

Aditya Sarpotdar Director Interview
esakal
वेगळ्या धाटणीचे सिनेमे करणारा अलीकडचा तरुण दिग्दर्शक म्हणजे आदित्य सरपोतदार. आदित्य सरपोतदारचा सिनेमा म्हणजे वेगळं काहीतरी बघायला मिळणार याची शाश्वती! क्लासमेट्स, झोंबिवली, मुंजा, फास्टर फेणे आणि अलीकडेच आलेला थामा यांसारखे वैविध्यपूर्ण चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या या दिग्दर्शकाबरोबर मारलेल्या गप्पा...
पहिल्यापासूनच चित्रपट क्षेत्राची आवड होती? या क्षेत्राकडे कसं वळालात?
आदित्य सरपोतदार ः या क्षेत्रातली माझी चौथी पिढी. लहानपणापासूनच हे जग इतकं जवळून पाहिलं असल्यामुळे या क्षेत्राबद्दल माहिती होती; लहानपणापासूनच मी वडील-आजोबांचं काम बघतो आहे. शूटिंग बघतो आहे. पुण्यात अलका टॉकिज होतं, ते आम्ही चालवायचो. त्यामुळे घरातच लहानपणापासून पाहिलेली सिनेमाची परंपरा होती. मी १२-१३ वर्षांचा असताना, करिअरचा विचार करताना या क्षेत्रात काहीतरी करू शकतो, याची जाणीव झाली. पण काहीतरी म्हणजे काय करावं? टेक्निकल काम करावं का? असे विचार सुरू झाले. मला आठवतंय, १६ वर्षांचा असताना मी माझ्या वडिलांबरोबर असिस्टंट म्हणून काम करू लागलो. पुण्यामध्ये आम्ही कार्पोरेट कम्युनिकेशन अॅड्स बऱ्याच करायचो. कॉलेजमध्ये असताना मी बऱ्याच स्वतंत्र जाहिराती करायला लागलो. टाटा मोटर्स किंवा संचेती हॉस्पिटल यांच्यासाठी जाहिराती करायला लागलो. तिथून खरी सुरुवात झाली. हैदराबादला जाऊन ईटीव्ही मराठीमध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणूनही दीड वर्ष काम केलं. मुंबईत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. ही सुरुवात सतरा-अठरा वर्षांचा असताना झाली.