
नरेंद्र चोरे
हुडकेश्वर येथे राहणाऱ्या ईश्वरीचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबातला. वडील जिल्हा परिषदेत संगणक ऑपरेटर, आई गृहिणी. आई सहा महिन्यांची गरोदर असतानाच ईश्वरीचा आणि तिच्या जुळ्या भावाचा, इशांतचा प्रिमॅच्युअर जन्म झाला. जन्मतः दोघांचंही वजन कमी असल्यामुळे दोन-अडीच महिने कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला. इंजेक्शनद्वारे दूध पाजावे लागे. इशांत हळूहळू बरा झाला. मात्र उपचारांदरम्यान कॉम्प्लिकेशन्स झाल्याने ईश्वरीच्या दोन्ही डोळ्यांच्या रेटिना खराब झाल्या. तिची दृष्टी परत यावी म्हणून वडिलांनी खूप प्रयत्न केले. चेन्नईतील हॉस्पिटलमध्ये उपचार केले; मात्र काहीच फायदा झाला नाही. ईश्वरी कायमची दृष्टिहीन झाली. तेव्हा अंधःकारमय वाटणाऱ्या ईश्वरीच्या आयुष्यात स्वीमिंगच्या रूपात आशेचा किरण येणार आहे हे तेव्हा कोणालाच माहीत नव्हते.