ऐकावे ते नवलच..! प्लॅस्टिक कमी करण्यासाठी प्लॅस्टिक खाणाऱ्या जीवाची निर्मिती.?

हे प्रदूषण पाण्यातील सजीवांच्या जीवावरच उठत आहे. चुकून किंवा अनवधानानं प्लॅस्टिक त्यांच्या पोटात गेल्यास त्यांचा जीव जाण्याचा प्रसंग येतो..
Plastic waste in sea
Plastic waste in seaEsakal

कहाण्या वारशांच्या : डॉ. बाळ फोंडके

प्लॅस्टिकचा खाद्य म्हणून वापर करण्यासाठी नायट्रोजेन्स आपल्या वारशाचा उपयोग करू शकत नव्हतं. मग वैज्ञानिकांनी प्लास्मिडला नायट्रोजेन्सच्या पेशींमध्ये प्रस्थापित केलं. आता त्यातल्या या प्लास्मिडमधील परकीय पण स्थाईक झालेल्या वारशामुळं त्यालाही प्लॅस्टिकवर गुजराण करणं शक्य झालं होतं.

मुंबईतील मिठी नदीची समस्या ही खरंतर आपल्या देशातल्या अनेक ठिकाणांची प्रातिनिधिक समस्या आहे. प्लॅस्टिकच्या वस्तू त्या नदीत टाकल्यामुळं तिच्या प्रदूषणात खूप मोठी वाढ झाली आहे.

प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. आम जनतेला त्या दृष्टीनं आवाहनही केलं गेलं आहे. पण आपण त्या बाबतीत अतिशय निष्काळजीपणा, खरंतर बेफिकिरी, दाखवत त्या बंदीला धूप घालत नाही.

परिणामी जागोजागी तशा पिशव्या, बाटल्या, इतर लहानसहान वस्तू यांचा कचरा साठून राहतो. पर्यावरण दूषित करतो.

नद्यांमधून हा कचरा वाहून समुद्रात जातो. भरतीच्या वेळेस तो किनाऱ्यावर वाहून येतो. चौपाट्यांवर त्यांचा खच पडलेला दिसतो. त्या चौपाट्यांवर हवा खायला जमलेली मंडळी त्यात भरच घालत असतात.

हे प्रदूषण पाण्यातील सजीवांच्या जीवावरच उठत आहे. चुकून किंवा अनवधानानं प्लॅस्टिक त्यांच्या पोटात गेल्यास त्यांचा जीव जाण्याचा प्रसंग येतो. जमिनीवर साठलेल्या प्लॅस्टिकची उचलबांगडी करणं कष्टाचं असलं तरी सोपं आहे.

वास्तविक ती पाळी येऊच न देणं हा त्याच्यावरचा खराखुरा उपाय आहे. पण नद्या किंवा सागर यांच्यात साठलेल्या प्लॅस्टिकचा निचरा करणं त्याहून कितीतरी पटीनं कठीण आहे. त्याचा बंदोबस्त कसा करायचा?

इतर अनेक सेंद्रिय पदार्थांचं विघटन जीवाणूंकडून होत असतं. अगदी सजीवांच्या कलेवरांनाही जीवाणू त्यांच्या घटकात रूपांतरित करतात. पण प्लॅस्टिक हा तसा विघटनशील पदार्थ नसल्यामुळं त्यांचाही निरुपाय होतो.

यावर तोडगा म्हणून ज्या प्लॅस्टिकचं असंच जीवाणूंकडून विघटन होईल अशा प्लॅस्टिकची निर्मिती करण्याचे काही प्रयत्न होत आहेत. पण विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकचं काय करायचं हा प्रश्न प्रशासनासमोर आ वासून उभा राहतोच.

आता त्यांच्या मदतीला अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलायना स्टेट युनिव्हर्सिटीतले काही वैज्ञानिक आले आहेत. त्यासाठी त्या प्लॅस्टिकचं अवस्थांतर न करता काही जीवाणूंनाच त्यांच्यावर हमला करण्याची क्षमता बहाल करण्याचा विचार त्यांनी केला.

वास्तविक या जीवाणूंच्या निसर्गानं दिलेल्या जनुकीय वारशात ती क्षमता नसते. पण आता जनुकांचं संपादन करून त्यात हवे ते बदल करण्याचं तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळं निसर्गानं दिलेल्या वारशाच्या या त्रुटीवर मात का करता येऊ नये, असाच विचार या वैज्ञानिकांनी केला.

त्यासाठी त्यांनी दोन निरनिराळ्या कुळातल्या जीवाणूंना हाताशी धरलं आहे. त्यापैकी एक आहे, व्हिब्रिओ नायट्रोजेन्स. त्याचा अधिवास खाऱ्या पाण्यात असतो. शिवाय त्याची वाढही अतिशय वेगानं होते.

दुसरा गोड्या पाण्यात वावरणारा आय. साकेयेन्सिस. हा तर भलताच उपयोगी ठरला आहे. कारण प्लॅस्टिकची मोडतोड करणाऱ्या काही विकरांचं उत्पादन करण्याची क्षमता असणारा वारसा मुळातच त्याला मिळाला आहे.

त्यामुळं तो पेट प्रकारच्या प्लॅस्टिकवर ताव मारू शकतो. त्याचा खाद्य म्हणून वापर करू शकतो. त्या क्षमतेचाच कल्पक वापर करण्याचा मनसुबा वैज्ञानिकांनी बाळगला.

त्यांनी या साकेयेन्सिसचं जनुक असलेला डीएनए त्याच्यापासून अलग केला. तो त्यांनी प्लास्मिड या एक प्रकारच्या जैविक वाहनात बंदिस्त करून टाकला.

या प्लास्मिडची खासियत अशी, की त्याचा एखाद्या पेशीत शिरकाव करून घेतला, की ते त्या नव्या जागेत सुखेनैव तर नांदतंच, पण त्याच यजमान पेशीच्या यंत्रणेचा वापर करत आपल्या स्वतःच्या डीएनएची आज्ञा पाळून त्यापासून प्रथिनांची, निरनिराळ्या विकरांची, निर्मिती करून घेतं.

त्याच्या याच वैशिष्ट्याचा वापर करण्याचं ठरवून वैज्ञानिकांनी त्या प्लास्मिडला नायट्रोजेन्सच्या पेशींमध्ये प्रस्थापित केलं. या नव्या जागेत ते प्लास्मिड काम करू लागलं. नायट्रोजेन्सच्या वारशात नसलेल्या क्षमता त्याला बहाल करू शकलं.

कारण, प्लॅस्टिकचा खाद्य म्हणून वापर करण्यासाठी नायट्रोजेन्स आपल्या वारशाचा उपयोग करू शकत नव्हतं. पण आता त्यातल्या या प्लास्मिडमधील परकीय पण स्थाईक झालेल्या वारशामुळं त्यालाही प्लॅस्टिकवर गुजराण करणं शक्य झालं होतं.

Plastic waste in sea
Plastic Bottles : प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा पुनर्वापर करणे सुरक्षित आहे का?

ही किमया प्रयोगशाळेतील स्तरावर त्यांनी घडवून आणली असली तरी प्रत्यक्ष खाऱ्या पाण्याच्या जलाशयांमध्ये तिचा वापर करण्यासाठी बराच पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव या वैज्ञानिकांना आहे. त्यासाठी तीन समस्यांचं समाधान करणं आवश्यक असल्याची कल्पनाही त्यांना आहे.

नायट्रोजेन्सच्या वारशामधील कमतरतेवर मात करणारं हे तंत्रज्ञान अनोखं असलं तरी ते उसनं आहे. पाहुण्याकडून साप मारून घेण्यासारखं आहे. मुळातच त्या वारशालाच या कामाला का जुंपता येऊ नये, असा विचार हे वैज्ञानिक करत आहेत.

ते उद्दिष्ट जर साध्य करायचं तर सायकेन्सिसचा वारसा नायट्रोजेन्सला प्रदान करायला हवा. म्हणजे मग अशा परकीय मदतीवर अवलंबून न राहता स्वतःच ते करणं त्या जीवाणूला साध्य होईल. तसं केल्यानं एकंदरीतच हा उपाय अधिक परिणामकारक होईल.

अशा प्रकारचं वारसा प्रत्यारोपण करणं आता अशक्य राहिलेलं नाही. लवकरच तेही साध्य होईल असं दिसत आहे.

तरीही दुसरीच एक समस्या या वैज्ञानिकांना भेडसावत आहे. भलेही मूळ प्लॅस्टिक या जीवाणूंनी खाल्लं किंवा त्याचं विघटन केलं तरी त्यातून जे नवीनच पदार्थ निर्माण होतील, तेही प्रदूषणकारी ठरतील का? तसं झालं नाही तर दुधात साखर.

पण तसं झालं तर त्या उच्छिष्टांचा निचरा कसा करायचा याचाही विचार आतापासूनच करायला हवा. नाहीतर ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी परिस्थिती सामोरी यायची. रोगापेक्षा इलाजच भयंकर असं व्हायला नको. आपण करत असलेल्या संशोधनाचे कोणते परिणाम संभवतात याचा विचार वैज्ञानिक करत नाहीत.

ते फक्त आपल्या संशोधनातच मग्न होऊन राहतात, असा आरोप बऱ्याच वेळा केला जातो. त्यात संपूर्ण तथ्य नाही हे खरं असलं तरी सर्व सामान्यांमध्ये तशी समजूत आहे, यात शंका नाही. पण या वैज्ञानिकांनी मुळातच त्याचाही विचार करण्याची तत्परता दाखवलेली आहे.

त्यामुळं आता नायट्रोजेन्सनं या प्लॅस्टिकचा आपल्या आहारात उपयोग केल्यानंतर त्यातून कोणते नवीन टाकाऊ पदार्थ तयार होण्याची शक्यता आहे, यावर लक्ष केंद्रित करायला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांचा निचरा करण्याचे कोणते उपाय आहेत, याची चिकित्सा करता येईल.

तिसरा मुद्दा याचाच एक घटक म्हणूनही समोर आला आहे. रासायनिक उद्योगाला कच्चा माल म्हणून किंवा प्रक्रियेतील मध्यस्थ म्हणून वापरता येणारे काही पदार्थ अशा प्रकारच्या प्रक्रियेतून तयार करता येतील का, याकडेही लक्ष दिलं जात आहे. ते साध्य करता आलं तर मग, आमके आम और गुठलियोंकेही दाम’ अशी विन-विन स्थिती प्रस्थापित करता येईल.

------------------

Plastic waste in sea
Nashik Plastic Ban: प्लॅस्टिक कचरा विल्हेवाटीसाठी ‘पवई’ चे तंत्रज्ञान; खत प्रकल्पावर प्रतिदिन 30 टन कचरा संकलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com