच्या खाणीमध्ये काम करणारा इंजिनिअर रवी (शशी कपूर) त्याच्या साहेबाच्या आदेशानुसार अनिताला (परवीन बाबी) विमानतळावरून आणण्यासाठी कोल माईन्सची जीप घेऊन जातो.

विमानतळावरून उतरलेली अनिता जीपमध्ये बसते, “अनिता तुम बदली नही” असे म्हणणारा रवी जीप सुरू करतो. कट. एक जीप थांबते आणि जीपमधून जेलर उतरतो आणि अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या जीप दाखवल्यामुळे कोळशाच्या खाणीच्या प्रसंगामधून दगडाच्या खाणीमध्ये दुसरा प्रसंग सुरू झाल्याचे प्रेक्षकांना समजते.

विमानतळावरील प्रसंग झाल्यानंतर मंगलसिंगचा (शत्रुघ्न सिन्हा) प्रसंग दोन वेगवेगळ्या जीप दाखवून जोडला आहे (संकलक -बी. मंगेशकर, दिग्दर्शक -यश चोप्रा). परिंदा चित्रपटामध्ये करन (अनिल कपूर) एका हॉटेलमध्ये एक खून करण्यासाठी आला आहे.

काचेपलीकडे मुसा (टॉम ऑल्टर) एकाबरोबर निवांत गप्पा मारतो आहे. सगळीकडे शांतता आहे. करन पिस्तूल उघडण्याचा प्रयत्न करतो. एवढ्यात मोठा आवाज येतो. प्रेक्षकांना वाटते पिस्तुलाचा आवाज आला आहे. परंतु प्रेक्षकांच्या विचारांना चकवा देत बिअरच्या बाटलीतून फेस बाहेर येतो (संकलक रेणू सलुजा, दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा).

ग्लासमध्ये बिअर सर्व्ह केली जातानाचा क्लोज-अप शॉट दिसतो. त्यामागे करनचा चेहरा दिसतो. करनला उडणारी कबुतरे दिसतात आणि त्याच्या मित्राचा -इन्स्पेक्टर प्रकाशचा खून झाल्याचे त्याला आठवते.

त्यावेळी अनिल कपूरच्या चेहऱ्यावर बंदुकीच्या गोळीमुळे उडणारी कबुतरे दिसतात. करनच्या मनात काय चालले आहे ते प्रेक्षकांना संवादाशिवाय समजते.

एक हसीना थी चित्रपटामध्ये सारिका वर्तक (ऊर्मिला मातोंडकर) तुरुंगामध्ये आहे. एक पोलिस तुरुंगाच्या ऑफिसमध्ये वाजणारा फोन घेतो. पोलिस विचारतो, “किसका डेथ हो गया?” पलीकडून येणारा आवाज प्रेक्षकांना ऐकू येत नाही.

त्याचवेळी फोन घेण्यासाठी येणारी ऊर्मिला आपण बघतो तेव्हाच पोलिस म्हणतो, “पिताजी का?” ऊर्मिला दिसते त्यावेळी पोलिसाचा आवाज येतो आणि नायिकेच्या वडिलांचे निधन झाल्याचे प्रेक्षकांना संकलनामधून समजते. (संकलक -संजीव दत्ता, दिग्दर्शक -श्रीराम राघवन).

नुकत्याच खंबीर झालेल्या नायिकेच्या डोळ्यात तरळणारे अश्रू दिसतात, त्यानंतर लगेच लाकडे पेटल्याचा शॉट दिसतो. कोणाही भारतीय प्रेक्षकाला वाटते, की नायिकेच्या वडिलांचे क्रियाकर्म सुरू आहे.

पण त्या जळणाऱ्या लाकडांवरून कॅमेरा मागे येतो आणि त्यावरचा तवा व त्यावर भाजल्या जाणाऱ्या रोट्या आपल्याला दिसतात. अशा मॅच कटमुळे कथा पटकन पुढे जाते आणि काहीही न दाखवता प्रेक्षकांना समजते, की क्रियाकर्म करून ऊर्मिला तुरुंगामध्ये परत आली आहे.

कालांतराने हॉटेलच्या रूममध्ये नायिका बॅग उघडून त्यातील पिस्तूल बघते आणि पिस्तुलातील इजेक्शन पोर्टवरील दोन उभ्या रेषा क्लोज अपमध्ये बघतानाच लिफ्टचे दोन दरवाजे मधून उघडतात आणि त्यामधून करन बाहेर पडतो.

दोन शॉटमधल्या दोन रेषा जुळवून तयार केलेल्या मॅच कटमुळे सारिका वर्तकच्या हातातील पिस्तूल करनला मारण्यासाठी आहे, हे प्रेक्षक ओळखतात. प्रेक्षकांना सविस्तर उलगडून सांगावं लागत नाही, ते हुशार आहेत असे समजून दिग्दर्शित केलेले चित्रपट दर्जेदार ठरतात.

संकलनाचे आणखी काही प्रकार पुढील लेखामध्ये ‘बघू’.

----------------------------

Movie Shooting
Shahrukh Khanचं २०० कोटींचं घर आतून कसं दिसतं ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com