Artificial Intelligence : चा तत्वज्ञानाशी संबंध आहे; जाणून घ्या, जाणकार काय सांगतात

आपलं अस्तित्व सत्य की भ्रामक?
Artificial Intelligence and philosophy
Artificial Intelligence and philosophy esakal

डॉ. सदानंद मोरे

आपण ज्या जगात वावरतो ते व त्यातील आपण करतो तो-तो व्यवहार सत्य असल्याची सर्वसामान्य माणसांची धारणा असते. किंबहुना या धारणेतूनच त्यांचे सर्व व्यवहार होत असतात. मग ती यज्ञयागादि वैदिक क्रियाकर्मे असोत किंवा व्यवस्थेत वाट्याला आलेली लौकिक कर्मे असोत. तत्त्वज्ञ मंडळी सखोल विचार करून या गृहितालाच आव्हान देतात.

कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची गोष्ट गंभीरपणाने घ्यायची म्हणजे नेमके काय करायचे आणि मुख्य म्हणजे कोणी करायचे हा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो. पूर्वीच्या काळात त्या-त्या वेळी प्रचारात आलेल्या नव्या-नव्या तंत्रज्ञानाकडे तेव्हाच्या लोकांनी गंभीरपणे पाहिले असणार हे उघड आहे.

उदाहरणार्थ, औद्योगिक क्रांतीच्या काळात पुढे आलेल्या तंत्रज्ञानाला व त्यातून निष्पन्न झालेल्या उत्पादन साधनांना कार्ल मार्क्सने गंभीरपणाने घेतले होते यात शंका नाही.

या तंत्रज्ञानाने अस्तित्वात आलेल्या भांडवलशाही नावाच्या नव्या व्यवस्थेत खऱ्या उत्पादकांचे म्हणजेच श्रमिकांचे शोषण होत आहे, असे लक्षात आलेल्या मार्क्सने केवळ वेगळे अर्थशास्त्र रचले असे नसून वेगळ्या राज्यव्यवस्थेचा व अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला व त्यांना अस्तित्वात आणण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग दाखवला. हा एक ‘गंभीरपणाने घेण्या’चाच प्रकार होता.

हाच मुद्दा पुढे न्यायचा म्हटले तर कृबुच्या उपयोगातून निष्पन्न होणाऱ्या तंत्राचा उत्पादनावर, वितरणावर, रोजगारीवर, समाजातील सम-विषमतेच्या भावनांवर, उत्पन्नावर, समाजव्यवस्थेवर, अर्थव्यवस्थेवर, संस्कृतीवर, मानवांच्या भाषांवर, नातेसंबंधांवर काय परिणाम होणार आहे या व अशा इतरही मुद्द्यांच्या व प्रश्नांच्या अनुषंगाने विचार करणे हे गंभीरपणाने घेणे होय.

या विचारातून कृबुचे काही संभाव्य धोके ध्यानात आले तर ते टाळण्यासाठी काय उपाययोजना करायला हवी हा विचार गंभीरपणाने घेण्याचा पुढील टप्पा होय, हे आता वेगळे सांगायची गरज नाही.

कृबुमुळे मानवजातीला जे लाभ होणार असतील व तिचे जगणे सुकर आणि सुखकारक होणार असेल तर तिचा तो भाग कसा ग्रहण करायचा व टिकवायचा आणि कृबुमुळे जे नुकसान होण्याची शक्यता आहे ते कसे टाळायचे हा या विचार व संशोधन प्रक्रियेचाच भाग असणार हेही स्पष्ट आहे.

याही पुढे जाऊन या दोन गोष्टींचा मेळ घालणे जेथे अशक्य होईल तेथे कशाला प्राधान्य देऊन कशाचा त्याग करायचा हेही ठरवावे लागेल.

लाभापेक्षा हानी अधिक आहे असे लक्षात येते तेव्हा लाभाचा लोभ न धरता त्याचा त्याग करून ती हानी टाळावी, हे कोणीही सांगेल; परंतु तारतम्याने व साकल्याने विचार केला तरच कदाचित आज लाभकारी वाटणारी गोष्ट उद्या हानिकारक ठरू शकते का, हेही पाहावे लागेल व तसे आढळले तर आजच्या लाभावर पाणी सोडण्याची तयारी ठेवावी लागेल.

पण लाभाला चटावलेले आणि त्यामुळे तात्कालिकाच्या मागे धावणारे लोक यासाठी तयार होतील काय, हा प्रश्न उरतोच. त्यांनी त्यासाठी तयार व्हावे म्हणून त्यांचे मूल्यात्मक प्रबोधन करावे लागेल. या प्रबोधनाला जे-जे प्रतिसाद व दाद देत नाहीत त्यांचा अनुशासनाच्या मार्गाने बंदोबस्तही करावा लागेल.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. कृबुकडे निराशावादी (Pessimistic) दृष्टीने पाहणारे संशोधक विचारवंत कृबुमुळे एकूणच मानवजातीचा नाश होण्याची, ती ‘एक्झिस्टेन्शिअल थ्रेट’ (Existential Threat) असल्याची शक्यता वर्तवतात.

हे दोन प्रकारे होऊ शकते. पहिला प्रकार म्हणजे कृबु तंत्रविद्येवर हिटलरी किंवा तालिबानी अशा प्रवृत्तीने कब्जा करून तिचा संहारासाठी वापर करणे.

दुसरा प्रकार म्हणजे असे काही दुष्कृत्य न करण्याची हमी देऊन, तसे न करण्याची व न करू देण्याची जबाबदारी मानवजातीने संस्थात्मक यंत्रणा उभारून सहकार्यभावनेतून स्वीकारली व तसे प्रत्यक्ष वर्तनही केले तरी कृबु तंत्राच्या यंत्रणांत आकस्मिक व दोष निर्माण होऊन त्यातून अनपेक्षित असा मोठा अपघात घडणे.

संपूर्ण मानवजातीचे अस्तित्व धोक्यात येणे ही अगदी टोकाची शक्यता झाली. या टोकाला न जाता आणखीही एक संभाव्य धोक्याची चाहूल घेता येते.

तो म्हणजे माणसे राहतील, म्हणजे जिवंत राहतील मात्र त्यांनी -त्यांच्या पिढ्यान् पिढ्यांनी कष्टपूर्वक घडवलेल्या संस्कृतीचा (Civilization) ऱ्हास होण्याचा.

अणुयुद्धामुळे म्हणजे येऊ घातलेल्या तिसऱ्या महायुद्धामुळे काय होऊ शकेल या प्रश्नाचे उत्तर शीतयुद्धकालीन विचारवंत कसे देत असा याचा उल्लेख केला तर मुद्दा चांगल्या प्रकारे समजू शकतो. एक उत्तर असे होते, की तिसरे महायुद्ध हे शेवटचे असेल.

चौथे महायुद्ध होणारच नाही. कारण ते लढण्यासाठी माणसेच अस्तित्वात राहणार नाहीत. दुसरे उत्तर म्हणजे मानवजातीचा संहार होणार नाही.

काही माणसे जिवंतपणे शिल्लक राहतीलच. इतकेच नव्हे मानवी प्रवृत्तीला धरून ती कधीतरी एकमेकांशी युद्धही करतील; पण ते युद्ध लाठ्याकाठ्यांनी लढले जाईल. ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान अशा मानवी संस्कृतीतून विकसित झालेल्या गोष्टींचा तेव्हा नाश झालेला असेल म्हणून.

कृबुचा गंभीरपणाने विचार व तदनुषंगिक कृती करायची आवश्यकता आता पुरेशी अधोरेखित झाली आहे, असे समजायला हरकत नसावी.

कृबुतून या घडीला मिळू शकणारे ‘घी’ आपल्या पोळीवर जास्तीत जास्त कसे ओढून घेता येईल व त्यातून अधिकाधिक तुष्टी-पुष्टी कशी मिळवता येईल याचा विचार करण्याऐवजी काही लोक संभाव्य बडग्याची चर्चा करतात याचे काहींना आश्चर्य वाटणेही शक्य आहे; पण समाजात असेही काही वेडे पीर असायची गरज असते, की जे केवळ स्वतःच्या लाभाचा विचार करीत नाहीत.

इतकेच नव्हे, सर्वांच्या हिताचा विचार करतानाही तात्पुरत्या लाभाचा विचार करण्याऐवजी दूरदृष्टीने भविष्याचाही विचार करतात, जो वर्तमान लाभाचा संकुचित विचार करणाऱ्यांना तापदायक वाटतो. ते असा विचार करणाऱ्यांचा उपहास करतात, टिंगलटवाळीही करतात.

लोकांना कृबु तंत्रज्ञानाचे अप्रूप का वाटते याचे एक कारण सांगून पुढच्या मुद्द्याचा विचार करू. कृबुच्या माध्यमातून आभासी विश्वाची निर्मिती करता येते इतकेच नव्हे, तर या आभासी विश्वाचा वास्तव विश्वावर परिणाम घडवून आणता येतो.

जी गोष्ट वास्तवात प्राप्त करून घेण्याची क्षमता नाही ती आभासी विश्वात का होईना मिळतेय ना, हे एक खोटे का होईना पण वास्तवातीलच समाधान ठरते ना? मधुबालासारख्या एखाद्या आवडत्या सौंदर्यवती अभिनेत्रीच्या उपलब्ध चित्रपटातील तिच्या नायकाला हटवून तेथे स्वतःची प्रस्थापना करीत त्या संपूर्ण चित्रपटाची पुनर्निर्मिती करणे कृबु तंत्राने शक्य होईल.

आपल्या एखाद्या प्रतिस्पर्ध्यावर आपल्या पराक्रमाने वा सामर्थ्याने मात करता येत नसेल, तर त्याचा फेक व्हिडिओ तयार करून त्याला बदनाम करता येणे शक्य आहे. भले त्याचा फोलपणा नंतर उघड झाला तरी दरम्यान प्रतिस्पर्ध्याचे व्हायचे ते नुकसान होऊन गेलेले असते.

वास्तव आणि आभास यांची एवढी सरमिसळ कृबु तंत्राने होणार आहे, की या क्षणी आपण जेथे आहोत ते विश्व वास्तव की आभासी; तसेच जे करीत आहोत व त्याचे जे परिणाम दिसत आहेत ते वास्तव की आभासी, याचा संभ्रम होऊ शकेल इतके हे तंत्रज्ञान पुढे चालले आहे. जाणार आहे.

आता यावर उपाय काय व तो कोणी करायचा हा प्रश्न आपोआपच पुढे येणार. मात्र त्याआधी हेही सांगायला हवे, की त्याचे गांभीर्य लोकांच्या पुढे आणण्याचे काम जसे वैज्ञानिक व संशोधक करतात तसेच ते वैज्ञानिक ललित लेखन करणारे, तसेच चित्रपटनिर्माते वगैरे मंडळीही करीत असतात.

त्यांच्या कृतींमध्ये कल्पिताचे आधिक्य असेल, अतिशयोक्तीही असेल; पण लोकमत घडविण्यासाठी व लोकमताचा दबाव संबंधित यंत्रणांवर आणण्यासाठी त्याचा उपयोग होतो यात शंका नाही. उत्पादक भांडवलदार कृबुच्या साह्याने आभासी गरजा निर्माण करून त्यावरील आभासी उपायही सांगतात.

हे उपाय म्हणजे अर्थातच त्यांनी बाजारात आणलेली उत्पादनेच असतात हे वेगळे सांगायची गरज नसावी. हे एक प्रकारचे ग्राहकांचे प्रबोधन म्हणावे लागेल.

पण मुद्दा या अथवा त्या उत्पादनाचा नसून अगोदरच सांगितल्याप्रमाणे व्यापक स्तरावरील आहे. त्याचाही थोडा ऊहापोह करायची गरज आहे.

बौद्ध तत्त्ववेत्ता नागार्जुन यांनी परमार्थ सत् आणि संवृत्ति सत् असे अस्तित्वाच्या पातळ्यांमध्ये भेद केला असल्याचे अभ्यासक जाणतात. नंतर बौद्ध परंपरेतीलच वसुबंधु या तत्त्ववेत्त्याने परिकल्पित सत्ता, परतंत्र सत्ता आणि परिनिष्पन्न सत्ता असा भेद केला.

तपशिलात न जाता एवढे सांगणे पुरेसे होईल, की पुढे आद्य शंकराचार्यांनी किंवा त्यांच्या परंपरेतील भाष्यकार-वार्तिककारांनी पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता असा भेद पुढे आणला. त्यावरून शंकराचार्यांवर प्रच्छन्न बौद्ध असल्याची टीका त्यांच्या वैदिक परंपरेतीलच प्रतिस्पर्ध्यांनी केली, हेही जगजाहीर आहे.

आपण ज्या जगात वावरतो ते व त्यातील आपण करतो तो-तो व्यवहार सत्य असल्याची सर्वसामान्य माणसांची धारणा असते. किंबहुना या धारणेतूनच त्यांचे सर्व व्यवहार होत असतात. मग ती यज्ञयागादि वैदिक क्रियाकर्मे असोत किंवा व्यवस्थेत वाट्याला आलेली लौकिक कर्मे असोत. तत्त्वज्ञ मंडळी सखोल विचार करून या गृहितालाच आव्हान देतात.

आपल्यासमोरील पंचेंद्रियांनी ज्ञात होणारे जग आणि त्या जगातील ज्ञानेंद्रियांनी व कर्मेंद्रियांनी चालत असणारा मानवी व्यवहार हा मिथ्या आहे. या संदर्भात माया, अज्ञान, भ्रम, भास, विवर्त इत्यादी शब्द वेदांत तत्त्वज्ञानाने रूढ केले असल्याचे दिसून येते.

मुद्दा पटावा यासाठी सर्वांच्याच परिचयाचे असलेले जे उदाहरण देण्यात येते ते म्हणजे स्वप्नाचे. झोपेत असताना आपल्याला जे स्वप्न पडते त्या स्वप्नात दिसणारे सर्व काही खरोखरच अस्तित्वात आहे अशीच आपली, आपण त्या स्वप्नात असतो तेव्हा म्हणजे असेपर्यंतची धारणा असते.

स्वप्नात आपण जे काही अनुभवले तसे वास्तविक पाहता काहीच घडले नव्हते. ते खरे नसून खोटे होते; आभास होता हे आपल्याला समजते, ते स्वप्नभंग होऊन जाग आल्यानंतर.

स्वप्नात जे काही घडले ते खरे मानून जागेपणी त्यानुसार व्यवहार करायच्या भानगडीत कोणी पडत नाही. (अपवाद राजा हरिश्चंद्राचा ज्याने स्वप्नात असताना कोणाला तरी दिलेले दान जाग आल्यावर वास्तवातही देऊन टाकायचा निश्चय केला.)

असण्या-दिसण्याचा हा विचार पूर्ण करून परत कृबु क्षेत्रात प्रवेश करताना या क्षेत्रातील दादा मानल्या जाणाऱ्या एका बुद्धिमान कॉर्पोरेट उद्योजकाच्या अगदी अलीकडील मताचा उल्लेख करावा लागेल. तो दुसरा तिसरा कोणी नसून एलॉन मस्क होय. पण त्याही आधी आचार्य रजनीश नेहमी सांगयचे ती झेन बौद्धांची एक गोष्ट सांगतो.

एक माणूस सकाळी झोपेतून उठून जोरजोरात रडायला लागला. तेथे असलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला रडण्यामागचे कारण विचारले.

त्यावर त्याने त्या रात्री आपल्याला एक भयंकर स्वप्न पडल्याचे सांगितले. ते कोणते, असे विचारल्यावर त्याने स्वप्नात आपण फुलपाखरू झाल्याचे पाहिले असे स्पष्ट केले व तो पुन्हा रडू लागला.

त्यावर चकित झालेल्या त्याच्या मित्रांनी त्यात रडण्यासारखे काय आहे, आता तर जागा झाला आहेस, अशी त्याची समजूत घालायचा प्रयत्न केला.

त्यावर तो अत्यंत गंभीरपणाने म्हणाला, की मी माणूस असून मला आपण फुलपाखरू झाल्याचे स्वप्न पडले असे मी समजतो; पण असे कशावरून नसेल, की खरेतर मी फुलपाखरू आहे आणि आपण माणूस झाल्याचे स्वप्न पाहतोय!

मामला वरकरणी वाटतो तसा सहजपणे उडवून लावण्याइतका सरळ सोपा नाही. सतराव्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त याने जगाच्या अस्तित्वावरच शंका घेत असा प्रश्न उपस्थित केला होता, की आपण जे विश्व अनुभवतो व सत्य मानतो ते अस्तित्वात नसूनही आहे असा आपला समज करून देऊन एखादा हुशार सैतान (Evil Genius) आपली फसवणूक करीत नसेल कशावरून? त्याची येथे आठवण होते.

पण हा झाला ऐतिहासिक मुद्दा आणि तोही कृबुपूर्वकाळातील.

सप्टेंबर २०१६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत एलॉन मस्क म्हणतो, ‘There is one in a billion chance that this is base reality.’

अर्थ स्पष्ट आहे. आपण ज्या वास्तवात जगतो ते वास्तव ‘वास्तव’ नसून, पायाभूत सद्‍वस्तू नसून आभासी असू शकते.

बौद्ध विचारवंत किंवा शंकराचार्य असेच काही तरी सांगत आहेत. आपण ज्यात किंवा जेथे आहोत ते विश्व माया, मिथ्या, विवर्त, अध्यास असून हा अध्यास ज्या अधिष्ठानावर होतो, जेथे किंवा ज्यावर आपले विश्व भासमान होते ते अधिष्ठान म्हणजेच ‘बेस रिॲलिटी’ (Base Reality) म्हणजे ब्रह्म असे शंकराचार्य म्हणतात.

हे ब्रह्मच पारमार्थिक सत्ता आहे. पंचज्ञानेंद्रियांनी ज्ञात होणारे आणि ज्यात पंचकर्मेंद्रिये क्रियाशील असतात ते आपले विश्व व्यावहारिक सत्ता आहे. परिवर्तनशील, अनित्य, विनाशोन्मुख आहे. ब्रह्म मात्र नित्य आहे.

आपल्या विश्वाबद्दल मस्क असेच काही म्हणतोय. पण त्याच्याकडील संकल्पना वेदांती वा बौद्ध नाहीत. त्यामुळे या विश्वाला ब्रह्म नामक बेस रिॲलिटीवरील अध्यास वगैरे म्हणायच्या भानगडीत तो पडणार नाही हे उघड आहे. (येथे वाळवंटात दिसणारे मृगजळ ही उपमा त्यामुळे योग्य नाही.) पण मग हे आहे तरी काय?

मस्क कृबुच्या क्षेत्रातील आहे. कृबुच्या साह्याने आपण हवे त्याचे सिम्युलेशन (Simulation) करू शकतो. म्हणजेच अधिष्ठानावर, बेस रिॲलिटीवर व्हर्च्युअल (Virtual Reality) करू शकतो.

मुद्दा असा आहे, की बेस रिॲलिटी म्हणजे दुसरे कोणते तरी विश्व असेल, आपल्याला अज्ञात व आपले विश्व हे तेथील रहिवाशांनी केलेले सिम्युलेशन असेल.

याचा अर्थ असा होत नाही का आपण कृबुच्या साह्याने जे सिम्युलेशन व्याज अनुकृती करतो ते सिम्युलेशनवरील सिम्युलेशन होय!

पण मग या सदृशीकरणाला, नकलेला अधिष्ठानभूत बेस रिॲलिटी कोणती?

कृबु क्षेत्राचा संबंध तत्त्वज्ञानाशी येतो तो असा!

----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com