Meena prabhu
Esakal
डॉ. आशुतोष जावडेकर
तुम्ही काही पुनर्जन्म मानायचा नाहीत, पण प्रवासावर मात्र तुमचा विश्वास होता. माझा मेसेज धाडसानं प्रवास करत तुमच्या दोघांपर्यंत पोहोचेल का? नक्की पोहोचेल, असं माझं अंतर्मन सांगतं. अर्थात... अर्थात एव्हाना तुम्ही बहुधा स्वर्लोकीच्या प्रवासात असणार, तिथलं सौंदर्य टिपत असणार आणि लगोलग तुमच्या संगणकावर त्या प्रवासातली अद्भुतं नर्मविनोदी तऱ्हेनं शब्दबद्ध करत असणार!
मीना प्रभु. नावच मुळी किती सुंदर, अल्पाक्षरी, लयबद्ध! थेट मीनाताईंच्या अनेक प्रवासवर्णनांच्या पुस्तकांच्या शीर्षकांसारखं! नॉर्वेमधली चोवीस तासांची रात्र आणि आकाशात झगमगणारे नॉर्दन लाइट्स बघून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं शीर्षक काय असावं? - उत्तरोत्तर! हातात पुस्तक घेतल्यावर ते शीर्षक वाचूनच मी ‘क्या बात है!’ असं मोठ्यानं म्हटलो होतो! रामराज्य आपल्याला माहीत असतं, पण मीना प्रभु यांनी समस्त मराठीजनांना रोमराज्य दाखवलं! मेक्सिकोपर्व, दक्षिण रंग ही शीर्षकं तर छान होतीच, पण त्यांचं चिनी माती आलं, तेव्हा त्या अल्पाक्षरी सहजसौंदर्याविषयी खरा आदर वाटला होता - जसा खुद्द मीनाताईंबद्दल कायम वाटत आलाय!
त्यांची पुस्तकं तासनतास वाचत, मनानं अनेक अस्पर्शित किनाऱ्यांना भेट देत मी मोठा झालो. पुढे त्यांच्या लेखनावर समीक्षा लेखनही केलं. लंडनला गेलो असताना माझ्या यूट्यूबच्या प्रेक्षकांना मीनाताईंच्या माझं लंडन या पुस्तकाची ओळख थेट लंडनमधल्या त्या त्या ठिकाणांहून करून दिली. मीनाताई एवढ्याच आणि इतक्याच भेटल्या असत्या, तरी मला पुरेसंच होतं. लेखकाविषयी कुतूहल असतं हे खरं, पण अगदी तरुण वयातही मी एखाद्या लेखकाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी अतिउत्सुक नसे. एखाद्या पुस्तकातून जो लेखक मला लेखक दिसत असे, तो मला आवडत असे, त्याची माझी मैत्री असे. पण मीनाताई मात्र प्रत्यक्ष आयुष्यातही भेटल्या, भेटत राहिल्या. खूप वेळा नाही; मोजक्याच भेटी तसं बघायला गेलं तर. मोजक्या आणि गहिऱ्या! वरिष्ठ पिढीतील अनेक मराठी साहित्यिकांच्या आणि मीनाताईंच्या समक्ष भेटी अनेकदा झाल्या आहेत. त्या भेटींची रसभरीत वर्णनंदेखील मी ऐकली आहेत. पण मी लेखक आहे म्हणून मीनाताई मला भेटत नव्हत्या. खरंतर आमची ओळख झाली तेव्हा माझी त्यांच्याशी एक लेखक म्हणून ओळख नव्हती. आणि पुढे लेखक म्हणून पॅन-मराठी जगात माझी व्यापक ओळख झाली, ते त्यांना लक्षात आलं का नाही हेही मी कधी तपासलं नाही. बहुधा आलं नसावं. माझी कला मात्र त्यांना माहीत होती.
आणि जेव्हा त्या समोर असायच्या, तेव्हा त्यांनी कधी आखडती दाद दिली नव्हती. पाश्चात्त्य जनसंगीतावरचा माझा ‘लयपश्चिमा’ हा कार्यक्रम तेव्हा देशभर सुरू होता. एकदा पुण्यात खास टीनएजर मंडळींसाठी त्याचा एक वेगळा प्रयोग झाला होता. पुण्यातील अक्षरनंदन या शाळेच्या सभागृहात तो कार्यक्रम झाला, तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या अनेकांना माहीत नसावं, की सगळ्या गोंगाट करणाऱ्या टीनएजर मंडळींच्या मागे खुर्चीमध्ये जी थोडीफार जेष्ठ मंडळी बसली होती, त्यात मीनाताई आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे यजमान सुधाकर प्रभु हेही होते. त्यांचं पुण्यातील घर तिथून जवळच गणेशखिंड रोडपाशी होतं आणि म्हणून मी त्यांना मुद्दाम निमंत्रित केलं होतं. संपूर्ण कार्यक्रमभर फार जाणतेपणे ते दोघं दाद देत होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर तर दोघेही भरभरून आनंदी स्वरात मला आशीर्वाद देत होते. विशेषतः सुधू सरांनी पाश्चात्त्य संगीत बारकाईनं ऐकलेलं होतं. त्यामुळे त्यांना माझा कार्यक्रम बघताना अनेक संदर्भ आठवत गेले होते. त्यांच्या ओळखीचा एक ब्रिटिश गायक आहे, त्याचीही कुठलीशी आठवण त्यांनी ओघात तेव्हा सांगितली होती. मीनाताई फक्त कार्यक्रम बघत नव्हत्या, तर भारतातलं बदलतं टीनएजर विश्वही त्यांनी तितक्यात बारकाईनं समोर बघून घेतलं होतं. अर्थात तेव्हा त्या काही बोलल्या नव्हत्या. त्यांची ती निरीक्षणं त्यांनी मला नंतर केव्हातरी सांगितली होती.