Artificial Intelligence :कृत्रिम बुद्धिमत्तेवरही करावे लागतात भाषेचे संस्कार?

Robot
Robot esakal

भाषा नसती तर विचार नसता, कर्मेंद्रियांचाही वेगळा उपयोग करता आला नसता. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांची प्रगती झाली नसती. जगाला बदलून आपल्याला हवा तसा आकारही देता आला नसता. ‘तत्त्ववेत्त्यांनी जगाचा अर्थ लावला, मुद्दा जग बदलण्याचा आहे.’ हे कार्ल मार्क्सचे वचन जगप्रसिद्ध आहे.

तत्त्ववेत्त्यांनी जगाचा अर्थ लावताना भाषेचाच उपयोग केला हे वेगळे सांगायला नको. पण जग बदलताना जे कर्म करावे लागते तेसुद्धा विचारपूर्वक करावे लागणार. तेथे भाषेचाच वापर करावा लागणार हे तितकेच स्पष्टच आहे.

डॉ. सदानंद मोरे

विश्‍वाचे आर्तमध्ये महाभारतामधील इंद्र काश्‍यप संवादाचा संदर्भ यापूर्वी येऊन गेला आहे. एक कश्‍यपगोत्री ब्राह्मण जीवनाला उबगून, उद्वेगून आत्महत्या करायला निघतो तेव्हा मुंगसाच्या रूपातील इंद्र त्याला त्यापासून परावृत्त करतो, अशा प्रकारच्या कथेचा हा संदर्भ होता. हा मुंगूस काश्‍यपाला त्याच्या प्राणी नसण्याची आणि मनुष्य असण्याची आठवणवजा जाणीव करून देतो.

माणसाकडे असे काही आहे की जे प्राण्यांकडे नाही व त्यामुळेच माणूस प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ बनू शकला. ते म्हणजे हात आणि जीभ ही दोन इंद्रिये. हातांमुळे माणूस कर्म करू शकतो. कर्ता (Agent) बनू शकतो. कर्त्याच्या माध्यमातून जगाला आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो. जग बदलू शकतो. आपल्याला अनुकूल करून घेऊ शकतो.

परिस्थितीशी जुळवून घेणे, परिस्थितीनुसार आपल्यात बदल घडवून आणणे हे जगण्यासाठी व तगण्यासाठी आवश्‍यक असते. ते प्राणी करीतच असतात आणि मनुष्य हाही एक प्राणीच असल्यामुळे त्यालाही ते करावेच लागते. पण माणसाचे प्राण्यापेक्षा वेगळेपण जर काय असेल तर तो त्याचबरोबर परिस्थितीही बदलण्याचा प्रयत्न करू शकतो. कर्माच्या माध्यमातून. आणि त्याला हे करता येते कारण त्यासाठी त्याला दोन हात लाभले आहेत.

पण त्याला हे फक्त हातांनीच जमले असते का? तर अर्थातच नाही. हे जमले याचे कारण त्याचे जीभ नावाचे दुसरे एक इंद्रिय. आणि या ठिकाणी जीभ याचा अर्थ भाषा. (भाषेसाठी इंग्रजीत ‘Tongue’ आणि फारसीत ‘ज़बान’ शब्द प्रचलित आहेत, याची आठवण करून देतो.) भाषेतील शब्दाचे उच्चारण करण्यासाठी जीभ नावाच्या इंद्रियाचा उपयोग करता येणे, हे मानवाचे वैशिष्ट्य होय.

जरी मुळात जिव्हेंद्रिय चवीचे ज्ञान होण्यासाठी इतर प्राण्यांप्रमाणेच माणसातही उत्क्रांत झाले असले, तरी माणसाला त्याच्याकडून एक वेगळेच काम करून घेता येणे शक्य झाले. प्राण्यांना नाही. ते म्हणजे बोलण्याचे. म्हणजेच भाषा विकसित झाली. ती प्रारंभी फक्त ध्वनिरूपच होती. पुढे मानवानेच त्या भाषेतील ध्वनींना अक्षररूप दिले ते लिपीची निर्मिती करून. लिहून.

पण या लिहिण्याचे इंद्रिय कोणते तर अर्थातच हात. आधी दगडांवर, झाडांच्या सालींवर, पानांवर असे करता करता मानवाने कागद तयार केला व तो कागदावर लिहू लागला. आता कागदावर लिहिण्यासाठी आवश्‍यक असलेले साधन त्याने कसे तयार केले तर अर्थातच हातांनी. म्हणजे बोरू, टाक, पेन इ. ज्यांच्यासाठी ‘लेखणी’ हा शब्द वापरता येतो आणि जो या लेखणीच्या साहाय्याने लिहितो तो लेखक.

ज्ञानेश्‍वरीचा ‘सच्चिदानंदबाबा आदरे। लेखकु झाला’ तो या अर्थाने. ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी सांगितली, उच्चारली आणि ती सच्चिदानंदबाबांनी लिहून घेतली. या अर्थाने बाबा लेखक झाले. येथे ‘लेखक’ शब्द लेखनिक या अर्थाने वापरला गेला आहे. पण ज्याला हे स्फुरते त्याच्यासाठीही मराठीत ‘लेखक’ हा शब्द रूढ आहे. त्या अर्थाने ज्ञानेश्‍वर ज्ञानेश्‍वरीचे लेखक होत व सच्चिदानंदबाबा लेखनिक होत.

आता हीच जिज्ञासा पुढे नेऊन विचारता येईल, की ज्ञानेश्‍वरकाळात लिहिण्याचे जे साधन म्हणजे बोरू आणि लिहिण्यासाठी वापरण्यात येणारा द्रव पदार्थ मसि (किंवा शाई- फारसीत ‘सियाही’) कसा तयार झाला. उघड आहे. पाण्यात काही वनस्पतींच्या किंवा अन्य काळ्या रंगाच्या पदार्थाचे मिश्रण करून, खलवून.

हे खलविण्याचे-मिश्रण करण्याचे काम कोणी केले तर अर्थातच हातांनी. हातांनीच बाबूंची एक लहान कांडी तोडून आणली. तिला टोक केले. तिचा बोरू बनवला. तो हातांनीच तयार केलेल्या शाईत बुडवला व त्याच्या साहाय्याने हातांनीच तयार केल्या गेलेल्या कागदावर, उदाहरणार्थ ज्ञानेश्‍वरांच्या मुखातून उच्चारल्या गेलेल्या ध्वनिरूप शब्दांना सच्चिदानंदबाबांनी अक्षरात उतरवून काढले.

Robot
Artificial Intelligence म्हणजे काय रे भाऊ ? AI ची निर्मिती कधी झाली ?

समजा ज्ञानेश्‍वर नावाच्या लेखकाला सच्चिदानंदबाबा नावाचा लेखनिक उपलब्ध झाला नसता तर त्यांनी ज्ञानेश्‍वरीची रचना केलीच नसती का? अर्थातच केली असती कशी? तर त्यांनी सच्चिदानंदबाबांनी जे लिहून काढायचे काम केले ते स्वतःच केले असते. लेखक आणि लेखनिक या दोन्ही भूमिका त्यांनीच बजावल्या असत्या.

आता येथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. ज्ञानेश्‍वरी रचनेचे जे चित्र आपल्या डोळ्यांसमोर तरळते ते म्हणजे ज्ञानेश्‍वर नेवासा येथील मोहिनीराजाच्या किंवा महालसेच्या किंवा म्हाळसेच्या मंदिरातील सभामंडपात ज्याला पैसाचा खांब म्हणून ओळखले जाते त्याला टेकून बसले आहेत, त्यांच्या समोर सच्चिदानंदबाबा बसले आहेत. ज्ञानेश्‍वर ओव्या ‘डिक्टेट’करीत आहेत व बाबा लिहून घेत आहेत.

या ओव्या बाबांच्याबरोबरीने उपस्थित सर्व श्रोतेही ऐकत आहेत. ज्यांच्यात श्रीगुरू निवृत्तीनाथांबरोबर ज्ञानेश्‍वरांच्या सोपान आणि मुक्ताई ह्या भावंडांचाही समावेश आहे. (हे हृदयंगम चित्र राजारामशास्त्री भागवतांनी शब्दांत सांगितले व ते चित्ररूपाने पुण्यातल्या श्री गंधर्व-वेद प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या माझ्या चार भावंडे या चरित्रग्रंथाच्या मुखपृष्ठावर विराजमान झाले.)

सच्चिदानंदबाबा नसते तर (त्याचे सहज सुचणारे एक उत्तर त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाकडून तरी ते काम करवून घेतले गेले असते, हे बाजूला ठेवू) स्वतः ज्ञानेश्‍वरांनीच ज्ञानेश्‍वरी लिहून काढली असती हे गृहित धरले तर पुढचा मुद्दा स्पष्ट आहे. लिहिताना ज्ञानेश्‍वरांना ओव्यांचे मुखाने उच्चारण करायची गरज राहिली नसती. त्या त्यांना त्यांच्या विचारप्रक्रियेत सुचल्या-स्फुरल्या असत्या व त्यांनी त्यांचे उच्चारण न करता सरळ हाताने कागदावर उतरविल्या असत्या.

म्हणजेच भाषिक प्रक्रिया ही विचारप्रक्रिया आहे. विचार करणे आणि भाषेचा उपयोग करणे या जणू एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. नव्हे, त्या जवळजवळ एकरूप आहेत. एकच आहेत. या संदर्भात ग्रीक भाषेतील ‘लोगोस’ या शब्दाचा दाखला देता येईल.

लोगोसचा एक अर्थ विचार (त्यातूनच Logic शब्द निघाला) व दुसरा अर्थ शब्द. ‘In the beginning was the Word, and the Word was with God’ एवढे म्हणून बायबलचे समाधान झाले नाही. तिथे तेच वाक्य पुढे नेत भर घातली ‘and the Word was God.` (जॉन १ः१)

आपल्या अगदी जवळचा संदर्भ घ्यायचा, तर तुकोबा म्हणतात, ‘तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव’. संस्कृत परंपरेत ‘शब्दब्रह्म’ हा शब्द आढळतो. वाक्यप्रदीपकार भर्तृहरीने शब्दब्रह्माचे रूपक केले आहे. या शब्दब्रह्मावरच जगाचा विवर्त होतो -म्हणजे ते भासते अशी त्याची वेदांती भूमिका आहे. हा मुद्दा वेगळा. वेदवाङ्‍मयाचा उल्लेखही शब्दब्रह्म असाच केला जातो. ज्ञानेश्‍वरीत ओंकाराला शब्दब्रह्माचा वाचक समजून त्याला गणेशमूर्तीच्या रूपकाने नमन केले आहे.

Robot
Artificial Intelligence : बापरे! अपहरणासाठी झाला AI चा दुरुपयोग; आवाजाचे क्लोनींग करून...

शब्द, शब्दब्रह्म म्हणजे भाषा. मानवाला विचार करणे भाषेमुळेच शक्य झाले. तो भाषेतून म्हणा, भाषेने म्हणा, विचार करतो. भाषा हे विचाराचे साधन आहे आणि माध्यमही आहे. भाषेमुळे मानवाला केवळ स्थूल, दृश्‍य वस्तूंचा निर्देश करता येतो असे नसून अमूर्त विचार (Abstract), सूक्ष्मातिसूक्ष्म वस्तूंविषयी विचार करता येतो.

अणूचा व अणुगर्भातील इलेक्ट्रॉनप्रोटाॅनादींचाही. भाषा नसती तर विचार नसता, कर्मेंद्रियांचाही वेगळा उपयोग करता आला नसता. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांची प्रगती झाली नसती. जगाला बदलून आपल्याला हवा तसा आकारही देता आला नसता. ‘तत्त्ववेत्त्यांनी जगाचा अर्थ लावला, मुद्दा जग बदलण्याचा आहे.’ हे कार्ल मार्क्सचे वचन जगप्रसिद्ध आहे.

तत्त्ववेत्त्यांनी जगाचा अर्थ लावताना भाषेचाच उपयोग केला हे वेगळे सांगायला नको. पण जग बदलताना जे कर्म करावे लागते तेसुद्धा विचारपूर्वक करावे लागणार. तेथे भाषेचाच वापर करावा लागणार हे तितकेच स्पष्टच आहे.

मुंगसाच्या रूपात इंद्र काश्‍यपाला सांगतो त्याचा अर्थ हा असा आहे. हात आणि जीभ या इंद्रियांमुळे मानव प्राणिसृष्टीपासून वेगळाच नव्हे तर प्राणिसृष्टीमध्ये श्रेष्ठ झाला. म्हणजे कर्म आणि विचार यांच्यामुळे. पण ते दोन वेगळे नाहीत. विचाराने कर्माला दिशा मिळते, गती मिळते. विचार म्हणजे ज्ञान- पण मानवजातीच्या संदर्भात ज्ञान भाषेतून व्यक्त व्हावे लागते. ज्ञानेश्‍वर उगाच म्हणत नाहीत, ‘कर्माचे डोळे ज्ञान। ते निर्दोष होआवे।।’

भाषेचे इंद्रिय जसे जीभ- मग ते प्रतिकात्मक असेल किंवा प्रातिनिधिक (कारण त्यात स्वरयंत्रादिकांचाही समावेश होतो. सामान्य भाषेत त्याला ‘कंठ’ म्हटले जाते. पाठ करायच्या प्रक्रियेला ‘कंठस्थ’ करणे म्हणतात) तसे विचाराचे कोणते?

विचाराच्या इंद्रियाला बुद्धी म्हटले जाते (Reason) कधी ‘मन’ शब्दाचाही प्रयोग होतो. इंग्रजीत ‘to reason’ असे म्हणतात. मराठीत ‘विचारणे’ शब्द प्रश्‍न उपस्थित करणे या अर्थी वापरला जातो. पण तो अर्थसंकोच होय.

माणसाच्या अनेक व्याख्या प्रचलित आहेत. त्यात मानवशास्त्राच्या दृष्टिकोनातून केली गेलेली हत्यारे (टूल्स) बनविणारा प्राणी अशीही एक आहे. ही व्याख्या प्राथमिक मानवाला चपखलपणे लागू पडते. प्रारंभिक अवस्थेतील हत्यारे अगदीच ओबडधोबड असणार यात शंका नाही. त्यांच्यात सुधारणा होत गेली, हेही आपण जाणतो.

आधुनिक काळातील माणसाची व्याख्या करायची झाली तर त्याला यंत्र वापरणारा प्राणी म्हणायला हरकत नाही. भाषेच्याच संदर्भात विचार करायचा झाला तर मुद्रणयंत्रापासून करावा लागेल. मुद्रणामुळे तुमचा विचार असंख्य वाचकांपर्यंत पोहोचवता येऊ लागला. हळूहळू मुद्रणयंत्रातही विकास झाला.

शिलाछापखान्यांची जागा मुद्रा-अक्षरांच्या टाइपांनी- खिळ्यांनी घेतली. अलीकडे तर कॉम्प्युटरच्या साहाय्याने डीटीपी या तंत्रज्ञानाचा उदय झाला. दरम्यान, ‘झेरॉक्स’ मशिन आलेच होते. आता मोबाईल नावाच्या यंत्राने संदेशवहनाची क्रिया खूप सुलभ आणि सोपी झाली. स्थळकाळाची बंधने तुटल्यासारखी झाली. भाषा बोलून वापरण्याच्या यंत्रांचाही प्रादुर्भाव झाला. ध्वनिवर्धकामुळे आवाज दूरवर पोहोचवता येऊ लागला.

एकाच वेळी अनेकांनी ऐकावे अशी व्यवस्था उपलब्ध झाली. ध्वनिमुद्रणाचे यंत्र अस्तित्वात आले. मग ग्रामोफोन, नळकांड्या, तबकड्या, टेपरेकॉर्डर, सीडी, पेनड्राइव्ह इत्यादी. हा सारा यंत्रांच्या साहाय्याने भाषेचाच विस्तार होता. म्हणजेच भाषा या इंद्रियाचा, पण म्हणजेच बुद्धीचाही. विचाराच्या इंद्रियाच्या, भौतिकतेच्या भाषेत मेंदू नावाच्या इंद्रियाचा.

या सर्व व्यवहारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रादुर्भाव झाला तेव्हापासून एका नव्या क्रांतीलाच सुरुवात झाली म्हणता येईल. जोपर्यंत बाह्य कर्मेद्रियांची शक्ती वाढेल अशी पूरक यंत्रे उपलब्ध होत होती तोपर्यंत कोणाला कसली चिंता वाटण्याचा प्रश्‍नच नव्हता. इतकेच काय पण हृदयासारख्या शरीराच्या आतील भागाची क्षमता वाढवणारा पेसमेकर आला तेव्हाही ती स्वागतार्हच बाब ठरली. या सर्व गोष्टी कृत्रिमच होत्या.

कृत्रिम बुद्धिमत्ता मात्र गुणतः वेगळा प्रकार ठरला. आता बुद्धी हे विचाराचे इंद्रिय म्हटले आणि विचार व भाषा यांचा अन्योन्य संबंध लक्षात घेतला, तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा संबंध भाषेशीच येणार, हे स्वयंस्पष्ट आहे.

----

Robot
Ancient Dnyaneshwari : अमेरिकेत सापडली प्राचीन ज्ञानेश्‍वरी

वरकरणी मानवाच्या मानव होण्याच्या प्रक्रियेत विचार-भाषा-कर्म अशी त्रिपुटी दिसून आली, तरी विचार व भाषा यांचा संबंध लक्षात घेतला तर (विचार-भाषा) -कर्म असा कंसाने संक्षिप्त करता येतो.

थोडक्यात ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स -एआय, म्हणतो त्याचा संबंध भाषेशीच पोहोचतो आणि आता मूळ पदावर यायचे झाल्यास म्हणावे लागते की ट्युरिंगच्या परीक्षेची परीक्षा ही भाषेशी निगडित आहे. त्याचप्रमाणे सर्लचा चायनीज रूम विचारप्रयोग भाषेशीच निगडित आहे आणि क्रेट क्रॉफर्डच्या ऑक्टोपसचा संबंधही भाषेशी पोहोचतो.

हा मुद्दा वेगळ्या प्रकारे मांडायचा झाल्यास असे म्हणता येईल, की बुद्धिमत्ता आणि आजच्या संदर्भात कृत्रिम बुद्धिमत्ता भाषेशी अविभाज्यपणाने चिकटलेली आहे आणि दोन्ही माणसाच्या कर्माशी लगटून आहेत. त्यामुळे जेव्हा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची चर्चा होते, तेव्हा ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे विचारप्रक्रियेशी आणि कृतीशी निगडित असतेच असते.

सुरुवातीला कृत्रिम बुद्धिमत्तेची (कृबु) व्याप्ती फारतर त्वरेने आकडेमोड करणाऱ्या यंत्रापुरती होती. आता तशी परिस्थिती नाही. केवळ आकारिक गणिती भाषेच्या मर्यादा ओलांडून ती संगणकाच्या माध्यमातून सामान्य भाषेपर्यंत पोहोचली आणि तेथून रोबोंच्याद्वारे तिचा संबंध थेट कृतींशी येऊ लागला.

म्हणजेच मानव जे जे बोलतो/ लिहितो ते कृबुला बोलता/ लिहिता आले पाहिजे. येथून सुरुवात होऊन मानव जो विचार करतो तो तिला करता आला पाहिजे व तेथून शेवटी मानव जे कर्म करतो तेही करणे शक्य झाले पाहिजे, असा हा प्रवास आहे.

यातील ‘इंटेलिजन्स’ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. १९५६ साली डार्टमाऊथ येथे भरलेल्या परिषदेत ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला. या परिषदेची चर्चा स्वतंत्रपणे करावी लागेलच. पण येथे पाश्चात्त्य विचारविश्‍वात ‘रीझन’ शब्द मागे पडून ‘इंटेलिजन्स’ शब्द पुढे येणे हा शिफ्ट विचारात घ्यायला हवा. या परिषदेचा प्रस्ताव पुरेसा बोलका आहे.

‘‘An attempt will be made to find how to make machines use language, form abstractions and concepts, solve kinds of problems now reserved for humans, and improve themselves. … For the present purpose the artificial intelligence problem is taken to be that of making a machine behave in ways that would be called intelligent if a human were so behaving.’’

प्रस्तावातील behaviour शब्द महत्त्वाचा आहे. माणसाचे वर्तन हे intelligent असते असे म्हटल्यावर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा संबंध केवळ विचारापुरता आणि भाषेपुरता मर्यादित न राहाता एकूण वर्तनाशी, प्रत्यक्ष कृतीशीही पोहोचतो.

------

Robot
AI for Earning : क्रिप्टोमध्ये गमावली आयुष्यभराची कमाई; एआयच्या मदतीने पुन्हा कमावले एक कोटी रुपये!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com