

Diwali Chakli Recipe Tips
esakal
भाजणी कशी करायची? (पद्धत १)
वाढप
एक किलो भाजणी
साहित्य
चार कप तांदूळ, २ कप चणा डाळ, १ कप उडीद डाळ, अर्धा कप जिरे, अर्धा कप जाड पोहे, १ टीस्पून मेथी दाणे.
कृती
प्रथम तांदूळ निवडून घ्यावा. डाळीमध्ये असणारे खडे काढून टाकावेत. आता तांदूळ, चणा डाळ, उडीद डाळ वेगवेगळी धुऊन घ्यावी. मग एका स्वच्छ मलमलच्या कापडावर तांदूळ, चणा डाळ व उडीद डाळ वेगवेगळी पसरून ठेवावी. डाळी व तांदूळ सावलीतच पसरून ठेवावेत. कमीतकमी सात-आठ तास तरी पसरून ठेवावेत. कढई गरम करून त्यामध्ये डाळी व तांदूळ भाजून घ्यावेत व एका पेपरवर पसरवून ठेवावेत. आता पोहे, जिरे व मेथी दाणे वेगवेगळे भाजून घ्यावेत. थंड झाल्यावर भाजणी बारीक दळून आणावी.
टीप्स
भाजणासाठी बुटका तांदूळ वापरावा. तांदूळ व डाळी धुऊन घ्याव्यात. पोहे, जिरे व मेथ्या धुवायची गरज नाही, ते कच्चेच भाजून घ्यावे. भाजणी दळून आणल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी.
चकली करताना लोणी, तेल किंवा तुपाचे मोहन घ्यावे, म्हणजे चकली छान खुशखुशीत होते. पीठ मळताना मिरची पावडर फार लाल रंगाची वापरू नये, त्याने चकलीचा रंग बदलतो. पीठ भिजवताना गरम पाणी वापरावे. पीठ खूप घट्ट किंवा सैल मळू नये, नाहीतर चकली कडकडीत होते किंवा मऊ पडते अथवा तळताना विरघळते.मळलेले पीठ थोडे थोडे घेऊन पाण्याचा हात लावून चांगले मळून घ्यावे व एका प्लॅस्टिकवर चकल्या पाडाव्यात. चकली तळताना अगोदर तेल नीट तापले आहे याची खात्री करून घ्यावी. तेल तापल्यावर चकली सोडताना विस्तव मोठा ठेवावा. चकली तेलात सोडली, की लगेच विस्तव मंद करावा व दोन्ही बाजूंनी चकली छान तळून घ्यावी. चकल्या तळल्यावर त्या एका प्लेटमध्ये काढाव्यात. मग चाळणीवर एक मोठा पेपर ठेवून गरम चकल्या त्या पेपरवर थंड करायला ठेवाव्यात आणि नंतर घट्ट झाकणाच्या जर्मनच्या डब्यात चकल्या ठेवाव्यात.
वाढप
४० चकल्या
साहित्य
चार कप चकली भाजणी (घरी करायची असल्यास वरची पद्धत वापरावी), १ टेबलस्पून लाल मिरची पावडर,
१ टेबलस्पून ओवा, ३ टेबलस्पून तीळ, ४ टेबलस्पून तेल/तूप/बटर (कडकडीत), दीड टीस्पून मीठ, २ कप पाणी (उकळते), तळण्यासाठी तेल.
कृती
भाजणीच्या पिठात लाल मिरची पावडर, ओवा, तीळ घालून चांगले मिसळून घ्यावे. मग त्यामध्ये कडकडीत मोहन घालून मिक्स करून घ्यावे. आता एका मोठ्या भांड्यात दोन कप पाणी उकळून घ्यावे. त्यामध्ये मीठ घालावे आणि लगेच भाजणी घालून मिक्स करावे. मग थोडा वेळ झाकून ठेवावे म्हणजे भाजणीचे पीठ चांगले फुगून येईल. नंतर पाण्याचा हात वापरून पीठ चांगले मळून घ्यावे. मग सोऱ्याला पाण्याचा व तेलाचा हात लावून सोऱ्यात पीठ भरून प्रथम प्लॅस्टिकवर चकल्या पाडाव्यात. कढईमध्ये तेल चांगले गरम करून चकल्या छान तळून घाव्यात.
वाढप
६० चकल्या
साहित्य
पाच फुलपात्र भाजणीचे पीठ, अर्धी वाटी तेल, ४ टीस्पून लाल मिरची पावडर, ४ टीस्पून मीठ, २ टेबलस्पून तीळ, तळण्यासाठी तेल.
कृती
एका भांड्यात दोन फुलपात्र पाणी गरम करायला ठेवावे. त्यामध्ये अर्धी वाटी तेल, तिखट, मीठ घालून एक उकळी आणावी. उकळी आल्यावर लगेच गॅस बंद करून पाच फुलपात्र भाजणीचे पीठ घालून मिक्स करावे. मग त्यामध्ये एक फुलपात्र गार पाणी घालून त्यावर लगेच झाकण ठेवावे. एक तासानंतर त्यामध्ये दोन टेबलस्पून तीळ घालून थोडेसे पाणी वापरून भाजणी चांगली मळून घ्यावी. नंतर मळून घेतलेले पीठ सोऱ्यामध्ये घालून चकल्या पाडाव्यात. कढईमध्ये तेल चांगले गरम करून त्यामध्ये चकल्या तळून घ्याव्यात. विस्तव मध्यम ठेवावा. चकल्या तळून झाल्यावर पेपरवर ठेवाव्यात, त्यामुळे तेल निथळून जाते. चकलीची चव घेऊन मग बाकीच्या चकल्याही तळून घ्याव्यात. सर्व चकल्या तळून झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवाव्यात.