

Types of Biofuels and Their Uses
esakal
डॉ. योगेश शौचे
जैवइंधन ऊर्जा संक्रमणाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. अलीकडच्या वर्षांतील क्रिस्पर, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रांतील प्रगतीमुळे जैवइंधन हे एका साध्या पर्यायावरून ऊर्जा आणि पर्यावरणीय आव्हानांवरील एका अत्याधुनिक, बहुआयामी उपाय ठरू लागले आहे. यासाठी पुढील दशक निर्णायक ठरणार आहे. संशोधनातील सातत्यपूर्ण गुंतवणूक, पूरक धोरणे आणि शाश्वततेच्या मुद्द्यांकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास जैवइंधन हा भविष्यात स्वच्छ ऊर्जेकडे नेणारा खात्रीचा मार्ग ठरेल.
गेल्या पाच दशकांत जागतिक ऊर्जा मागणीत जवळपास अडीचपटींनी वाढ झाली आहे. त्यामागे लोकसंख्यावाढ, औद्योगिकीकरण, शहरांचे विस्तारिकरण, वाढते उत्पन्न आणि तांत्रिक प्रगती अशी अनेक कारणे आहेत. या मागणीचा मोठा भाग जीवाश्म इंधनांद्वारे पूर्ण केला जात असला, तरी हवामान बदल, वायू प्रदूषण आणि ऊर्जासुरक्षा यांबाबतच्या चिंतांमुळे शाश्वत पर्यायांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला वेग मिळाला आहे. त्यामुळे, नूतनीकरणक्षम जैविक स्रोतांपासून मिळणारे ‘जैवइंधन’ (Biofuel) जागतिक ऊर्जा परिवर्तनातील एक महत्त्वाचा घटक म्हणून समोर आले आहे. जिथे द्रवइंधने आजही अपरिहार्य आहेत अशा क्षेत्रामध्ये जैवइंधन एक महत्त्वाचा पर्याय म्हणून पुढे येत आहे.
जैवइंधन म्हणजे पिके, शेतीतला उरलेला कचरा, जंगलातील बायोमास, शैवाल आणि सेंद्रिय कचरा यांसारख्या जैविक पदार्थांपासून मिळवलेले अक्षय्य ऊर्जावाहक. जीवाश्म इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागतात; त्याउलट जैवइंधन अशा अक्षय्य संसाधनांपासून तयार केले जाते, जे तुलनेने कमी काळात पुन्हा तयार होऊ शकते. म्हणूनच हे इंधन शाश्वत ऊर्जेकडे होणाऱ्या संक्रमणाचा एक महत्त्वाचा घटक आहे.
जैवइंधने अनेक रासायनिक प्रकारांमध्ये येतात आणि प्रत्येक प्रकाराची निर्मिती व वापर थोडा वेगळा असतो. इथेनॉल आणि मिथेनॉलसारखी अल्कोहोल, वनस्पतींमधील शर्करांचे किण्वन करून तयार केली जातात आणि ती गाड्यांसाठी पेट्रोलमध्ये मिसळली जाऊ शकतात. बायोडिझेल हे वनस्पती तेल किंवा प्राण्यांच्या चरबीचे फॅटी-ॲसिड एस्टरमध्ये रूपांतर करून तयार केले जाते आणि डिझेलप्रमाणे वापरले जाते. रिन्युएबल डिझेलसारखे इंधन तेले किंवा वायुरूपात परिवर्तन केलेल्या बायोमासपासून केलेले सुधारित हायड्रोकार्बन इंधन आहे; ते डिझेल किंवा जेट इंधनाची जागा घेऊ शकते. बायोगॅस हा सुधारित बायोमिथेन कचऱ्यावर जैविक प्रक्रिया करून तयार केला जातो आणि नैसर्गिक वायूप्रमाणे जाळला जाऊ शकतो. पायरोलिसिस तेल हे बायोमासला जलद गतीने गरम करून तयार केलेले एक दाट, ऑक्सिजन-समृद्ध द्रव आहे. इंधन म्हणून वापरण्यासाठी त्यावर पुढील शुद्धीकरण करणे आवश्यक असते. सिनगॅस हे बायोमासच्या वायूकरणातून मिळणारे हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साइडचे मिश्रण आहे आणि त्याचे द्रव किंवा हायड्रोजनमध्ये रूपांतर केले जाऊ शकते. बायोहायड्रोजन हा इंधन पेशींपासून (फ्युएल सेल्स) जैविक किंवा औष्णिक-रासायनिक मार्गांनी तयार केलेला हायड्रोजन. मेदाम्ले/तेले पुरविणाऱ्या शैवालावर (Algae) प्रक्रिया करून वरीलपैकी अनेक इंधने करता येतात. प्रत्येक प्रकार त्याच्या निर्मितीच्या पद्धतीत, ऊर्जा-घनतेत आणि तो कोणत्या इंजिन किंवा पायाभूत सुविधांसोबत काम करतो, याबाबतीत भिन्न असतो.