

ADAS Test City Pune
esakal
ॲडास प्रणालीच्या चाचणीमुळे भारत ऑटोमोटिव्ह सुरक्षा आणि तंत्रज्ञान सज्जतेमध्ये एक मोठे पाऊल टाकत आहे. येत्या काळात आधुनिक वाहन तंत्रज्ञानात ॲडास प्रणाली क्रांती ठरण्याची शक्यता आहे. ही प्रणाली अपघातांचे प्रमाण कमी करून प्रवास अधिक सुरक्षित व स्मार्ट करण्यास मदत करेल, यात शंका नाही.
भारतातील रस्ते हा नेहमीच चर्चेचा मुद्दा असतो. त्यात अपघातांचे वाढते प्रमाण हाही काळजीचा व कळीचा मुद्दा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर जगात, मुख्यतः युरोपीय देशांत सध्या ‘ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स’ (ॲडास - ADAS) ही यंत्रणा विकसित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतातही या यंत्रणेचा प्रवेश झाला आहे.
पुण्याजवळील टाकवे येथे ‘ॲडास टेस्ट सिटी’ ही देशातील पहिली ॲडास व्हॅलिडेशन इकोसिस्टीम म्हणून पुढे येत आहे. यामध्ये सुरक्षा व तंत्रज्ञानाची तयारी याला महत्त्व दिले जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एआरएआयच्यावतीने (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया) वाहन उद्योग क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यंत्रणेची टाकवे येथे चाचणी घेण्यात आली. ही चाचणी प्रत्यक्ष भारतीय ड्रायव्हिंग परिस्थितींमध्ये ॲडासच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी घेण्यात आली. या चाचणीवेळी सिम्युलेशन, क्लोज्ड-ट्रॅक चाचणी आणि सार्वजनिक रस्त्यांमधील अंतर भरून काढणे अशा वेगवेगळ्या स्वरूपाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. यामध्ये वाहन उद्योगविषयक अत्याधुनिक उपकरणे, चाचणी प्रोटोकॉल आणि प्रमाणन क्षमता यांचाही समावेश होता. या चाचणीचे आयोजन आयेरा या संस्थेच्या मदतीने करण्यात आले.