

Marathi book review
esakal
सविता कुरुंदवाडे
पुस्तकात विविध विषयांवरचे इतर विनोदी लेख असले, तरी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरातील फोलपणा अचूक दर्शवणारे सुरुवातीचे चार लेख महत्त्वाचे आहेत. शीर्षकलेखासह ‘फेस फसफसे फेसबुकी’, ‘फेसबुकी तर प्रसिद्ध आम्ही’ आणि ‘आमच्या सोशल मीडियाचा आढावा’ या लेखांमधून लेखकाने जीवनातील हास्यास्पद घटना ज्या पद्धतीने शोधून विनोदी शैलीने मांडल्या आहेत, त्या खाडकन डोळे उघडवणाऱ्या आहेत.
सद्यःस्थितीत बहुसंख्य मंडळी मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. आभासी दुनियेत रमली आहेत. या दुनियेत आवडले हे सांगण्यासाठी ‘लाइक’च्या अंगठ्याचा उपयोग होतो. ही वस्तुस्थिती अचूक हेरून त्यातील विनोद तांबोळींनी शोधला. पुढे त्यांच्या स्वप्नात कधीतरी द्रोणाचार्य आले, आणि ‘अंगठा, लाईक आणि द्रोणाचार्य’ या शीर्षकाची धमाल विनोदी कथा तांबोळींनी लिहिली, असे लेखक मनोगतामध्ये म्हणतात.
सोशल मीडियाच्या दुनियेत फ्रेंड्स आणि फॉलोअर्स अशा आभासी गोतावळ्यावर लोकप्रियतेचा निकष ठरतो. तांबोळींनाही पाच हजार फ्रेंड्स आणि साडेसहा हजार फॉलोअर्स लाभलेत असे ते म्हणतात. ही मंडळी पुस्तके विकत घेत नसली, तरी जो कोणता मजकूर तांबोळी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर प्रसारित करतात, त्या विनोदी मजकुराला ही मंडळी लाइकरूपी अंगठा वापरून दाद देतात. कधीकधी म्हणे पुन्हा त्याच अंगठ्याने कॉमेंट करून प्रोत्साहनही देतात. अंगुष्ठीमय झालेले घरोघरीचे प्रेक्षकरूपी वाचक बघून पुढे तांबोळीनी या अंगुष्ठीतत्वाचा जेव्हा शोध घेतला, तेव्हा त्यांना अंगठा म्हणजे शष्ठमहाभूत असल्याचे जाणवले. भविष्यात आपलाही उल्लेख अंगुष्ठीसाधक असा व्हावा, ही भावना त्यांनी नव्या पुस्तकातील पहिल्याच कथेत व्यक्त केली आहे. पुढे त्यांचे हे पुस्तक विनोदासाठीचे अकल्पित विषयवैविध्य घेऊन प्रसन्न विनोदाच्या दिलखुलास दुनियेत आपल्याला सोबत फिरवते.