रचना बिश्त-रावत
लष्करी अधिकाऱ्याबरोबर लग्नगाठ बांधलेली असणं हा एक विशेषाधिकार आहे! पण त्याच्याबरोबर एक वेगळी बांधिलकीही येते. ती तुम्ही निभावू शकणार असाल, तर हातात घेण्यासाठी याहून दुसरा उत्तम हात नाही!
ऑक्टोबर १९९२. मी २४ वर्षांची होते आणि दिल्लीत द इंडियन एक्स्प्रेस ग्रुपमध्ये काम करत होते. डेहराडूनला घरातलं एक लग्न होतं, म्हणून त्यादिवशी रात्रीच्या बसने मी डेहराडूनला गेले होते. लग्नाच्या स्वागत समारंभात एक उंचापुरा, रुबाबदार तरुण दिसला.
राखाडी रंगाचा ब्लेझर आणि गडद रंगाची पँट (‘इंडियन मिलिटरी अकॅडमी’च्या कॅडेट्सचा ट्रेनिंग व्यतिरिक्त-काळातील पोशाख, म्हणजेच ‘मुफ्ती’). केसांचा पारंपरिक ‘आर्मी क्रू कट’ होता. त्यावेळी आम्ही एकमेकांना जेमतेम ‘हाय-हॅलो’ म्हणालो असू.