चित्रपटांमधील कलाकारांच्या कपड्यांचाही होतो एवढा विचार? ऋतू, स्वभाव आणि व्यक्तिमत्वाचाही होतो अभ्यास

यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतरच राष्ट्रीय पुरस्कारांना सुरुवात
costume design in films
costume design in filmsesakal

वेशभूषाकारांचे काम नावीन्यपूर्ण फॅशन रूढ करण्यापलीकडे बरेच काही असते. वेशभूषाकाराला चित्रपटाच्या काळाचा, चित्रपटकथा जिथे घडते त्या ठिकाणाचा अभ्यास करावा लागतो, पात्राच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करावा लागतो.

सुहास किर्लोस्कर

प्रत्येक चित्रपटाची कथा एका काळामध्ये घडते. त्या काळानुसार चित्रपटातील पात्रांची वेशभूषा असते. त्यापलीकडे जाऊन वेशभूषाकार काही भाष्य करत असतात जे चित्रपट दिग्दर्शकाच्या व्हिजनबरोबर मेळ साधणारे असते.

गांधी चित्रपटामध्ये बहुतांश वेळा पांढऱ्या रंगांची वेशभूषा वापरण्यात आलेली आहे. चित्रपटाची मांडणी ज्या संयत पद्धतीने केली आहे, त्याचा विचार करता या चित्रपटामध्ये भडक रंगाचे कपडे वापरल्यास ते आपल्याला विचित्र वाटेल.

गाइड चित्रपटाच्या सुरुवातीला नायकाचा (देव आनंद) शर्ट पांढऱ्या रंगाचा आहे. राजू गाइड नायिकेला (वहीदा) नृत्याची आवड जोपासण्यास सांगतो, तिच्या कार्यक्रमांचे आयोजन करतो, तिला प्रसिद्धी मिळवून देतो आणि त्यामधून मिळणाऱ्या पैशांचा मोह त्याला आवरता घेता येत नाही.

एकवेळ अशी येते जेव्हा नायिका रोझीला त्याचा उबग येतो. तो क्षण गहिरा करून दाखवताना दिन ढल जाये हाय, रात न जाय... हे गाणे चित्रित केले आहे. त्यावेळी वहीदाचा नाईट गाऊन पांढऱ्या रंगाचा आहे आणि देव आनंदच्या शर्टाचा रंग काळा आहे.

पिया तोसे नैना लागे रे... गाण्यामध्ये प्रत्येक कडव्याला ऋतू बदलतो, त्यामुळे त्या गाण्याच्या कडव्याला आनुषंगिक वेशभूषा वहीदाला देण्यात आली. मोसे छल किये जा... या गाण्यामध्ये रागावलेल्या वहीदाचा ड्रेस लाल भडक रंगाचा आहे.

भानू अथैय्यांसारखे वेशभूषाकार अनेक गोष्टींचा विचार करतात आणि चित्रपट बघताना प्रेक्षकांच्या मनावर त्याचा परिणाम जाणते-अजाणतेपणाने होत असतो. जे जे स्कूल ऑफ आर्ट्‌सच्या पदवीधर असलेल्या भानू अथैया यांनी सी.आय.डी चित्रपटापासून करिअरची सुरुवात केली.

प्यासा, साहेब बिवी और गुलाम, गाइड, यादों की बारात, वक्त पासून लगान – स्वदेसपर्यंत अनेक चित्रपटांची वेशभूषा केलेली आहे.

परंतु सर्वसामान्य चित्रपट रसिकांना भानू अथैया हे नाव त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतरच समजले.

तोपर्यंत म्हणजेच १९८३पर्यंत वेशभूषेकरीता राष्ट्रीय पुरस्कार किंवा फिल्मफेअर पुरस्कार दिला जात नव्हता. ऑस्कर पुरस्कारानंतर सात वर्षांनी भानू अथैया यांना लेकिन चित्रपटासाठी वेशभूषेचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

कथेनुसार बदलणारे कपडे

चित्रपटाच्या धाटणीप्रमाणेच चित्रपटाची कथा ज्या पद्धतीने वळण घेते त्यानुसार त्या पात्रांच्या कपड्याचे रंग बदलू शकतात. दिवार चित्रपटामध्ये नायक विजय (अमिताभ) हमाल आहे त्यामुळे त्याचा निळा ड्रेस इतर हमालांप्रमाणे आहे आणि त्याच्या गळ्यात दोरखंड दिसतो.

विजय हक्कासाठी लढतो आणि डावरकडे (इफ्तिकार) त्याला काम मिळते. त्या भेटीच्यावेळी विजयचा शर्ट निळा आहे, परंतु त्याच्या गळ्यात दोरखंड नाही. ‘मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता’ म्हणणाऱ्या विजयला ‘डावर साहब’ कडे अनेक कामे मिळतात, त्याचे पैसे मिळतात.

काळाबरोबर विजयचा शर्ट बदलत जातो आणि त्याची श्रीमंती कपड्यावरून दिसत राहते. ज्या इमारतीच्या बांधकामावर आईने काम केले, ती इमारत आईकरीता खरेदी करणाऱ्या विजयच्या डोळ्यावर गॉगल आहे, ज्यामध्ये इमारतीचे प्रतिबिंब दिसते.

त्रिशूल चित्रपटामध्ये कथा पुढे सरकते त्यानुसार नायक विजयची श्रीमंती त्याच्या कपड्यांमधून दिसत राहते. जोकर चित्रपटामध्ये नायकाची (जॅक्विन फिनिक्स) आर्थिक स्थिती बेताचीच आहे. तरीही त्याचे कपडे प्रसंगानुसार कसे बदलले आहेत, ते अभ्यास करण्यासारखे आहे.

मार्क ब्रिज यांनी जोकर चित्रपटाचे प्रॉडक्शन आणि कॉस्च्युम डिझायनर या नात्याने जोकरला किरमिजी (गडद तपकिरी छटा असलेला लाल रंग) रंगाची पँट आणि जरा जास्तच लांब असलेला कोट दिला; उद्देश जोकरचा आत्मविश्वास कपड्यांतून दाखवण्याचा होता.

अशा सुटा-बुटात जोकर रॉबर्ट द निरो समोर बसून मुलाखत देतो आणि आपल्या मनाप्रमाणे कृती करतो, त्याचे सूतोवाच कपड्यांमध्ये केले आहे.

मार्क ब्रिज यांनी जोकरच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा विचार करून त्याला राखाडी, निळ्या, लाल रंगाचे परंतु स्वच्छ धुतल्यासारखे न दिसणारे कपडे परिधान करण्यासाठी डिझाईन केले.

आर्थिक स्थितीनुसार कपडे

प्रॉडक्शन डिझाईन टीम ज्याप्रमाणे चित्रपटाची थीम, चित्रपटाचा मूड, प्रत्येक प्रसंगाकरिता चित्रपटाचे लोकेशन, सेटवर कोणकोणते प्रॉप असावेत या सर्व बाबींचा विचार करते त्याप्रमाणेच चित्रपटातील प्रत्येक पात्रांच्या वेशभूषेवर बराच विचार केला जातो.

प्रश्न प्रत्येक पात्र कोणत्या प्रकारची आणि रंगाची वेशभूषा वापरेल एवढाच नसतो तर प्रत्येक प्रसंगानुसार ती वेशभूषा कशी बदलेल, वेशभूषेमधून काही सांगायचे आहे का, अशा अनेक बाबी विचारात घेतल्या जातात.

टायटॅनिक चित्रपटामध्ये नायक लिओनार्दोची वेशभूषा त्याच्या आर्थिक स्तरानुसार आहे आणि बोटीवरील पार्टीकरिता तो जेव्हा श्रीमंत लोकांसारखा सूट परिधान करतो, त्यावेळी तो तितकाच अवघडलेला दाखवला आहे.

टेबलवर जेव्हा कोणी सिगार पेटवण्यासाठी लाइट शोधतो, त्यावेळी लिओनार्दो पटकन आपल्या खिशातील काडेपेटी काढून देतो. नायक गरीब असला तरी राज कपूरच्या चित्रपटातील गरीब नायकाचे कपडे श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील गरीब नायकापेक्षा वेगळे असतात कारण श्याम बेनेगल यांचे चित्रपट वास्तवाच्या जवळ जाणारे असतात.

श्याम बेनेगल यांनी भारत एक खोजमध्ये दाखवलेले रामायण आणि महाभारत, रामानंद सागर आणि बी.आर. चोप्रा यांच्या सिरीयलपेक्षा कमी ग्लॅमरचे पण उच्च दर्जाचे आहे. शोले चित्रपटापूर्वी डाकूंची वेशभूषा ठरावीक असायची.

शोले चित्रपटामधल्या गब्बरची वेशभूषा त्या काळाचा विचार करता मॉडर्न होती. डाकू धोतर बदलून फूल पँटमध्ये प्रथमच दिसला.

परंतु जय-विरू आणि ठाकूर यांचे कपडे पूर्ण चित्रपटात एकदाही बदलले नाहीत, हे विशेष. जय-विरू रोज कपडे रात्री धुऊन सकाळी तेच कपडे पुन्हा परिधान करत असावेत, बहुतेक.

वेशभूषा करताना चित्रपटाच्या बजेटचाही विचार केला जातो. हृषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांमध्ये कलाकारांना बरेचवेळा स्वतःचे कपडे परिधान करावे लागायचे.

त्यामुळे जुर्माना आणि बेमिसाल चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चनचा एकच शर्ट दिसतो. अर्थात काहीवेळा गफलत झाल्यामुळे असेल कदाचित चलो सजना..., साथिया नही जाना..., झिलमिल सितारों का आंगन होगा... या तीन वेगवेगळ्या चित्रपटांमधील गाण्यांमध्ये धर्मेंद्रचा एकच शर्ट दिसतो.

दिग्दर्शकाचे व्हिजन

वेशभूषाकारांचे काम नावीन्यपूर्ण फॅशन रूढ करण्यापलीकडे बरेच काही असते. परिंदा चित्रपटामध्ये नायक (अनिल कपूर) आणि नायिका (माधुरी दिक्षित) यांची मने जुळतात त्यावेळी नायकाचा शर्ट आणि नायिकेची ओढणी एकाच रंगाची (पिवळ्या) आहे.

परंतु खलनायक आण्णाच्या गँगमध्ये नायक सामील होतो त्यावेळी त्याचा शर्ट काळ्या रंगाचा आहे. तमीळ चित्रपटामधून हिंदीमध्ये पदार्पण केल्यानंतर श्रीदेवीने चांदनी चित्रपट स्वीकारला, त्यावेळी शूटिंग सुरू असताना चित्रपटातील तिच्या पांढऱ्या रंगाची वेशभूषा बघून श्रीदेवी नाराज झाली (वेशभूषा भानू अथैया).

परंतु यश चोप्रा यांनी आग्रह धरला. तो किती बरोबर होता ते श्रीदेवीला चित्रपट यशस्वी झाल्यानंतर उमजले.

खुशबू चित्रपटामध्ये नायिकेला कॉटनच्या साड्या नेसण्यास वेशभूषाकार मिता हसन आणि दिग्दर्शक गुलजार यांनी सांगितल्यावर हेमामालिनी नाराज झाली. त्याचप्रमाणे तिला मेकअप काढून टाकण्यास सांगण्यात आले होते, जे त्यावेळी तिला पटले नव्हते.

जैसा देस, वैसा भेस

वेशभूषाकाराला चित्रपटाच्या काळाचा, चित्रपटकथा जिथे घडते त्या ठिकाणाचा अभ्यास करावा लागतो, पात्राच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करावा लागतो. भारतामधील विविध राज्यांमधील पोलिसांचा युनिफॉर्म वेगवेगळा असतो.

डोर चित्रपट राजस्थानमध्ये घडतो त्यामुळे त्या चित्रपटातील पात्रांच्या वेशभूषा आपल्याला त्या वातावरणात घेऊन जातात.

वेगवेगळ्या राज्यातील स्त्रिया साडी वेगळ्या पद्धतीने परिधान करतात. युवा चित्रपट बंगालमध्ये घडतो त्यामुळे लल्लनच्या (अभिषेक) पत्नीची (राणी मुखर्जी) वेशभूषा बघितल्यावर आपण मनाने कोलकात्यामध्ये पोहोचतो.

लल्लनचे शर्ट भडक रंगाचे आहेत, जे त्याच्या स्वभावाला अनुसरून आहेत. विवेक ओबेरॉय कॉलेजमधला तरुण आहे, त्याचा वेश त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसा आहे. तो नायिका करिना कपूरला म्हणतो, ‘जबसे तुम्हे मिला हुं, कलकत्ता भी साफ सुथरा लगने लगा है’. त्यावेळी करिना कपूरचा वेश पांढरा आहे.

मायकेलची (अजय देवगण) वेशभूषा समजूतदार मॅच्युअर परंतु बंडखोर युवकाची आहे. सत्या चित्रपटामध्ये भिकू म्हात्रे साकार करताना मनोज वाजपेयी यांनी मुंबईत फेरीवाल्याकडून भडक शर्ट खरेदी केले होते, तर शेफाली शाह यांनी आपल्या महाराष्ट्रीय आईच्या सल्ल्याने साड्या वापरल्या. भिकू म्हात्रे आपल्या पत्नीसह सत्या आणि त्याच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो तेव्हा त्यांच्या दृष्टीने सभ्य असणारे म्हणजे अधिकच भडक कपडे मनोज वाजपेयी आणि शेफाली शाह यांनी परिधान केल्याचे जाणवते. सत्याच्या शर्टाच्या शेड काळ्या रंगाशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत. सत्या ज्यावेळी विद्याला सांगतो की तो अनाथ आहे, त्यावेळी तो खरे बोलत असतो त्यामुळे त्याचा शर्ट पांढरा शुभ्र आहे. (वेशभूषाकार – शाहीद आमीर). अन्ना सिंग (१९४२ अ लव्ह स्टोरी), मनीष मल्होत्रा, सव्यसाची मुखर्जी (ब्लॅक, गुजारिश), नीता लुल्ला (जोधा अकबर) हे हिंदी चित्रपट सृष्टीतील आताच्या काळातील नामांकित वेशभूषाकार /फॅशन डिझायनर आहेत. चित्रपटातील प्रत्येक पात्राचे व्यक्तिमत्त्व त्याच्या वेशभूषेवरून दिसते. गॉडफादर चित्रपटाच्या सुरुवातीला मार्लन ब्रांडोच्या अंधाऱ्या खोलीमध्ये सर्वांचे काळ्या रंगाचे कोट लक्षवेधी आहेत. त्याचवेळी बाहेरच्या बाजूला समारंभामध्ये अनेकांचे वेगवेगळ्या रंगांची वेशभूषा दिसते परंतु ग्रुप फोटो काढताना अल पचिनोचा वेगळा वेश बरेच काही सांगून जातो. वेशभूषाकाराचा मानसशास्त्राचा अभ्यासही उत्तम असावा लागतो. म्हणूनच हर (Her) चित्रपटात नायकाचे भडक लाल रंगाचे शर्ट उठून दिसतात. अर्थात वेशभूषाकार दिग्दर्शकाबरोबर चर्चा करून प्रत्येक पात्रांच्या वेशभूषेचे निर्णय घेत असतात. ऐतिहासिक चित्रपटामध्ये वेशभूषाकाराला त्या काळातील उपलब्ध साधनांचा विचार करावा लागतो तर भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या मेट्रिक्ससारख्या चित्रपटामध्ये कल्पकता आणि सर्जनशीलता यांचा संगम घडवून आणावा लागतो. ग्लॅडिएटरसारख्या चित्रपटांकरिता वेशभूषा करताना ग्रीक संस्कृती, तेव्हाचे राजे-रजवाडे आणि त्या काळच्या गुलाम पद्धतीचा अभ्यास करावा लागतो. दी आर्टिस्ट (२०११), दी अॅव्हिएटर (२००४), शिकागो (२००२), टायटॅनिक (१९९७), द लास्ट एम्परर (१९८७), अॅमेड्यूअस (१९८४) हे चित्रपट भूतकाळातील ठरावीक काळ आपल्यासमोर उभा करतात. त्यावेळची केशभूषा, मेकअप, वेशभूषा करण्याचे आव्हान त्या चित्रपटाच्या वेशभूषाकारांनी पेलले आणि ऑस्कर पटकावले. म्हणूनच चित्रपट संपल्यावर श्रेयनामावली बघावी आणि प्रॉडक्शन डिझायनर – कॉस्च्युम डिझायनरला दाद द्यावी. -------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com