

Climate Change in India
esakal
भारतामधील उष्णतेची लाट, त्यानंतर भर जून-जुलैमध्ये तप्त हवामानाने केलेली अंगाची लाही-लाही यांमुळे भारतीयांना वैश्विक तापमानवाढीचे परिणाम आपल्या दारात आल्याची जाणीव नक्कीच झाली असणार. त्याच्या जोडीला लांबलेला मॉन्सून व पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण पाहता हा प्रश्न गंभीर आहे, याबद्दल कोणाचेच दुमत राहिले नसावे! हवामान बदल हा आता केवळ पर्यावरणाचा विषय राहिलेला नाही; तो अर्थव्यवस्था, आरोग्य, शेती, रोजगार आणि राष्ट्रीय विकासाशी निगडित प्रश्न झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘क्लायमेट चेंज इन द इंडियन माइंड - २०२५’ या अहवालाने भारतीय नागरिकांच्या हवामान बदलाविषयीच्या धारणा, चिंता आणि अपेक्षांचे महत्त्वपूर्ण चित्र समोर आणले आहे. या अहवालानुसार भारतीय समाजात हवामान बदलाबाबत जागरूकता वाढत असली, तरी त्या समस्येवर प्रभावी कृती करण्यासाठी शासन, उद्योग आणि नागरिक या तिन्ही स्तरांवर अधिक समन्वयाची गरज आहे.
या अहवालातील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे हवामान बदलाच्या कारणांबाबत भारतीयांची समज वाढत आहे. ५८ टक्के नागरिकांनी जीवाश्म इंधनांचा वापर, जंगलतोड आणि औद्योगिकीकरण हे जागतिक तापमानवाढीचे प्रमुख कारण असल्याचे मान्य केले. हा आकडा २०२३च्या तुलनेत वाढलेला असून वैज्ञानिक माहिती समाजापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचत असल्याचे तो दर्शवितो.