

Dimethyl Ether DME fuel technology India
esakal
डायमिथिल ईथर हे एक कृत्रिमरित्या तयार केलेले इंधन असून ते जैव कचरा किंवा मिथेनॉलपासून तयार केले जाते. सामान्य तापमान असताना हा रंगहीन वायू असतो, परंतु उच्च दाबाखाली त्याचे द्रवात रूपांतर करता येते व त्याचा वापर एलपीजीसारखा करता येतो. यामार्फत पुढील आठ ते नऊ महिन्यांत एलपीजीला किमान सहा ते नऊ टक्के पर्याय उपलब्ध करून देण्याचे एनसीएलचे उद्दिष्ट आहे. हे तंत्रज्ञान केवळ पर्यायी इंधन नाही, तर भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी करणारे एक क्रांतिकारी पाऊल ठरेल यात शंका नाही.
आखाती देशांतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आज जगासमोर ऊर्जा संकट आक्राळविक्राळ रूप धारण करून उभे आहे. रशियासारख्या देशांकडून होणाऱ्या तेल पुरवठ्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचा फारसा तुटवडा भासत नसला, तरी घरगुती आणि व्यावसायिक उपयोगाच्या लिक्विड पेट्रोलियम गॅसच्या (एलपीजी) उपलब्धतेचे मोठे आव्हान देशासमोर आहे. भारताला आपली ६० टक्के एलपीजीची गरज आयातीतून भागवावी लागते. अशा कठीण समयी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (सीएसआयआर-एनसीएल) विकसित केलेले ‘डायमिथिल ईथर’ (डीएमई) हे तंत्रज्ञान देशाच्या ऊर्जासुरक्षेसाठी एक ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. विशेष म्हणजे, या तंत्रज्ञानाची पहिली महत्त्वपूर्ण चाहूल आणि त्यातील प्रगतीबाबतची सविस्तर बातमी सुमारे सहा वर्षांपूर्वी सकाळमध्ये प्रसिद्ध झाली होती, जी आज प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या उंबरठ्यावर आहे.
मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यांत चाकाच्या शोधाने आणि १८व्या शतकातील औद्योगिक क्रांतीने जीवाश्म इंधनाचा आधार दिला. आज वाहतूक, स्वयंपाक आणि शेती अशा सर्वच क्षेत्रांत इंधन हा कणा झाला आहे. मात्र, जीवाश्म इंधनाचे स्रोत मर्यादित असून त्यांच्यामुळे होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन आणि हवामान बदल हे मोठे संकट आहे. अशा वेळी शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जास्रोतांचा शोध घेणे अनिवार्य आहे. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) गेल्या दोन दशकांपासून पर्यायी इंधन स्रोतांवर संशोधन सुरू आहे. २००४पासून सुरू झालेले डायमिथिल ईथरवरील संशोधन आज प्रत्यक्ष औद्योगिक उत्पादनाच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. डीएमई प्रक्रिया तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ
डॉ. टी. राजा आणि त्यांच्या पथकाने केलेल्या संशोधनानुसार, डीएमईमुळे तातडीने ९ टक्के एलपीजीला पर्याय उपलब्ध होऊ शकतो. थोडे तांत्रिक बदल केल्यास हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत नेणे शक्य आहे.