संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन व कार्य

वारकरी संप्रदायाचे प्रणेते मानले जाणारे संत ज्ञानेश्वर, मराठी संत परंपरेतील शिरोमणी मानले जातात.
Sant Dnyaneshwar Maharaj Life & Work Information in Marathi
Sant Dnyaneshwar Maharaj Life & Work Information in Marathi Sakal

कुचेष्टेचा विषय ठरलेल्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे ज्ञानेश्वर व त्यांच्या तिन्ही भावंडांना आयुष्यभर समाजाकडून अवहेलनेचा सामना करावा लागला. मात्र त्याच्यासह त्यांच्या तिन्ही भावंडांनी भागवत संप्रदायाच्या परंपरेत आपले अढळ स्थान निर्माण केले. (Sant Dnyaneshwar Information in Marathi)

विठ्ठलपंतांचा विवाह आणि संन्यास

वारकरी संप्रदायाचे प्रणेते मानले जाणारे संत ज्ञानेश्वर(Sant Dnyaneshwar), मराठी संत परंपरेतील शिरोमणी मानले जातात. कुचेष्टेचा विषय ठरलेल्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे ज्ञानेश्वर व त्यांच्या तिन्ही भावंडांना आयुष्यभर समाजाकडून अवहेलनेचा सामना करावा लागला. मात्र त्याच्यासह त्यांच्या तिन्ही भावंडांनी भागवत संप्रदायाच्या परंपरेत आपले अढळ स्थान निर्माण केले. आज जवळपास ८०० वर्षांनंतरही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची विठ्ठल भक्ती तितक्याच अढळपणे जनजीवनात स्थान मिळवून आहे.

पुन्हा संसारात परतायचा गुरूंचा आदेश

त्यांचे वडील धार्मिक वृत्तीचे संस्कृत पंडीत विठ्ठलपंत कुलकर्णी (Vitthalpant kulkarni) हे वृत्तीनं विरक्त होते. त्यांना संन्यासाचा ध्यास होता. मात्र तत्कालीन सामाजिक रुढींनुसार आळंदीच्या श्रीधर पंतांच्या कन्या रुक्माई यांच्याशी त्यांचा विवाह झाला परंतु त्यांच्यातील संन्यासाचे मन गृहस्थाश्रमात रमेना. त्यामुळे त्यांनी घराचा त्याग करून काशीला रामानंद स्वामी (Ramanand Swami) या गुरूंकडून संन्यासाची दीक्षा घेतली. मात्र त्यांच्या गुरुंना त्यांच्या विवाहाविषयी कळताच त्यांनी विठ्ठलपंतांना पुन्हा वैवाहिक आयुष्यात परतण्याचा आदेश दिला.

चार आपत्यांचा जन्म (Family Of Sant Dnyaneswar)

गुरूंचा आदेश शिरोधार्य मानून विठ्ठलपंत पुन्हा संसाराला लागले. विठठलपंताचं संन्यास सोडून पुन्हा संसारात परतणं हा तेव्हाच्या समाजासाठी हेटाळणीचा विषय ठरलं. संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमात परतणं हा धर्मद्रोह असल्याचं तत्कालीन सनातनी ब्राम्हणवर्गाचं मत होतं. विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या कुटुंबाला समाजातून बहिकृत करण्यात आले. दरम्यान त्यांना निवृत्ती (Nivrutti) (इ.स.१२७३), ज्ञानेश्वर(Dnyaneshwar) (इ.स.१२७५), सोपान (Sopan) (इ.स.१२७७), व मुक्ताबाई(Muktabai) (इ.स.१२७९) ही चार आपत्ये झाली. या चार आपत्यांपैकी ज्ञानेश्वर हे एक. त्यांचा जन्म पैठण जवळीत अपेगाव या गावी झाला. अभ्यासकांत चारही भावंडांच्या जन्म वर्षाविषयी मतभेद आहेत.

‘संन्याशाची मुले’ म्हणून अवहेलना

विठठ्लपंतांच्या चारही मुलांना धार्मिक संस्कारही नाकारण्यात आले. मुलांच्या उपनयन (मुंज) विधीला आपल्या मृत्यनंतर तरी परवानगी मिळेल म्हणून विठ्ठलपंतांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. तरीही चारही भावंडांना आळंदीच्या ब्राम्हणांकडून शुद्धीपत्र मिळालं नाही, त्यांना वेदाध्ययनाचा अधिकार नाकारला. त्या नकारानंतर चारही भावंडांनी पैठणच्या ब्राम्हणांकडून तरी शुद्धीपत्र मिळेल या आशेनं पैठणचा(Paithan) मार्ग धरला.

पैठणला आले पण तिथंही कडवा विरोध

तिथं त्यांना शुद्धीपत्र मिळाले परंतु अपार विरोधाचा सामना करावा लागला. त्या संघर्षाच्या अनेक कथा मैखिक परंपरेनं आजपर्यंत टिकून आहेत. पाठीवर मांडे भाजल्याचा प्रसंग, असो किंवा वाघावरून सवारी करणाऱ्या संत चांगदेवांचे भिंत चालवून केलेले गर्वहरण असो... त्यातील रेड्याच्या मुखातून वेद (Ved)वदवल्यानंतर त्यांना शुद्धीपत्र देण्यात आल्याचा चमत्कार आजही सत्य मानला जातो. मुळात चारही भावंडं अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेची होती. विठ्ठलपंत स्वतः संसकृतचे पंडित असल्यानं त्यांनी आपल्या मुलांना धर्मशास्त्राचे शिक्षण दिले होते. थोरले बंधू निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना दीक्षा दिली.

आपले ज्ञान प्राकृत भाषेतून देण्याचा निश्चय

ज्ञानेश्वर व त्यांच्या तिन्ही भावंडांना श्रेष्ठ वर्णात जन्म घेऊनही वर्णाश्रमाचे चटके सोसावे लागले. त्यांनी घेतलेल्या अनुभवांतून जाती व्यवस्थेच्या मुळे हजारो वर्ष अशाच विषमतेचे चटके सोसत असलेल्या बहुजनांच्या दुःखाशी ते एकरूप झाले. आपले जीवनशास्त्रांचे ज्ञान बहुजनांनाही मिळावे म्हणून त्यांनी संस्कृत भाषेतील गीतेचे सार तत्कालीन प्राकृत या लोकभाषेतून देण्याचा निर्णय घेतला.

अशी झाली ‘ज्ञानेश्वरी’ची निर्मिती (Dnyaneshwari Information in Marathi)

मराठी भाषेतील सर्वात प्राचीन व सर्वोत्तम ग्रंथांतील एक म्हणून गणली जाणाऱ्या ‘ज्ञानेश्वरी’च्या लिखाणाला त्यांनी नेवासा येथे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी सुरुवात केली. यावरून त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्ता व प्रतिभेची कल्पना करता येते. ‘अमृतानुभव’(Amrutanubhav) आणि ‘भावार्थ दीपिका’(Bhavarth Deepika) हे अन्य दोन ग्रंथही त्यांनी लिहिले. शेकडो अभंग तसेच ‘विरहिणी’ (विराणी) हा काव्यरचना प्रकारही त्यांनी मराठी साहित्याला दिला.

आध्यात्माचे शिक्षण बहुजनांचा देखील अधिकार

आध्यात्माचे शिक्षण हा कुणा एकाचाच अधिकार नाही. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती आपला आध्यात्मिक विकास करू शकतो हा संदेश त्यांनी त्याकाळातील शोषितांच्या मनात जागृत केला. त्यामुळे आज वारकरी संप्रदायात अठरापगड जातींतल्या संतांचे अभंग व ग्रंथ आज आपल्या समोर आहेत. ज्या काळात वडिलांची चूक म्हणून ब्राम्हण असलेल्या भावंडांना शिक्षणाचा अधिकार नाकारणाऱ्यात आला, त्या कळात बहुजनांना कनिष्ठ जातींना, शिक्षणाचा कोणता अधिकार असणार? त्यामुळे केवळ ब्राम्हणांना येणारी संकृत ही ज्ञानभाषा ज्ञानेश्वरांनी नाकारली. बहुजन समाजाची भाषा असलेली सोपी प्राकृत भाषा त्यांनी बहुजनांची ज्ञानभाषा म्हणून वापरात आणली.

बहुजनांना भक्तीचा मार्ग ज्ञानेश्वरांनी खुला केला

त्यामुळेच केवळ भक्तीमार्गच नाही तर, वर्षानुवर्ष जातीव्यवस्थेचे दाहक अनुभव घेणाऱ्या बहुजन संतांना आपले अनुभव अभंगाच्या रुपात लिहून ठेवण्याचा मार्ग सापडला. आज आपल्याकडे असलेले वारकरी साहित्य ही केवळ धार्मिकच नाही तर समाजशास्त्राचा मोठा ठेवा आहे. वारकरी संप्रदायाचे प्रणेते म्हणून, बहुजनांच्या प्रकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहून बहुजनांना लिहितं करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे कार्याची उंची हिमालयापेक्षाही खूप मोठी आहे.

वारकरी संप्रदायाची स्थापना व तत्त्वज्ञान (Varkari Sampraday Information in Marathi)

चारही भावंडांनी आपलं पुढचं आयुष्य प्रवासात व्यतीत केले. हरिभक्तीचा सोपा मार्ग इतरांना सांगितला. त्या प्रवासातच पुढे संत नामदेवांशी(Sant Namdev) ज्ञानेश्वरांची भेट झाली आणि तिथून त्यांनी वारकरी संप्रदायाचे बीज लावले. पहाता पहाता त्याचा भागवत तत्वक्षानाचा कल्पवृक्ष झाला. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे प्रचारक होते. त्यांनी भारतभर वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान पोहचवले. वारकरी संप्रदायाच्या तत्त्वक्षान सोप्या पद्धतीनं सांगता येतं. वारकरी संप्रदार हा भक्तीमार्ग सांगतो. त्यात पांडित्य अपेक्षित नाही. तुमच्या अमच्या रोजच्या जगण्यातील अनुभव आणि त्यांचं ईश्वराशी असलेलं नातं सोप्या भाषेत वारकरी संप्रदाय सांगतो. रोजचं जगणं (परमार्थ) भक्तीरसानं जगावं हे ते तत्त्वज्ञान.

निर्वाण आणि वारीची परंपरा अव्याहतपणे सुरू (Pandharpur Vari)

मानले जाते की आपले या जगातील कार्य संपले याचा साक्षात्कार होऊन त्यांनी संजीवन समाधीचा निर्णय घेतला. १२९६ साली त्यांनी समाधी घेतली. त्यांची समाधी आजही आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरासमोर पाहता येते. आठशेहून अधिक वर्ष आषाढीकार्तिकी एकादशीला अवघा वारकरी संप्रदाय पंढरपुरला विठ्ठल-रुक्माईच्या भेटीला लोटतो... वारी हे जागतीक पातळीवरील समाजशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय ठरला आहे. त्यावरुनही संत ज्ञानेश्वरांच्या दूरदृष्टीची तत्त्ववेत्ता व समाजशास्त्रज्ञ म्हणून असलेल्या प्रतिभेची कल्पना करता येते.

(लेखक हे मुक्तपत्रकार असून त्यांची मतं वैयक्तिक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com