मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त)
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वयंभूत्व अतुलनीय होते. महाराज स्वराज्याचे नृपती होते, परंतु त्याचबरोबर जागतिक दर्जाचे स्वयंभू सेनापती होते. शिवाजी महाराजांच्या मराठा सेनेचा वारसा बाजीराव पेशव्यांना मिळाला. दोघेही अभिनव आणि चाकोरीबाहेरच्या स्वयंनिर्मित रणनीतीचे शिल्पकार होते.
भारताच्या सैनिकी इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेलेले दोन संग्राम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विजापूरचा सरदार अफझलखानाबरोबरचे प्रतापगड युद्ध आणि पहिल्या बाजीराव पेशव्यांचे दक्षिणेतील अग्रगण्य मोगल सरदार निजामाशी झालेले पालखेड युद्ध.
या दोन्ही युद्धांतील रणनीतीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीच्या युद्धतज्ज्ञांनी घेतलेली आहे. दोन्ही बाजूंची प्रचंड मनुष्यहानी आणि शस्त्रविध्वंस करून जिंकलेली युद्धे पथदर्शक समजली जात नाहीत. उलट शक्तीपेक्षा युक्तीने आणि सेनापतीच्या कुशल बुद्धिमत्तेवर मारलेली बाजी मननशील आणि साक्षेपी ठरते.
भावी सैनिकी पिढ्यांसाठी ही युद्धे मार्गदर्शक असतात आणि लष्करी प्रशालांत कसून अभ्यासली जातात. अगदी याच कारणासाठी जगभरातील अनेक सैनिकी विद्यापीठांत प्रतापगड आणि पालखेड संग्रामांची पारायणे होत राहतात. या संग्रामांच्या विविध पैलूंवर अनेक प्रबंधही लिहिले गेले आहेत.