Ayodhya Ground Report: सुप्रीम कोर्टाचा निकाल ते प्राणप्रतिष्ठापना, अयोध्येत पाच वर्षात काय बदल झाले?

Ayodhya Ram Temple Ground Report: राममंदिरासाठी सुमारे पाचशे वर्षांहून अधिक काळ संघर्ष झाल्यावर श्रीराम मंदिराची निर्मिती होत आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirEsakal

मंगेश कोळपकर

अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना आणि नगरीच्या कायापालटाचा ग्राउंड रिपोर्ट

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या मंदिरात श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यांतील गावागावांतून पोहोचलेल्या शिलांच्या (विटा) बळावर राममंदिर साकारत आहे.

यानिमित्ताने विमानतळ, रेल्वे स्थानक, रिंग रोड आदी मूलभूत पायाभूत सुविधांमुळे अयोध्या आणि परिसराचा कायापालट होत आहे. त्यामुळेच जगाच्या नजरा अयोध्येकडे लागल्या आहेत.

अयोध्येतील रामजन्मभूमीबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिला. त्या दिवशी अयोध्येत सकाळपासूनच काहीसा तणाव होता. रस्त्यांवर अघोषित संचारबंदी दिसत होती. दुकाने, बाजारपेठा बंद होत्या.

चहाचे ठेलेही अर्धवट सुरू होते. हनुमान गढीजवळ प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची फक्त गर्दी होती. मात्र, त्यानंतर पुन्हा अयोध्येला गेलो तेव्हा प्रत्येकवेळी बदललेली अयोध्या दिसली. आता संपूर्ण अयोध्येत वातावरण राममय झालेले दिसते...

२६ डिसेंबर २०२३ची सकाळ. वेळ सकाळी सात वाजताची. कडाक्याची थंडी आणि धुके. हनुमान गढीजवळील रस्त्यावर पोहोचलो तेव्हा हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या जथ्यांची गर्दी झाली होती.

एवढ्या थंडीत आलेले ते भाविक स्वेटर, शाली, कानटोप्यांमध्ये स्वतःला गुरफटून घेऊन दर्शनासाठी जात होते. त्यांच्या पेहरावावरून ते ग्रामीण भागातून आल्याचे जाणवत होते. हनुमानाचे दर्शन घेऊन त्यांची पावले रामजन्मभूमीकडे वळत होती.

रामजन्मभूमीच्या पूर्वीच्या परिसरात गेल्या दोन वर्षांत मोठा फरक पडला आहे. विक्रेत्यांची दाटी, भिक्षेकऱ्यांची गर्दी, अरुंद रस्त्यावरचा पादत्राणांचा खच, उघडी गटारे, लोंबकळणाऱ्या वायरी हे पूर्वीचे चित्र संपूर्ण बदलले होते.

हनुमान गढीजवळचा रस्ता तब्बल ६० फूट रुंद झालेला दिसला. गटारे, वायरी भूमिगत झाल्या होत्या. अतिक्रमणे दूर झाल्यामुळे भाविक मोकळा श्वास घेताना दिसत होते. भिक्षेकऱ्यांची संख्या कमी झालेली. रस्ते स्वच्छ दिसत होते.

दुकाने आता एकसारखी झाली होती. त्यांची रंगसंगती, त्यावरील पाट्या या सगळ्यात एकसारखेपणा होता. त्यासाठी अयोध्या नगर निर्माण प्राधिकरणाने रस्त्यांचे, दुकानांचे ले-आउट सारखे केले होते.

वातावरणात बदलत असल्याचे चित्र होते. त्यामुळेच रामलल्लाचे दर्शन झाल्यावर भाविकांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगून जाणारे होते.

मंदिराचे बांधकाम सुरू असलेल्या जागेजवळ पोहोचलो तेव्हा विश्व हिंदू परिषदेचे उपमहामंत्री आणि श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कार्याध्यक्ष चंपत राय यांच्याशी भेट झाली. त्यांच्यासमवेत पदाधिकाऱ्यांचा ताफा होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही वरिष्ठ पदाधिकारीही त्यांच्या बरोबर होते. बोलता बोलता मंदिरांचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचलो. कडेकोट सुरक्षा व्यवस्था, चारही बाजूंना पत्र्याच्या उंच शेड. त्यामुळे आत बांधकाम कसे चालले आहे, हे बाहेरून समजणे अवघडच.

चंपत राय यांच्याबरोबर चर्चा करताना अशा भागात पोहोचलो, की तेथून क्षणार्धात मंदिराचे दर्शन झाले. उंच पायऱ्या, तीन टप्प्यांत सुरू असलेले मंदिराचे बांधकाम, त्याभोवती शेकडो कारागीर, परिसरात सुरू असलेली कामे पाहून अचंबित व्हायला झाले.

जेसीबी, वाळू-सिमेंटची वाहतूक, अधून-मधून उठणारे धुळीचे लोट, अशा वातावरणात श्रीराम मंदिर कसे असेल, परिसराचा विकास कसा होत आहे, नव्या मंदिर परिसरात न्यासाचे उपक्रम कोणते असतील, याची माहिती चंपत राय देत होते.

बांधकामाची सविस्तर माहिती देण्यासाठी अभियंतेही होते. मंदिराचा तळमजला, पहिला मजला २२ जानेवारीपर्यंत पूर्ण होऊन भाविक विनासायास दर्शन घेऊ शकतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मंदिराचे बांधकाम आणि परिसराचा विकास हे नंतरही काही काळ म्हणजे किमान दोन ते तीन वर्षे सुरू राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटकमधून मंदिरासाठी दगड येत असल्याची माहिती त्यांनी दिली तर, किती मनुष्यबळ कार्यरत आहे, अप्रत्यक्षपणे किती लोक कार्यरत आहेत, हेही ते सांगत होते.

मुख्य मंदिरात तळमजला, पहिला आणि दुसऱ्या मजल्यावर एकूण ३९४ खांब आहेत. प्रत्येक खांबावर बारा ते चौदा मूर्त्या असतील. असा एक खांब घडविण्यास तीन कुशल कारागिरांना किमान १५ दिवस लागतात.

ते हाताने मूर्ती घडवितात आणि त्यांचे काम आणखी किमान दोन वर्षे चालणार आहे, हे समजल्यावर मंदिराच्या भव्यतेचा नेमका अंदाज येतो

Ayodhya Ram Mandir
Ram Mandir Inauguration: 1,265 किलो लाडू प्रसाद, 400 किलोचं कुलूप अन् चावी; 'प्राण प्रतिष्ठे'साठी अयोध्या सज्ज!
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir : पुण्य पदरात पाडून घेण्याचा उद्या महत्त्वाचा दिवस, श्री राम विराजमान होतील तेव्हा नक्की करा या गोष्टी

मंदिर उभारणीची धामधूम सुरू असताना, श्रीराम जन्मभूमी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा म्हणजेच ‘रामपथी’चाही लक्षवेधी कायापालट झाला आहे.

चौदा किलोमीटरच्या या रस्त्यावर दुकाने, हॉटेले, बॅंका, एटीएम आदींचे ले-आउट सारखे दिसत होते.

एरवी बऱ्याचदा तीर्थक्षेत्र म्हटले, की गर्दी, अस्वच्छता, गोंगाट असे चित्र असते. परंतु, अयोध्या त्याला अपवाद ठरावी असा प्रयत्न सुरू असल्याचे दिसले.

न्यायालयाच्या निकालाच्या आदल्या दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबर २०१९ला ज्या रस्त्यावरून फिरलो होतो; ज्या ठिकाणी नाश्ता केला होता तो रस्ताही आमूलाग्र बदललेला दिसला.

ओळखीच्या खुणा शोधाव्या लागत होत्या. नया घाट परिसराचाही कायापालट सुरू असल्याचे दिसले. शरयू नदीतील पाण्याचा प्रवाह वळवून तो नया घाटातील कालव्यात आणण्यात आला आहे.

त्याभोवती विद्युत रोषणाई केल्यामुळे सायंकाळी बदलणाऱ्या रंगांची आकर्षक रंगाची सजावट भाविकांना पाहायला मिळते.

त्या रोषणाईत देशाच्या विविध भागांतून आलेले भाविक मोबाईलवरून सेल्फी काढत असल्याचे दिसून आले.

‘हायवे’वरून हनुमान गढीकडे जाताना शरयू नदीवरील पुलाजवळील चौकाला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. तेथील सजावटही अत्यंत लक्षवेधक आहे.

मंदिरात श्रीरामाची प्रतिष्ठापना झाल्यावर अयोध्येत रोज किमान दोन लाख भाविक येतील, असे गृहित धरून नियोजन आणि तयारी असल्याचे दिसून येत होते.

त्यासाठी पुनर्निर्माण झालेले अयोध्या धाम रेल्वे जंक्शन आणि नव्याने उभारण्यात आलेला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळही अयोध्या नगरीला साजेसा असाच बांधण्यात आला आहे. प्रवासी रेल्वे, विमानातून उतरल्यावर श्रीरामाची विविध प्रकारची रूपे प्रवाशांना पाहायला मिळतात.

लखनौ, वाराणसी आदी शहरांकडून येणाऱ्या रस्त्यांवरूनही अयोध्येत प्रवेश करताना शरयू नदीवरील प्रख्यात पुलावर रामायणातील प्रसंगांचे म्यूरल दिसतात.

त्यामुळे अयोध्येत प्रवेश करताक्षणीच भाविक बाह्यजगातून आपोआपच राममय वातावरणात पोहोचतात.

बावीस राज्यांनी अयोध्येत आपलेआपले भवन उभारण्यासाठी जागांचे प्रस्ताव देणे, १५० लहान-मोठ्या हॉटेलांची उभारणी, २७ वाहनतळ, ४० अन्नछत्र... ही सगळी तयारी म्हणजे कोणत्याही वर्गातील भाविक अयोध्येत पोहोचला तरी, श्रीरामलल्लाचे दर्शन त्याला सुलभ होईल, याचीच नांदी आहे.

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram mandir : विरोधकांचे ‘चलो अयोध्या’ प्राणप्रतिष्ठेनंतर; शरद पवार, केजरीवाल यांची भूमिका

अयोध्येतील कामे पूर्ण करण्यासाठी सगळ्याच यंत्रणा वेगाने कार्यरत आहेत. अयोध्या नगर विकास प्राधिकरण, राज्य सरकार, केंद्र सरकारचे अनेक वरिष्ठ अधिकारी सध्या अयोध्येत कार्यरत आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे तर गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने अयोध्येत येत आहेत.

कामांची पाहणी, अधिकाऱ्यांसमवेत बैठका, श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा असे त्यांचे स्वरूप असते.

मुख्य रस्त्यांवरील कामांविषयी चर्चा सुरू असतानाच अयोध्येचे खासदार लल्लू सिंह यांच्याशी भेट झाली. २००९ची लोकसभा निवडणूक गमावल्यानंतर २०१४ आणि २०१९ अशा दोन सलग निवडणुकांमध्ये ते निवडून आले.

अयोध्येचा गेल्या दशकभराचा इतिहास त्यांना अगदी मुखोद्‍गत आहे. काय-काय कामे सुरू आहेत, असे विचारल्यावर लल्लू सिंह खुलले आणि भरभरून बोलायला लागले.

‘‘अयोध्या हे जागतिक पातळीवर नावाजले जाईल असे तीर्थक्षेत्र होत आहे. त्यासाठीचा आराखडा, नगर नियोजन आदी कामे गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहेत. रस्त्यांच्या कामांना वेळ लागतो, हे लक्षात घेऊन त्यांचे नियोजन पहिल्या टप्प्यात करण्यात आले.

विमानतळ, रेल्वे स्थानक, रिंग रोड, उड्डाण पूल, पार्किंग लॉट, हेलिपॅड आदींची कामे आता पूर्ण झाली आहेत.

त्यामुळे जगातून येणाऱ्या पर्यटकांना एक बदललेली अयोध्या दिसेल.’’ रस्त्यांच्या नियोजनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोलाचे सहकार्य केल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

अयोध्या ही मंदिरे, मठ आणि साधूंची नगरी म्हणून ओळखली जाते. राममंदिरासाठी सुमारे पाचशे वर्षांहून अधिक काळ संघर्ष झाल्यावर श्रीराम मंदिराची निर्मिती होत आहे.

त्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी जोडलेल्या अन्य संस्थांचे अनेक वर्षांचे नियोजन होते.

उदाहरणच सांगायचे झाले, तर श्रीराम मंदिराच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होण्याच्या कितीतरी आधी म्हणजे १९९६मध्ये मुंबईतील एका बैठकीत विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल यांनी श्रीराम मंदिराचा उभारणीसाठीच्या दगडांचा रंग लालसर- गुलाबी (रेड- पिंक) असला पाहिजे, असे सांगितले होते आणि आता मंदिरही त्याच रंगात उभारले जात आहे, इतके हे नियोजन अचूक आहे.

जगाच्या नकाशावर श्रीराम मंदिर यावे यासाठी अयोध्येचा कायापालट करणे ही तशी अवघड बाब होती. आवश्यक तेथे मंदिर-मठांतील साधू, महंतांची समजूत घालून नव्या रूपात अयोध्या साकारणे, यासाठी स्थानिक महापालिका, अयोध्या नगर विकास प्राधिकरण, राज्य आणि केंद्र सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बदल होत आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यामुळे अनेक आव्हाने सहज पार झाली. त्यांनीच फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण चार वर्षांपूर्वी अयोध्या केले आणि तेव्हापासूनच अयोध्येच्या बदलाचे पर्व सुरू झाले.

-----------------------------

(A ground report on the inauguration of the Shriram temple in Ayodhya and the transformation of the city)

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir : "किती बदलली अयोध्या ?" रामायणमधील राम, सीता, लक्ष्मण पोहचले रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com