Premium|Indian potato lunch recipes : चिप्सची कुरकुरीत भाजी अन् मसालेदार रस्सा; बटाट्याचे हे दोन पारंपारिक प्रकार नक्की ट्राय करा!

Potato Chips Bhaji Recipe Marathi : सणासुदीचे जेवण असो वा रोजचा बेत, बटाट्याशिवाय ताटाला पूर्णत्व येत नाही; घरच्या घरी सहज उपलब्ध साहित्यात बनवा खमंग 'बटाटा चिप्सची भाजी' आणि रस्सेदार 'मसालेदार बटाटा', दोन सोप्या आणि चविष्ट रेसिपीज.
Indian potato lunch recipes

Indian potato lunch recipes

esakal

Updated on

सुप्रिया खासनीस

भारतात सणासुदीचे जेवण असो वा रोजचे जेवण असो, बटाट्याशिवाय जेवणाच्या ताटाला पूर्णत्व येत नाही. बटाटा कोणत्याही चवीत, रूपात सहज मिसळून जातो. कधी रस्सा भाजी, कधी कुरकुरीत काचऱ्या, तर कधी साधी बटाट्याची भाजीही पोट आणि मन दोन्ही तृप्त करते. काही करायला सोप्या आणि चवीला अप्रतिम भाज्या...

बटाटा चिप्सची भाजी

वाढप

४ व्यक्तींसाठी

साहित्य

चार ते सहा लांबट आकाराचे बटाटे, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, २ चमचे तिखट, चवीनुसार मीठ व साखर, गरजेनुसार तेल, प्रत्येकी पाव चमचा हळद, हिंग व मोहरी, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती

प्रथम कच्चे बटाटे सोलून चिप्ससारखे किसून घ्यावेत व स्वच्छ धुऊन थोड्या तेलावर वाफवून घ्यावेत. जास्त शिजवू नयेत. चिप्स थोडे गार झाल्यानंतर तेलात तांबूस रंगावर तळावेत. आता कढईत तेल तापवून हळद, हिंग, मोहरीची फोडणी करावी. त्यात तळलेले बटाट्याचे चिप्स घालावेत. वरून तिखट, मीठ व साखर घालून चांगले परतावे. परतल्यानंतर भाजीत खोबऱ्याचा कीस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करावे. बटाटा चिप्सची भाजी तयार.

मसालेदार बटाटा

वाढप

४ व्यक्तींसाठी

साहित्य

पाव किलो बटाटे, २ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, २ चमचे तिखट, चवीनुसार मीठ, २ चमचे ओल्या खोबऱ्याचा कीस, प्रत्येकी पाव चमचा हळद, हिंग व मोहरी, २ चमचे गोडा मसाला किंवा गरम मसाला, थोडा गूळ व चिंच, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, गरजेनुसार तेल.

कृती

प्रथम बटाटे उकडून व सोलून त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. कढईत तेल तापवून हळद, हिंग, मोहरीची फोडणी करावी. फोडणीत चिरलेला कांदा घालून लालसर परतून घ्यावा. त्यानंतर बटाट्याच्या फोडी घालून परतावे. परतल्यानंतर त्यात तिखट, मीठ, गरम किंवा गोडा मसाला, गूळ व चिंच घालून भाजी नीट एकजीव करावी आणि मंद आचेवर शिजू द्यावी. एक वाफ आल्यानंतर पुरेसे पाणी घालून रस्सा दाट होईपर्यंत भाजी शिजवावी.

Indian potato lunch recipes
Weekend Special Recipe: कोथिंबीरमध्ये किसलेला बटाट घालून तर पाहा, तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ नाश्त्यात नक्की ट्राय करा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com